माक्स वेबरवेबर, माक्स : (२१ एप्रिल १८६४–१४ जून १९२०). प्रसिद्ध जर्मन समाजशास्त्रज्ञ व अर्थशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म एरफुर्ट येथे एका सधन व्यापारी कुटुंबात झाला. त्यांचे व डील राजकारणी व विधिज्ञ होते. माक्स वेबर यांनी हायडल्‌बर्ग विद्यापीठात दोन वर्षे अध्ययन केले व नंतर बर्लिनला कायद्याची पदवी व अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळविली. बर्लिन विद्यापीठात १८९३ मध्ये न्यायशास्त्राचे व्याख्याते आणि १८९४ साली फ्रायबुर्ग विद्यापीठात अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. पुढे १८९६ मध्ये त्यांची हायडल्‌बर्ग विद्यापीठात नेमणूक झाली. १९०० च्या दरम्यान गंभीर व्याधी जडल्याने त्यांना कोणतेही काम करणे शक्य झाले नाही. १९०४ मध्ये ते अमेरिकेस गेले व त्याच वर्षी त्यांनी अर्काइव्ह फॉर सोशल सायन्स अँड वेल्फेअर पॉलिसीचे संपादक म्हणून काम पाहिले. १९०९ पासून त्यानीं आउटलाइन ऑफ सोशल इकॉनॉमिक्स ह्या बहुखंडीय ग्रंथाचे संपादन केले. त्यासाठी त्यांनी इकॉनॉमी अँड सोसायटी व त्याची पुरवणी म्हणून द इकॉनॉमिक एथिक्‌स ऑफ द वर्ल्ड रिलिजन या ग्रंथाचे लेखन सुरू केले. १९१८ साली व्हिएन्ना विद्यापीठात अभ्यागत प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. त्यानंतर म्यूनिक विद्यापीठात १९१९ मध्ये ते अर्थशास्त्राचे प्राध्यापक झाले.

माक्स वेबर यांनी समाजशास्त्राचे महत्त्वपूर्ण संशोधन, विश्लेषण व विवेचन केले. त्यांनी अतिशय मौलिक स्वरूपाचे ग्रंथलेखन केले, पण त्यांपैकी त्यांच्या हयातीत फारच थोडे प्रकाशित व भाषांतरित झाले. त्यांचे इंग्रजीत भाषांतरित झालेले काही महत्त्वाचे ग्रंथ पुढीलप्रमाणे : द प्रॉटेस्टंट एथिक अँड द स्पिरिट ऑफ कॅपिटॅलिझम (१९०४-०५, इं.भा. १९३०), द रिलिजन्स ऑफ द ईस्ट सीरिज (१९२०-२१, इं.भा. १९५२-५८). हा ग्रंथ एकूण तीन खंडांत प्रसिद्ध झाला, ते खंड असे : (१) द रिलिजन ऑफ चायना : कन्फ्यूशिॲनिझम अँड ताओइझम, (२) द रिलिजन ऑफ इंडिया : द सोशिऑलॉजी ऑफ हिंदुइझम अँड बुद्धिझम व (३) एन्शंट जुडाइझम : ऑन लॉ इन इकॉनॉमी अँड सोसायटी (१९२१, इं. भा. १९५४). याखेरीज द सिटी (१९२१, इं. भा. १९५८), मेथॉडॉलॉजी ऑफ द सोशल सायन्सेस (१९२२, इं. भा. १९४९) हे त्यांचे ग्रंथही उल्लेखनीय आहेत. त्यांच्या अन्य उपलब्ध इंग्रजी भाषांतरित ग्रंथांत थिअरी ऑफ सोशल अँड इकॉनॉमिक ऑर्गनायझेशन (१९४७), बेसिक कन्सेप्ट्‌स ऑफ सोशिऑलॉजी (इं. भा. १९६२) हे उल्लेखनीय आहेत. हान्स एच्‌. गर्थ आणि सी. राइट मिल्स यांनी अनुवादित व संपादित केलेल्या फ्रॉम माक्स वेबर : एसेज इन सोशिऑलॉजी (१९४६) या ग्रंथात त्यांचे महत्त्वाचे निवडक निबंध संकलित केले आहेत.

माक्स वेबर यांचे सुरुवातीच्या काळात मध्ययुगीन व्यापरी कंपन्या, रोम व प. यूरोपमधील कृषिभूमिविषयक संघटना, जर्मन शेअरबाजार हे प्रामुख्याने अभ्यासाचे विषय होते. धर्मामध्ये एक सामाजिक संस्था म्हणून त्यांना विशेष आस्था असल्याने त्यांनी बौद्ध धर्म, कन्फ्यूशियन मत, ताओवाद, प्राचीन ज्यू धर्म इ. विविध धर्मांचे सखोल विश्लेषण केले व त्यांची यूरोपीय ख्रिस्ती धर्माशी तुलनाही केली. कार्ल मार्क्सची विचारसरणी त्यांना अंशत: पटली होती परंतु त्यांच्या मते आर्थिक जीवन कितीही महत्त्वाचे असले, तरी आर्थिक जीवनाची प्रेरणासुद्धा धर्मविषयक कल्पनांतूनच मिळते. या संदर्भात त्यांनी मांडलेला द प्रॉटेस्टंट एथिक अँड द स्पिरिट ऑफ कॅपिटॅलिझम या प्रसिद्ध ग्रंथातील सिद्धांत अतिशय महत्त्वपूर्ण आहे. वेबर यांच्या मते प्रॉटेस्टंट पंथाची तत्त्वप्रणाली विशेषत: ⇨जॉन कॅल्व्हिन या धर्मशास्त्रवेत्त्याने प्रसृत केलेली विचारसरणी (कॅल्व्हिनवाद) ही भांडवलशाहीच्या वाढीस पोषक व प्रेरक आहे. केवळ संपत्ती मिळविणे पुरेसे नसून त्या संपत्तीची उत्पादनकार्यात गुंतवणूक करणे, अतिशय महत्त्वाचे आहे. त्याकरिता ज्या तत्त्वज्ञानामुळे लोक वित्तसंचय व गुंतवणूक करतील, असे तत्त्वज्ञान भांडवलशाहीच्या विकासाला अतिशय पोषक ठरते. या दृष्टिकनातून त्यांनी प्रॉटेस्टंट धर्मपंथातील तत्त्वज्ञान व नीतिमूल्ये (मुख्यत्वे कॅल्व्हिनवाद) आणि भांडवलशाहीचा विकास यांसंबंधी जो सखोल अभ्यास केला आहे, तो फार महत्त्वाचा समजला जातो. वेबर यांच्या मते भांडवलशाहीच्या विकासास धार्मिक तत्त्वज्ञान व नीतिमूल्ये हे एकच कारण नसून इतरही अनेक कारणष असतात परंतु भांडवलशाहीच्या विकासास इतर परिस्थिती अनुकूल असली, तरीसुद्धा जर भांडवलशाहीची मानसिकता समाजात नसेल, म्हणजेच भांडवलशाहीच्या विकासास अनुकूल धार्मिक तत्त्वज्ञान व नीतिमूल्ये यांचा अभाव असेल, तर भांडवलशाहीचा विकास त्या प्रमाणात होणार नाही. या संदर्भात त्यांनी केलेला हिंदू, प्राचीन ज्यू व चीनमधील कन्फ्यूशियन व ताओ धर्मांचा अभ्यास अतिशय सखोल, मूलगामी व विस्तृत स्वरूपाचा आहे. त्यांच्या मते, ज्या धर्मामध्ये वित्तसंचय व त्याची उद्योगधंद्यातील गुंतवणूक यांवर भर दिला जात नाही, तेथे भांडवलशाहीचा विकास होणे अवघड आहे. त्यांनी केलेले हिंदू धर्माचे विवेचन व भारतीय सामाजिक परिस्थितीचे विश्लेषण अतिशय मौलिक स्वरूपाचे गणले जाते.

वेबर यांनी आपल्या समाजशास्त्रीय विवेचनात ऐतिहासिक तुलनात्मक पद्धतीवर विशेष भर दिला. त्यांनी परंपरानिष्ठ समाजापासून ते आधुनिक बुद्धिप्रधान समाजापर्यंत निरनिराळ्या समाजरचनांचे तौलनिक दृष्ट्या विश्लेषण व विवेचन केले. वेबर यांनी समाजाचे नियंत्रण करणाऱ्या सत्तेचे वा अधिकारशाहीचे तीन प्रकार मानले : (१) अलौकिक व्यक्तिमत्त्वाची वा विभूतीची (करिश्मॅटिक) सत्ता, (२) पारंपरिक सत्ता व (३) वैधानिक सत्ता. काही व्यक्तींमध्ये दैवी वा लोकविलक्षण शक्ती असल्याची समाजाची धारणा असते. अशा व्यक्तींना नेतृत्व प्राप्त होऊन त्यांची समाजावर सत्ता चालते. काही हुकूमशाही राजवटींत हे दिसून येते. काही व्यक्तींना पूर्वोक्त परंपरेने अधिकार प्राप्त होतात. उदा., सरंजामशाहीतील जमीनदार  भूदास संबंध किंवा पितृसत्ताक कुटुंबपद्धती. याशिवाय कायदेशीर वा वैधानिक नियमांच्या आधारेही समाजाचे नियंत्रण केले जाते. या प्रशासकीय स्वरूपाच्या सत्ता होत. समाजात वैधानिक सत्तेशी समन्वय साधणाऱ्या संपत्ती व वस्तू यांना वेबर यांनी `प्रशासनाची साधने’ मानले आहे. या साधनांवर व्यक्तीचा पूर्ण अधिकार नसतो, तर त्यावर शासनामार्फत नियंत्रण आणले जाते. आधुनिक लोकशाहीतील नोकरशाही हे प्रशासकीय सत्तेचे उदाहरण होय. नोकरशाही हा आधुनिक समाजरचनेचा महत्त्वाचा घटक त्यांनी मानला. नोकरशाही ही कर्तव्यांचे विशेषीकरण, नियमांनुसार कृती व अधिकारशाहीची श्रेणीबद्ध संरचना यांवर आधारलेली संघटनात्मक प्रणाली आहे, असे त्यांचे प्रतिपादन होते. वेबर यांच्या मते, लोकशाही शासनपद्धतीचे स्वरूप व प्रभाव यांमुळे नोकरशाहीचा विकास शक्य झाला म्हणून लोकशाही व नोकरशाही यांच्यात घनिष्ठ संबंध असल्याने त्यांनी दाखवून दिले. आधुनिक समाजरचनेत विवेकप्रामाण्य व कायद्याचे प्रामाण्य यावर भर दिला जातो. वेबर यांनी बुद्धिप्रधान समाजरचनेचे विश्लेषणही धार्मिक कल्पना व नीतिमूल्ये याच्या अनुषंगाने केले. त्यांच्या मते समाजरचना ही बुद्धिप्रामाण्य व कायदाप्रामाण्य यांवर आधारलेली असल्याखेरीज तिला आधुनिकता प्राप्त होणार नाही. त्यासाठी नोकरशाहीचा विकास होणे अतिशय महत्त्वाचे असून त्याला एक प्रकारच्या व्यक्तिनिरपेक्ष वातावरणाची जरूरी असते. समाजात अधिकाराचे वाटप हे गुणवत्ता व कार्यक्षमता यांनुसार झाले नाही, तर समाजाचा योग्य तो विकास होणार नाही. ज्या समाजात अधिकार हा जन्मसिद्ध असतो, त्या समाजाची वाढ खुंटणार हे साहजिकच आहे. वेबर यांनी सामाजिक क्रियेसंबंधी (सोशल ॲक्शन) केलेले विवेचनही महत्त्वपूर्ण आहे. समाजशास्त्र हे सामाजिक क्रियांच्या अर्थबोधाशी संबंधित आहे. हा अर्थबोध सामाजिक क्रियेचे विश्लेषण, स्पष्टीकरण, त्यांतील परस्परसंबंध, कार्यकारणभाव यांच्या शोधातून जाणून घेता येतो. सामाजिक क्रिया व्यक्ति- व्यक्तींमधील सहकार्य, संघर्ष आदी संबंधांतून घडते. यामुळेच व्यक्ति-व्यक्तींमध्ये काही व्यवहार वा वर्तनपद्धती निर्माण होतात त्या मुख्यत्वे भावनात्मक, मूल्यात्मक, हेतुपूर्ण, तर्कसंगत आणि परंपरागत अशा पातळ्यांवर घडतात. ह्या सर्व व्यवहारांमध्ये वेबर समूहापेक्षा व्यक्तीला जास्त महत्त्व देतात.

वेबर यांनी मेथॉडॉलॉजी ऑफ द सोशल सायन्सेस व एसेज इन सोशिऑलॉजी   या ग्रंथांत सामाजिक शास्त्रांच्या अभ्यासातील पद्धतिशास्त्राचे महत्त्व विशद केले. समाजशास्त्रातील वैज्ञानिक अधिष्ठान व इतर शास्त्रांमध्ये प्राधान्य मिळवून देण्याच्या दृष्टीने त्यांनी तुलनात्मक पद्धती, प्रत्यक्ष निरीक्षण, संशोधन यांवर आधारित पद्धतिशास्त्र विकसित केले. वेबर यांनी सामजिक गतिशीलता व परिवर्तन यांचे विश्लेषण करण्यातही विशेष रूची होती. समाजरचना व सामाजिक परिवर्तन या दोन्हींचा अभ्यास त्यांनी सातत्याने व साकल्याने केला. आर्थिक विकास व आधुनिकीकरण यांना पोषक ठरणाऱ्या सामाजिक परिस्थितीसंबंधी त्यांनी विश्लेषण केले आहे. ‘राजकारणाचे समाजशास्त्र’ ही नवीन अभ्यासशाखा प्रामुख्याने वेबर यांच्या संशोधनामुळे व विश्लेषणामुळे निर्माण झाली.

म्यूनिक येथे न्यूमोनियाच्या आजाराने त्यांचे अकस्मात निधन झाले.

संदर्भ : 1. Beetham, David, Max Weber and the Theory of Modern Politics, 1985.  

            2. Bendix, Reinhard, Max Weber : An Intellectual Portrait, Fultion St. Berkeley, 1977.

            3. Collinex, Randall, Max Weber : A Skeleton Key, Vol. I, II, II, New York, 1986.

            4. Weber, Marianne Trans. Zohn, Harry, Max Weber : A Biography, New York, 1975.                                            

दामले, य. भा.