मार्गारेट मीडमीड, मार्गारेट : (१७ डिसेंबर १९०१–१५ नोव्हेंबर १९७८). प्रसिद्ध अमेरिकन मानवशास्त्रज्ञ. जन्म फिलाडेल्फिया (पेनसिल्व्हेनिया) येथे. शालेय शिक्षण घरी पूर्ण करून तिने पुढे बर्नार्ड महाविद्यालयातून (कोलंबिया विद्यापीठ) मानसशास्त्र विषयात पदवी घेतली (१९२२). तेथेच फ्रांट्‌स बोॲस या नामवंत मानवशास्त्रज्ञाचे आणि नंतर रूथ बेनेडिक्ट या विदुषीचे तिला मार्गदर्शन लाभले. त्यांच्या प्रभावामुळे तिच्या पुढील जीवनाला कलाटणी मिळाली.

प्रथम तिने पॅसिफिक महासागरातील ओशिॲनिया बेटावरील आदिवासी लोकांचा अभ्यास केला. पुढे सामोआ, न्यू गिनी, ॲडमिरॅल्टी द्वीपसमूह, बाली इ. बेटांवरील आदिम जमातींचा प्रत्यक्ष क्षेत्राभ्यास करून तिने प्रारंभीचे संशोधन केले. विशेष म्हणजे या प्रारंभीच्या संशोधनाचा पाठपुरावा ती १९७५ पर्यंत करीत होती. १९२८ ते १९७५ दरम्यान जवळजवळ सहा वेळा या प्रदेशांना तिने भेटी दिल्या. विशेषतः मॅनस बेटावरील पेरी गावातील आदिवासींचा अश्मयुगापासून इलेक्ट्रॉनिक युगापर्यंत एकाच पिढीत झालेला प्रवास तिने कसोशीने टिपला. तेथील आदिवासी जीवनाच्या परिवर्तनांचा अभ्यास करण्याचे तंत्र प्रथमच तिने अवलंबिले. मानसशास्त्रीय तत्त्वे व तंत्रे मानवशास्त्रीय संशोधनासाठी वापरण्यास प्रथम तिनेच सुरुवात केली. संस्कृतीची संकल्पना, समाजरचना आणि संस्कृतीचा समाजीकरणाच्या आकृतीबंधावर होणारा परिणाम व त्यामुळे विविध समाजातील व्यक्तीमत्वांच्या विशिष्ट पद्धतीने होणारा विकास व्यक्तीचे लैंगिक जीवन व सवयींवर पडणारा संस्कृतीचा प्रभाव, संस्कृतीचे प्रतिकात्मक अर्थबोधन व त्यासाठी कर्मकांड, कला यांसारख्या गोष्टींची उपयुक्तता असे तिचे प्रारंभीचे संशोधन-अभ्यासाचे विषय होते. विविध समाजांतील स्त्री-जीवनाचा तौलनिक अभ्यास करणारी, तसेच सामाजिक-सांस्कृतिक घटकांचा शारीरिक-जौविक प्रक्रियांवर होणारा परिणाम निदर्शनास आणणारी ती पहिलीच मानवशास्त्रज्ञ होय.

तिने आपल्या सुरूवातीच्या संशोधनाचे निष्कर्ष कमिंग ऑफ एज्‌ इन सॅमोआ (१९२८), ग्रोइंग अप इन न्यू गिनी (१९३०) व सेक्स अँड टेंपरामेंट इन थ्री प्रिमिटिव्ह सोसायटीज (१९३५) या ग्रंथांत मांडले. व्यक्तिगत व सामाजिक अभिवृत्ती आणि वर्तणूक यांना वळण देण्याचे महत्त्वाचे कार्य संस्कृती करते, हे तिने विश्लेषणात्मक-वर्णनात्मक पद्धतीने वरील ग्रंथांतून विशद केले आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर सामाजिक परिवर्तनाच्या अभ्यासाकडे ती वळली आणि सामाजिक-सांस्कृतिक पार्श्वभूमीच्या परिवर्तनाचा वेग व आशय यांवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यासही तिने केला. अनेक भिन्न शास्त्रांचा समन्वय साधून संशोधन करण्यात ती अग्रणी होती.

 तिची ‘अमेरिकन म्यूझियम ऑफ नॅचरल हिस्टरी’ येथे मानवजातिशास्त्र विषयाची साहाय्यक अभिरक्षक (१९२६–४२), सह अभिरक्षक (१९४२–६४), अभिरक्षक (१९६४–६९) आणि गुणश्री अभिरक्षक (१९६९ नंतर) म्हणून नियुक्ती करण्यात आली. कोलंबिया विद्यापीठात ती मानवशास्त्र विषयाची अभ्यागत प्राध्यापक म्हणून १९५४ नंतर अध्यापनही करीत असे. अमेरिकेच्या अनेक आयोगांवर तिने सभासद म्हणून काम केले. २८ विद्यापीठांनी सन्मान्य डी.लिट्‌. ही पदवी तिला दिली. यांखेरीज तिला इतरही अनेक मानसन्मान मिळाले.

तिचे संशोधनपर लेखन विपुल असून तिने मानवशास्त्रातील विविध शाखांवर एकूण ४४ ग्रंथ लिहिले. यांपैकी १८ ग्रंथांत ती सहलेखिका असून तिचे सु. १,००० शोधनिबंध आणि व्याप्तिलेख प्रसिद्ध झाले आहेत. याशिवाय विविध विषयांवरील तिची काळजीपूर्वक व अभ्यासपूर्वक काढलेली टिपणे मानवशास्त्राच्या पुढील अभ्यासकांना उपयुक्त ठरली आहेत. तिने लिहिलेल्या ग्रंथांपैकी माउंटन अरापेश (१९३८-४९), बालिनीज कॅरॅक्टर : ए फोटोग्राफिक ॲनालिसिस (१९४२), मेल अँड फीमेल : ए स्टडी ऑफ द सेक्सिस इन अ चेजिंग वर्ल्ड (१९४९), न्यू लाइव्ह्‌ज फॉर ओल्ड (१९५६), ॲन्थ्रपॉलॉजी : ए ह्यूमन सायन्स (१९६४), कल्चर अँड कमिटमेंट (१९७०), ए रॅप ऑन रेस (१९७१), इ. पुस्तके महत्त्वाची आहेत. ब्लॅकबरी विंटर या आत्मचरित्रात (१९७२) तिचे प्रारंभीचे जीवनकथन आढळते. लेटर्स फ्रॉम द फील्ड (१९७८) हा तिचा पत्रसंग्रह.

मार्गारेट मीडने निरनिराळ्या समाजरचनांचा तुलनात्मक दृष्टीने अभ्यास करून संस्कृती व मूल्ये, समाजरचना व व्यक्तिमत्व यांसंबंधी महत्त्वाचे सिद्धांत मांडले. समाजरचनेच्या अभ्यासात तिने मानसशास्त्रीय दृष्टीकोनाचा आग्रहपूर्वक पुरस्कार केला. तिच्या मते आर्थिक-तांत्रिक विकास व बदल हे संस्कृती व समाजरचनेवर बरेचसे अवलंबून असतात. प्रत्येक समाजरचनेचे काही एक वैशिष्ट्य असते आणि त्यानुसार सामाजीकरणाची प्रक्रिया व व्यक्तिमत्त्वाचा विकास विशिष्ट प्रकारचा ठरतो. समाजशास्त्रीय सिद्धांतांचा उपयोग हा सामाजिक बदल निरनिराळ्या स्तरांना कशा तऱ्हेने मान्य होईल, हे समजण्यासाठी आणि दैनंदिन जीवन जास्त समृद्ध करण्यासाठी झाला पाहिजे, असे तिने आग्रहाने प्रतिपादले. आधुनिक मानवशास्त्राच्या अभ्यासात तिने वैज्ञानिक पद्धतीची शिस्त निर्माण केली. न्यूयॉर्क येथे ती कर्करोगाने मरण पावली.

संदर्भ : 1. Dillon, Wilton S. Margaret Mead. Grants Magazine, New York, 1979.

             2. Dillon, Wilton S.Margaret Mead President Elect, 1974, Science, New York, 1974.

             3. Gordon, Joan, Ed. Margaret Mead: The Complete Bibliography 1925-1975, The Hague, 1976.

कुलकर्णी, मा. गु. दामले, य. भा.