ॲडम स्मिथ

स्मिथ, ॲडम : (५ जून १७२३—१७ जुलै १७९०). प्रख्यात स्कॉटिश राजकीय अर्थतज्ज्ञ व तत्त्वज्ञ. त्याचा जन्म स्कॉटलंडमधील करकॉल्दी येथे झाला. त्याच्या जन्मापूर्वीच त्याचे वडील वारले. त्यामुळे त्याचे संगोपन-शिक्षण आईनेच केले. सुरुवातीच्या शिक्षणानंतर तो ग्लासगो विद्यापीठात शिकत असताना त्याच्यावर फॅ्रन्सिस हचसन या शिक्षकाचा प्रभाव पडला. स्मिथने त्याच्या हाताखाली नैतिक तत्त्वज्ञानाचा तीन वर्षे अभ्यास केला व नंतर बॅलिऑल कॉलेज (ऑक्सफर्ड) मधून पदवी घेतली आणि परत करकॉल्दीला गेला (१७४४). अभ्यासाबरोबर त्याने आपल्या इंग्रजी साहित्यावर व्याख्याने दिली. पुढे तो एडिंबरोला गेला. तेथे त्याची डेव्हिड ह्यूमशी मैत्री झाली (१७४८). ग्लासगो विद्यापीठात स्मिथची तर्कशास्त्राचा प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली (१७५१), तर १७५२ मध्ये नीतिशास्त्राचा प्राध्यापक म्हणून तो अध्यापन करू लागला. त्याचा द थिअरी ऑफ मॉरल सेंटिमेन्ट्स हा ग्रंथ प्रसिद्ध झाला (१७५९). त्यामध्ये त्याची ग्लासगो विद्यापीठात नीतिशास्त्रावर दिलेली व्याख्याने समाविष्ट होती. त्यात त्याने सहानुभूती ही सामान्य संवेदनातून उद्भवते आणि ती व्यक्तीत ममतेद्वारे संक्रमित होते, असे प्रतिपादन केले. स्मिथला बक्ल्यूशच्या सरदारपुत्राचा शिक्षक म्हणून काम मिळाले, तेव्हा त्याने प्राध्यापकी पेशा सोडला. १७६४—६६ या काळात तो आपल्या शिष्याबरोबर यूरोपभर फिरला व या प्रवासात त्याची फ्रान्समध्ये आन त्यूर्गो, ॲलेंबर्ट, आन्द्रे मॉर्ले, हेल्व्हेटियस आणि विशेषतः फ्रान्स्वा क्वेस्ने (फिजिओक्रॅटिक पंथाचा मुख्य), डेनिस दीद्रो, जाक्विस नेकर या विचारवंत-अर्थशास्त्रज्ञांशी ओळख झाली. करकॉल्दीला परतल्यावर स्मिथने पुढील नऊ वर्षे आपल्या ग्रंथनिर्मितीत घालविली व त्याचा ॲन इन्क्वायरी इंटू द नेचर अँड कॉझेस ऑफ द वेल्थ ऑफ नेशन्स हा ग्रंथ प्रसिद्ध झाला (१७७६). या ग्रंथामुळे त्यास प्रसिद्धी मिळाली. त्याची स्कॉटलंडमध्ये ‘ कमिशनर ऑफ कस्टम्स ’ पदी नियुक्ती झाली. त्याला एडिंबरोमध्ये रॉयल सोसायटीची छात्रवृत्ती मिळाली (१७८४). त्यानंतर त्याने लंडनमध्ये काही काळ बेंजामिन फ्रँक्लिनच्या सहवासात घालविला. अल्पशा आजाराने स्मिथचे एडिंबरो येथे निधन झाले. मरणोत्तर त्याचा एसेज ऑन फिलॉसॉफिकल सब्जेक्ट्स हा ग्रंथ प्रसिद्ध झाला (१७९५).

वेल्थ ऑफ नेशन्स ह्या ग्रंथात डेव्हिड ह्यूम, फॅ्रन्सिस हचसन, टक्कर, ॲडम फर्ग्युसन आणि मँडेव्हिल या लेखकांच्या लिखाणातून स्मिथने कित्येक कल्पना उचलल्या आहेत. मनुष्याच्या स्वहित-तत्परतेची कल्पना आणि श्रमविभागणीचे विवेचन या दोनही गोष्टी स्मिथला मँडेव्हिलच्या मधमाशांच्या कथेवरूनच स्फुरल्या होत्या. फ्रॅन्सिस हचसन या शिक्षकाचा स्मिथवर फार प्रभाव पडला होता. ‘ जास्तीत जास्त लोकांचे जास्तीत जास्त हित ’ ही व्याख्या हचसन याचीच मानली जाते. स्मिथच्या ग्रंथातील विवेचन अशाच श्रद्धा-समजुतींवर आधारित होते. स्मिथची तात्त्विक भूमिका आणि आर्थिक दृष्टिकोण यांवर ह्यूमचा प्रभाव होता तर टक्करच्या व्यापार, उद्योगधंदे, कर-आकारणी यांसारख्या विविध विषयांवर लिहिलेल्या निबंधांतून स्मिथने अनेक कल्पनांचे ऋण घेतले आहे. ॲडम फर्ग्युसन या स्मिथपूर्वीच्या लेखकाने सांगितलेल्या कर-आकारणीच्या तत्त्वांवरूनच स्मिथला त्याच्या कर-कसोट्यांची कल्पना सुचली होती.

वेल्थ ऑफ नेशन्स हा स्मिथचा ग्रंथ ऐतिहासिक तपशील आणि तत्संबंधीच्या शिफारशी यांचे मिश्रण होय. कोणत्याही देशाची आर्थिक प्रगती ही उपभोग्य वस्तू व त्यांचे विविध प्रकार आणि पुरवठा यांवर अवलंबून असते. कोणत्याही देशाच्या अधिकाधिक विकासासाठी मुक्त व्यापार आवश्यक आहे कारण अशा व्यापारामुळे अनेक वस्तूंची निर्मिती होते. त्याने वेल्थ ऑफ नेशन्स या ग्रंथाद्वारे तत्कालीन आर्थिक जीवन शब्दरूपाने साकार केले. विश्लेषणाच्या दृष्टीने पाहता वेल्थ ऑफ नेशन्स हा ग्रंथ त्याच्या शीर्षकाप्रमाणेच खरोखरच देशाच्या संपत्तीच्या स्वरूपाची आणि कारणांची मीमांसा करणारा ठरला. संपत्तीचे उगमस्थान म्हणून श्रमाचे महत्त्व विशद करून स्मिथने विवेचनास प्रारंभ केला आहे. त्यानंतर श्रम-विभागणीच्या तत्त्वाची चर्चा केली आहे. श्रमविभागणीमुळे विनिमयाची आवश्यकता निर्माण होते, म्हणून त्याच्या पाठोपाठ स्मिथने विनिमय-विषयक प्रश्न चर्चिले आहेत. श्रम हेच राष्ट्राच्या संपत्तीचे उगमस्थान आहे, असे स्मिथचे मत होते. श्रमाचा वापर देशात किती कौशल्याने व योजकतेने केला जात आहे, यावर देशाच्या संपत्तीची वाढ अवलंबून असते, हा स्मिथचा दुसरा सिद्धांत होय. श्रमांची वर्गवारी सांगितल्यावर श्रमविभागणीचे तत्त्व त्याने सांगितले आहे ( श्रमविभागणीच्या मर्यादा बाजारपेठेच्या विस्तारावर अवलंबून असतात ). त्याने श्रमविभागणी हे आर्थिक जीवनाचे मध्यवर्ती सूत्र कल्पून अर्थशास्त्रीय विवेचनात या तत्त्वाला अग्रस्थान प्राप्त करून दिले आहे.

स्मिथने राज्याच्या अर्थकारणाचा प्रश्न चर्चिला आहे. कर-आकारणीच्या विवेचनातून त्याच्या सुप्रसिद्ध कर-कसोट्यांचा जन्म झाला आहे. या कर-कसोट्या अशा : (१) देशातील प्रत्येक नागरिकाने आपल्या कुवती-प्रमाणे कर भरून शासनाला साहाय्य केले पाहिजे. (२) कोणते कर भरावयाचे, तसेच कर भरण्याची वेळ, पद्धत आणि कराची रक्कम या गोष्टी कर भरणार्‍यास निश्चितपणे माहीत असल्या पाहिजेत. (३) प्रत्येक कराची वसुली ही करदात्यांना सोयीस्कर ठरेल अशा वेळी व अशा पद्धतीने झाली पाहिजे. (४) कोणताही कर वसूल करताना कररूपाने बाहेर आलेली रक्कम व शासकीय तिजोरीत उत्पन्नरूपाने जमा होणारी रक्कम यांमधील अंतर कमीत कमी असले पाहिजे. या कर-कसोट्यांचे महत्त्व स्मिथच्या काळात व आजवरही अबाधित राहिले आहे.

एडिंबरो शहरातील हाय स्ट्रीटवर ॲडम स्मिथचा तीन मीटर उंचीचा ब्राँझचा पुतळा उभा करण्यात आला आहे (४ जुलै २००८). त्याच्या स्मरणार्थ इंग्लंडमधील क्लिडेस्टेल बँक इन स्कॉटलंडने ५० पौंडांच्या नोटेवर (१९८१), तर बँक ऑफ इंग्लंडने वीस पौंडांच्या नोटेवर त्याचे छायाचित्र छापलेले आहे (२००७). त्यामुळे इंग्लिश बँकेच्या नोटांवर छायाचित्र असणारा स्मिथ हा पहिला स्कॉटिश नागरिक ठरला आहे.

१९७० मध्ये लंडन येथे ‘ ॲडम स्मिथ इन्स्टिट्यूट ’ ची स्थापना झाली असून तीत अर्थशास्त्राविषयी चर्चासत्रे, व्याख्याने होतात.

 गद्रे, वि. रा.