चहापान : आज बहुतेक सर्वच देशांत चहा हे पेय म्हणून कमी- अधिक प्रमाणात वापरात आहे. भारतीय शहरी व ग्रामीण लोकांत आदरातिथ्याचा एक भाग म्हणून चहापानाला महत्त्व आहे. चहाची वाळवलेली पाने उकळत्या पाण्यात टाकून चहा बनवितात. पाश्चात्यांमध्ये काही ठिकाणी लिंबाच्या चकत्या चहात टाकून पितात. चीन व जपान येथे पाने न वाळविता तशीच उकळून ‘हिरवा चहा’ पितात. चहाची लागवड व त्याचे पेय बनविण्याची पद्धत प्रथम चीनमध्ये व नंतर जपान येथे सुरू झाली. चीनमधील ॲमॉय या बोलीभाषेत त्याला ‘टे’ असे म्हणतात, तर कॅंटनी भाषेत ‘चा’ असे म्हणतात. चीनपासून जपान, भारत, इराण व रशिया या देशांमध्ये चहाचा प्रसार झाला. यूरोपमध्ये त्याचा प्रसार डच लोकांपासून झाला आणि डचांनी ते पेय इंडोनेशियापासून स्वीकारले, असे म्हटले जाते. इंग्लंडमध्ये या पेयाचा प्रसार सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात झाला असावा. भारतात या पेयाचा प्रसार इंग्रजांपासून झाला.

जपानमध्ये चहा हे आरोग्यवर्धक व राष्ट्रीय पेय मानतात. चहापानाच्या विधीला ‘चा-नो-यू’ ही जपानी संज्ञा आहे. जपानमध्ये चहापानाची प्रथा कामाकुरा कालखंडामध्ये (११९२ – १३३३) झेन पंथाच्या भिक्षूंनी रूढ केली आणि त्यांनीच पुढे चहापानास विधीचे म्हणजे आचारधर्मांचे स्वरूप प्राप्त करून दिले. पंधराव्या शतकामध्ये या विधीस अधिक रोचक रूप लाभले. मित्रमंडळींनी निसर्गरम्य व निवांत स्थळी एकत्र जमून चहापान करावे व चित्रकला, सुलेखन, पुष्पसजावट आदि कलांचा सौंदर्यास्वाद तसेच चहापान-विधीतील पेयपात्रांचा सुंदर- सुबकपणा यांविषयी चर्चा करावी, असे या विधीचे स्वरूप होते. या निवांत ठिकाणांना ‘टोको-नो-मा’ अशी संज्ञा असून तेथे चित्रकला, मृत्पात्री, पुष्पसजावट आदींचे नमुने मांडलेले असत. सोळाव्या शतकातील सेन रिक्‌यू (१५२१ – ९१) हा चहापान-विधीच्या क्षेत्रातील प्रख्यात सौंदर्यवादी होय. त्याने ‘वाबी’ नावाची चहापान-शैली रूढ केली. तीत साधेपणा, अनलंकृतता आणि निवांतपणा या गोष्टींवर विशेष भर होता. त्यानेच पहिल्या ‘चा-शित्सू’ची (चहापान-दालन) उभारणी केली. त्याची रचना मोठी वैशिष्ट्यपूर्ण असते. त्याचा प्रवेशमार्ग फक्त  २/ फूट (७५ सेंमी.) असतो. त्यामुळे त्यात गुडघे टेकूनच प्रवेश करावा लागतो. अशा रीतीने या विधीची सुरुवात प्रतीकात्मक अर्थाने विनम्रभावाने होते व ही विनम्रता पुढील सर्व समारंभात पाळली जाते. दालनाचा अंतर्भाग मात्र पाच माणसे बसू शकतील, इतका प्रशस्त असतो. चहापानाची ‘वाबी’ शैली आजही जपानमध्ये लोकप्रिय आहे.

काळदाते, सुधा