यूरोपीय देवघेव संघ : सदस्यराष्ट्रांमधील बहुदेशीय व्यापाराला चालना देण्याकरिता स्थापन करण्यात आलेली प्रादेशिक देवघेव संघटना. यूरोपीय आर्थिक सहकारी संघटनेने (मार्शल योजनांतर्गत द्रव्य व इतर साहित्य यांचे वितरण करण्यासाठी १९४८ मध्ये उभारण्यात आलेली संघटना) पुरस्कृत केलेली ही संस्था १९५० मध्ये कार्यवाहीत आली. ‘यूरोपीय पुनर्रचना कार्यक्रमां’तर्गत (मार्शल योजनांतर्गत) १९४८ मध्ये कार्यान्वित केलेल्या ‘आंतर यूरोपीय देवघेव करारा’ची जागी (इंट्रा-यूरोपियन-पेमेंट्स-ॲग्रिमेंट) यूरोपीय देवघेव संघाने घेतली.

यूरोपीय देवघेव संघामुळे सदस्यराष्ट्रांना आपापले ताळेबंदाचे हिशेब आधिक्य व घट या दोहोंचा प्रतितोल संभाळून चुकते करण्याची यंत्रणा उपलब्ध झाली होती हा संघ म्हणजे एकप्रकारचे वित्तीय समाशोधन गृह मानले जाई. बहुदेशीय व्यापार आणि सदस्य राष्ट्रांमधील पारस्परिक अभेदकारी वर्तन या दोन तत्त्वांवर या संघाचे कार्य आधारलेले होते.

डिसेंबर १९५८ मध्ये यूरोपीय देवघेव संघाचे कार्य समाप्त करण्यात आले कारण त्या सुमारास ग्रेट ब्रिटनचे पौंड स्टर्लिंग हे चलन व इतर पश्चिम यूरोपीय राष्ट्रांची चलने यांमध्ये परिवर्तनीयता सुरू झाली आणि संघाची जागा यूरोपीय चलन संघाने घेतली.

पहा : समाईक बाजारपेठा.

गद्रे, वि.रा.