मित्सुबिशी : दुसऱ्या महायुद्धापर्यंत जपानची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर नियंत्रित करणाऱ्या झैबात्सूंपैकी (एक-कुटुंबिय नियंत्रण व संचालन असलेल्या कार्टेलस्वरूपी मोठ्या भांडवलशाही व्यावसायिक कंपन्या) मित्सुईखालोखालची दुसऱ्या क्रमाकांची व्यापारी,औद्योगिक व वित्तीय संघटना.

मेजी राज्यसत्तेच्या पुनः स्थापनेनंतर (१८६८) जपानमधील सर्व प्रां तिक राज्ये खालसा करण्यात आली,त्यांमध्ये टोसा हे प्रांतिक राज्य होते. या राज्याच्या अखत्यारीतील कापूर,चहा, रेशीम,लाकूड,कोळसा इत्यादींचा व्यापारव्यवसाय करणारी कंपनी,तसेच ११ जहाजे असलेली एक जहाजकंपनी यांचे संचालन इवासाकी यातारो (१८३५–८५) याच्याकडे सोपविण्यात आले. इवासाकीने या कंपनीची नागासाकी येथील शाखा आपल्या प्रवर्तकीय आणि व्यापारकुशल बुद्धिमत्तेमुळे नावारूपास आणली होती. आपल्या हुशारीने व राजकीय संघटनांच्या साहाय्याने इवासाकीने निमसरकारी कंपनीचे एका खाजगी उपक्रमात रूपांतर करून त्या उपक्रमाला १८७३ मध्ये ‘मित्सुबिशी व्यापारी कंपनी’ (मित्सुबिशी शोकाई) असे नाव दिले. त्या काळी शिकोकू  प्रांतात ‘मित्सुबिशी’ (तीन हिऱ्यांच्या आकाराचे) हे चिन्ह प्रचलित व लोकप्रिय असल्याने आपल्या व्यवसायालाही इवासाकीने,स्वतःच्या कौटुंबिक नावाचा वापर करण्याऐवजी, मित्सुबिशी हेच नाव कायम केले. ‘तैवान मोहिमे’ मध्ये (१८७४) सरकारी फौजांची वाहतूक करण्याकरिता इवासाकीस शासनाने आणखी १३ जहाजे उपलब्ध करून दिली. त्यामुळे १८७५ मध्ये कंपनीचे नाव ‘मित्सुबिशी स्टीमशिप कंपनी’ असे ठेवण्यात आले. त्याच वर्षी या कंपनीला जलवाहतुकीची सनदही मिळाली. १८७७ मध्ये क्यूशू प्रांतातील ‘सात्सूमा बंडा’ चा बीमोड करण्याच्या मोहिमेकरिता शासनाने इवासाकीला आणखी काही जहाजे व अर्थसाहाय्य उपलब्ध केले. यायोगे जवळवळ सर्व जपानी जहाजताफा मित्सुबिशीच्या ताब्यात आला. ही परिस्थिती मित्सुई समूहाला न पटल्याने, त्याने शासनाला विनंती करून इतर काही कंपन्यांच्या सहकार्याने ‘क्योडो ट्रॅन्स्पोर्ट कंपनी’ ही दुसरी जहाजकंपनी स्थापन केली. या दोन्ही जहाजकंपन्यांच्या निकराच्या स्पर्धेमुळे त्या दिवाळखोरीच्या काठावर उभ्या राहिल्याचे चित्र दिसू लागले. त्यामुळे १८८५ मध्ये दोन्ही कंपन्यांचे ‘निप्पॉन यूझेन कंपनी’ या नावाने विलीनीकरण करण्यात आले. ही नवी कंपनी वस्तुतः  मित्सुबिशीच्या नियंत्रणाखालीच आली.

मेजी युगातच स्थापन झाल्याने मित्सुबिशी कंपनीचे नियंत्रण इवासाकी यातारो व त्याचा धाकटा भाऊ इवासाकी या नोसुके (१८५१–१९०८) या दोन भावांच्या कुटुंबांकडेच आलटून-पालटून जात राहिले. १८८५ मध्ये यातारोच्या मृत्यूनंतर यानोसुकेने कंपनीची धुरा सांभाळली. १८९६ मध्ये यानोसुकेनंतर यातारोचा मुलगा हिसाया याने कंपनीचे संचालन केले त्याच्यानंतर १९१६ मध्ये कंपनीची व्यवस्थापकीय जबाबदारी यानोसुकेचा मुलगा इवासाकी कोयाटा याच्याकडे गेली. तो मृत्यूपर्यंत (१९४५)मित्सुबिशीचा अध्यक्ष होता.

जहाजवाहतूक व्यवसायाचा ओनामा करून तेथेचे न थांबता, इवासाकी यातारोने लवकरच आपल्या उपक्रमाच्या विविधांगी-वित्तीय व औद्योगिक-विस्तारास प्रारंभ केला. १८७३ मध्ये त्याने ‘योशिओका’ ही तांब्याची पहिली खाण खरीदली १८८० मध्ये त्याने सावकारी, विनिमय व वखारव्यवसाय सुरू केले तर १८८१ मध्ये ‘ताकाशीमा’ ही पहिली कोळसाखाण विकत घेतली. १८८५ मध्ये आर्थिक आपत्तिग्रस्त ११९ व्या राष्ट्रीय बॅंकेचे व्यवस्थापन इवासाकी यानोसुकेने स्वतः कडे घेतले. दहावर्षांनी हीच बँ क मित्सुबिशी उद्योगसमूहाचा वित्तिय आधार बनली. १८८४ मध्ये शासनाने मित्सुबिशीला ‘नागासाकी शिपयार्ड्‌स’ हा जहाजे बांधण्याचा कारखाना भाडेपट्‌ट्याने दिल्यामुळे मित्सुबिशीचे भविष्य फारच उज्ज्वल ठरले.

मेजी शासनाने १८८७मध्ये आपल्या अखत्यारीतील काही कारखाने, खाणी, इतर उद्योग विकावयाचे ठरविले आणि त्याचा फायदा मित्सुबिशी कंपनीने तात्काळ घेतला. त्याच वर्षी कंपनीने स्थावरसंपदा व्यवसायास प्रारंभ केला. द्रव्याच्या गरजेपोटी शासनाने टोकिओमधील ‘राजप्रासादा’ समोरील मोठा भूखंड मित्सुबिशीस विकला. त्याचेच पुढे मित्सुबिशींनी ‘मारुनोउची व्यवसाय जिल्ह्यातरूपांतर केले.


यानोसुकेने १८९३ मध्ये मित्सुबिशी कंपनीचे संघटन केले. विविध मित्सुबिशी उपक्रम या मर्यादित भागीदारी कंपनीचे विभाग बनले. पहिल्या महायुद्धानंतरच्या काळात या विभागांच्या स्वतंत्र कंपन्या बनविण्यात आल्या. महत्त्वाच्या मित्सुबिशी उपक्रमांचा सु. पाव शतक एवढा काळ भागीदारी कंपनीच्या विभागांच्या रूपाने विकास होत राहिल्याने, मित्सुबिशी उद्योसमूहाच्या आर्थिक क्रियांचे एकात्मीकरण झाल्याचे आढळते. याच्या नेमकी उलट अवस्था मित्सुई उद्योगसमूहाची होती. मित्सुई सूत्रधारी कंपनीने (नियंत्रक कंपनीने) आपल्या महत्त्वाच्या गौण कंपन्यांच्या कार्याचे संयोजन (समन्वयन) केल्याचे आढळत नाही कारण सामान्यतः या सर्व गौण कंपन्या सूत्रधारी कंपनीच्या अखत्यारीबाहेर विकसित होत गेल्या.

इवासाकी कोयटाच्या अध्यक्षीय कारकीर्दीत, मित्सुबिशी समूहाने स्वतंत्र संयुक्त भांडवल कंपन्या स्थापन केल्या. त्यांच्यानंतर नियंत्रण बव्हंशी भागधारकांचेच होते. १९१७–१९ यांदरम्यान मित्सुबिशी उद्योगसमूहातून पुढील सात गौण कंपन्या स्वतंत्र विकासार्थ वेगळ्या करण्यात आल्या: (१) मित्सुबिशी जहाजबांधणी व आभियांत्रिकी, (२)लोखंड व पोलाद,(३) खाणकाम,(४)व्यापार,(५) बॅंकिंग, (६)सागरी व आग विमाव्यवसाय आणि (७)वखारव्यवसाय. १९१९–२१ यांदरम्यान पहिल्या गौण कंपनीतून ‘मित्सुबिशी इंटर्नल कंबश्चन एंजिन’ (पुढे ‘मित्सुबिशी एअरक्राफ्ट’ या नवीन नावाने अस्तित्वात आली) व ‘मित्सुबिशी इलेक्ट्रिक  कॉर्पोरेशन’ अशा दोन कंपन्या स्वतंत्रपणे काम पाहू लागल्या. याच सुमारास, मित्सुबिशी समूहाने न्यास व्यवसाय,खनिज तेल परिष्करण,विमाननिर्मिती व रसायने या उद्योगांच्या विकासाकडे आपले लक्ष वळविले. १९३४मध्ये ‘मित्सुबिशी एअरक्रा फ्ट’व ‘मित्सुबिशी शिपबिल्डिंग अँड एंजिनिअरिंग’ दोन्ही स्वतंत्र कंपन्याचे एकत्रीकरण (विलीनीकरण) करण्यात येऊन ‘मित्सुबिशी हेवी इंडस्ट्रीज’ अशी अवजड उद्योगनिर्मिती कंपनी अस्तिवात आली. दोन मित्सुबिशी उद्योगांनी अमेरिकन तंत्रज्ञान आत्मसात करण्याकरिता दोन अमेरिकन कंपन्यांबरोबर संयुक्त भागभांडवलाचा करार केला. ‘मित्सुबिशी इलेक्ट्रि क कॉर्पोरेशन’ ने ‘वेस्टिंगहाउस’ ला आपली ९·८% भागीदारी देऊ केली,तर ‘मित्सुबिशी ऑइल कंपनी’मध्ये ‘टाइडवॉटर ऑइल कॉर्पोरेशन’ ने ५०% भागीदारी मिळविली.

अशाप्रकारे विस्तार व विविधांगी विकास या धोरणामुळे १९२८च्या सुमारास मित्सुबिशी ही प्रचंड ‘झैबात्सू’ गणण्यात येऊ लागली. त्यावर्षी ‘मित्सुबिशी लि.’ या सूत्रधारी कंपनीचे भांडवल १,२०० लक्ष येन आणि तिच्या नियंत्रणाखालील दहा प्रथम क्रमांकाच्या गौण कंपन्या, ११ द्वितीय क्रमांकाच्या गौण कंपन्या आणि अनेक उपकंपन्या या सर्वांचे मिळून भरणा झालेले भांडवल ५,९०० येन होते. दुसऱ्या महायुद्धाच्या तयारीकरिता आणि प्रत्यक्ष महायुद्धकाळात,मित्सुबिशी कंपन्यांची, अंतर्गत अर्थव्यवस्था आणि जपानी साम्राज्य अशा दोन्ही दृष्टींनी, फार मोठ्या प्रमाणात वाढ होत गेली. मित्सुबिशी कंपनीकडे देशाला लष्करी शस्त्रसंभार पुरविण्याचे प्रमुख काम होते. ‘झीरो फायटर एअरप्लेन’ हे तिचे त्या काळातील सर्वोत्कृष्ट उत्पादन होते.दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर, मित्सुबिशी कंपनीच्या नियंत्रणाखाली २०९उपक्रम कार्य करीत होते. सूत्रधारी कंपनीचे भरणा झालेले भांडवल २,४०० कोटी येन, तर सर्व गौण कंपन्यांचे एकूण भरणा भांडवल ३१०कोटी येन होते.

दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस जपानच्या शरणागतीनंतर १९४६मध्ये दोस्त राष्ट्रांच्या प्रशासकांनी मित्सुबिशी उद्योगसमूहाचे, इतर झैबात्सूंप्रमाणेच, विघटन करण्याचा आदेश दिला. ह्यामागे मूलभूत आर्थिक क्रियांची मालकी, लोकशाहीच्या तत्त्वांनुसार, अनेकजणांत विभागली जावी, हा प्रमुख हेतू होता. १९५१ मध्ये जपानने शांतता करारावर सह्या केल्यावर, जपानमध्ये झैबात्सू संघटनेप्रमाणेच उद्योगधंद्यांचे पुनर्गठन करण्याची प्रवृत्ती बळावू लागली. तीमागे जपानची बाजारपेठेतील स्पर्धाक्षमता अधिक वाढेल असा विश्वास होता.


सांप्रत जपानमधील प्रमुख उद्योगसमूहांमध्ये मित्सुबिशी उद्योगसमूहाचा फार वरचा क्रम लागतो. या उद्योगसमूहात अनेक कंपन्या असून (१९७१ सालानुसार या समूहात सु. ८५ उपक्रम होते), त्यांपैकी मोठ्या कंपन्या या बहुराष्ट्रीय निगमच असून त्यांची मुख्यालये टोकिओमध्ये व उप (गौण) कंपन्या समुद्रपार आहेतकाही निगमांनी अन्य देशांतील कंपन्यांबरोबर संयुक्त प्रकल्प उभारलेले आहेत. जहाजबांधणी, अवजड यंत्रसामग्री, मोटारी, विमाने, बांधकामसामग्री, प्रशीतक, वातानुकूलित सामग्री, विद्युत्‌रेल्वे सामग्री, इलेक्ट्रॉनिकीय व आण्विक सामग्री, विविध धातू, काचसामान, रसायने, औषधे, खनिज तेल पदार्थ, कागद, कॅमेरे व छायाचित्रण साधने, रेयॉन, कृत्रिम धाग्यांचे कापड, अल्कोहॉ ल व मद्ये,प्लॅस्टिके अशा विविध वस्तूंचे उत्पादन मित्सुबिशीतर्फे होत असून बँकिंग, विमा, अंतर्गत व विदेश व्यापार यांकरिताही या समूहाच्या कंपन्या आहेत.

‘मित्सुबिशी बँ क’ही जपानमधील चौथ्या क्रमाकांची व्यापारी बँ क असून तिची स्थापना इवासकी यातारोने १८८० मध्ये ‘मित्सुबिशी एक्श्चेंज ऑफिस’ या नावाने केली. १९१९ मध्ये सांप्रतचे नाव पडले. १९४८–५३ यादरम्यान हिचे नाव ‘छियोडा बँक’असे होते. १९५३पासून ती पूर्ववत्‌ मित्सुबिशी बँ क म्हणून ओळखली जाऊ लागली. उद्योग, व्यापार यांना  वित्तप्रबंधपरदेशी हुंडणावळीत सहभाग विकसनशील राष्ट्रे तसेच विविध आंतरराष्ट्रीय संस्था ह्यांना कर्जपुरवठा इ. कार्ये ही बँ क करते. १९८२ मध्ये हिच्या ८ समुद्रपारशाखा, ५उपकंपन्या आणि अन्य देशातील २१ शहरांत प्रातिनिधिक कचे ऱ्या कार्य करीत होत्या. जपानमध्ये ह्या बँ केच्या २०५ शाखा आहेत.

‘मित्सुबिशी केमिकल इंडस्ट्रीज’ ही मित्सुबिशी समूहातील एक प्रमुख उत्पादनसंस्था गणली जाते. देशांतर्गत रासायनिक पदार्थांच्या एकूण उत्पादनात हिचा सर्वाधिक हिस्सा आहे. ‘मित्सुबिशी माइनिंग अँड सिमेंट कंपनी’ व ‘आसाही ग्ला स कंपनी’ यांच्या संयुक्त व समान भागभांडवलावर १९३४ मध्ये हिची स्थापना झाली. प्रथम कोल रसायन पदार्थां ची उत्पादक कंपनी, दुसऱ्या महायुद्धकाळापासून कोक,टार पदार्थ, रंजकद्रव्ये व उर्वरके यांचे उत्पादन करू लागली. १९६५ पासून तिचा खनिजतेल रसायनक्षेत्रात प्रवेश झाला. कंपनीची एकूण पाच सयंत्रे असून किटाक्यूशू शहरात ‘कुरोसाकी’ हे प्रधान संयंत्र आहे. योकोहामा शहरात कंपनीचे मोठे संशोधन केंद्र असून त्याशिवाय ‘मित्सुबिशी कासेई जीवविज्ञान संस्था’ जगातील या प्रकारच्या सर्वांत मोठ्या संस्थांपैकी एक आहे. संशोधन व विकास यांच्या साहाय्याने कंपनीने औषधे, वैद्यकिय शुश्रूषा उपकरणे व रसायने,विश्लेषण उपकरणे तसेच माहिती-प्रक्रिया उपकरणे अशी विविधांगी निर्मिती सुरू केली आहे. १९८२ मध्ये अमेरिकेची संयुक्त संस्थाने व प. जर्मनी यांसहित पाच देशांत कंपनीची संपर्क कार्यालये असून ब्राझील,मलेशिया,नॉर्वे व अमेरिकेची संयुक्त संस्थाने या देशात संयुक्त उपक्रम कार्यवाहीत होते.

‘मित्सुबिशी कॉर्पोरेशन’ (मित्सुबिशी शोजी). मित्सुबिशी व्यापार कंपनी. संबंध जगभर हिचे कार्य चालू आहे. स्थापना १८७०‘मित्सुबिशी ट्रेडिंग कंपनी’ हे नाव बदलून सांप्रतचे नाव १९७१ पासून. ही कंपनी विविध प्रकारच्या सु. ८२,५०० वस्तूंचा व्यापार करते. देशांतर्गत ६० व समुद्रपार १३० कार्यालयांच्या साहाय्याने या कंपनीचे दूरसंचारण जाळे सु. ४·५५ लक्ष किमी. पसरलेले आहे. देशांतर्गत व्यापार उलाढालीमध्ये या कंपनीचा हिस्सा ४१·७ % आयातीमध्ये ३२·९%, निर्यातीत १७·६% आणि जपानबाहेरील देशांमध्ये ७·८% असा आहे. या कंपनीचे पुढीलप्रमाणे विभाग आहेत :(१)प्रकल्प विकास व बांधकाम, (२)इंधन, (३) लोहधातू, (४) अलोह धातू,(५)यंत्रे,(६) अन्न, (७) कापड व वस्त्रे,(८)रसायने व (९) सर्वसाधारण वस्तू. खनिज तेल संशोधन व उत्पादन, खनिज संपत्ति-विकास, विमानतळ निर्मिती, रसायन सयंत्र निर्मिती या क्षेत्रांत ही कंपनी संघटक म्हणून सहकार्य देते. ‘मित्सुबिशी इलेक्ट्रि क कॉर्पोरेशन’ (स्था. १९२१) – अवजड विद्युत्‌ यंत्रे, गृहोपयोगी विद्युत्‌ उपकरणे, इलेक्ट्रॉनिकीय साधने व उपकरणे तसेच औद्योगिक यंत्रे आणि अवजारे यांची उत्पादक कंपनी. या कंपनीची विद्युत्‌ प्रेषणासाठी लागणाऱ्या रोहित्रांची निर्मिती जगद्‌विख्यात आहे. दूरचित्रवाणी संच, प्रशीतक, वातानुकूलन यंत्रे व इतर गृहोपयोगी वस्तूंच्या उत्पादनामध्ये या कंपनीची जगभर प्रसिद्धी आहे. अर्धसंवाहक, संदेशवहनयंत्रे, तसेच इतर इलेकाट्रॉनिकीय वस्तूंच्या निर्मितीनंतर १९७५ पासून कंपनीने उत्पादन सयंत्रांची निर्यात तसेच अतिकार्याक्षम सौरबॅटरी यांचे उत्पादन व विकास यांवर विशेष भर दिला आहे.


कंपनीचे संयुक्त प्रकल्प भारत, थायलंड, तैवान,दक्षिण कोरिया या देशांत १९६० च्या पुढील काळात उभारण्यात आले. १९८१ मध्ये कंपनीच्या साठांहून अधिक निर्मिती व विक्री गौण कंपन्या आशिया, ऑस्ट्रेलिया, यूरोप, अमेरिका व लॅटिन अमेरिका या पंचखंडात कार्य करीत होत्या. ‘मित्सुबिशी इस्टेट कंपनी’ (स्था. १९७१) भूविकास व इमारतींचे बांधकाम करणारी कंपनी. अशा प्रकारच्या देशातील तीन मोठ्या कंपन्यांपैकी एक. ‘मित्सुबिशी गॅस केमिकल कंपनी'(स्था. १९५१) रसायनांची निर्मिती करणारी कंपनी. रसायननिर्मितीसाठी कच्चा माल म्हणून नैसर्गिक वायूचा वापर करणारी जपानमधील पहिली कंपनी, मेथॅनॉल, फॉर्मलिन, अमोनिया, यूरिया, उर्वरक, प्लॅस्टिकी कारक, हायड्रोजन संयुगे, संश्लेषक रेझिने ही कंपनीची प्रमुख उत्पादने. ‘मित्सुबिशी हेवी इंडस्ट्रीज'(स्था. १८७५). अवजड यंत्रसामग्रीची निर्मिती करणारी जपानमधील सर्वां त मोठी कंपनी. संरक्षण सामग्री व साहित्य यांची उत्पादक म्हणून तसेच मित्सुबिशी उद्योगसमूहाची केंद्रस्थित कंपन्यांपैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. जहाजबांधणी, सयंत्र-निर्मिती, एंजिनांची निर्मिती, बांधकाम साहित्य, वातानुकूलनसामग्री व उपकरणे,यंत्रावजारे,प्रदूषण नियंत्रक उपकरणे तसेच विमाने यांची निर्मिती ही कंपनी करते. टोकिओमधील प्रधान कार्यालयाशिवाय, जपानमध्ये या कंपनीची ६ कार्यालये व १२ उत्पादन संयंत्रे, ७ समुद्रपार गौण कंपन्या व संयुक्त प्रकल्प आहेत.

‘मित्सुबिशी मेटल कॉर्पोरेशन’ (१८७३)ही तांबे,जस्त,शिसे, सोने, चांदी इ. धातूंचे प्रगलन व प्रक्रिया करणारी कंपनी आहे.‘मित्सुबिशी माइनिंग अँड सिमेंट कंपनी'(१९७३) (प्रारंभीची ‘मित्सुबिशी माइनिंग कंपनी’- १९१८)ही सिमेंट व अन्य बांधकाम सामग्रीचे उत्पादन, तर खनिज तेल, कोळसा आणि लोहखनिज यांचे ती समन्वेषणही करते. ‘मित्सुबिशी ऑइल कंपनी’ (१९३१) खनिज तेलाचे परिष्करण व विक्री ‘मित्सुबिशी पेपर मिल्स’ (१८९८)ही कागद लगदा,कागद, छायाचित्रण कागद,माहिती प्रक्रिया, आरेख्यक कलासाहित्य इत्यादींचे उत्पादन करते. ‘मित्सुबिशी रेयॉन कंपनी’ (१९३३) ही संश्लिष्ट,रासायनिक तसेच ॲक्रिलिक धागे व संश्लिष्ट रेझिने यांचे उत्पादन करते. ‘मित्सुबिशी स्टील मॅन्युफॅक्चरिंग कंपनी’ (१९४९) ही विशेष प्रकारचे पोलाद,घडीव व ओतीव पोलाद,स्पिंग,यांत्रिक सुटे भाग यांचे उत्पादन करते. ‘मित्सुबिशी पेट्रोकेमिकल कंपनी’ (१९५६) ही एथेलिनचे सर्वाधिक उत्पादन करणारी जपानमधील सर्वांत मोठी कंपनी आहे. ‘मित्सुबिशी मोटर्स कॉर्पोरेशन’ (१९७०) ही कंपनी मोटारगाड्या,ट्रक,बसगाड्या आणि त्यांचे घटक व सुटे भाग यांचे उत्पादन करते. या कंपनीने ध्वनिप्रदूषण नियंत्रण,अतिशय कमी प्रमाणात वाहन-कंपने यांसारख्या अतिशय उच्च दर्जाच्या तांत्रिक बाबींत अद्ययावतता प्राप्त केली आहे. मित्सुबिशी मो टर्सच्या अमेरिका, यूरोप, आस्ट्रेलिया, आग्नेय आशियाई राष्ट्रे यांमध्ये गौण कंपन्या आहेत. जपानमधील विज्ञान,शिक्षण, संस्कृती व कल्याण यांच्या संवर्धन-विकासार्थ मित्सुबिशी समूहातील ४५ कंपन्यांनी १९६९ मध्ये ‘मित्सुबिशी प्रतिष्ठान’स्थापिले. देशांतर्गत समाजकल्याण,विज्ञान आणि वैद्यक यांच्या प्रगतीस हातभार लावणे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यक्ती व संस्था यांना कला व मानव्य विद्या यांच्या विकासार्थ अनुदाने देणे,ही कार्ये हे प्रतिष्ठान पार पाडते. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध शासकीय संस्था व उद्योग यांच्या आर्थिक, राजकीय, औद्योगिक, व्यवस्था परकीय बाबींच्या गरजांची पूर्तता करणे तसेच तांत्रिक-आर्थिक अहवाल,सामाजिक अभियांत्रिकी, तंत्रविद्या, प्रदत्त संस्करण यांच्या विकासार्थ मित्सुबिशी समूहाने ‘मित्सुबिशी संशोधन संस्था’ १९७० मध्ये स्थापन केली.

गद्रे, वि. रा.