शिष्टजन : (एलिट). जन्मजात स्वरुपाच्या आणि स्वकष्टाने संपादित केलेल्या अशा दोन्ही प्रकारच्या गुणवत्तेमुळे विशिष्ट क्षेत्रात विशेष प्राविण्य संपादन करणाऱ्यांना समाज एक विशेष दर्जा किंवा प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचा प्रयत्न करतो. असा विशिष्ट दर्जा व सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त झालेल्या समूहाला समाजशास्त्रज्ञांनी व राज्यशास्त्रज्ञांनी शिष्टजन किंवा अभिजन अथवा श्रेष्ठजन अशा संज्ञा दिलेल्या आहेत. इंग्रजीत एलिट ही एकच संज्ञा त्यासाठी रूढ आहे.

अभिजन, शिष्टजन व श्रेष्ठजन : अभिजन ही संज्ञा गुणनिर्देशक स्वरुपाची आहे. स्वतःचे अनुभव, अभिरुची, सौंदर्यदृष्टी, सराव इत्यादींच्या आधारे आपले प्राविण्य संबंधीत व्यक्ती विकसित करते. काही वेळा आनुवंशिक गुणविशेषांची जोडही या प्रक्रियेत लाभते. अशा व्यक्तींना सामाजिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त होऊन त्या व्यक्ती समाजाच्या भूषण ठरतात. मात्र अभिजनवर्गातील सदस्य आपले वेगळेपण कायम टिकविण्याचा प्रयत्न करतात. या व्यक्ती समाजात फारशा मिसळत नाहीत. आपल्या श्रेणीतील सदस्यांच्या बरोबर मिसळण्याचा व त्यांच्याशी संपर्क ठेवण्याचा त्या विशेष प्रयत्न करतात. सांस्कृतिक मूल्य व्यवस्था जतन करण्याची खास जबाबदारी अशा अभिजनवर्गाकडे असते.

शिष्टजन (इंग्रजीत ‘रिस्पेक्टेबल’ किंवा ‘ऑनरेबल’) ही संज्ञा समाजातील सभ्य व प्रतिष्ठित सदस्यांच्या संदर्भात वापरली जाते. वयोवृद्ध व्यक्ती, परंपरेने विशेष दर्जा धारण करणारी खानदानी घराणी, न्यायव्यवस्थेतील सदस्य, जातपंचायतीतील सदस्य, महाजन वर्गातील सदस्य इत्यादींना अनुभवाच्या आधारे समाजव्यवस्थेने सामूहिक स्वरुपाची प्रतिष्ठा प्राप्त करून दिलेली असते. या शिष्टजनांचे समाजव्यवस्थेवर नैतिक प्रभुत्व असते. त्यांचे आचारविचार, वर्तन व कृती शिष्टाचाराला व सभ्यतेला अनुसरून असतात, अशी समाजाची धारणा असते. सामाजिक संगटन, सामाजिक स्वास्थ्य आणि सामाजिक मूल्ये प्रस्थापित करण्यात व त्यांचे संवर्धन करण्यात शिष्टजनांची भूमिका विधायक स्वरुपाची असल्याने समाज या शिष्टजनांना मानाचे स्थान प्राप्त करून देतो. सभ्यता, शिष्टता व नैतिकता या संज्ञा संस्कृतिनिदर्शक असल्याने शिष्टजन ही संज्ञा संस्कृतिनिदर्शक स्वरुपाचा आशय स्पष्ट करते. पारंपरिक समाजव्यवस्थेत तसेच लहान आकारमान असलेल्या समाजात शिष्टजनांचे स्थान विशेष महत्त्वाचे मानले जात असे. परंतु गुंतागुंतीच्या व अतिपरिवर्तनवादी आधुनिक समाजात शिष्टजनांचे महत्त्व कमी होत चालले आहे. समाजाचे होत जाणारे नैतिक अधःपतन त्यास कारणीभूत मानले जाते.

श्रेष्ठत्वाच्या जाणिवेशी निगडीत असलेली श्रेष्ठजन ही संज्ञा समाजाच्या राजकीय व्यवस्थेच्या संदर्भात प्रामुख्याने वापरली जाते. ही संज्ञा श्रेष्ठतानिदर्शक स्वरुपाचा आशय सूचित करते. श्रेष्ठजनवर्ग आपले श्रेष्ठत्व, प्रभुत्व आणि अस्तित्व दीर्घकाळ टिकविण्याकडे विशेष लक्ष देतो. प्रामुख्याने सत्ता, संपत्ती व अधिकार इत्यादींच्या बळावर प्रभाव प्रस्थापित करण्याची महत्त्वाकांक्षा श्रेष्ठजनांत दिसून येते. जातिनिष्ठ समाजव्यवस्थेतील उच्चजातीय समुदाय, राजकीय सत्ता संपादन करणारा राजकारणी लोकांचा वर्ग, प्रशासकीय यंत्रणेतील उच्चपदाधिकारी, धार्मिक क्षेत्रातील पुरोहितांचा वर्ग, शेतीप्रधान समाजव्यवस्थेतील जमीनदारांचा व वतनदारांचा वर्ग, वर्गीय समाजव्यवस्थेतील भांडवलदार, सावकार  व श्रीमंतांचा वर्ग, औद्योगिक, व्यापारी क्षेत्रांतील बडे उद्योगपती व व्यापारी यांसारख्या वेगवेगळ्या क्षेत्रांतील श्रेष्ठजनांचे वर्ग आढळतात. एलिट या इंग्रजी संज्ञेचा संबंध प्रामुख्याने श्रेष्ठजन या संज्ञेशी निगडीत आहे. सामाजिक, राजकीय आर्थिक विषमतेच्या पार्श्वभूमीवर श्रेष्ठजनांचे केलेले विवेचन हे नकारात्मक दृष्टिकोनावर आधारलेले आहे याउलट अभिजनांचे आणि शिष्टजनांचे विवेचन हे सकारात्मक दृष्टिकोनावर आधारलेले आहे.

अभिजन, शिष्टजन व श्रेष्ठजन या तीनही संज्ञांचा गर्भितार्थ जरी वेगवेगळा असला, तरी त्यांची फलनिष्पत्ती संघटित समाजव्यवस्थेवर आधारलेली आहे. लोकशाही समाजव्यवस्थेचा, व्यवसायाच्या विशेषीकरणाचा व स्पर्धात्मक जीवनपद्धतीचा जसाजसा विकास होऊ लागला, तसतसे अभिजन, शिष्टजन व श्रेष्ठजन यांच्याविषयीचे निकष बदलू लागले, असे दिसून येते. सामाजिक बांधीलकीच्या जाणिवेतून अभिजन, शिष्टजन व श्रेष्ठजन यांच्याकडून विशिष्ट प्रकारच्या आचारविचारांची अपेक्षा समाज बाळगू लागला. सामाजिक उद्दिष्टपूर्ती, समायोजन, एकात्मता, सामाजिक व्यवस्थापन व तणावनिवारण इ. बाबतींत समाज या तीनही वर्गांकडून विशिष्ट अपेक्षा करतो. सामाजिक व राष्ट्रीय कल्याणाच्या दृष्टीने विशेष योगदानाची अपेक्षा या तीनही वर्गांकडून करण्यात येते. म्हणून समाजरचनेच्या चौकटीत कार्यात्मक दृष्टीकोनातून अनेक समाजशास्त्रज्ञांनी व राज्यशास्त्रज्ञांनी अभिजन, शिष्टजन व श्रेष्ठजन यांचे ऐतिहासिक व तुलनात्मक स्वरुपाचे विवेचन केलेले आहे.

शिष्टजनांचे वर्गीकरण : समाजरचनेच्या व सामाजिक संबंधांच्या पार्श्वभूमीवर तसेच सामाजिक नेतृत्वाच्या जाणिवेतून शिष्टजनांचे (एलीट्स) वर्गीकरण पुढीलप्रमाणे करता येईल.

(१) प्रज्ञावंतांचा वर्ग : (स्ट्रॅटेजिक क्लास). समाजजीवनाच्या विविध क्षेत्रांत केवळ चातुर्य, गुणवत्ता, पात्रता, अनुभव व कार्यक्षमता इ. निकषांवर ज्यांनी विशेष प्रावीण्य मिळविलेले आहे व ज्यांच्या कर्तृत्वाबद्दल समाजाला विशेष अभिमान वाटतो आणि ज्यांच्याकडून समाज व राष्ट्र विशेष योगदानाची अपेक्षा बाळगतो, अशा उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा अंतर्भाव या वर्गात करता येईल. सत्ता, संपत्ती, अधिकार, लिंग, जन्म, वंश, भाषा, धर्म व जात इ. निकषांवर सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त न होता केवळ गुणवत्तेच्या निकषावर सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त करणाऱ्याना या वर्गात अंतर्भूत केले जाते. संगीत, साहित्य, ललित कला, क्रीडा, उद्योग, व्यापार, विज्ञान, सत्शील राजकारण, निःपक्षपाती व निर्भीड प्रशासन, बुद्धिप्रामाण्यवाद यांसारख्या क्षेत्रांतील नामवंतांची गणना या वर्गात होते.

(२) महाजन वर्ग : अनुवंशिकतेच्या व परंपरेच्या आधारावर ज्या घराण्यांनी सामाजिक स्वास्थ्य, सामाजिक संरक्षण व सामाजिक कल्याण साध्य करण्यात सामाजिक नीतिमत्ता, सभ्यता, शिष्टाचार, सामाजिक मूल्ये इ. निकषांवर विशेष भूमिका वठविलेली आहे, त्यांचा या वर्गात समावेश केला जातो. या पारंपरिक घराण्यांना ऐतिहासिक, राजकीय व आर्थिक वारसा प्राप्त झाल्याने नीतिमत्तेच्या आधारावर विशेष स्वरुपाची प्रतिष्ठा समाजव्यवस्थेने प्राप्त करून दिली. बदलत्या सामाजिक आणि राजकीय स्थिंत्यंतरांत नीतिमत्तेचा व मूल्यभावनांचा जसाजसा रऱ्हास होऊ लागला, तसतसे या वर्गाचे अस्तित्व हळूहळू कमी होऊ लागले. उदा., सरदार, सरंजामदार, वतनदार, जमीनदार, खानदानी घराणी इत्यादी.

(३) सत्ताधीश जाती : (रुलिंग कास्ट्स). वांशिक श्रेष्ठत्वाच्या शुद्ध रक्ताच्या भ्रामक कल्पनांमुळे तसेच विशिष्ट जातीत व कुळात जन्म घेतल्याच्या आणि व्यवसायाच्या प्रतवारीच्या निकषांवर व आनुवंशिकतेवर आधारलेल्या अनेक जातिसमुदायांचा सत्ताधीश जातीत अंतर्भाव होतो. श्रेष्ठत्वाच्या जाणिवेतून कनिष्ठ समजल्या जाणाऱ्या अनेक जातिसमुदायांवर सांस्कृतिक प्रभुत्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न उच्च जातिसमुदाय करीत असतात. भारतातील प्राचीन वर्णव्यवस्था व नंतर निर्माण झालेली जातिव्यवस्था यांतून ही परिस्थिती निर्माण झाली. सामाजिक, धार्मिक, वांशिक, श्रेष्ठ-कनिष्ठतेच्या या विषमता निर्माण करणाऱ्या घटकांचा लाभ उठवून राजकीय सत्ता काबीज करण्याचे प्रयत्न जसजसे होऊ लागले, तसतसे सत्ताधीश जातिसमुदायांचे समाजव्यवस्थेवर प्रभुत्व प्रस्थापित होऊ लागले.

(४) सत्ताधीश वर्ग : (रुलिंग क्लास). आर्थिक व व्यावसायिक विषमतेच्या आधारांवर उभा राहणारा सत्ताधिशांचा एक वर्ग सर्वच समाजांत उदयास येऊ लागला. भांडवलाच्या आधारावर व्यवसायाच्या विशेषीकरणाला जसजसी चालना मिळू लागली, तसतसा उद्योगपतींचा व भांडवलदारांचा वर्ग उदयास येऊ लागला. परिणामतः राजकीय समाजव्यवस्थेवर उद्योगपतींचे व व्यापारांचे प्रभुत्व प्रस्थापित होऊ लागले. उत्पादनप्रक्रियेवर, श्रमिक संघटनेवर व अर्थव्यवस्थेवर उद्योगपतींच्या, भांडवलदारांच्या व व्यापाऱ्याच्या वर्गांचे वर्चस्व वाढत राहिल्याचे दिसून येते.

वरील चार वर्गांत जरी शिष्टजनांचे (एलिट्स) वर्गीकरण करण्यात आलेले असले, तरी राजकीय श्रेष्ठजनांचा वर्ग विशेषपणे अभ्यासविषय ठरलेला आहे. मात्र सामाजिक प्रगतीच्या, स्वास्थ्याच्या व मूल्यांच्या दृष्टीने विचार केल्यास प्रत्येक समाजाला अभिजन व शिष्टजन या वर्गांची नितांत आवश्यकता भासत असते.

संक्षिप्त ऐतिहासिक आढावा : मानव समाजाच्या भटक्या अवस्थेपासून श्रेष्ठजनांच्या संकल्पनेला मान्यता प्राप्त झालेली दिसते. प्राचीन काळातील मानवी टोळक्यांच्या नेत्यांचा अंतर्भाव श्रेष्ठजनांत होतो. सबळ व दुर्बल यांतील परस्परसंबंध लक्षात घेतल्यास सबळांचा श्रेष्ठजनांत समावेश करता येईल. प्लेटोने आप्ल्या रिपब्लिकया ग्रंथात तत्त्वज्ञ राजाची जी कल्पना विशद केलेली आहे, तिचा अंतर्भाव अभिजन वर्गात करता येईल. राजा ह फक्त राज्यकर्ता नसून तो स्वतःच्या अंगभूत गुणवैशिष्ट्यांमुळे व अनुभवांमुळे तत्त्वज्ञ राजाची भूमिका वठवीत असतो. मध्ययुगीन कालखंडात सरदार, सरंजामदार, वतनदार, महाजन इ. वर्गांतील श्रेष्ठ-ज्येष्ठ व्यक्तींनी आपल्या कर्तृत्वाच्या व अनुभवाच्या बळावर जी उल्लेखनीय प्रगती केली, त्यामुळे तत्कालीन समाजव्यवस्थेत त्यांना आदराचे व मानाचे स्थान प्राप्त झाले. ⇨कार्ल मार्क्स्ने भांडवलदारांचा, जमीनदारांचा व सावकार वर्गाचा श्रेष्ठजनात समावेश केलेला आहे. सत्ता, संपत्ती व अधिकार यांच्या असमान वाटपामुळे मूठभर भांडवलदार, जमीनदार व सावकार बहुसंख्य श्रमिकांचे ⇨शोषण करीत असतात. असे क्रांतिकारी विचार मार्क्सने ज्या पद्धतीने मांडले, त्यांतून श्रेष्ठजनांच्या संकल्पनेच्या विचाराला अधिकाधिक चालना मिळू लागली. ⇨ मार्क्स वेबरने श्रेष्ठ-कनिष्ठतेच्या तत्त्वावर प्राधिकार (ऑथॉरिटी) तसेच अधिकारतंत्राचे किंवा नोकरशाहीचे (ब्यूरॉक्रसी) जे विवेचन केलेले आहे, त्याचा संबंध अभिजन व श्रेष्ठजन या दोन्ही संकल्पनांशी आहे कारण अधिकारतंत्राच्या रचनेतील पदाधिकाऱ्यांची निवड गुणवत्ता, पात्रता व अनुभव यांच्या निकषांवर स्पर्धात्मक परीक्षा व मुलाखत यांद्वारे केली जाते. तसेच त्याच रीतीने बढती देण्याची तरतूदही त्यांत असते. कर्तव्यतत्परता, कार्यक्षमता व अनुभव यांच्या आधारावर हुकुमांची व आज्ञांची अंमलबजावणी नियमांच्या चाकोरीत राहून तत्परतेने करण्याइतपतची क्षमता नोकरशाहीकडे असल्याने तिचा अभिजन वर्गात समावेश होतो. तथापि लालफितीचा बडगा, भ्रष्टाचार, दप्तरदिरंगाई, आधिकारचा गैरवापर यांसारख्या अनेक समस्यांनी नोकरशाही ग्रासलेली असते. अशा समस्या निर्माण होण्यास समाजव्यवस्थाही कारणीभूत ठरत असते म्हणून नोकरशाही व समाजव्यवस्था यांच्यातील संबंधांच्या पार्श्वभूमीवर नोकरशाहीची गणना श्रेष्ठजनात करावी लागेल. आपल्या अधिकारपदाचे व अधिकाराचे स्थान काय आहे, याची जाणीव ठेवून त्यानुसार आपणास योग्य तो मान व प्रतिष्ठा समाजाने द्यावी, अशी अपेक्षा नोकरशाही करते.

लोकशाही समाजव्यवस्थेत सत्तेच्या विकेंद्रीकरणामुळे स्थानिक पातळीपासून राष्ट्रीय पातळीपर्यंत राजकीय श्रेष्ठजनांचे प्रभुत्व प्रस्थापित होत असते. सत्तांतरामुळे राजकीय श्रेष्ठजनांत फेरबदल होत असले, तरी सत्ता काबीज करण्याची त्यांची महत्वाकांक्षा नष्ट होत नाही. ‘एलिट’ या इंग्रजी संज्ञेचा वापर राजकीय श्रेष्ठजनांच्या संदर्भात करण्यात येतो हे खरे तथापि सदाचार, सद्विचार, सत्शीलता, सद्वर्तन, चारित्र्य इ. निकषांवर राजकीय नेत्यांचा उदय होत असेल, तर त्यांची गणना राजकीय श्रेष्ठजनांपेक्षा राजकीय अभिजनांत किंवा राजकीय शिष्टजनांत जरुर करता येईल.

बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अभिजन, शिष्टजन व श्रेष्ठजन यांचा गर्भितार्थ लक्षात घेतल्यास या संज्ञांचे निकषही बदलत गेल्याचे दिसून येते. ऐतिहासिक, तुलनात्मक व कार्यात्मक दृष्टींनी या वर्गांचा अभ्यास करण्यावर अनेक विचारवंतांनी जरी भर दिलेला असला, तरी आधुनिक काळात समाजशास्त्रीय, राज्यशास्त्रीय व मानसशास्त्रीय दृष्टीकोनांतून त्यांचा अभ्यास करण्याकडे संबंधितांनी विशेष लक्ष दिलेले आहे.


व्हिलफ्रेदो पारेअतोचे विचार : ⇨ व्हिलफ्रेदो पारेअतो या इटालियन समाजशास्त्रज्ञाने १९३५ साली श्रेष्ठजन व त्यांचे अभिसरण या सिद्धांताचे मार्मिक विवेचन केले. समाजातील ज्या व्यक्तींमध्ये बौद्धिक, शारीरिक व नैतिक गुणवैशिष्ट्ये प्रभावी व परिणामकारक स्वरुपाची असतात, त्यांच्याकडे राजकीय सत्ता केंद्रित होत असते, असे पारेअतोचे मत आहे. या वर्गासाठी तो राजकीय श्रेष्ठजन अशी संज्ञा वापरतो.

राजकीय श्रेष्ठजनांत दोन प्रवृत्तींचे नेते असतात. एक प्रवृत्ती सिंहासारखी तर दुसरी लांडग्यासारखी असते, असे वर्णन पारेअतो करतो. राजकीय सत्तेच्या बळावर आपल्या इच्छेनुसार समाजाला वागविण्याची क्षमता असलेला राजकीय श्रेष्ठजनांचा एक गट असा अस्तित्वात असतो, त्याबरोबरच कपटी राजकीय श्रेष्टजनांचा दुसरा गटही अस्तित्वात असतो. एक वर्ग सत्ता, अधिकार व संपत्तीला प्राधान्य देतो तर दुसरा वर्ग युक्ती, कुटिल राजनीती व बौद्धिक चातुर्याला अधिक महत्त्व देतो. मानवसमाजातील राजकीय स्थित्यंतरे अथवा सत्तांतरे या दोन गटांतील संघर्षातून घडून येतात. राजकीय स्थित्यंतरे ही नेहमीच राजकीय श्रेष्ठजनांतील गुणवैशिष्ट्यांच्या कमतरतेमुळे व ऱ्हासामुळे घडून येतात, असा त्याचा दावा आहे. प्रथम सत्ताधिष्ठित राजकीय श्रेष्ठजन नंतर कपटी राजकीय श्रेष्ठजन व पुन्हा सत्ताकांक्षी राजकीय श्रेष्ठजन अशा चक्राकार पद्धतीने राजकीय सत्तांतर होत असते कारण या दोन्ही प्रकारच्या श्रेष्ठजनांकडे जी गुणवैशिष्ट्ये असतात, ती समाजातील बहुसंख्य लोकांकडे नसतात. समाजातील राजकीय व्यवस्थेत प्रभुत्व प्रस्थापित करणारा व श्रेष्ठत्व सिद्ध करणारा अल्पसंख्य समूह म्हणजे राजकीय श्रेष्ठजन होय. या वर्गांचे अस्तित्व अनियंत्रित राजेशाहीत, हुकूमशाहीत तसेच साम्यवादी व लोकशाही समाजव्यवस्थांत आढळून येते. ते सार्वत्रिक असते. सत्तेच्या अभिसरणाची प्रक्रिया ही न संपणारी आहे. मानवसमाजात जोपर्यंत विविधता व असमानता अस्तित्वात आहे, तोपर्यंत श्रेष्ठजनांच्या अभिसरणाची प्रक्रिया अखंडपणे चालू राहते, असा दावा पारेअतोने केलेला आहे.

जी. मॉस्काचे विचार : जी. मॉस्का (१८५८–१९४१) या इटालियन समाजशास्त्रज्ञाने १९३९ साली प्रकाशित केलेल्या ‘रुलिंग क्लास’ (इं. शी.) या ग्रंथात राजा व प्रजा, राज्यकर्ते  व प्रजा, शासक व शासित यांतील फरक विशद केलेला आहे. राजा, राज्यकर्ते व शासक यांना प्रजेपेक्षा जे वेगळे व श्रेष्ठस्थान प्राप्त झालेले असते, त्यास त्यांच्याकडे असणारी वैयक्तिक गुणवैशिष्ट्ये हीच बऱ्याच अंशी कारणीभूत असतात, असे मॉस्काचे मत आहे. शासक वर्गाकडे जबरदस्त संघटनक्षमता आणि सत्ता संपादन करण्याचे कौशल्य असते व त्याच्याच बळावर ते समाजाचे राजकीय नेतृत्व करीत असतात. आपले नेतृत्व व सत्ता अबाधित राखण्यासाठी ते समाजातील विविध स्तरांतील लोकांशी हातमिळवणी करीत असतात. या वर्गाला जे श्रेष्ठत्व प्राप्त झालेले असते, त्यास त्याच्या गुणवैशिष्ट्यांपेक्षा त्या त्या काळातील सामजिक परिस्थिती ही बऱ्याच अंशी कारणीभूत असते, यावर मॉस्काने भर दिलेला आहे. राजकीय श्रेष्ठजनांसाठी आवश्यक असणारे गुण सर्वत्र सारखेच असले, तरी कालमानानुसार व परिस्थितीप्रमाणे त्यांचे निकष बदलत असतात, असा विचार मॉस्काने मांडलेला आहे.

रॉबर्ट मिचेलचे विचार : रॉबर्ट मिचेल (१८७६–१९३६) या जन्माने जर्मन पण इटलीत वास्तव्य करणाऱ्या, राजकीय समाजशास्त्रज्ञाने १९११ साली प्रसिद्ध केलेल्या ‘पॉलिटिकल पार्टीज : ए सोशिऑलॉजिकल स्टडी ऑफ द ऑलिगार्कीकल टेंडन्सीज ऑफ मॉडर्न डेमॉक्रसी’ (इं. शी.) या ग्रंथात अल्पजनशाहीचे किंवा स्वल्पतंत्राचे सर्व प्रकारच्या राजकीय व्यवस्थेतील अनिवार्य व इष्ट स्थान विशद केलेले आहे. लोकशाहीप्रधान समाजव्यवस्थेत बहुसंख्याकांचे राज्य असे जरी संबोधले असले, तरी निर्णय घेण्याचा अधिकार काही मंत्रिमंडळास व प्रशासनातील काही अत्युच्च पदाधिकाऱ्यानाच प्राप्त झालेला असतो. प्राधिकारशाही ऑथॉरिटॅरिॲनिझम व नोकरशाही यांचाच मोठा वाटा निर्णयप्रक्रियेत असतो. तसेच लोकशाहीत राजकीय पक्षांचे स्थान अनन्यसाधारण असले, तरी पक्ष संघटनेच्या दृष्टीने काही उच्च पदाधिकाऱ्यांनाच राजकीय निर्णय घेण्याचा अधिकार प्राप्त झालेला असतो. एवढेच नव्हे, तर कोणत्याही कालखंडातील कोणत्याही प्रकारच्या राजकीय व्यवस्थेत निर्णय घेणाऱ्या काही विशिष्ट राजकीय, प्रशासकीय व लष्करी अधिकाऱ्यांना विशिष्ट दर्जा, प्रतिष्ठा व मान प्राप्त झालेला असतो. अशी अल्पजन सत्ता म्हणजे राजकीय शिष्टजनांचीच सत्ता केवळ अपरिहार्यच नव्हे, तर इष्टही असते, असे मिचेलचे प्रतिपादन आहे. रॉबर्ट मिचेलने इटलीतील फॅसिस्ट सत्तेस विरोध केला नाही, हे उल्लेखनीय आहे.

भारतीय संदर्भ : पाश्चात्त्य विचारवंतांनी भारताच्या स्वातंत्र्यपूर्वकाळात भारतीय समाजव्यवस्थेच्या संदर्भात श्रेष्ठजनांबद्दल विवेचन केलेले आहे. परंतु ते विवेचन उच्चजातीय श्रेष्ठजनांबद्दल प्रामुख्याने केलेले आहे. स्वातंत्र्योत्तर काळात व विशेषतः लोकशाही सत्तेच्या विकेंद्रीकरणाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक, प्रांतिक व राष्ट्रीय स्तरांवरील राजकीय श्रेष्ठजनांबद्दल काही समाजशास्त्रज्ञांनी व राज्यशास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून अभ्यास करण्यावर भर दिलेला आहे. राजकीय समाजव्यवस्थेत दबाव-गटाचा, सहकारी क्षेत्रात साखर-सम्राटांचा, सामजिक पातळीवर अनेक हितसंबंधी समूहांचा जसाजसा विकास होऊ लागला, तसतसे राजकीय श्रेष्ठजनांचे संदर्भ बदलू लागले. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात समाजजीवनाच्या विविध क्षेत्रांत प्रभाव टाकणारा श्रेष्ठजन वर्ग संख्येने वाढू लागला. या गुंतागुंतीच्या प्रक्रियेचे नेमके विवेचन करण्याचा प्रयत्न अभ्यासक करीत आहेत. या राजकीय श्रेष्ठजनांबरोबरच स्वतःच्या उल्लेखनीय कर्तृत्वामुळे समाजाची व राष्ट्राची प्रतिमा ज्यांनी उंचावली, अशा अभिजनांचे आणि नितीमत्तेच्या, शिष्टाचारांच्या व सभ्यतेच्या निकषांवर सामाजिक व नैतिक मूल्यांची ज्यांनी जोपासना केली, अशा शिष्टजनांचे अध्ययन करणेही आवश्यक ठरते.

पहा : अधिकारी तंत्र नागरी समाज.

संदर्भ : 1. Coser, Lewis A. Masters of Sociological Thought, New York, 1977.

           2. Michels, Robert, Trans. Alfred, Grazia, First Lectures in Political Sociology, New York, 1949.

           3. Mill, C. Wright, The Power Elite, New York 1956.

           4. Mosca, Gaetano, The Ruling Class, New York, 1939.

           5. Pareto, Vilfredo, Trattatodi Sociologia Generale, 4 Vols., 1916.

                                   गजेंद्रगडकर, व्ही. एन्.