रानडे, महादेव गोविंद : (१८ जानेवारी १८४२ – १६ जानेवारी १९०१). भारतातील उदारमतवादी, समाजसुधारक, धर्मसुधारक, राजनीतिज्ञ, अर्थसास्त्रज्ञ आणि द्रष्टे पुरूष. अनेक वेळा महादेवच्या ऐवजी त्यांना माधवराव म्हणत असत. मातेचे नाव गोपिका. त्यांचा जन्म नासिक जिल्ह्यातील निफाड गावी झाला. मराठी आणि प्राथमिक इंग्रजी शिक्षण कोल्हापूरला झाले. त्यांचे शरीर भरदार व डोके मोठे होते. वृत्ती लहानपणापासूनच शांत, सहिष्णू, निरहंकारी, उदार व ऋजू असल्यामुळे लोकांना ते फार आवडत. ते नेहमी उद्योगात रमलेले, शीलसंपन्न व सत्यवादी होते.

न्यायमूर्ती रानडे माध्यमिक आणि उच्च शिक्षण मुंबईस झाले. शिक्षण चालू असताना भारताच्या व मराठ्यांच्या इतिहासाचे विशेष अध्ययन केले व विद्यालयीन अभ्यासक्रमाच्या बाहेर इतर विषयांचेही अनेक ग्रंथ अभ्यासले. इ. स. १८६२ मध्ये बी. ए. च्या परीक्षेत पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले. इतिहास आणि अर्थशास्त्र विषय घेऊन पुन्हा बी. ए. (ऑ.) परीक्षा दिली. त्यांची विद्वत्ता पाहून प्राध्यापक-विद्वान मंडळी व गुरुजन यांना त्यांचे थोर भवितव्य दिसू लागले होते. इतिहास, भूगोल, गणित, अर्थशास्त्र, तर्कशास्त्र, इंग्लिश, निबंधलेखन इ. विषयांचे ते एल्फिन्स्टनमध्ये अध्यापन करू लागले. १८६४ साली एम्. ए. ची परीक्षा दिली व १८६५ साली कायद्याच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. मुंबई विद्यापीठाच्या फेलोंमध्ये या तरुण पदवीधराचा समावेश झाला.

इ. स. १८६६ च्या जूनमध्ये त्यांची ओरिएंटल ट्रान्सलेटरच्या जागी सरकारने नेमणूक केली. मराठी भाषेत जे ग्रंथ त्या वेळी प्रसिद्ध होत होते, त्यांच्यावर अभिप्राय लिहिण्याचे काम ते करीत. साहित्य, इतिहास, समाजशास्त्र विषय यासंबंधी त्यांच्या अभिप्रायांत विस्तृत विवेचन केलेले आढळते. १८६८ मध्ये मुंबईच्या एलफिन्स्टन कॉलेजात प्राध्यापक म्हणून त्यांची कायम नेमणूक झाली. पुण्यास न्यायखात्यात १८७१ पासून न्यायाधीश किंवा दंडाधिकारी म्हणून त्यांची नेमणूक झाली. त्यावेळी त्यांनी ॲडव्होकेटची परीक्षा दिली. न्यायखात्यात काही काळ काम केल्यावर १८९३ साली रानड्यांना मुंबईच्या उच्च न्यायालयात न्यायमूर्तींची जागा मिळाली. त्या काळात भारतीयाला उच्च न्यायालयातील न्यायमूर्तीचे पद दुर्लभ होते. त्या प्रसंगी पुण्यातील जनतेने आठ दिवस मोठा उत्सव केला व पुण्यातील महत्त्वाच्या संस्थांनी त्यांचा गौरव केला. अनेक सत्कारसमारंभ होऊन त्यांच्यावर पुष्पवृष्टी झाली. न्यायदानाच्या कामात परिश्रम, निस्पृहपणा, कायदेशास्त्राचे सखोल ज्ञान व न्यायनिष्ठा हे त्यांचे गुण प्रकर्षाने दिसून आले. उच्च न्यायासनावर ते विराजमान झाल्याने न्यायासनाचाच बहुमान झाला, असे सरन्यायाधीश सर मायकेल वेस्ट्राप यांनी उद्‌गार काढले.

महादेवराय यांचे दोन विवाह झाले होते. एक वयाच्या बाराव्या वर्षी आणि प्रथम पत्नी वारल्यावर दुसरा विवाह एकतिसाव्या वर्षी रमाबाईंबरोबर झाला. ते थोर समाजसुधारक म्हणून नाणावले होते. समाजसुधारणेच्या चळवळी त्यांनी उभारल्या होत्या, तरी वृद्ध वडिलांच्या अत्याग्रहामुळे अकरा वर्षांच्या कुमारिकेबरोबर त्यांनी दुसरा विवाह केला. त्यामुळे त्यांच्या समाजसुधारक म्हणून प्राप्त झालेल्या प्रतिष्ठेला धक्का बसला. रमाबाईंसमवेत (१८६२ – १९२४) त्यांचा प्रपंच सुखासमाधानाचा झाला. रमाबाईंनी त्यांच्या उदात्त जीवनाशी समरसता प्राप्त करून घेतली. त्यामुळे रानड्यांच्या निधनांनतर त्यांनी आमच्या आयुष्यातील काही आठवणी ही जी आत्मकथा लिहिली (१९१०), ती मराठीतील सुंदर साहित्य म्हणून मान्यता पावली. रमाबाईंनी पतिनिधनानंतर स्त्रियांच्या सेवेस वाहून घेतले. आर्य महिला समाज तसेच लेडी डफरिन फंड कमिटीशी त्यांचा जवळचा संबंध होता. स्त्रियांना व्यावसाय शिक्षण देणारी संस्था स्थापिली. पुण्याच्या प्रख्यात ‘सेवासदन’ या विविध प्रकारच्या स्त्रीशिक्षणाचे कार्य करणाऱ्या संस्थेच्या त्या प्रमुख प्रेरणास्थान होत्या. शासकीय पाठ्य-पुस्तक समितीवरही चार वेळा त्या होत्या तसेच महिला संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. भारतीय स्त्रीसाठी केलेले त्यांचे कार्य महत्त्वपूर्ण मानले जाते.

महादेवराव यांच्या काळात ‘लोकहितवादी’ देशमुख, विष्णुशास्त्री पंडित, जोतीराव फुले इ. समाजसुधारकांनी सुधारणेचे आंदोलन सुरू केले होते. त्यात रानडे सहभागी झाले. १८६२ मध्ये त्यांनी इंदुप्रकाश या वृत्तपत्राच्या इंग्रजी विभागात समाजसुधारणेची मीमांसा अनेक लेख लिहून केली. १८६५ साली विधवाविवाहोत्तेजक मंडळाची स्थापना झाली. या मंडळाने एक विधवाविवाह घडवून आणला. परंपरानिष्ठ सनातन धर्मीयांनी शंकराचार्यांच्या अनुमतीने विधवा-विवाहाच्या पुरस्कर्त्यावर बहिष्कार टाकला. त्यामुळे पुष्कळ त्रास सहन करावा लागला. महादेवरावांनी या वादाच्या निमित्ताने वेद, स्मृती, पुराणे व इतिहास यांचे आलोडन करून विद्वत्ताप्रचुर निबंध लिहिला. राजा राममोहन रॉय यांनी हिंदु धर्मामध्ये मौलिक, तात्त्विक परिवर्तनास प्रारंभ केला. या मौलिक हिंदू धर्मसुधारणेच्या आंदोलनात न्यायमूर्ती रानडे यांनी स्वतःच्या धर्मचिंतनाची भर घातली. धर्मानुभवांची नैसर्गिक योग्यता मनष्याच्या अंतःकरणामध्ये आहे. अंतःकरण हे चिंतनशील बनले व विकारांच्या बंधनातून बाहेर पडले म्हणजे आतला विवेकाचा प्रकाश प्राप्त होतो आणि निराकार, पवित्र विश्वनियंत्याची अनुभूति प्राप्त होते. त्याच्यातून शुद्ध नैतिक विवेक जागृत होतो. संतांचे आणि धर्मसंस्थापकांचे विचार या अनुभवाला अधिक परिपुष्ट करतात. सर्व मानवांची व्यापक नैतिक मूल्ये विवेक बुद्धीनेच निश्चित होतात. निराकार, पवित्र, एकाच ईश्वराचा प्रत्यय आणि त्याच्याबद्दलची भक्तिभावना हृदयात व्यक्त होते. म्हणून सगळ्या मावनजातीचा मूळचा शुद्ध धर्म एकच आहे अशी निश्चिती होते, अशी त्यांच्या धार्मिक, तात्त्विक विचारांची धारणा होती.

समाजकारणाची धुरा आपल्या खांद्यावर घेतल्यानंतर त्यांनी इंडियन नॅशनल काँग्रेस व सामाजिक परिषद या दोन संस्था निर्मिल्या. समाजसुधारणेच्या विचारांचा आधार म्हणून निश्चित असे तत्त्वज्ञान त्यांनी मांडले. राजकीय सुधारणा, आर्थिक सुधारणा, धर्मसुधारणा व समाजसुधारणा ही भिन्नभिन्न अंगे परस्परांशी अगदी संबद्ध आहेत, म्हणून समाजजीवनाचा साकल्याने विचार केला पाहिजे असा त्यांचा व्यापक दृष्टिकोन होता. त्यांनी प्रतिपादिले की, वंशभेद किंवा धर्मभेद न मानता मनुष्यामनुष्यांत समानता व न्याय प्रस्थापित करणे, हे नव्या युगातील माणसाचे कर्तव्य आहे. त्याकरिता परंपरेवरच्या अंधश्रद्धेतून आणि धर्मग्रंथांच्या बंधनातून मानवाची बुद्धी प्रथम मुक्त केली पाहिजे. त्याची कर्तव्यनिष्ठा त्याच्या विवेकबुद्धीतून आली पाहिजे. अंध दैववादाऐवजी बुद्धिनिष्ठा रुजविली पाहिजे. मानव्याची प्रतिष्ठा समतेच्या तत्त्वावर व्हावयास पाहिजे. उच्च असे विश्वनियामक ईश्वरी तत्त्व आणि त्या ईश्वरी तत्त्वाची मानवी हृदयातील शुद्ध प्रेरणा हे सर्व धर्मांच्या मुळाशी असलेले रहस्य होय, असे ते म्हणत. मूर्तिपूजा आणि कर्मकांड यांतून मुक्त होऊन उच्च धर्माकडे मनुष्याच्या विवेकबुद्धीचे आकर्षण वाढले पाहिजे म्हणून ⇨ राजा राममोहन रॉय यांनी बंगालमध्ये स्थापलेल्या ⇨ ब्राह्मो समाजाच्या धर्तीवर मुंबईत ⇨ प्रार्थनासमाजाचीस्थापना त्यांनी व त्यांच्या अनेक मित्रांनी केली. त्या पंथाची तत्त्वे, उपासनापद्धती आणि विधी यांचे समर्थन करण्यासाठी त्यांनी इंग्लिशमध्ये ‘एकेश्वरनिष्ठाची कैफियत’ अशा अर्थाच्या शीर्षकाखाली एक निबंध लिहिला. एकनाथांच्या ⇨ भागवतधर्माचाम्हणजे वारकरी संप्रदायाचा महादेवरावांच्या मनावर प्रभाव खोल उमटला होता. भक्तीचा प्रसार करण्यासाठी प्रार्थनासमाजाचा जन्म आहे, असे त्यांनी प्रतिपादिले.


न्या. रानडे १८७१ मध्ये पुण्याला बदलून आले आणि पुण्यातील सार्वजनिक सभेची सूत्रे त्यांनी आपल्या हाती घेतली सार्वजनिक सभेच्या कार्याला राजकीय चळवळीचे स्वरूप दिले. भारतातील प्रागतिक सनदशीर राजकारणाचा पाया प्रथम त्यांनी घातला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक सभेचे चिटणीस गणेश वासुदेव जोशी म्हणजे ⇨ सार्वजनिक काका यांनी मोठी कामगिरी केली. इ. स. १८९० मध्ये सामाजिक सुधारणेच्या वादाला प्रक्षोभक स्वरूप प्राप्त झाले. रानडे यांनी १८७० मध्ये स्थापलेल्या पुण्यातील ‘सार्वजनिक सभा’ या संस्थेमध्ये फाटाफूट झाली, दोन तट पडले. ⇨ लो. बाळ गंगाधर टिळक व त्यांचे सहकारी यांनी आपले बहुमत स्थापित करून न्यायमूर्ती रानड्यांच्या अनुयायांना दूर सारले. तेव्हा रानड्यांनी १८९३ साली पुण्यात ‘डेक्कन सभा’ ही नवी संस्था काढली. त्यावेळी त्यांनी काढलेल्या परिपत्रकात त्यांचे राजकीय तत्त्वज्ञान स्पष्ट झाले आहे. लोकशिक्षण हाच राजकीय चळवळीचा उद्देश त्यांनी त्यात स्पष्ट केला. स्वाभिमान व स्वावलंबन या गुणांनी युक्त नागरिकत्व निर्माण करणे, ही राजकारणाची पहिली पायरी आहे. हे गुण अंगी बाणण्याला दीर्घ कालावधी लागतो. जातिपातीचा दुराभिमान सोडणे हा उदारमतवादाचा महत्त्वाचा भाग आहे, असे त्यांनी दाखवून दिले.

स्वदेशीचा प्रचार व संघटनेचे कार्य रानडे व जोशी यांनी सुरू केले. रानडे यांनी भारताच्या आर्थिक ऱ्हासाची आणि विकासाची शास्त्रशुद्ध मीमांसा दोन व्याख्याने देऊन केली. रानड्यांनी आपल्या देशात औद्योगिक क्रांती व्हावी म्हणून संरक्षक जकातीचे तत्त्व पुरस्कारिले. इंग्रज सरकार भारताच्या आर्थिक विकासाच्या विरूद्ध कसे आहे, ही गोष्ट त्यांनी स्पष्ट केली आणि हिंदी अर्थशास्त्राचा पाया घातला.

महाराष्ट्रात १८७४ ते ७६ या कालखंडात मोठा दुष्काळ पडला. तेव्हा सार्वजनिक सभेद्वारे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीचे सर्वेक्षण केले. त्या सर्वेक्षणात सरकारचे धोरणच शेतकऱ्यांच्या हलाखीस कारण आहे, असे स्पष्ट केले. जनतेला जबाबदार राज्यपद्धती प्राप्त झाल्याशिवाय सामान्य जनतेची आर्थिक स्थिती सुधारणार नाही, असा मुद्दा धरून जबाबदार राज्यपद्धतीच्या मागणीचा अर्ज इंग्लंडच्या पार्लमेंटकडे धाडून दिला. या अर्जावर हजारो लोकांच्या सह्या होत्या. १८७७ मध्ये दिल्ली येथे भरलेल्या दरबारात राणी व्हिक्टोरिया हिला हिंदुस्थानची सम्राज्ञी ही पदवी अर्पण करण्यात आली. त्या प्रसंगी सार्वजनिक सभेतर्फे राणीला एक मानपत्र दिले आणि त्याबरोबर हिंदी जनतेच्या मागण्यांचा अर्जही दिला. रानड्यांच्या या राजकारणाच्या पाठीमागे अखेर बंड उठविण्याचाही उद्देश असावा, अशी त्यावेळी ब्रिटिश सरकारला दाट शंका उत्पन्न झाली. रानड्यांच्या सर्व व्यवहारांवर सरकारने कडक लक्ष ठेवले परंतु स्पष्ट असा पुरावा उपलब्ध न झाल्यामुळे १८८५ साली रानडे यांना कौन्सिलचे सभासद म्हणून नेमले व फायनान्स कमिटीत घेतले. १८८५ साली काँग्रेसची स्थापना झाली. या स्थापनेच्या कार्यात रानड्यांचा मोठा भाग होता. ⇨ गोपाळ कृष्ण गोखले यांनी राजकारणात रानडे यांचा ध्येयवाद व धोरण स्वीकारले. गोखले यांनी १९०० साली केलेल्या एक भाषणात म्हटले आहे, की ‘मी रानडे यांच्या पायापाशी शहाणपण शिकलो आहे’.

रानड्यांनी १८९० साली औद्योगिक परिषद स्थापली. त्यावेळच्या प्रास्ताविक भाषणात आणि त्यानंतरच्या भाषणांमध्ये त्यांनी हिंदी अर्थशास्त्रावर अनेक उद्‌बोधक व्याख्याने दिली. कंगाल हिंदुस्थानला स्वतंत्र अर्थशास्त्र असावे, असे त्यांनी प्रतिपादिले. मराठी साहित्य संमेलनाची गंगोत्री ठरलेल्या पहिल्या मराठी ग्रंथकार संमेलनाचे (११ मे १८७८) न्यायमूर्ती रानडे हे अध्यक्ष होते.

साधारणपणे १८९४ पासून पुढील पाच-सहा वर्षे न्या. रानड्यांनी विविध संस्था आणि सभांतून मराठ्यांच्या इतिहासासंबंधी आपले शोधनिबंध वाचले होते. ते पुढे ‘राइझ ऑफ द मराठा पॉवर अँड अदर एसेज’ [म. शी. मराठ्यांच्या सत्तेचा उत्कर्ष (१९६४)] या पुस्तकात संग्रहित करण्यात आले. या लेखनाला जोडूनच मराठी सत्तेचा विस्तार आणि ऱ्हास या संबंधीही पुढील दोन खंड लिहिण्याचा त्यांचा मानस होता परंतु त्यांच्या निधनामुळे (१९०१) तो पूर्ण होऊ शकला नाही.

स्वकीयांच्या दृष्टिकोनातून मराठ्यांच्या इतिहासाची वैशिष्ट्ये निःपक्षपातीपणे सादर करणे व यूरोपीय इतिहासकारांच्या लेखनामुळे त्यासंबंधी निर्माण झालेले अपसमज दूर करणे, हा या लेखनामागील मुख्य हेतू होता.

दीर्घ आजाराने त्यांचा मुंबई येथे देहान्त झाला. भारताच्या नवयुगाचा अग्रदूत गेला, म्हणून देशातील सुशिक्षित वर्ग शोकाकूल झाला. तेव्हा भारतातील वृत्तपत्रांमध्ये त्यांच्याविषयी आलेल्या मृत्युलेखांत त्यांची थोरवी गायली गेली. लो. टिळकांनी लिहिलेल्या मृत्युलेखांत लिहिले आहे, की ‘थंड गोळा झालेला महाराष्ट्र जिवापाड मेहनत करून पुन्हा जिवंत करण्याचे दुर्धर काम प्रथम महादेवरावांनीच केले’. त्यांच्या असामान्य मोठेपणाचे हे मुख्य चिन्ह होय.

संदर्भ : 1. Brown, Mackenzie, The Nationalist Movement : Indian Political Thought from 

        Ranade to Bhave, Bombay, 1972.

   2. Gopalkrishnan, P. K. Development of Economic Ideas in India, Poona, 1942.

   3. Karve, D. G. Ranade : The Prophet of Liberated India, Poona, 1942.

   4. Kolaskar, M. B. Ed. Religious and Social Reforms, Bombay, 1902.

   5. Mankar, G. A. Mr. Justice M. G. Ranade : A Sketch of the Life and Work.

  6. Parvate, T. V. Mahadev Govind Ranade, Bombay, 1963.

  ७. जावडेकर, शं. द आधुनिक भारत, पुणे, १९७९.

  ८ फाटक, न. र. न्या. म. गो. रानडे यांचे चरित्र, पुणे, १९६६.

 

जोशी, लक्ष्मणशास्त्री