रॉस, एडवर्थ ॲल्झवर्थ : (१२ डिसेंबर १८६६−२२ जुलै १९५१). अमेरिकन समाजशास्त्राच्या आद्य प्रवर्तकांपैकी एक महत्त्वाचा समाजशास्त्रवेत्ता. अमेरिकेतील इलिनॉय संस्थानात व्हर्डन येथे जन्म. याचे माता-पिता आयर्लंड आणि स्कॉटलंडचे रहिवासी होते. बालपणी कॅनझस संस्थानातील सेंट्रालिया व आयोवा संस्थानातील सीडर रॅपिड्स येथे वास्तव्य. वयाच्या दहाव्या वर्षांच्या आतच माता-पित्यांच्या निधनामुळे तो पोरका झाला. काही काळ वेगवेगळ्या नातेवाईकांनी त्याला ठेवून घेतले परंतु शेवटी आयोवा संस्थानामध्येच मॅरीअन येथील बीच कुटुंबाकडे त्याला आश्रय मिळाला. पुढे श्रीमती बीच यांच्या मृत्यूपर्यंत त्या कुटुंबाशी रॉसेचे निकटचे संबंध राहिले. सोळाव्या वर्षी मॅरीअन सोडून तो पुन्हा सीडर रॅपिड्स येथील कोय महाविद्यालयात दाखल झाला. तेथे पदवीपर्यंतचे शिक्षण त्याने पूर्ण केले. पुढे जर्मनी तसेच अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठात त्याचे शिक्षण झाले. जॉन्स हॉपकिन्स येथून १८९१ मध्ये त्याने पीएच्. डी. घेतली. नंतर इंडियाना आणि कॉर्नेल विद्यापीठांत वर्षभर अध्यापनाचे काम करून १८९३ मध्ये तो स्टॅन्फर्ड विद्यापीठात प्रशासन आणि अर्थकारण (फायनॅन्स) या विषयांचा प्राध्यापक म्हणून नियुक्त झाला. पुढे त्याच्या आग्रही स्वरूपाच्या पुरोगामी, कल्याणकारी आणि सुधारणावादी विचारामुळे त्याने समाजातील सनातन्यांचा रोष ओढवून घेतला. स्टॅन्फर्ड विद्यापीठाशी संबंधित असलेल्या ‘सदर्न पॅसिफिक रेलरोड कंपनी’कडून कंपनीच्या गौरेतर कामगारांना मिळणाऱ्या वाईट वागणुकीच्या विरुद्ध रॉसने कामगारांची बाजू जाहीरपणे उचलून धरली, हेच त्या रोषाला पुरेसे कारण होते. विद्यापीठाचे संस्थापक स्टॅन्फर्ड यांची विधवा पत्नी लेलँड स्नॅन्फर्ड हिने तर विद्यापीठाच्या अध्यक्षांकडे रॉसला बडतर्फ करण्याबद्दल आग्रह धरला. अध्यक्षांना रॉसबद्दल सहानुभूती होती तरी श्रीमती स्टॅनफर्डच्या सततच्या तगाद्यामुळे शेवटी नाईलाजाने त्यांनी रॉसकडून राजीनामा मागितला. रॉसने त्याप्रमाणे नोव्हेंबर १९०० मध्ये राजीनामा दिला व एक प्रगट निवेदनही दिले. त्यात आपल्या राजीनामा दिला व एक प्रगट निवेदनही दिले. त्यात आपल्या राजीनाम्याबद्दल श्रीमती स्टॅन्फर्डला रॉसने दोषी ठरविले होते.

यानंतरही रॉसचे विद्याक्षेत्रीय कार्य चालूच राहिले. प्रथम नेब्रॅस्का विद्यापीठात आणि नंतर १९०६ पासून १९३७ पासून १९३७ मध्ये निवृत्त होईपर्यंत विस्कॉन्सिन विद्यापीठात त्याने अध्यापनाचे काम केले. त्याने एकूण २८ ग्रंथ आणि अनेक विद्वन्मान्य असे लेख लिहिले. त्याने लिहिलेल्या ग्रंथांपैकी फाउंडेशन ऑफ सोशिऑलॉजी (१९०५), सोशल कंट्रोल (१९०१), सिन अँड सोसायटी (१९०७), सोशल सायकॉलॉजी (१९०८) आणि प्रिन्सिपल्स ऑफ सोशिऑलॉजी (१९२०) हे त्याचे प्रमुख ग्रंथ होत. पैकी सोशल कंट्रोल आणि फाउंडेशन ऑफ सोशिऑलॉजी हे दोन ग्रंथ अनुक्रमे १८९६ ते १८९८ आणि १८९७ ते १९०४ या काळात त्याने प्रसिद्ध केलेल्या लेखांचे संग्रह होत. सामाजिक मानसशास्त्रावर सर्वप्रथम रॉसनेच लेखन केले आहे. सेव्हंटी पिअर्स ऑफ इट हे १९३६ मध्ये प्रसिद्ध झालेले त्याचे आत्मचरित्र आहे.

एडवर्ड ॲल्झवर्थ रॉस

एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस अमेरिकेत औद्योगिकीकरण, नागरीकरण यांच्या प्रक्रियेला झपाट्याने सुरुवात झाली होती. त्यामुळे समाजात आमूलाग्र स्थित्यंतरे घडून येत होती. शतकाच्या मध्यास चार्ल्स डार्विनने जैविक उत्क्रांतीवादाचे स्वरूप स्पष्ट करणारा ग्रंथ प्रसिद्ध केला होता. त्याचा परिणाम सामाजिक विचारवंतांवरही होऊन सामाजिक प्रक्रियांमध्ये उत्क्रांतीवादाचा तथा ‘समर्थ त्यांचा टिकाव’ या तत्त्वाचा शोध लावण्यास सुरुवात झाली होती हर्बर्ट स्पेन्सर आणि विल्यम ग्रेअम सग्नर यांनी सामाजिक डार्विनवादाचा पुरस्कार करून समाजातील गरीब आणि दलित वर्गांच्या दुरवस्थेचे एक प्रकारे समर्थनच केले. स्पर्धात्मक जीवमन जगण्याच्या शर्यतीत अपेशी ठरलेल्या लोकांचा हा वर्ग आहे. त्यांना कितीही आणि कोणतेही कृत्रिम प्रोत्साहन दिले, तरी हा वर्ग वर येणार नाही, असा त्यांचा युक्तिवाद होता. रॉसने आपल्या लिखाणातून या विचारसरणीच्या विरुद्ध हल्ला चढविला. एकीकडे औद्योगिकीकरणाने निर्माण झालेल्या नवनागरी समाजात ग्रामीण समाजातील एकोपा, आपलेपणा इ. मुल्ये नष्ट होत चालली आहेत, याबद्दल त्याला खंत होती आणि नागरी जीवनातील कृत्रिमता, नियंत्रणरहित संदर्भामुळे निर्माण होणारी गुन्हेगारी प्रवृत्ती इत्यादींमुळे नागरी जीवनाबद्दल त्याला फारशी आस्था उरली नव्हती. नागरी जीवनाच्या आकर्षणामुळे ग्रामीण भागातील बुद्धिमान लोकांची नगरांकडे रीघ लागते. यामुळे ग्रामीण भागाचे नुकसान होते असे त्याचे मत होते परंतु त्याचबरोबर समाजात अलौकिक शक्तीवर आधारलेल्या धर्माचा पगडा कमी व्हावा आणि वैयक्तिक व सामाजिक नैतिकतेसह समाजाने प्रगती साधावी, असे त्याला वाटत होते. अशा रीतीने जुने आणि नवे यांतील सुवर्णमध्याचा पुरस्कार तो करीत असे.

त्याच्या समाजशास्त्रीय लिखाणामध्ये त्याच्या विचारसरणीचे स्पष्ट प्रतिबिंब उमटलेले दिसते. फाउंडेशन्स ऑफ सोशिऑलॉजी या ग्रंथात त्याने सामाजिक डार्विनवादावर कडक टीका केलेली आहे आणि अमेरिकन समाजसुधारणेस पूरक असे समाजशास्त्रीय सिद्धांत प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. रॉसने सर्वप्रथम ⇨सामाजिक प्रक्रिया या संकल्पनेचे महत्त्व या ग्रंथात प्रतिपादिलेले आहे. समाजात चालू असलेल्या अनेक प्रक्रिया त्याने शोधून काढल्या होत्या परंतु शेवटी साहचर्य, वर्चस्व (डॉमिनेशन), शोषण आणि विरोध ह्या चार महत्त्वाच्या प्रक्रिया होत, असे त्याने प्रतिपादिले. सोशल कंट्रोल आणि सोशल सायकॉलॉजी या ग्रंथामध्ये व्यक्तीच्या वर्तणाचे निंयत्रण करणाऱ्या सामाजिक सांधनांची त्याने चर्चा केली आहे [⟶ सामाजिक नियंत्रण]. रूढी, संकेत, धर्म आणि शिक्षण यांच्यासह कायदा आणि सामाजिक बंधनांचा त्यांत उल्लेख आहे.

सामाजिक न्याय आणि नैतिक अधिष्ठाण यांची कदर करणाऱ्या, सुरुवातीच्या काही समाजशास्त्रांमध्ये रॉसची गणना प्रामुख्याने होते.

मॅडिसन (विस्कॉन्सिन) येथे त्याचे निधन झाले.

संदर्भ : 1. House, F. N. The Development of Sociology, New York, 1936.

2. Karpf, F. B. American Social Psychology Its Origins, Development and European Background, New York, 1932.

कुलकर्णी, मा. गु.