केशवचंद्र सेनसेन, केशवचंद्र : (१९ नोव्हेंबर १८३८-८ जानेवारी १८८४). ब्राह्मो समाजाचे प्रवर्तक आणि भारतातील प्रमुख बंगाली समाजसुधारक. कोलकात्याजवळील गरिफा हे सेन यांचे मूळ गाव होय. कोलकात्यातील कोलुतोला भागात प्यारे मोहन व शारदादेवी या दांपत्यापोटी केशवचंद्र यांचा जन्म झाला. त्यांचे वडील टांकसाळीत अधिकारी होते. परमार्थाविषयीची ओढ आणि बुद्धिवाद यांची देणगी सेन यांना आईकडून मिळाली. त्यांचे आजोबा रामकमल सेन बंगालच्या पुनरुज्जीवन चळवळीतील सक्रिय व्यक्तिमत्त्व होते. हिंदू महाविद्यालय (१८१७), स्कूल बुक सोसायटी (१८१८), संस्कृत महाविद्यालय (१८२४) यांच्या स्थापनेत त्यांचा सहभाग होता.

सेन हे हिंदू प्रशालेतून प्रवेशपरीक्षा उत्तीर्ण झाले (१८५३). नंतर हिंदू महाविद्यालयातून ते पदवीधर झाले (१८५६). या सुमारास जगनमोहिनी देवी या युवतीशी ते विवाहबद्ध झाले (१८५६). सुरुवातीस त्यांनी बंगाल बँकेत काम केले (१८५९-६१). त्यानंतर १८६६ मध्ये काही काळ ते टांकसाळीत अधिकारी होते. विद्यार्थिदशेत त्यांनी तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला तसेच अनेक तत्त्ववेत्यांचे ग्रंथ वाचले तथापि त्यांच्या मनावर सर्वांत जास्त परिणाम राजनारायण बसू यांच्या ब्राह्मोइझम   या ग्रंथाचा झाला. त्यानंतर ते ब्राह्मो समाजाकडे आकृष्ट झाले (१८५७).

सेन यांनी ‘यंग बेंगाल मूव्हमेंट’चा अभ्यास करून ‘यंग बेंगाल, धिस इज फॉर यू’ (जून १८६०) या लघुप्रबंधात आपली परखड मते मांडली. मनाचा संबंध ज्ञानाशी आणि हृदयाचा संबंध श्रद्धेशी, करुणेशी आणि नीतितत्त्वांशी असतो. या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत. बौद्धिक प्रगती आणि धर्मनिष्ठा यांच्यातील साहचर्याशिवाय प्रत्यक्षात सुधारणा होणे कठीण आहे, हे त्यांचे मत होते. त्यांनी अनेक शहरांना भेटी देऊन इंग्रजीमध्ये बाह्मो समाजाचा प्रचार प्रभावीपणे केला. तत्पूर्वी १८५५ मध्ये महािवद्यालयीन काळात त्यांनी कोलुतोला भागात प्रौढांसाठी सायंशाळा सुरू केली. नाटकमंडळीच्या मदतीने सेन यांनी उमेशवंत दत्तांचे विधवाविवाह  हे नाटक रंगभूमीवर आणले. नीतिमूल्यांची जोपासना, आध्यात्मिक आणि मानवतावादी शिक्षण, अस्पृश्यता आणि जातीयतेचे निर्मूलन, स्त्री शिक्षण, मद्यपानविरोध अशा विविध बाबतींत समाजसुधारणा करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. देवेंद्रनाथ टागोर यांनी त्यांना मंत्रिपदाचा दर्जा दिला होता आणि स्वतःकडील ब्राह्मो समाजाचे आचार्यपद त्यांना बहाल केले (१८६२).

ब्राह्मो समाजामध्ये स्त्रियांना प्रवेश नव्हता, तेव्हा केशवचंद्र सेन यांनी स्वतःच्या पत्नीस सामुदायिक उपासनेमध्ये सामील करून घेतले. १८६० मध्ये सामाजिक सुधारणेला वाहून घेणाऱ्या मित्रांची संघटना ‘संगत सभा’ या नावाने स्थापन केली. दुष्काळग्रस्त लोकांना अन्नदान करण्यात ही मंडळी पुढे होती. त्यांनी आपल्या व्याख्यानांतून जातिभेद, अस्पृश्यता, स्त्री शिक्षण यांविषयी प्रबोधन केले. त्यांनी चर्चमध्ये आंतरजातीय विवाह घडवून आणला (१८६२). स्त्रियांकरिता वामबोधिनी पत्रिका  हे बंगाली भाषेतील मासिक सुरू केले (१८६४). तसेच ब्राह्मिका समाज  नावाचे पत्रक ब्राह्मो स्त्रियांसाठी सुरू केले (१८६५). त्यातून तत्कालीन भारतीय स्त्रियांच्या स्थितीविषयीची माहिती प्रसिद्ध होत असे. त्यांनी उच्च शिक्षणासाठी कलकत्ता (कोलकाता) महाविद्यालय (१८६५) आणि ॲल्बर्ट महाविद्यालय (१८७२) स्थापन केले. केशवचंद्रांनी सु. डझनभर वृत्तपत्रे काढली. त्यांपैकी इंडियन मिरर (इंग्रजी पाक्षिक -१८६१), धर्मतत्त्व (मासिक-१८६४), सुलभ समाचार (१८७०), धर्मसाधन (१८७२), सन्डे मिरर (इंग्रजी-१८७३), मद न गरल (दारू किंवा विष- १८७७), बालबंधू (१८७८), परिचारिका (१८८०) आणि न्यू डिस्पेंशन (इंग्रजी—१८८१) वगैरे फार लोकप्रिय झाली होती. त्यांनी बहुतेक वृत्तपत्रे बंगालीत काढली. इंडियन मिरर  हे १८७१ मध्ये दैनिक झाले.

सेन यांनी वृत्तपत्रे व व्याख्याने यांद्वारे ब्राह्मो समाजाची तत्त्वे भारतभर प्रसृत केली. या तत्त्वांत अस्पृश्यता निवारण, स्त्री शिक्षण, जातिभेद निर्मूलन, दारूबंदी, आंतरजातीय विवाह वगैरेंचा अंतर्भाव होता. त्यासाठी त्यांनी जीवाचे रान केले आणि धर्मोपदेशकाची प्रांजल भूमिका बजावली. त्यांच्या या कार्याचा गौरव ‘ब्रह्मानंद’ या उपाधीने करण्यात आला.

सेन यांचा सर्वदेशीय बंधुत्वाचा विशाल दृष्टिकोन व तदंतर्गत धर्मकल्पना परंपरावादी ब्राह्मो समाजधुरिणांना अडचणीच्या वाटू लागल्या. संकीर्तनाने त्यात भर पडली आणि मतभेद विकोपाला जाऊन केशवचंद्र आद्य ब्राह्मो समाजातून बाहेर पडले आणि त्यांनी ‘भारतवर्षीय (११ नोव्हेंबर १८६६) ब्राह्मो समाज ‘ या संस्थेची स्थापना केली. त्यादिवशी सामूहिक प्रार्थनेमध्ये त्यांनी हिंदू धर्मातील स्तोत्रांबरोबर ख्रिस्ती, मुस्लिम, पारशी आणि चिनी धर्मग्रंथांतील स्तोत्रांचे पठण केले. संस्थेचे चिटणीस केशवचंद्र होते. आदि ब्राह्मो समाजाशी ( जुन्या ) सहानुभूती ठेवूनच नवीन मंडळी ब्राह्मो धर्माचा प्रसार करू लागली मात्र देवेंद्रांचा विरह त्यांना जाणवू लागला. वैष्णव भक्तिसंप्रदायाला उजाळा मिळाला आणि भक्तिमार्ग हाच ईश्वरदर्शनाचा मार्ग असून तत्संबंधी श्रद्धा उत्पन्न झाली. त्यांनी नगर-कीर्तनाचा कार्यक्रम हाती घेऊन अनेक वार्षिक उत्सव साजरे केले. याच सुमारास केशवचंद्रांनी इंग्लंडची वारी केली (१८७०). तिथे त्यांनी व्याख्याने दिली आणि राणीसह काही विचारवंतांच्या भेटी घेतल्या. भारतात परतल्यानंतर त्यांनी ‘द इंडियन रिफॉर्म असोसिएशन’ स्थापून धर्मसुधारणेचे विविध उपक्रम सुरू केले. मुलींकरिता पाठशाळा, प्रौढ महिलांसाठी व्हिक्टोरिया इन्स्टिट्यूशन, मुलांकरिता उद्योगप्रशाला आणि सुलभ समाचार  हे बंगाली साप्ताहिक काढले. आंतरजातीय आणि विधवा विवाह यांना कायदेशीर पाठिंबा मिळावा म्हणून १८७२ मध्ये ‘ब्राह्मो मॅरेज ॲक्ट’ ब्रिटिश शासनातर्फे संमत करून घेतला. केशवचंद्रांची लोकप्रियता वाढत असताना त्यांना असे वाटू लागले की, ईश्वर त्यांना आदेश देतो, आपल्याशी संवाद साधतो. ही गोष्ट ते प्रकट करू लागले. त्यामुळे सहकारी दुरावले. तसेच त्यांच्याकडून पंधरा वर्षीय कुच बिहारच्या राजपुत्राला आपली तेरा वर्षाची कन्या देऊन बालविवाह संपन्न झाला. हा ब्राह्म धर्मविरोधी अपराध त्यांच्याकडून घडला. परिणामतः सुशिक्षित हिंदूंकडून त्यांची सर्वत्र निंदा होऊ लागली. या सर्वांमुळे अनेक सहकारी व मित्र दुरावले गेले. तेव्हा त्यांच्या सहकार्याने एका नवीन ‘साधारण ब्राह्मो समाजा’ ची स्थापना केली (१८७८). त्याच्या मंदिराचे उद्‌घाटन १८८१ मध्ये झाले. शिवनाथ शास्त्री यांनी या समाजाचे नेतृत्व केले. आदि ब्राह्मो समाजाच्या सहा सिद्धांतात आणखी तीन सिद्धांत घालण्यात आले. (१) ईश्वर हा सर्वांचा पिता असून सर्व मानव हे बंधू होत. (२) आत्मा अमर आहे व त्याची प्रगती सतत होते आणि (३) देव पुण्याचरणाने प्रसन्न होतो आणि पापाचे दंडन करतो. समाजाच्या वार्षिक समारंभात (१८८१) त्यांनी लाल झेंडा उभारून ‘नवविधान’ म्हणजे नव्या आदेशाची आणि साधनेची द्वाही फिरविली आणि टेबलावर सर्व धर्मांचे ग्रंथ मांडून या चार धर्मांच्या पुढची पायरी म्हणजे ब्राह्मो समाज होय, असा ईश्वरी संकेत केशवचंद्रांनी उद्‌घोषित केला. सर्व धर्मांचा पूर्ण समन्वय ब्राह्म धर्मात झाला आहे, असे ते म्हणत. त्यांनी सामान्य लोकांकरिता ख्रिस्ती व हिंदू धर्मांतून आकर्षक समारंभ निवडून काढले.

केशवचंद्रांनी ख्रिस्तचरित्र व ख्रिस्ताचा उपदेश यांची महती सांगणारी काही पुस्तके लिहिली तथापि त्यांचा भर व्याख्यानांद्वारे विचार प्रसृत करण्यावरच होता. त्यांची बहुतेक व्याख्याने पुस्तकरूपात प्रसिद्ध झाली असून त्यांपैकी ‘ट्रू फेथ’, ‘न्यू संहिता ‘, ‘योग-ऑब्जेक्टिव्ह अँड सब्जेक्टिव्ह’, ‘द न्यूज डिस्पेन्शन’, ‘रिलिजन ऑफ हॉर्मोनी’, या शीर्षकार्थाची (इंग्रजी) आहेत तर ‘संगत’, ‘ब्राह्मो गीतोपनिषद’, ‘ जीवनवेद ‘, ‘ माघोत्सव’ आणि ‘ साधूसंगम ‘ ही बंगालीतील व्याख्याने होत.

धर्म प्रसारार्थ व ब्राह्मो समाजाच्या विहित सुधारणांच्या प्रचारार्थ केशवचंद्रांनी भारतभर (१८५७-८४) भ्रमंती केली. इंग्लंडचा दौरा केला. ब्राह्मो समाजाच्या राजा राममोहन रॉय, देवेंद्रनाथ या दोन प्रेषितांच्या नंतरचे तिसरे स्थान त्यांचे होते. एकोणिसाव्या शतकातील धार्मिक आणि सामाजिक स्थित्यंतरे व सुधारणांत केशवचंद्र यांची भूमिका मौलिक असून वैशिष्ट्यपूर्ण होय.

ऐन उमेदीत अल्पशा आजाराने त्यांचे कोलकाता येथे निधन झाले.

पहा : ब्राह्मो समाज.

 

संदर्भ : 1. Natesan, G. A. &amp Company, Leaders of The Brahmo Samaj, London, 1958.

           २. देसाई, प. स. अनु. पंडित शिवनाथ शास्त्री यांचे आत्मचरित्र, मुंबई, १९७३.

राऊत, अमोल