व्हिर्ट, लूई : (२८ ऑगस्ट १८९७–३ मे १९५२). प्रख्यात अमेरिकन समाजशास्त्रज्ञ व नागरी समस्यांचे गाढे अभ्यासक. त्यांचा जन्म पश्चिम जर्मनीतील गम्यूंदन येथील एका सधन ज्यू कुटुंबात झाला. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी उच्च शिक्षणासाठी अमेरिकेस प्रयाण केले. शिकागो विद्यापीठातून ते एम्. ए. पीएच. डी. झाले. १९२६पासून ते याच विद्यापीठामध्ये प्राध्यापक होते.

शिकागो येथील प्रसिद्ध अमेरिकन समाजशास्त्रज्ञ ए. डब्ल्यू. स्मॉल (१८५४ – १९२६) यांचा, तसेच मार्क्सवादी युद्धविरोधी विचारसरणीच्या गटांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव पडला. त्यांच्याबरोबरच त्यांनी पहिल्या महायुद्धाच्या काळात काम केले. सामाजिक सुधारणांसाठी मानवी वर्तनाचे शास्त्र अभ्यासले पाहिजे, असे त्यांचे मत होते. व्यावसायिक सामाजिक कार्यकर्ता म्हणून, तसेच प्रशासकीय सल्लागार म्हणून त्यांनी कार्य केले. ‘अमेरिकन कौन्सिल ऑफ रेस रिलेशन्स’ या संस्थेचे ते संस्थापक संचालक होते. शिकागो विद्यापीठातील समाजशास्त्राचे विभागप्रमुख रॉबर्ट एझरा पार्क आणि अर्नेस्ट डब्ल्यू. बर्जेस यांनी नागरी समाजशास्त्राच्या शिकागो विचारप्रणालीचा पाया रचला.

रॉबर्ट पार्क आणि अर्नेस्ट बर्जेस यांच्याप्रमाणे व्हिर्ट यांनीही (१) लोकसंख्याशास्त्र, परिस्थितिविज्ञान आणि तंत्रविद्या (२) सामाजिक संघटना आणि (३) सामाजिक मानसशास्त्र या तीन विभागांत समाजशास्त्राची विभागणी केली. सैद्धान्तिक समाजशास्त्राला प्रत्यक्ष संशोधन व व्यवहार यांची जोड दिली पाहिजे, असे व्हिर्टचे प्रतिपादन आहे. त्यांना समूहजीवनाच्या मूलाधारांबद्दल उदा. स्पर्धा आणि परस्परसंवाद, सहजीवन-व्यवस्था आणि सांस्कृतिक व्यवस्था, तसेच पारिस्थितिकीय समूह व नैतिक समूह अशा घटकांतील आंतरक्रियांबाबत विशेष आस्था होती.

व्हिर्ट हे व्यक्तिगत स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते. समाजशास्रज्ञाने परस्परसंवाद, चर्चा, वादविवाद, वाटाघाटी, तडजोडी यांच्या साहाय्याने जनमत घडवून आणण्याची कला विकसित करण्यासाठी आपले ज्ञान अधिक परिणामकारक व प्रभावीरीत्या राबविले पाहिजे, असेही त्यांनी सूचित केले.

मानवसमूहाचे परिस्थितिविज्ञान हा व्हिर्ट यांच्या आस्थेचा मुख्य विषय होता. अवर सिटीज : डियर रोल इन द नॅशनल इकॉनॉमी (१९३७) या ग्रंथात शहरांसंबंधीचे रष्ट्रीय धोरण काय असावे, याबाबत प्रारंभिक चर्चा करण्यात आलेली आहे. द घेट्टो (१९२८) हा त्यांचा दुसरा उल्लेखनीय ग्रंथ. नागरी जीवनाच्या समाजशास्त्रीय विश्लेषणाचे सैद्धान्तिक विवेचन त्यांनी अर्बनिझम अज अ वे ऑफ लाइफ या लेखात केले (१९३८). त्यानंतरच्या नागरी समाजावरील प्रत्येक ग्रंथात व्हिर्टच्या या मौलिक लेखाची दखल घेण्यात आली. त्यांचे अनेक संशोधनपर लेख कम्युनिटी लाइफ अँड सोशल पॉलिसी (१९५६) आणि लूई व्हिर्ट ऑन सिटीज अँड सोशल लाइफ (१९६४) या पुस्तकांत संकलित केले आहेत.

व्हिर्ट यांचा दुसरा आवडता विषय म्हणजे बौद्धिक जीवनाचे समाजशास्त्र हा होय. या विषयावर त्यांनी अनेक लेख लिहिले आणि त्यांतून श्रद्धा व विचारप्रणाली यांचे स्थान, सामाजिक जीवनावर विचारांचा होणारा परिणाम, बौद्धिक जीवनाचे सामाजिक संघटन इ. विषयांचा परामर्श घेतला.

गृहनिर्माण, अल्पसंख्याकांच्या समस्या त्याचप्रमाणे वांशिक नातेसंबंधांचे प्रश्न अशा विविध क्षेत्रांत त्यांनी प्रत्यक्ष कार्य केले.

व्हिर्ट हे ‘अमेरिकन सोशिऑलॉजिकल असोशिएशन’चे अध्यक्ष (१९४७) आणि ‘इंटरनॅशनल सोशिऑलॉजिकल असोशिएशन’चे पहिले अध्यक्ष (१९४९ – ५२) होते. ज्ञान हे सामाजिक कृतीपासून अलग करता येत नाही, त्याचप्रमाणे समाजशास्त्र हे कोणत्याही प्रश्नापासून किंवा समाजातील चालू घडामोडींपासून वेगळे करता येत नाही, यावर व्हिर्ट यांचा ठाम विश्वास होता. बफालो येथे त्यांचे निधन झाले.            

                देशपांडे, सु. चिं.