होस्पेट, कमलाबाई : (२३ मे १८९६–१५ नोव्हेंबर १९८१). एक महाराष्ट्रीयन गांधीवादी समाजव्रती व अनेक सेवाभावी संस्थांच्या कमलाबाई होस्पेटप्रणेत्या. त्यांचा जन्म खानदेशातील शिरपूर येथे सामान्य कुटुंबात झाला. पूर्वाश्रमीच्या त्या यमुना मोहनी. वडील कृष्णाजी तात्या मोहनी हे पोलीस खात्यात होते. यमुनांच्या बालपणीच त्यांच्या वडिलांचे अकाली निधन झाले. त्यामुळे आईने कुटुंबाला सावरले. यमुनांचे कसेबसे प्राथमिक शिक्षण झाले. वयाच्या १२-१३ व्या वर्षी गुरुराव होस्पेट यांच्याशी त्यांचा विवाह झाला (१९०९) आणि त्यांचे नाव कमला ठेवण्यात आले पण दोन वर्षांनी त्यांच्या पतीचे निधन झाले. तेव्हा बंधू हरिभाऊ यांच्या आधार व प्रोत्साहनाने त्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा निश्चय करून राष्ट्रसेवेची दीक्षा घेतली. पुढे डफरिन हॉस्पिटलमध्ये (नागपूर) परिचारिका व सुईण (मिडवाइफ) यांचे प्रशिक्षण घेतले (१९१८–२०). त्यांनी आपल्या बरोबरीच्या सहकारी परिचारिका वेणुताई नेने यांना सोबत घेऊन नागपूरच्या सीताबर्डी भागात सूतिकागृह काढले (८ मे १९२१). सुरुवातीच्या काळात सीताबाई गाडगीळ, मथुराबाई द्रविड, गंगाबाई गोखले यांसारख्या उच्चभ्रू घराण्यांतील महिलांनी त्यांना मोलाची साथ दिली. नंतर त्यांनी नागपूरच्या महाल भागात सूतिकागृहाची आणखी एक शाखा काढली (१९२७) आणि डॉ. इंदिराबाई नियोगी यांच्या सहकार्याने त्याला जोडूनच विधवा व परित्यक्ता महिलांसाठी परिचारिका प्रशिक्षण केंद्र (नर्सिंग स्कूल) सुरू केले (१९२७). या आरोग्य सेवेबरोबर स्वातंत्र्य लढ्यातील सत्याग्रहींनाही त्या मदत करीत असत. सीताबर्डी सूतिकागृहाच्या सु. अकरा शाखा मध्य प्रांतात, विशेषतः जबलपूर, हिंगणघाट, ब्रह्मपुरी आदी ठिकाणी त्यांनी स्थापन केल्या. सूतिकागृहांची व्याप्ती वाढली, तेव्हा त्यांनी सीताबर्डी नर्सिंग होमची घटना बदलली (१९५४) आणि संस्थेचे नाव मातृसेवा संघ केले. संस्थेच्या उद्दिष्टांत अन्य अनेक सेवांचा समावेश केला कारण माता आणि मातृत्व यांची सेवा हे कमलाबाईंचे मूळ ध्येय होते. 

 

कमलाबाईंनी या उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी समाजकार्य महिला महाविद्यालय (१९५८), मतिमंदांसाठी नंदनवन विद्यालय (१९६०), पंचवटी वृद्धाश्रम (१९६१), शारीरिक दृष्ट्या अपंगांसाठी विकलांग चिकित्सा रुग्णालय (१९८१), कुटुंब समुपदेशन केंद्र, फौंडिंग होम आदी संस्था स्थापन केल्या. शिवाय विद्यार्थिनींसाठी वसतिगृहे काढली. स्त्री-पुरुष कामगारांसाठी बहूद्देशीय वैद्यकीय सेवा केंद्र सुरू केले. त्याचबरोबर आपल्या कार्याच्या प्रसार-प्रचारार्थ मातृसेवा हे मासिक सुरू केले (१९६६). त्यांची मातृसेवा संघ ही संस्था व तिच्या उद्दिष्टपूर्तीसाठी स्थापन झालेल्या अन्य संस्था प्रामुख्याने स्त्रिया व मुले यांच्या विकासार्थ कार्यरत आहेत. त्यांची इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वर्क ही महिला महाविद्यालयसदृश संस्था नागपूर विद्यापीठाला (सध्याचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ) संलग्न असून तीत १९७० च्या दशकात दोन वर्षांच्या प्रमाणपत्राबरोबरच पदवीव पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि एम्.फिल्. पदवी हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. 

 

कमलाबाईंच्या सामाजिक कार्याचा गौरव त्यांना रेडक्रॉस सोसायटीचा पुरस्कार (१९५९), केंद्र शासनाचा पद्मश्री बहुमान (१९६१) आणि जमनालाल प्रतिष्ठानचा जानकीदेवी बजाज पुरस्कार (१९८०) देऊन करण्यात आला. त्यांच्या नागपुरातील अर्धपुतळ्याचे अनावरण ज्येष्ठ समाजवादी नेते एस्. एम्. जोशी यांच्या हस्ते झाले. कमलाबाईंनी संन्याशिणीचे नि:स्वार्थी सेवाव्रत जीवनभर पाळले. त्यांच्या मालकीची कोणतीही वास्तू वा वस्तू नाही. त्यांच्या चरितार्थासाठी मातृसेवा संघही संस्था मातृदान देत असे. 

 

वृद्धापकाळाने त्यांचे नागपुरात निधन झाले. 

खांडगे, मंदा