चट्टोपाध्याय, कमलादेवी : (३ एप्रिल १९०३-    ) सुप्रसिद्ध राजकीय व सामाजिक कार्यकर्त्या. मंगलोर येथे जन्म. त्या बाल विधवा होत्या. हरींद्रनाथ चट्टोपाध्याय यांच्याबरोबर त्यांनी पुनर्विवाह केला. त्यांचे शिक्षण इंग्लंडमध्ये ‘बेडफर्ड कॉलेज’ आणि ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’ येथे झाले. त्याच सुमारास म.गांधींच्या नेतृत्वाखालील असहकारितेच्या चळवळीत भाग घेण्यासाठी त्या भारतात परत आल्या.

कमलादेवी चट्टोपाध्यायभारताच्या स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी धडाडीने भाग घेतला व अनेक वेळा तुरुंगवासही भोगला. युवकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. शेतीविषयक प्रश्नांसंबंधीही त्यांना विशेष आस्था होती. काँग्रेस पक्षाच्या त्या सदस्या होत्या पण त्या पक्षाचे कृषि सुधारणाविषयक धोरण त्यांना पसंत न पडल्याने १९४८ मध्ये पक्षत्याग करून त्यांनी काँग्रेस सोशॅलिस्ट पार्टीचे सदस्यत्व स्वीकारले. कामगारविषयक चळवळींमध्येही त्यांनी भाग घेतला होता. ‘ऑल इंडिया विमेन्स कॉन्फरन्स’ ही स्त्रियांची संघटना त्यांच्याच प्रयत्नांतून साकार झाली. जिनीव्हा, प्राग व एल्मिनोर येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्त्रीपरिषदांमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांची भारतीय रंगभूमीच्या संदर्भातील कामगिरीही लक्षणीय आहे. त्यांनी यूरोपमध्ये अनेक कलावंतांच्या भेटी घेतल्या आणि नाट्यनिर्मिती व रंगभूमी यांसंबंधी अभ्यास केला. भारतीय नाट्यकलेत नवचैतन्य निर्माण करण्यासाठी त्यांनी अनेक नवनवीन प्रयोग केले. भारतीय रंगभूमीवर काम करणाऱ्या त्या पहिल्या सुशिक्षित व प्रतिष्ठित महिला होत. भारतीय कलाकुसरीच्या व हस्तकौशल्याच्या अवनत स्थितीतील कलांना ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी बरचे परिश्रम घेतले. हँडिक्रॅफ्ट्‌स ऑफ इंडिया (१९७५) हा त्यांचा तद्‌विषयक ग्रंथ महत्त्व पूर्ण आहे. त्यांच्या अन्य ग्रंथांत अवेकनिंग ऑफ इंडियन वुमनहुड (१९३९), सोसायटी अँड सोशॅलिझम (१९४८), इंडिया ॲट द क्रॉसरोड्‌स (१९४९) इ. उल्लेखनीय आहेत.

त्यांनी सार्वजनिक जीवनात अनेक महत्त्वपूर्ण पदे भूषविली : काँग्रेस पक्षाच्या सदस्या व पदाधिकारी  ‘ऑल इंडिया हँडिक्रॅफ्ट्‌स बोर्ड’, ‘भारतीय नाट्यसंघ’, ‘ऑल इंडिया डिझाइन सेंटर’ आदी संस्थांच्या अध्यक्षा इत्यादी. सार्वजनिक क्षेत्रातील कामगिरीबद्दल त्यांना वाटुमल पारितोषिक (१९६२), मॅगेसेस पुरस्कार (१९६६) यांसारखे मानसन्मानही लाभले.

भोईटे, उत्तम