जातिसंस्था : हिंदु समाजाची सु. गेली तीन हजार वर्षे स्थिरावलेली रचना म्हणजे जातिसंस्था होय. खालच्या व वरच्या अशा विविध श्रेणींनी म्हणजे उच्च व नीच, उच्चतर व नीचतर आणि उच्चतम व नीचतम अशा श्रेणींनी स्थिर स्वरूपात बनलेली ही समाजरचना आहे. ही प्रत्येक श्रेणी वर्ण किंवा जाती या संज्ञेने निर्दिष्ट केली जाते. हिंदू धर्मशास्त्राने व पवित्र मानलेल्या रूढींनी हा श्रेणींचा उच्चनीचभाव ठरतो. धार्मिक दृष्टीने व पवित्र रूढींच्या दृष्टीने भिन्नभिन्न जातींचे आर्थिक, व्यावसायिक, राजकीय व अन्य प्रकारचे सामाजिक व्यवहार ठरतात. उदा., द्विजांनी म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य यांनी शूद्राचा सेवा हा व्यवसाय अथवा लोहार, साळी, माळी, कोळी, इत्यादिकांचा व्यवसाय करणे अधर्म्य ठरते. त्याचप्रमाणे क्षत्रिय व वैश्य या द्विजांना वेदांचे अध्ययन करण्याचा अधिकार असला, तरी वेदांचे अध्यापन, याजन वा पूजन हा ब्राह्मणी व्यवसाय करण्याचा अधिकार नाही. या उच्चनीच श्रेणीबद्ध जातिसंस्थेमध्ये जातींचे परस्परावलंबित्वाचे दृढ संबंध असतात. ही संस्था आधुनिक अर्थाने सांस्कृतीक आहे. आधुनिक अर्थाने ती वंशवादी नाही म्हणजे असे की, नॉर्डिक, भूमध्यसमुद्रीय, मंगोलॉइड, ऑस्ट्रेलॉइड व नेग्रिटो अशा प्रकारचे जे मानवांचे भिन्नभिन्न शारीरिक लक्षणांचे वंश शारीरिक मानवशास्त्राने ठरविले आहेत, त्या प्रकारच्या वंशभेदावर जातिसंस्था आधारलेली नाही किंवा गोरे पश्चिमी लोक व काळे आफ्रिकी निग्रो लोक असे जे दोन वंश अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमध्ये दिसतात व त्यावरून तेथील समाजसंस्थेत उच्चनीचभावदर्शक रचना निर्माण झालेली आहे, तशा प्रकारची वंशवादी तत्त्वे जातीसंस्थेच्या रचनेत गृहीत धरलेली नाहीत, म्हणजे त्या अर्थाच्या भिन्नभिन्न जाती म्हणजे भिन्नभिन्न वंश नव्हते. समान शारीरिक वंश परंतु जाती भिन्न, उलट जात एक परंतु त्यातील गट व व्यक्ती भिन्न शारीरिक वंशांच्या, असी स्थिती जातिसंस्थेत दिसते. सामान्यपणे जातिसंस्थेची मुख्य लक्षणे भारतातील भिन्नभिन्न प्रदेशांतील जातिसंस्थेला सारखीच लागू पडतात परंतु भिन्नभिन्न प्रदेशांत भिन्नभिन्न संज्ञांच्या भिन्न जाती असतात. उदा., महाराष्ट्रात मराठे, तमिळनाडू व केरळमध्ये नायर, उत्तर हिंदुस्थानात राजपूत, जाट, खत्री इत्यादी. म्हणून असेही म्हणता येते की, भिन्नभिन्न प्रदेशांतील जातीसंस्था अनेक आहेत म्हणजे या जातीसंस्था प्रदेशभेदाने भिन्न वैशिष्ट्यांनी युक्त असलेल्या दिसतात. उदा., एका प्रदेशात ज्या काही जाती अस्पृश्य मानल्या आहेत, त्याच दुसऱ्या प्रदेशात अस्पृश्य मानलेल्या नाहीत किंवा त्याच प्रकारच्या व्यवसायाच्या काही जातींचे सामजिक स्थान भिन्नभिन्न प्रदेशांत वेगवेगळेही असते. परंतु जातींचा अभ्यास करीत असता वरपासून खालपर्यंतच्या उच्चनीच श्रेणींनी बांधलेल्या समग्र जातिसंस्थेचा अभ्यास करावा लागतो व त्याबरोबरच त्यातील परस्परावलंबी श्रेणींबंध लक्षात घेऊनच घटकजातींचा अभ्यास करणे अर्थपूर्ण ठरते. शैव, वैष्णव इ. भिन्नभिन्न दैवतांचे उपासना संप्रदाय, लिंगायत [→ वीरशैव पंथ] वा गोसावी–बैरागी  यांचे जातींचे निर्बंध न मानणारे पंथ हेही या अभ्यासाचेच एक अंग म्हणून धरावे लागते. त्याचप्रमाणे एकेका समान पातळीवर म्हणजे श्रेणीत अनेक जाती वा उपजाती असतात. प्रत्येक भाषिक प्रदेशात – उदा., गुजरात, महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक, तमिळनाडू, बंगाल, उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब इ. प्रदेशांमध्ये – प्रत्येकी २०० ते ३०० जाती व उपजाती आहेत परंतु त्यांच्यातील प्रत्येक प्रदेशातील उच्चनीच श्रेणींची संख्या २० ते २५ पेक्षा जास्त नसते. पोटजाती जरी शेकडो असल्या, तरी उच्चनीच श्रेणींची वा स्थानांची संख्या २०–२५ पेक्षा अधिक भरत नाही. उदा., महाराष्ट्रात ब्राह्यणांच्या सु. २७ पोटजाती आढळतात. त्यांतील अनेक पोटजाती एकमेकांना कमी लेखतात परंतु ब्राह्यण ही श्रेणी धर्मशास्त्रदृष्ट्या व पवित्र रूढींच्या दृष्टीने एकच उच्चतम ठरते. ब्राह्यण पोटजातींनी एकमेकांना कमीजास्त लेखण्यात व्यावसायिक मत्सर हा कारण ठरतो. या सर्व पोटजातींचे धर्मशास्त्रमान्य जातिमूल्य एकच होय ते म्हणजे ⇨ उपनयन  संस्कारामुळे प्राप्त झालेला वेदाध्ययन, वेदाध्यापन व पौरोहित्य करण्याचा अधिकार होय.

धर्मशास्त्रदृष्ट्या समान स्थान व समान अधिकार असलेल्या वर्णांमध्ये वा जातींमध्ये ज्या पोटजाती पडल्या, त्यांना ‘ज्ञाती’ अशीही संज्ञा आहे. या संज्ञेचा मूळचा अर्थ ज्यांचे कुलगोत्र इ. माहीत आहे, आचारधर्म माहीत आहे, अशा व्यक्तींचा व कुळांचा एकजातीय समूह असा आहे. ‘ज्ञाती’ म्हणजे माहीत असलेली. प्राचीन काळी दूरदूरच्या प्रदेशात राहणाऱ्या कुळांची विवाहसंबंधास आवश्यक असलेली माहिती दुर्मिळ असे, म्हणून जवळच्या ज्ञात असलेल्या कुळसमूहांमध्येच विवाह होत असे. पोटजाती पडण्याचे हे एक महत्त्वाचे कारण होय. जातींच्या भेदांचे व उच्चनीचपणाचे गमक मुख्य आणि शुद्ध मूल्य धार्मिकच असावे लागते.

संस्कृती चिरकाल टिकविण्याच्या पद्धतीचा परिणाम जातिसंस्था : जातीसंस्था ही प्राचीन भारतीय  संस्कृती टिकविण्याच्या सामाजिक विशिष्ट प्रयत्नांचे व्यक्त स्वरूप होय. मानवाच्या उच्च प्रगल्भ दशेत आलेल्या अनेक प्राचीन संस्कृतींपैकी काही संस्कृती दोन ते तीन हजार वर्षे टिकल्या व विलयास गेल्या. अशा विलयास गेलेल्या संस्कृतींपैकी ईजिप्शियन, ॲसिरियन, ग्रीक व रोमन या होत. या प्राचीन संस्कृतींपैकी भारतीय आणि चिनी या दोन संस्कृती मात्र आतापर्यंत टिकल्या याचे कारण त्यांच्यातील आपली सांस्कृतिक परंपरा खंडित न होता सतत टिकविण्याची शक्ती, हे होय. ज्यांच्या सांस्कृतिक परंपरा अत्यंत खंडित झाल्या, त्या संस्कृती विलयास गेल्या. परंपरा बदलत असतात बदल हा विश्वाचा किंवा निसर्गाचा नियम आहे. ज्यांच्या परंपरा बदलत गेल्या परंतु खंडित झाल्या नाहीत, त्या ह्या दोन संस्कृती होत. आवश्यक वा अपरिहार्य असे बदल ह्या संस्कृतींनी मान्य केले म्हणून त्या आतापर्यंत टिकल्या. परंपरा टिकविण्याच्या भारतीय विशिष्ट पद्धतीमुळेच हिंदू समाजाचे जातिसंस्थेत रूपांतर झाले. जातिसंस्थेमुळे प्रत्येक जातीतील व्यक्तींच्या स्वातंत्र्यास व नैसर्गिक महत्त्वाकांक्षेस मर्यादा पडल्या. जातिसंस्थेमुळे हिंदू समाजात काही दोष उत्पन्न होऊन खिळून राहिले व त्यामुळे अनेक प्रकारचे दौर्बल्यही आले. परकीय आक्रमणांना मागे रेटून पुरून उरणारे आवश्यक असे मोठे राजकीय व आर्थिक सामर्थ्य प्राप्त झाले नाही. प्रगतीचा वेग मंद राहिला. व्यक्तींच्या नैसर्गिक योग्यतेला संकुचित क्षेत्रातच बंदिस्त व्हावे लागले परंतु अतिदीर्घकाळ युगानुयुगे टिकण्याचे सामाजिक सामर्थ्य मात्र सतत राहिले.

धार्मिक व निधर्मी किंवा पारलौकिक व ऐहिक विचार, आचारनियम व कार्ये यांचा आकृतिबंध म्हणजे संस्कृती होय. हिंदू संस्कृतीचा असा एक विशिष्ट आकृतिबंध आहे. जातिसंस्थेतील सर्व प्रकारच्या सांस्कृतिक प्रवृत्ती त्या एका आकृतिबंधाचे भाग होत. हा आकृतिबंध वंशपरंपरेने म्हणजे कुलपरंपरेने टिकवण्यानेच मनुष्याचे ऐहिक व पारलौकिक कल्याण होते, पाप होत नाही, झालेले पाप नष्ट होते, पुण्य प्राप्त होते, अशा तऱ्हेची निष्ठा ही प्राचीन भारतीयांची निष्ठा होय. ऐहिक व पारलौकिक व्यवहार कुलपरंपरेने चालवून पुण्यसंपादन करावयाचे, असा दृष्टीकोन या संस्कृतीच्या मुळाशी आहे. प्रत्येक जातीचा परंपरागत असा एक स्वधर्म असतो तोच पाळावयाचा, दुसऱ्या जातीचा धर्म स्वीकारावयाचा नाही, हे जातिसंस्थेच्या आकृतिबंधाचे नियामक तत्व आहे. त्यामुळे सर्व जातींची संस्कृती तत्वतः एकच ठरते. पारलैकिक अथवा धार्मिक वा पवित्र अशा ⇨कर्मकांडाशी आणि दैवतोपासनेशी ऐहिक व्यवहारांचा संबंध या संस्कृतीने निगडीत केला. मातृपूजा, पितृपूजा म्हणजे श्राद्ध त्याचप्रमाणे कुलदैवतांची आणि देवतांची पूजा ज्या तऱ्हेच्या सामाजिक व विशेषतः वैवाहिक संबंधामुळे अखंडितपणे चालते आणि कुलपरंपरागत व्यवसाय वा व्यवसायविषयक विशेषविद्या त्याच स्वरूपात कायम राहतात, अशा तऱ्हेचे सामाजिक वैवाहिक संबंध इष्ट व योग्य होत, असे प्राचीन भारतीय संस्कृतीने मानले. हा सांस्कृतिक सिद्धांत भगवद्‌गीतेच्या पहिल्या अध्यायात मांडलेला आहे. युद्धाच्या योगाने कर्त्या पुरुषांचा वध होतो, कुलस्त्रिया ह्या त्यामुळे  भ्रष्ट होतात आणि त्याचमुळे सनातन असे कुलधर्म नष्ट होऊन नरकगती प्राप्त होते, असे तिथे म्हटले आहे. अतिप्राचीन काळी जातिसंस्था स्थिरावण्याच्या पूर्वी भारतामध्ये जातींच्या रूपाने दृढबद्ध न झालेल्या शेकडो जमाती होत्या.


त्या प्रगतीच्या खालच्या-वरच्या भिन्नभिन्न स्तरांत वावरत होत्या. त्यांची दैवते भिन्न होती, त्यांच्या पापपुण्याच्या कल्पना भिन्न होत्या, विधिनिषेधात्मक नियम भिन्न होते. व व्यवसायही विविध प्रकारचे होते. जेव्हा कालांतराने उच्च व व्यापक असे ब्रह्यवादी  धार्मिक तत्त्वज्ञान निर्माण होऊ लागले, तेव्हा त्या तत्त्वज्ञानाने त्या परंपरांचा उच्छेद न करता खालच्या वा वरच्या दर्जाचे दैवतविचार, उपासनाप्रकार व पापपुण्याच्या सदाचार-अनाचाराच्या कल्पना किंवा अपधर्म यांना तात्त्विक दृष्ट्या मान्यता देऊन एकत्र व्यापक उच्च धार्मिक विचाराच्या व उच्च आचाराच्या व्यापक क्षेत्रात समाविष्ट करण्याची प्रवृत्ती उत्पन्न झाली. म्हणजे संकुचित परंपरांना, खालच्या दर्जाच्या उपासनामार्गाना वा अपधर्माना उच्च तत्त्वांच्या तेजोवलयात समाविष्ट करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. म्हणजे परंपरा टिकवायची परंतु तिला उच्च दर्जाचे संस्कार द्यावयाचे, याला संस्कृतीचा ब्रह्यवादी दृष्टिकोन असे म्हणता येईल. हा ब्रह्मवादी दृष्टिकोन भगवद्‌गीतेत मांडलेला आहे. यहुदी, ख्रिस्ती आणि इस्लामी धर्मांच्या प्रवृत्ती ह्याच्या उलट आहेत. नष्ट झालेल्या ईजिप्शियन, ॲसिरियन, ग्रीक आणि रोमन संस्कृती खंडित का झाल्या, त्याच्या ह्या प्रवृत्ती गमक होत. अन्य उपासनांचा त्या पापमय म्हणून धिक्कार व नाश करणे, हे यांचे तत्त्व आहे. जाती ही सामाजिक संघटना कुलधर्मांचे वंशपरंपरेने संरक्षण करण्याच्या प्रबल इच्छेतून निर्माण झाली व त्या इच्छेला समावेशक ब्रह्मवादी तत्त्वज्ञान उपयुक्त ठरले.

जाती शब्दाचे दोन अर्थ : जाती या शब्दाचे दोन अर्थ जातिसंस्थांच्या संदर्भात लक्षात ठेवावे लागतात : (१) वर्णव्यवस्थेत वर्ण म्हणून एक चिरंतन स्थान प्राप्त झालेला कुलसमूह या कुलसमूहास ‘जाति’ ही संज्ञा आहे कारण समान वा अविरोधी कुलधर्मपरंपरा असल्यामुळे हा कुलसमूह परस्परांचा वैवाहिक संबंधच  अत्यंत उचित वा धर्म्य मानतो. विवाह हा संस्कार मात्र पवित्र रूढीप्रमाणे व्हावयास पाहिजे. कुलक्रमागत आचार पाळणे, हेही बंधन जातीच्या संकेतांप्रमाणे पाळले पाहिजे. ‘जाति’ शब्दाचा मूळ अर्थ जन्म. अशा कुलसमूहापैकी एका कुलात जो जन्मतो, त्याची ती जात ठरते. वर्णव्यवस्थेतील विशिष्ट श्रेणी म्हणून मान्य असलेली जात ही समान अधिकाराची असते. ती वरीलप्रमाणे अंतर्विवाही असते. त्या जातीतील कुलात जन्मलेल्या स्त्रीपुरुष व्यक्तींचा धार्मिक वा रूढिमान्य पद्धतीने विवाह होऊ शकतो. (२) समान अधिकार असलेल्या अशा एकेका जातीत अनेक उपजाती किंवा पोटजाती असतात. त्यांना उपजाती किंवा पोटजाती न म्हणता जाती हीच संज्ञा प्राप्त होते कारण त्या अनेक जातींचे परस्परांत मान्य असे विवाहसंबंध घडू शकत नाहीत. त्यांतील काही अंतर्विवाहीच असतात. ज्या प्राचीन ⇨ मनुस्मृति, ⇨ याज्ञवल्क्यस्मृति  इ. स्मृतींमध्ये जातिसंस्थेचे किंवा वर्णव्यवस्थेचे सांगोपांग सविस्तर विवरण आले आहे, त्यांमध्ये अशा पोटजातींचा वा उपजातींचा निर्देश नाही. गेल्या हजारपाचशे वर्षांत पुराणांमध्ये जी भर पडत गेली, तीमध्ये या पोटजातींचा उल्लेख येतो. मनु, याज्ञवल्क्य  इ. प्राचीन स्मृतींमध्ये, म्हणजे दीड ते दोन हजार वर्षांपूर्वीच्या धर्मशास्त्रसाहित्यात, समान वर्णांतर्गत पोटजातींचा निर्देश येत नाही. उदा., त्यात निर्दिष्ट नसलेल्या ब्राह्मणांच्या सु. २७ पोटजाती महाराष्ट्रात आहेत. त्यांच्यातील अनेकांमध्ये परस्परांत विवाहसंबंध होत नव्हते. उदा., कोकणस्थ चित्पावन व देशस्थ या दोन ब्राह्मण पोटजातींत विवाहसंबंध रूढीने मान्य केला नव्हता. त्या त्या वर्गातील काही पोटजाती या अंतर्विवाही असतात व काही नसतात. चित्पावन ब्राह्मण अंतर्विवाही जात होय परंतु ऋग्वेदी देशस्थ ब्राह्मण किंवा यजुर्वेदी माध्यंदिन देशस्थ ब्राह्मण अंतर्विवाही नाहीत कारण त्यांचे कानडी, तेलंगी तमिळी ब्राह्मणांशी रूढीने मान्य असे विवाहसंबंध होत आले आहेत. केरळात चार ब्राह्मण पोटजाती आहेत त्यांचेही परस्पर विवाहसंबंध रूढीला मान्य आहेत. प्रत्येक प्रदेशात दीर्घकाळपर्यंत स्थिरावलेल्या जमातीचे आचारधर्म वेगवेगळे असतात. धर्मशास्त्रास अमान्य असेही अनाचार  त्या त्या जमातीत चालू असतात. त्यामुळे उपजाती तयार होतात. उदा., भारताचे उत्तर हिंदुस्थान आणि दक्षिण हिंदुस्थान असे साधारणपणे दोन विभाग धरून पंचगौड आणि पंचद्रविड असे ब्राह्मण जातीचे दहा विभाग झालेले आहेत परंतु या दहांचेदेखील पुष्कळ पोटविभाग आहेत. ब्राह्मणोत्पत्तिमार्तंड  या संस्कृत ग्रंथात म्हटले आहे की, विंध्य पर्वताच्या उत्तरेस पंचगौड ब्राह्मण राहतात ते म्हणजे सारस्वत, कान्यकुब्ज, गौड, उत्कल व मैथिली हे होत आणि विंध्याच्या दक्षिणेस कर्नाटक, तैलंग, द्रविड, महाराष्ट्रीय व गुर्जर असे पाच द्रविड ब्राह्मण राहतात.

जातिसंस्थेच्या विविध उपपत्ती : गेल्या सु. दीडशे वर्षांत पश्चिमी  विद्वानांनी, अनेक ब्रिटीश सत्ताधाऱ्यांनी नेमलेल्या समाजशास्त्रज्ञांनी आणि आधुनिक भारतीय सुशिक्षितांनी भारतीय जातिसंस्थांच्या प्रत्यक्ष वस्तुस्थितीचे अवलोकन करून अनेक वृत्ते आणि सोपपत्तिक ग्रंथ प्रसिद्ध केले आहेत. अजुनही अशा प्रकारची वृत्ते व ग्रंथ संशोधक विद्वान प्रसिद्ध करीत आहेत. साधारणपणे भारतात जाति-उपजातींची संख्या तीन हजारांच्या आसपास कमीअधिक आहे. या संशोधकांनी जातिसंस्थेच्या उगमाच्या अनेक उपपत्ती सांगितल्या आहेत. रिस्लेनामक पश्चिमी विद्वानाने वंशवादी उपपत्तीला महत्त्व दिले त्याचा प्रभाव असलेले त्यानंतर अनेक विद्वान झाले आहेत. इबेट्‌सन आणि त्याच्या प्रभावाखाली असलेल्या अनेक विद्वानांनी ‘ट्राइब्ज’ म्हणजे भारतातील व बाहेरील, परस्परांशी सामाजिक रीत्या संघटित न झालेल्या व सांस्कृतिक मेलन न झालेल्या भिन्नभिन्न जमाती वा टोळ्या या जातिसंस्थेचे उगमस्थान होय, असे प्रतिपादिले. नेसफील्ड व त्याला अनुसरणाऱ्या अनेक विद्वानांनी भिन्नभिन्न व्यवसाय हे जातिसंस्थेचे उगमस्थान म्हणून ठरविले. राजांचे किंवा सत्ताधाऱ्यांचे धार्मिक कर्मकांड हे जातिसंस्थेचे कारण होय, म्हणजे राज्यभिषेक, यज्ञ, देवालयासंबंधी पूजादी विस्तृत विधिविधाने इत्यादिकांना आवश्यक असलेल्या विविध व्यवसायांच्या वा व्यवसायी गटांच्या मुळे जातिभेद उत्पन्न  झाला, अशी उपपत्ती मानवजातिशास्त्रज्ञ होकार्ट याने सांगितली. इंग्लंडमधील केंब्रिज  विद्यापीठाचे प्राध्यापक हटन आणि पॅरिस येथील मानवजातिशास्त्रज्ञ ल्वी द्यूमाँ यांनी भिन्नभिन्न जमातींच्या पवित्र व अपवित्र, पुण्य व पाप यांसंबंधी असलेल्या भिन्नभिन्न श्रद्धांचा प्रभाव व त्या श्रद्धांना मान्यता देण्याची प्रवृत्ती यांमुळे जातिसंस्था निर्माण झाली, असे प्रतिपादिले आहे.

जातिसंस्थेची अंगभूत लक्षणे तीन दिसतात : (१) भिन्नभिन्न कुलसमूहांना पृथक कुलपरंपरेने प्राप्त झालेला परस्परांपासूनचा पृथक्‌पणा (२) या पृथक्‌पृथक कुलसमूहांचा परस्परोपकारक श्रमविभाग वा भिन्न व्यवसाय आणि (३) उच्चनीच व स्थिर अशी श्रेणीबद्ध रचना. या अंगभूत तीन लक्षणांनी युक्त अशा जातिसंस्थेचे व त्याबरोबरच त्यातील सर्व जाती व उपजाती यांचे समग्र चित्र प्रथम वेदोत्तर काळी इ. स. पू. आठव्या-सातव्या शतकांत प्रकट झालेले दिसते. तत्पूर्वी व त्यानंतर त्या चित्रात अनेक लहानमोठे फेरबदल झाले. खालच्या मानलेल्या जाती किंवा त्यांतील काही व्यक्ती उच्च व्यवसायांत शिरून किंवा आर्थिक व राजकीय प्रभाव आणि सामर्थ्य मिळवून किंवा आचारविचारांमध्ये वरच्या श्रेणींचे मोठ्या प्रमाणात अनुकरण करून हळूहळू वरच्या श्रेणीत शिरल्या त्याचप्रमाणे वरच्या श्रेणीत असलेल्या जातिजमाती किंवा काही विशिष्ट व्यक्ती खालच्या दर्जाचे मानलेले व्यवसाय पतकरावयाला लागल्यामुळे किंवा आर्थिक आणि राजकीय सामर्थ्य अनेक पिढ्यांपर्यत कमी होत गेल्यामुळे अथवा अधःपात झाल्यामुळे अथवा उच्च धार्मिक संस्कारांचा अनेक पिढ्यांपर्यत लोप झाल्यामुळे वरची श्रेणी गमावून बसून खालच्या जाती म्हणून स्थिरावल्या. वर्णव्यवस्था व जातिव्यवस्था स्थिरवल्यानंतर भारताबाहेरून भारतात मुसलमानपूर्व काळी ज्या जमाती येत गेल्या, त्यांचाही सांस्कृतिक दर्जा, राजकीय सामर्थ्य किंवा व्यवसायविषयक विशेष ज्ञान असेल त्याप्रमाणे येथील वर्णव्यवस्थेत वा जातिव्यवस्थेत समावेश होत गेला. उदा., इराणी, ग्रीक, शक, कुशाण, हूण, बाल्हिक इ. जमाती भारतात आल्या आणि निरनिराळ्या वर्णांत वा जातींत मिसळून गेल्या. यासंबंधी एक सूत्रभूत वाक्य मनुस्मृतीच्या दहाव्या अध्यायात व 

याज्ञवल्क्यस्मृतीच्या पहिल्या अध्यायात आले आहे.


मनुस्मृतीत म्हटले आहे, की तपःप्रभावाने किंवा बीजप्रभावाने वर्णांचा उत्कर्ष किंवा अपकर्ष होत असतो. क्षत्रिय वर्णाच्या अपकर्षाची तेथे दिलेली उदाहरणे म्हणजे पौंड्रक, ओड्र, द्रविड, कांबोज, यवन, शक, पारद, पल्हव, चीन, किरात, दरद व खश हे होत. हे ब्राह्मणांच्या संपर्काच्या अभावी क्षत्रिय, असूनही शुद्र झाले. याज्ञवल्क्यस्मृतीत म्हटले आहे, की कर्मांचा म्हणजे वर्णधर्माचा व्यत्यय म्हणजे खालच्या वर्णाने वरच्या वर्णाचे कर्म किंवा वरच्या वर्णाने खालच्या वर्णाचे कर्म स्वीकारल्याने सातव्या किंवा पाचव्या पिढीत वर्ण बदलतो. वर्ण म्हणजे जाती, असा अर्थ मनुस्मृतीत व याज्ञवल्क्यस्मृतीत केलेला आहे. तेथे वर्ण व जाती हे पर्यायशब्द आहेत.

जातिसंस्थेचे अध्ययन करीत असताना जातीची पाच लक्षणे लक्षात घ्यावी : (१) कुलपरंपरेने आईबाप ज्या जातीचे असतात तीच जात जन्मतः पुत्रकन्यांची समजली जाते. (२) त्याच जातीतील व्यक्तींना त्याच जातीतील व्यक्तींशी धार्मिक पद्धतीने लग्न करता येते मात्र त्या जातीतील काही नातेवाईकांशी व तशी रूढी असल्यास सगोत्रांशी किंवा सगोत्रसद्दश पद्धतीत असलेल्या व्यक्तींशी लग्नसंबंध करता येत नाही. (३) काही जातींनी स्पर्शिलेले वा शिजविलेले अन्न काही जातींनी सेवन करणे, कुलपरंपरेने निषिद्ध मानलेले असते. त्याचप्रमाणे काही जातींनी स्पर्शिलेले किंवा भांड्यात भरून आणलेले पाणी पिणे निषिद्ध मानलेले असते. उदा., महाराष्ट्रातील ब्राह्मण किंवा पंचद्रविड ब्राह्मण हे ब्राह्मणेतर जातींनी शिजविलेले किंवा स्पर्शिलेले अन्न ग्रहण करणे, निषिद्ध मानतात. यास अपवाद म्हणजे पेढा, बर्फी इ. मिठाई होय. अस्पृश्येतर किंवा स्पृश्य अशा बऱ्याच अन्य जातींनी तुपात वा तेलात तळलेले पुऱ्या, कचोरी इ. प्रकारचे अन्नपदार्थ म्हणजे ‘पक्की रसोई’ उत्तर हिंदुस्थानातील ब्राह्मण निषिद्ध मानत नाहीत. ब्राह्मणेत्तर जातींनी स्पर्शिलेले किंवा पात्रात आणलेले पाणी पिणे पंचद्रविड ब्राह्मण निषिद्ध मानतात परंतु उत्तरेतील ब्राह्मणांना बहुतेक स्पृश्य ब्राह्मणेतर जातींनी स्पर्शिलेले किंवा आणलेले पाणी पिणे निषिद्ध वाटत नाही. स्मृतींसारख्या धर्मशास्त्रात अन्नोदक व्यवहारासंबंधी वरील प्रकारचे निर्बंध निर्दिष्ट केलेले नाहीत परंतु त्या धर्मशास्त्रात सामान्यपणे देशाचार, कुलाचार किंवा जातिधर्म म्हणून निर्दिष्ट केले आहेत. धर्मशास्त्रात निषिद्ध नसलेले परंतु पवित्र रूढीने निषिद्ध केलेले आचार निषिद्ध मानावे, असा धर्मशास्त्रांचा निर्बंध आहे. (४) धर्मशास्त्राप्रमाणे आणि पवित्र रूढीप्रमाणे त्या त्या जातींचे परंपरागत असे धंदे, उद्योग व व्यवसाय ठरलेले असतात. त्या त्या जातींनी अपवित्र मानलेले म्हणजे असंमत असे धंदे, उद्योग आणि व्यवसाय असतात. असंमत असलेले व निषिद्ध असलेले उद्योग, धंदे व व्यवसाय त्या त्या जातीतींल व्यक्तींनी सुरू केल्यास त्या त्या जातींच्या व्यक्ती जातिभ्रष्ट मानल्या जातात. हे व्यवसायविषयक नियम ब्रिटीश राजवटीच्या पूर्वी अधिक कसोशीने पाळले जात. मुसलमान राजवटीपूर्वी हिंदू सत्ताधारी आणि जैन व बौद्ध सत्ताधारीही त्याचप्रमाणे कुलप्रमुख, जातिप्रमुख, त्यांच्या पंचायती, ग्रामपंचायती हे व्यवसायविषयक नियम जास्तीत जास्त कसोशीने व्यक्तींना पाळावयास लावीत. न पाळल्यास जातिबहिष्कार व प्रायश्चित हे उपाय योजले जात. काही बाबतींत प्रायश्चित्ताचाही इलाज चालत नसे बहिष्कारच कायम रहावयाचा. (५) पवित्र आणि अपवित्र, अधिक पवित्र व अधिक अपवित्र अशी कसोटी लावून जातिसंस्थेत त्या त्या जातीला कायमचे स्थान असते. जातिसंस्थेच्या रचनेचे काही आचारविषयक महत्त्वाचे विधिनिषेध हे आधारभूत तत्त्व आहे. या तत्त्वाला गेल्या हजारो वर्षांच्या इतिहासात वारंवार मुरड पडली आहे, यात शंका नाही. आणि विहित आणि निषिद्ध आचारांच्या कसोट्याही बदलल्या आहेत. मधूनमधून होणारी सामाजिक अव्यवस्थाही जातींच्या श्रेणीबंधामध्ये अव्यवस्था उत्पन्न करण्यास कारण झाले आहे. आर्थिक आणि राजकीय सामर्थ्याने संपन्न अशा जातिजमातींची प्रतिष्ठास्थाने बदललेली आहेत. परंतु जातिसंस्थेची नियंत्रक सामान्य तत्त्वे साधारणपणे प्रभाव गाजवीतच राहिली म्हणून ही जातिसंस्था गेली सु. तीन हजार वर्षे टिकली आहे.

जातिसंस्थेचे धर्मशास्त्रोक्त स्वरूप : जातिसंस्थेला व्यवस्थित व निश्चितआकार सध्याउपलब्ध असलेल्या अत्यंत प्राचीन गौतम, वसिष्ठ, आपस्तंब  या गद्य स्मृतींच्या व विशेषतः त्यानंतरच्या मनु, याज्ञवल्क्य, पराशर  इ. स्मृतींच्या काळी प्राप्त झाला [→ स्मृतिग्रंथ आणि स्मृतिकार]. गेल्या दीडशे वर्षांतील जातींची व जातिसंस्थांची स्वरूपे व नियमांच्या अंमलबजावणीची पद्धती यावरून जातिसंस्थेचे स्वरूप निश्चित केल्याने प्राचीन हिंदू राजवटीतील तिचे वास्तव स्वरूप ठरविणे कठीण आहे. कारण जातिसंस्थेचे नियंत्रण करणाऱ्या शक्ती ब्रिटीश अमदानीत दुबळ्या झाल्या. ब्राह्मणी वर्चस्व, पुरोहित वर्चस्व, धार्मिक गुरूंचे वर्चस्व आणि हिंदू धर्मपरंपरेचे रक्षण करण्याची हमी घेणारी व ते कर्तव्य समजणारी हिंदूची राजकीय सत्ता जेव्हा प्रभावी होती त्या वेळच्या जातिसंस्थेचे किंवा जातिसंस्थांचे खरेखुरे वास्तविक स्वरूप आणि नियमन करणारी तत्त्वे यांचे यथार्थ ज्ञान मनु आदी स्मृतींच्या आधारानेच होऊ शकते म्हणून मनु  आदी स्मृतींमध्ये यासंबंधी काय म्हटले आहे, ते पाहणे मानवजातिविज्ञानाच्या एतद्संबंधी चर्चेला आधिक प्रमाणभूत ठरते. मुसलमानपूर्व हिंदू राजवटीमध्ये व मुसलमानकालीन हिंदू राजवटीत प्रचलित असलेल्या धर्मशास्त्र, टीका व धर्मनिबंध यांमध्ये तत्कालीन जातिसंस्थेचे स्वरूप मुख्यतः प्रतिबिंबित झाले आहे कारण या हिंदू राजवटींमध्ये या ग्रंथांच्या आधारे व त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनुशासन चालत होते [→ धर्मनिबंध ]. ही चर्चा करताना धर्मशास्त्रोक्त जातिसंस्थेच्या विवेचनाच्या संदर्भात धर्मशास्त्रीय संकेत तपशील, विधिनिषेध, पृथक्करण, वर्गीकरण, तत्त्वे आणि सिद्धांत यांची आधुनिक मानवजातिविज्ञानानुसारे नव्याने येणारी मीमांसाही त्याबरोबरच येथे देणे योग्य होईल.

 

मनु, याज्ञवल्क्य  इ. स्मृतींच्या धर्मशास्त्रात जातिसंस्थेचे असे वर्णन केले आहे : ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शुद्ध हे चार वर्ण विराट पुरुषाच्या  किंवा यज्ञपुरुषाच्या अंगांतून उत्पन्न झाले आहेत. ब्राह्मण मुखापासून, क्षत्रिय बाहूपासून, वैश्य मांडीपासून आणि शूद्र पायापासून उत्पन्न झाले आहेत आणि त्यांचा उच्चनीचभाव या अंगांच्या उच्चनीचभावाप्रमाणेच आहे. सर्वांत उच्च ब्राह्मण, त्याच्या जवळचा खालोखाल क्षत्रिय, त्याच्या खाली वैश्य व सर्वांत खाली असलेला म्हणजे अंत्य शूद्र होय. ही उच्चनीचता पावित्र्याच्या उच्चनीचतेची दर्शक आहे आणि त्यामुळे सामाजिक स्थानाच्याही उच्चनीचतेची दर्शक आहे. वर्णांची उच्चनीचता व त्या त्या वर्णातील व्यक्तीचे स्थान हे जन्मतःच ठरते, म्हणून वर्ण म्हणजे जाती होत. या जातींमध्येच सर्व मानवांची विभागणी होते. भारतातील आणि भारताबाहेरील मानव अशी विभागणी स्मृतींचे धर्मशास्त्र गृहीत धरत नाही. म्हणून यवन म्हणजे ग्रीक, शक म्हणजे मध्य आशियातील एक जमात, चीन म्हणजे अतिपूर्वेकडील जमाती यासुद्धा शूद्र बनलेल्या क्षत्रिय जाती होत, असे मनुस्मृतीत व महाभारतात म्हटले आहे. अत्यंत प्रशस्त विवाह म्हणजे त्या त्या वर्णातील विवाह होय. धर्म्य अशा विवाहापासून होणारी संतती ही त्याच वर्णाची होते. ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य हे द्विज होत म्हणजे त्यांना उपनयन संस्काराने पहिल्या वयात दुसरा जन्म प्राप्त होतो, त्यामुळे वेदाधिकार प्राप्त होतो. हा धार्मिक म्हणजे आधुनिक अर्थी सांस्कृतिक जन्म होय. म्हणूनच जातिसंस्था ही शारीरिक अर्थी वंशवादी समाजसंस्था नाही, तर ती सांस्कृतिक संस्था आहे, असे निश्चितपणे म्हणता येते. शुद्राला उपनयन संस्काराचा आधिकार नसल्यामुळे तो द्विजाती नव्हे, तो एकजाती आहे कारण त्याला वेदाधिकार नाही. शैवागम, वैष्णवागम, इ. तंत्रग्रंथात शूद्रालाही उपनयनाचा अधिकार दिला आहे परंतु त्या उपनयनाने वेदमंत्र म्हणण्याचा अधिकार प्राप्त होत नाही, केवळ पौराणिक मंत्र म्हणण्याचा अधिकार प्राप्त होतो व पौराणिक पूजा इ. कर्मकांडाचा अधिकार प्राप्त होतो.


हे वर्ण परस्परावलंबी आहेत. चारी वर्णांच्या धर्मिक जीवनाचा मार्गदर्शक ब्राह्मण वर्ण यज्ञ, दान व वेदविद्याध्ययन इतर वर्णांकडून करविणे, हा त्याचा व्यवसाय होय. युद्धार्थसज्जता, दंडशक्तीने प्रजापालन आणि वर्णाश्रमधर्मांचे रक्षण, हा क्षत्रियाचा व्यवसाय होय. अर्थोत्पादन व व्यापार हा वैश्याचा व्यवसाय होय. द्विजांची शरीराने सेवा व कारागिरीची कामे, हा शुद्राचा व्यवसाय होय. ह्या व्यवसायांनी समाजधारणा होते. त्यावर समग्र समाजाचे अस्तित्व अवलंबून असते. हाच सिद्धांत संकरजातींच्या व्यवसायांना लागू होतो.

खालच्या वर्णाची स्त्री व वरच्या वर्णाचा पुरुष यांचा विवाहही धर्मशास्त्रमान्य होता यास अनुलोमविवाह म्हणतात आणि संततिसही ‘अनुलोम’ ही संज्ञा प्राप्त होते. जेव्हा वरच्या वर्णाची स्त्री व खालच्या वर्णाचा पुरुष  यांचा विवाह वा लैंगिक संबंध घडतो, तेव्हा त्या संबंधास ‘प्रतिलोम’ म्हणतात. हा संबंध पूर्ण निषिद्ध आहे. संततीसही प्रतिलोम अशी संज्ञा प्राप्त होते. प्रतिलोम व अनुलोम या संज्ञा ह्या अर्थाने वैदिक वाङ्‌मयात येत नाहीत. आपस्तंब धर्मसूत्रास केवळ समान वर्णीय विवाहच मान्य आहे. ‘कलिवर्ज्य’ नामक पौराणिक धर्मशास्त्रात अनुलोम विवाहही निषिद्ध सांगितला आहे आणि हा निषेध सर्वत्र हिंदू समाजात गेली हजार-बाराशे वर्षे कसोशीने पाळला जात आहे. त्यामुळे वारसाहक्क असवर्ण विवाहसंततीस अमान्य झाला. भिन्न वर्णांमध्ये अनुलोम वा प्रतिलोम संबंधांपासून होणाऱ्या संततीस संकरजाती वा संकरवर्ण म्हणतात. हे संकर तीन प्रकारचे : अनुलोम, प्रतिलोम व संकीर्ण संकर. चार वर्णांचे संकर होऊन झालेल्या जातींपासून पुन्हा संकर होऊन नवीन जाती निर्माण होतात त्यांस संकीर्ण संकरजाती म्हणतात. या संकरशाखांना अंत नाही. परंतु चार वर्णांसह संकरजातींची स्मृतींमध्ये परिगणना करून स्मृतींच्या समोर असलेल्या जातिसंस्थेतील ७१ जाती, त्यांचे व्यवसाय आणि त्यांची जातिसंस्थेतील उच्चनीचभावाप्रमाणे ठरलेली स्थाने दाखविलेली आहेत. त्यात काही थोड्या जातींच्या वर्णनाच्या बाबतीत स्मृतींमध्ये एकमेकांत विसंगती दिसते. सु. ६० वर्षांपूर्वी पंडित ज्वालाप्रसाद मिश्र यांनी लिहिलेल्या व श्रीवेंकटेश्वर मुद्रणालयाने प्रसिद्ध केलेल्या जातिभास्कर  नामक हिंदी पुस्तकात स्मृती, पुराणे व उपपुराणे यांच्या आधारे ११५ संकरजातीचे वर्णन केले आहे. मनू व याज्ञवल्क्य यांनी चार वर्णांच्या सरळ अनुलोम संकरापासून सहा संकरजाती आणि प्रतिलोम संकरापासून सहा संकरजाती दाखविल्या आहेत. अनुलोम विवाहातील शूद्र स्त्रीव्यतिरिक्त स्त्रियांच्या ठिकाणी निर्माण झालेल्या संततीस द्विजत्वाचे अधिकार असतात. शूद्र स्त्रीच्या ठिकाणी झालेली संतती ही शूद्रच होय. अनुलोमविवाह हा स्मृतींना मान्य असला, तरी ‘कलिवर्ज्य’ नावाच्या आदिपुराणातील किंवा आदित्यपुरणातील प्रकरणात अनुलोम विवाह किंवा असवर्ण विवाह निषिद्ध केला आहे. प्रतिलोम संबंधातून निर्माण झालेल्या संततीचे अधिकार चांडाल वगळल्यास शूद्रसमान मानले आहेत परंतु काही पुराणांनी चांडालासह सर्व अस्पृश्य जातींना शैव, वैष्णव, शाक्त इ. पंथांची दीक्षा मान्य केली आहे. इ. स. सातव्या शतकाच्या सुमारास झालेल्या अमरकोश  या संस्कृत शब्दकोशात हिंदूंच्या सर्व जातींचे अस्पृश्य व चांडाल यांच्यासह चार वर्णांतच वर्गीकरण केले आहे.

अनुलोम पद्धती त्या त्या वर्णातील उपजातींमध्येसुद्धा अलीकडे चालू असलेली दिसते. उदा., हिमालयातील सुरोला व गंगारी या हिमालयातील गढवाली ब्राह्मण पोटजाती होत. गंगारी कन्येशी सुरोला पुरुषाचा विवाह होतो परंतु संतती गंगारीच ठरते. सुरोला ब्राह्मण आपली कन्या गंगारी ब्राह्मणास देत नाहीत. ते आपणास उच्च मानतात. गुजराती भाटेला ब्राह्मण आणि अनावला ब्राह्मण यांच्यात भोजनव्यवहार आहे परंतु भाटेला ब्राह्मण अनावलाची कन्या घेतात स्वतःची कन्या मात्र अनावलाला देत नाहीत. त्या त्या वर्णात ज्या उपजाती पडल्या, त्यांस देशभेद आणि आचारभेद ही कारणे आहेतच धर्मशास्त्रनिषिद्ध हीन आचारांमुळे काही उपजाती खालच्या मानल्या जातात, वर्ण तोच मानला जातो. राजस्थानात गारूड नामक ब्राह्मण अस्पृश्यांचे कर्मकांड करतात. म्हणून खालचे मानले जातात. खस किंवा खसिया ब्राह्मण शूद्रांचे अन्न घेतात, म्हणून इतर ब्राह्मण त्यांना कमी लेखतात. बंगाल, ओरिसा, उत्तर प्रदेश इ. ठिकाणची जी ब्राह्मण कुटूंबे अंत्यसंस्काराचे दान घेतात व बाराव्या-तेराव्याची  भोजने करतात, त्यांना इतर ब्राह्मण पंक्तीत घेत नाहीत. काही जमाती स्वतःला ब्राह्मण समजतात परंतु त्यांच्यामध्ये वैदिक पौरोहित्य करणारे ब्राह्मण नसल्यामुळे त्यांना इतर ब्राह्मण व ब्राह्मणांचे पौरोहित्य ज्यांच्या कुटुंबात चालते त्या जमाती ब्राह्मण म्हणून लेखत नाहीत. महाराष्ट्रातील व उत्तर प्रदेशातील सोनार, सुतार, कासार, तांबट आणि गवंडी यांची काही कुटुंबे ही स्वतःला ब्राह्मण समजतात व त्यांच्यात उपनयन संस्कारही होतो. यांना ‘पांचाल’ ब्राह्मण ही संज्ञा आहे. काही सोनार, सुतार, कासार, तांबट व गवंडी यांची कुटूंबे स्वतःस ब्राह्मण समजत नाहीत. गुजरातेतील तलादिया ब्राह्मण हे खालच्या दर्जाचे मानले जातात त्यांना ते मूळचे शूद्र आहेत, असेही समजतात. ताळगुंद स्तंभशिलालेखाप्रमाणे कदंब राजे हे मूळचे ब्राह्मण होते परंतु पुढे काही पिढ्यांनंतर ते स्वतःस क्षत्रिय म्हणवू लागले आणि इतर क्षत्रिय राजघराण्यांना स्वतःच्या कन्या देऊ लागले व त्यांच्या घेऊ लागले, असा उल्लेख आहे. याच्या उलट महाभारतात अनेक राजघराणी क्षत्रिय असताना ब्राह्मण बनली, असे म्हटले आहे. वीतहव्य, आर्ष्टिषेण, सिंधुद्विप, देवापी , विश्वामित्र इ. क्षत्रिय होते त्यांनी स्वतः ब्राह्मण बनून ब्राह्मण वंशाची परंपरा सुरू केली. मांधाता, संकृती, कपी, वध्र्यश्व, पुरुकुच्छ, अजमीढ इ. क्षत्रिय ब्राह्मण बनल्याचेही पुराणांनी म्हटले आहे.

संकरजातिभेद व त्यांच्या उच्चनीच श्रेणी यांचा सांकेतिक अर्थ : धर्मशास्त्रांनी जे सरळ चार वर्ण सांगितले, त्या चार वर्णांमध्ये भारतातील सगळ्या जाती, उपजाती, जमाती, बाहेरून आलेले लोकसमूह या सर्वांना समाविष्ट करण्यास अडचणी दिसल्यामुळे आणि उच्चनीच अशा केवळ चार श्रेणींत समाविष्ट करणे अशक्य झाल्यामुळे, चार वर्णांच्या मिश्रणांची कल्पना करून चारांपेक्षा अधिक उच्चनीच श्रेणींची कल्पना धर्मशास्त्रांनी केली. विराट पुरुषापासून चारच वर्ण उत्पन्न झाले. मनुष्यजात मुळात चारच वर्णांची होती, हा  मूलभूत सिद्धांत गृहीत धरून शेकडो जाती व उपजातींना अनुलोम प्रतिलोम संकरांच्या कल्पित साच्यामध्ये बसविण्याचा प्रयत्न केला. आर्यावर्तात म्हणजे पंजाबात व गंगा-यमुनांच्या दुआबात वर्णव्यवस्था प्रथम निर्माण झाली परंतु या वर्णव्यवस्थेतील वरिष्ठ पुरोहित ब्राह्मणवर्ग आणि वर्णाश्रमधर्माचे राजकीय दंडसामर्थ्याच्या द्वारे पालन करणारा


राजन्यवर्ग यांनी आर्यवर्ताच्या बाहेरून येणाऱ्या जमातींना आपल्या समाजसंस्थेत समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला त्याचप्रमाणे आपली वर्णाश्रमधर्मात्मक समाजव्यवस्था व संस्कृती आर्यावर्ताबाहेर भारतात अन्यत्र पसरवीत असताना भिन्नभिन्न व्यवसायी गण व बाहेरून येणाऱ्या जमाती या चार वर्णांच्या साच्यांत नीट बसविता येत नव्हत्या, म्हणून संकरांच्या विचित्र साच्यांमध्ये त्या उच्चनीच आचारांच्या व्यवसायी गणांना आणि बाह्य जमातींना समाविष्ट करून घेतले. संकरजातींच्या नामाभिधानांवरून असे लक्षात येते की, त्यांतील काही नावे प्रदेश व जमाती यांची दर्शक आहेत. उदा., अंबष्ठ, आवन्त्य, ओड्र, कांबोज, द्रविड, मागध, वैदेहक, शक, शबर, भिल्ल, पारशव, माहिष्य, कुंतलक, अंध्र, पौंड्रक, म्लेच्छ, तुर्क, यवन, किरात, इ. तथाकथित संकरजातींची नावे प्रदेश किंवा बाह्य जमातींचीच वाचक आहेत. संकरकल्पना त्यांच्यावर आरोपित केली आहे. यांतील अंबष्ठ, माहिष्य, मागध, वैदेहक, पौंड्रक, कुंतलक, पारशव, द्रविड, अंध्र, ओड्र ही प्रदेशवाचक नावे आहेत, हे स्पष्ट होते. यातील यवन, तुरुष्क, किरात, भिल्ल इ. नावे मूळच्या बाह्य जमातींची वाचक आहेत. यांच्यावर संकरकल्पना आरोपून त्यांची पवित्र किंवा अपवित्र श्रेणी सूचित केली आहे. उदा., क्षत्रिया किंवा वैश्या स्त्री व ब्राह्मण पुरुष यांच्या संकरापासून अंबष्ठ जात उत्पन्न झाली, असे दाखविल्यामुळे ही जात ब्राह्मणांपेक्षा कमी  व क्षत्रिय किंवा वैश्य यांच्यापेक्षा वरची, असे सूचित केले. माहिष्य  म्हणजे माहिष्यनामक प्रदेशातील होत. क्षत्रिय पुरुष व वैश्या स्त्री यांचा हा संकर होय, असे म्हटल्याने वैश्य वर्णापेक्षा वरचेपणा सूचित केला. उलट मुळात मागध म्हणजे मगध देशातील एक जमात वैश्य पुरुष व क्षत्रिय स्त्री यांच्या प्रतिलोम संकराने तिची उत्पत्ती दाखवून शूद्र वर्णाच्या समान श्रेणीत गणना केली. वैदेहक ही जात मूळची विदेहनामक प्रदेशातील होय. वैश्य पुरुष आणि ब्राह्मणी स्त्री यांच्या संकरापासून वैदेहकाची उत्पत्ती दाखविली त्यावरून शूद्र वर्णापेक्षा खालचा दर्जा सूचित केला. भिल्ल ही भारतातील एक आदिवासी जमात होय. धीवरनामक संकरजातीचा पुरुष आणि कारावारी नामक संकरजातीची स्त्री यांच्यापासून भिल्लाची उत्पत्ती दाखविली. धीवर आणि कोरावारी हे दोन्हीही प्रतिलोम संकर मानले आहेत त्यामुळे भिल्ल जमात ही शूद्रापेक्षा खालच्या दर्जाची ठरविली.

श्रमविभाग व जातिसंस्था: सर्व वर्ण व जाती यांचे व्यवसायही वर्णवार व जातवार सामाजिक श्रमविभागाच्या तत्त्वानुसारे ठरविले आहेत. चार वर्णांच्या संज्ञा ज्याप्रमाणे विशिष्ट व्यवसायदर्शक आहेत, त्याचप्रमाणे अनुलोम व प्रतिलोम संकरजातींतील बऱ्याच जातींच्या संज्ञा विशिष्ट व्यवसायदर्शक आहेत. पावित्र्यापावित्र्याचा निकषावर त्या व्यवसायांचे उच्चनीच स्थान ठरवून त्या भिन्नभिन्न व्यावसायिक कुलसमूहांना संकरकल्पना लावून त्यांचे उच्च वा नीच स्थान निर्दिष्ट केले आहे. तात्पर्य, संकरकल्पना ही चातुर्वर्ण्य कल्पनेच्या तत्त्वावर आधारलेली मूळच्या व्याख्येप्रमाणे चार वर्णांच्या साच्यात ज्यांना नेमके बसविता येत नाही, त्यांना जातिसंस्थेत पृथक स्थाने देऊन उच्चनीच श्रेणीमध्ये समावेशन करण्याची ही सांकेतिक पद्धती ठरविली, असे अनुमान करता येते.

वर्णापकर्ष : धर्मशास्त्रात शुद्धवर्ण व संकरवर्ण या सर्वांचे व्यवसाय निर्दिष्ट केले आहेत. खालच्या वर्णांनी वरच्या वर्णांचा व्यवसाय करावयाचा नाही, केल्यास पाप लागते. परंतु वरच्या वर्णांना आपत्काळी, म्हणजे उपजीविकेचे धर्मशास्त्रोक्त साधन न मिळाल्यास, खालच्या वर्णाचा व्यवसाय आपत्काळ संपेपर्यत पाप न लागता करता येतो पंरतु आपत्काळ संपला, तरी खालच्या वर्णाचा व्यवसाय वरच्या वर्णाने चालू ठेवल्यास किंवा खालच्या वर्णाची इतर वरच्या वर्णास निषिद्ध असलेली कर्मे चालू ठेवल्यास पाप लागते व त्या पापातून निवृत्त होऊन प्रायश्चित्त करावे लागते. तेच खालच्या वर्णाचे निषिद्ध कर्म वा निषिद्ध व्यवसाय तसाच चालू ठेवल्यास पाच किंवा सात पिढ्यांनी खालचा वर्ण प्राप्त होतो, खालच्या जातीत समावेश होतो याला ‘वर्णापकर्ष’ म्हणतात. हा अपकर्षाचा सिद्धांत अत्यंत तळच्या म्हणजे तथाकथित नीचतम मानलेल्या जातींशिवाय सर्वांना लागू आहे. एका अर्थी नीचतम मानलेल्या अनेक जातींचेदेखील तशाच दुसऱ्या जातीचा व्यवसाय आणि कर्मे अनेक पिढ्यांपर्यंत चालू ठेवल्यास ‘जात्यंतरण’ होते. हा ‘जात्यपकर्षा’चा किंवा वर्णापकर्षाचा नियम मिताक्षरादी धर्मशास्त्रटीका व धर्मनिबंध यांच्यामध्ये स्पष्ट करून सांगितला आहे. वर्णोत्कर्ष व वर्णापकर्ष यांचा नियम मनु, याज्ञवल्क्य  इ. स्मृतींमध्ये सूत्ररूपाने सांगितला आहे. वर्णोत्कर्षाचा, म्हणजे खालच्या वर्णातील व्यक्तीचा वरच्या वर्णात अंतर्भाव करण्याचा, नियम थोडक्यास मागे सांगितला आहे परंतु अलीकडच्या हजार–पंधराशे वर्षांत या नियमाची अंमलबजावणी झालेली दिसत नाही.

व्रात्य : या संदर्भात धर्मशास्त्रातील व्रात्य या संज्ञेचे स्पष्टीकरण थोडक्यात करणे आवश्यक आहे, ते असे : ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य यांपैकी कोणत्याही वर्णातील वा जातीतील व्यक्तीने शास्त्रोक्त अवधीमध्ये उपनयन संस्कार केला नाही, तर द्विजत्व येत नाही व आयुष्यात कधीच उपनयन संस्कार केला नाही, तर त्या व्यक्तीस ‘व्रात्य’ ही संज्ञा येते. व्रात्य ब्राह्मण, व्रात्य क्षत्रिय, व्रात्य वैश्य अशा संज्ञा प्राप्त झालेल्या जाती त्याच जातीतील खालच्या उपजाती बनतात त्यांची जाती निराळी होत नाही, म्हणजे ती त्याच वर्णाची राहतात परंतु त्यांच्याशी द्विजत्व संस्कार झालेल्या पुरुष व्यक्तींना शास्त्रोक्त विवाहसंबंध निषिद्ध मानला आहे. उत्तर हिंदुस्थानात द्विजत्वाचा संस्कार न केलेल्या परंतु स्वतःस क्षत्रिय किंवा वैश्य वर्णाच्या समजणाऱ्या शेकडी जाती आहेत त्याबरोबरच द्विजत्व संस्कार करून केव्हातरी यज्ञोपवीत म्हणजे जानवे धारण करणाऱ्या क्षत्रिय व वैश्य जातीही आहेत. दक्षिण हिंदुस्थानातसुद्धा–उदा., महाराष्ट्रात व गुजरातमध्येही–स्वतःस क्षत्रिय व वैश्य समजणाऱ्या परंतु द्विजत्व संस्कार अनेक पिढ्या लोप झालेल्या जाती आहेत. कलियुगात ब्राह्मण व शुद्र असे दोन वर्ण आहेत, अशी दक्षिण हिंदुस्थानातील ब्राह्मणांची समजूत आहे. अशीच अनेक पाश्चात्त्य संशोधकांचीही आहे, परंतु ही समजूत चुकीची आहे दक्षिण हिंदुस्थानातील क्षत्रिय-वैश्यांची ब्राह्मणांप्रमाणेच ऋषींची गोत्रे सांगतात. उदा., महाराष्ट्रातील ९६ कुळींतील मराठ्यांना ऋषींची गोत्रे आहेत.

वेदकाळी ‘व्रात्यस्तोम’ नामक यज्ञविधी प्रचलित होता. तो ताण्डयब्राह्यण  या ग्रंथात सांगितला आहे. या विधीने वैदिक समाजाच्या बाहेरच्या भटक्या गणांचे, जमातींचे शुद्धीकरण होत असे. त्यानंतर त्यांचा द्विजांमध्ये समावेशही होत असे. ‘व्रात्य’ शब्दाचा व्युत्पत्त्यर्थ भटकी जमात असा आहे.

धर्मशास्त्रातील संकरजातींच्या व्यवसायवाचक व अन्य संज्ञा : त्या त्या जातीचे परंपरेने व शास्त्राने मान्य केलेले आणि निषिद्ध मानलेले असे व्यवसाय कोणते, हे सांगता येते. त्या त्या जातीस योग्य असा व्यवसाय उपलब्ध होत नसल्यास म्हणजे आपत्काळी विहित असे सर्व जातींना समान म्हणून मान्य असलेले व्यवसाय मनुस्मृतीमध्ये (अध्याय १०, श्लोक ११६) सांगितले आहेत ते म्हणजे : वैद्यकादी विद्या अत्तरे, रंग, मूर्ती, मंदिर, वस्त्रे इ. निर्माण करावयाच्या उपयुक्त कला अथवा शिल्पे सेवा, गोरक्षण, व्यापार, ऋषिकर्म, दारिद्र्यात संतोष मानून राहणे, भिक्षा आणि सावकारी हे होत. वारसाहक्काने प्राप्त धन, गुप्त खजिना सापडणे, विक्री, विजयाने प्राप्त धन, सावकारी, कृषी व वाणिज्य आणि दान घेणे, हे संपत्तीच्या प्राप्तीचे उपाय म्हणून सर्वांना धर्म्य मानले आहेत. यासंबंधी स्मृतींच्या धर्मशास्त्रात मतभेदही आढळतात.

संकरजातींच्या बऱ्याच संज्ञा त्यांच्या व्यवसायांच्या सूचक आहेत. व्यवसायांवरूनच त्या संज्ञा पडल्या आहेत. वैतालिक, नट, मणिकार, कासार, तांबट, कुंभकार, स्वर्णकार, लोहकार, तांबोळी, रथकार, नीलीकार, लोणार, सौनिक (खाटीक), मालाकार, तैलकार, चर्मकार, रजक (धोबी), नापित, देवलक (पुजारी), दोलाकार (भोई), गोपाल (गवळी), सूत्रधार, जिनगर, पाथरवट, चित्रकार, सुराकार (कलाल), शंखकार, शौंडिक (दारुविक्रेता किंवा मद्यपानगृहाचा मालक), व्याध (पारधी) इत्यादी. काही संकरजातींच्या संज्ञांवरून त्यांचे व्यवसाय कळत नाहीत परंतु धर्मशास्त्रात त्यांच्या व्यवसायांचे स्पष्टीकरण येते. उदा., शालक्य, उल्मुक, किंशुक, सिंदोल, रोम, मंगू,  कैवर्त, मेद, भारूढ, वडवा, मंडन, कुरुविंद, क्षेमक, वेन, मैत्रेय, धोलिक, पुष्पशेखर, कुवच, सूत, चांडाल, पुल्कस इ. संज्ञांवरून व्यवसाय समजत नाहीत.


जातिपृथक्करणाची कारणे : समाजसंस्था संस्कृतीच्या उच्च पातळीवर आली असता शेकडो विविध व्यवसाय चालत असतात. त्यामुळे संस्कृती प्रगल्भदशेस येते. चातुर्वर्ण्याचे तत्त्व मूलभूत मानल्यामुळे त्यात सर्वांचा समावेश करणे आवश्यक व अपरिहार्य ठरले. स्वतःचा  कुलधर्म हाच स्वधर्म आणि अन्यांचा कुलधर्म हा परधर्म म्हणून निषिद्ध, अशी श्रद्धा ही हिंदू संस्कृतीच्या मुळाशी असल्यामुळे जातिव्यवस्थेचे संकेत निर्माण करून ती व्यवस्था दृढ केली. स्वधर्म व परधर्म भेदाचे तत्त्व मौलिक मानून हिंदूंमध्ये अहिंदूंचा गटवार भिन्नभिन्न जमातींच्या रूपाने समावेश झाला व जगातील एक प्रचंड समाजसंस्था भारतात निर्माण झाली. स्वधर्मनिष्ठा ही सर्व जातींची संस्कृती होय.

स्वधर्म कोणता व परधर्म कोणता, याचे निर्णायक प्रमाण सामान्यपणे वेदस्मृतिपुराणांचे धर्मशास्त्र जरी ठरले, तरी सर्व जातींचे व उपजातींचे आचारधर्म तपशीलवार निरूपित करून संगृहीत करणे शक्य झाले नाही. म्हणून देशधर्म, जातिधर्म, गणधर्म, पाषंडधर्म व कुलधर्म यांना सामान्यपणे मान्यता मनु  इ, धर्मशास्त्रग्रंथांनी दिली.

धर्मशास्त्रांनी प्रथम विहित केलेले असे धर्मसुद्धा कालांतराने नंतरच्या धर्मशास्त्राने निषिद्ध मानले. कालांतराने निषिद्ध मानलेले किंवा नेहमी निषिद्ध मानलेले आचारदेखील त्या त्या प्रदेशातील जातिजमातींमध्ये परंपरेने चालत असल्यास त्यास प्रतिबंध करू नये, असेही सांगितले. त्यामुळे एका प्रदेशात किंवा एका जातीत जे निषिद्ध आचार रूढ झाले, ते दुसऱ्या तशाच जातीने वा तशाच प्रदेशाने स्वीकारू नयेत, असेही सांगितले. उदा., बौधायन धर्मसूत्रात म्हटले आहे, की दक्षिणेत व उत्तरेत काही आचारधर्मांच्या बाबतीत विरोध आहे. दक्षिणेतील द्विज उपनयन न झालेल्या पुत्राच्या ताटातील जेवतात, भार्येबरोबर एकत्र भोजन करतात, शिळे अन्न खातात, मामेबहिण आणि आतेबहिण यांच्याशी विवाह करतात, हे निषिद्ध आचार होत. त्याचप्रमाणे उत्तरेतील द्विज लोकरीचा विक्रय, पशुविक्रय, समुद्रातून परदेशगमन, उसाच्या रसाच्या आसवाचे म्हणजे मद्याचे पान करतात, हे सर्व निषिद्ध आहे परंतु दक्षिणेतील निषिद्ध आचार उत्तरेतील लोकांनी करू नयेत व उत्तरेतील लोकांचे निषिद्ध आचार दक्षिणेतील लोकांनी करू नयेत. त्या त्या देशातील म्हणजे प्रदेशातील आचार त्या त्या देशातील लोकांनी पाळण्यात दोष नाही. बृहस्पतिस्मृतीत म्हटले आहे, की दाक्षिणात्य मातुलकन्या परिणय करतात, मध्य देशातील कारागीर वर्ग गोमांसभक्षण करतात पूर्व देशातील द्विज मत्स्याहार करतात आणि स्त्रियांनी केलेला व्यभिचार निषिद्ध मानत नाहीत. उत्तर प्रदेशात द्विज मद्यपान करतात, रजस्वलांना स्पर्श करण्यात दोष मानीत नाहीत, विधवा भावजयीशी विवाह करतात त्यांच्या अशा आचारांवर आक्षेप घेऊ नये.

स्मृतिशास्त्रातील चातुर्वर्ण्य व्यवस्थेप्रमाणे भारतातील सर्व प्रदेशांतील ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य वा शुद्र यांचा समान अधिकार वा समानच योग्यता ठरते परंतु वर निर्दिष्ट धर्मशास्त्रांनी विहित व निषिद्ध अशा भिन्नभिन्न देशधर्मांनी त्या त्या वर्णाच्या शेकडो उपजाती बनल्या. जातिपृथक्करणाचे हे महत्त्वाचे  कारण आहे. अन्नोदक व्यवहारासंबंधी वर थोडक्यात स्पष्टीकरण केलेले आहे. विशेष स्पष्टीकरण असे : अन्नोदक व्यवहारासंबंधी धर्मशास्त्रात जातिसंस्था स्थिरावल्यानंतर महत्त्वाची परिवर्तने अनेक  वेळा झाली आहेत. त्यामुळे  धर्मशास्त्रांपैकी  एका स्मृतीमध्ये  जो अन्नोदक व्यवहार तपशीलवार रीतीने संमत म्हणून  निर्दिष्ट केलेला असतो तो दुसऱ्या स्मृतींमध्ये निषिद्ध म्हणून सांगितलेला असतो. त्यांवरून या विधिनिषेधांमध्ये परिवर्तने झाली आहेत, असे अनुमान करता येते. पूर्वी संमत असलेला अन्नोदक व्यवहार कालांतराने निषिद्ध किंवा असंबद्ध ठरला, त्याला युगभेद म्हणजे कालमर्यादा दाखविण्यात आली. पूर्वी संमत केलेला अन्नोदक व्यवहार हा कलियुगापूर्वीचा होय नंतर कलिययुगात तो निषिद्ध ठरला, अशी सांकेतिक व्यवस्था धर्मशास्त्रात केली आहे. सांकेतिक म्हणण्याचे कारण, वस्तुतः  ऐतिहासिक दृष्टिने या प्रकारचे बदल हळूहळू परंतु पुष्कळ वेळा स्मृतींनी केले आहेत. अन्नोदक व्यवहारांची अंमलबजावणी एका प्रदेशात व एका किंवा अनेक जातींमध्ये जशा प्रकारची झाली, तशीच अन्य प्रदेशांमध्ये आणि त्याच प्रकारच्या अन्य उपजातींमध्ये व जातींमध्ये झाली नाही, असे अवलोकनावरून लक्षात येते.

सर्वसामान्यपणे वरच्या मानलेल्या जातींनी तयार कलेले भोजन खालच्या जातींना स्वीकारण्याची संमती धर्मशास्त्रांनी दिली आहे व त्याप्रमाणे काही अपवाद सोडल्यास जातिसंस्थेतील सर्व जातींत ही पद्धती आतापर्यंत हजारो वर्षे मान्य आहे. उदा., ब्राह्मणाने शिजविलेले अन्न हिंदू समाजातील सर्व जातींना स्वीकार्य ठरते. दुसरे असे, की धर्मशास्त्राधारे ब्राह्मण, क्षत्रिय वा वैश्य यांनी शिजविलेले अन्न या तिन्ही वर्णांना भोजनीय आहे. यासंबंधी नंतर अधिक संकोच झाला म्हणजे वरच्या वर्णाने खालच्या वर्णाचे अन्न ग्रहण करू नये, असे धर्मशास्त्रामध्ये सांगितले. ही मर्यादा सर्व प्रदेशांतील ब्राह्मणांत पाळली जाते. उत्तर हिंदुस्थानात याला अपवाद म्हणजे खालच्या वर्णाची ‘पक्की रसोई’ तेथील ब्राह्मणांनी भोज्य मानली आहे, हे वर आलेच आहे. शूद्राचे अन्न द्विजांना म्हणजे त्रैवर्णिकांना भोज्य  आहे, असे काही स्मृतींमध्ये सांगितलेले असले तरी काही महत्त्वाच्या स्मृतींमध्ये निवडक अशा शूद्र जमातींचेच अन्न भोज्य म्हणून विहित केले आहे द्विजांचा सेवक म्हणजे दास, न्हावी, गोप म्हणजे गोवारी, कुंभार, स्वतःच्या घराण्याचा मित्र, वाटेकरी, शेतकरी हे भोज्यान्न–म्हणजे ज्यांचे अन्न ग्राह्य असे-आहेत, असे सांगितले आहे. ही रूढी ‘कलिवर्ज्य’ प्रकरणात वर्ज्य केली आहे म्हणजे अलीकडे हजार–बाराशे वर्षांत अमान्य झाली आहे.

मनु, याज्ञवल्क्य  इ. स्मृतींच्या काळी ब्राह्मणादी त्रैवर्णिकांना देव, पितर व अतिथी यांना अर्पण केलेले अनेक प्रकारच्या प्राण्यांचे मांस भक्षण करणे, आवश्यक म्हणून सांगितले आहे. मात्र असे धार्मिक कर्मात अर्पण न केलेले मांस भक्षण करणे निषिद्ध मानले आहे. श्राद्धात मांस हे आवश्यक मानले आहे. काही प्रकारचे मासे, अनेक प्रकारचे हरिण, मेंढा, काही प्रकारचे पक्षी, बोकड, रानडुक्कर, महिष, ससा, कूर्म म्हणजे कासव, गेंडा, लाल बकरा इ. प्राण्यांच्या मांसाचे ब्राह्मणास भोजन दिल्यास पितरांची तृप्ती होते, असे मनुस्मृतीत म्हटले आहे. अतिथीपूजेत आणि एका विशिष्ट यज्ञात गोमांसही संमत केले आहे परंतु ‘कलिवर्ज्य’ प्रकरणात कलियुगात गोवधाचा निषेध केला आहे. सर्वसामान्यपणे द्विजांना ज्यांचे मांस वर्ज्य आहे, अशा प्राण्यांची यादीही मनुस्मृतीत सांगितली आहे. एकखुरी जनावरे, काही विशिष्ट मासे, शुकसारिका, सारस, जाळीदार पाय असलेले पक्षी, गावकोंबडा, हंस, चक्रवाक, चिमणी, वृक्षावरील कोंबडा, पाणबुड्या पक्षी, ससाणा, सुतार पक्षी, टिटवी, बगळा, पारवा, कपोत, कोकीळ, गिधाड, घुबड, गाढव, उंट, हत्ती, मांजर, कुत्रा, कोल्हा, माकड, गावडुक्कर, वाघ, सिंह, इ. प्राण्याचे मांस द्विजांना वर्ज्य सांगितले आहे.


मनुस्मृतीत मांस प्रथम ग्राह्य ठरविले परंतु नंतर निषिद्ध केले आहे. देवपितरकार्ये किंवा अतिथीपूजा यांच्यामध्ये मांस न वापरणे अधिक चांगले, असेही मनुस्मृतीत म्हटले आहे. ह्या स्मृतीमध्ये मांसाहाराचा निषेध नंतर प्रविष्ट झाला असावा. काहींच्या मते मांसाहाराच्या निषेधाची वाक्ये अथवा संपूर्ण हिंसानिषेधाची वाक्ये बौद्ध धर्मी व विशेषतः जैन धर्मी यतींच्या प्रभावामुळे समाविष्ट करणे भाग पडले. याचा परिणाम असा झाला, की नर्मदेच्या वा विंध्य पर्वताच्या दक्षिणेस असलेल्या ब्राह्मण व इतर उच्च वैश्य इ. जातींमध्ये मांसाहाराचा निषेध रूढ झाला. उत्तर हिंदुस्थानातदेखील उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थान येथील काही ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शुद्र उपजातींमध्येसुद्धा मांसाहाराचा निषेध मान्य झाला. त्यामुळे एकंदर जातिसंस्थेचे चित्रच बदलले. येथे हे मात्र लक्षात ठेवले पाहिजे, की काश्मीरी, पंजाबी, मैथीली आणि बंगाली ब्राह्मण त्याचप्रमाणे गुजरातमधील व उत्तर हिंदुस्थानमधील काही क्षत्रिय व वैश्य उपजातींमध्ये हा मांसाहाराचा निषेध रूढ झाला नाही. काश्मीरी, पंजाबी, मैथिली व बंगाली ब्राह्मण अजूनही मत्स्याहारी आहेत. मैथिली आणि बंगाली ब्राह्मण महाराष्ट्रातील ब्राह्मणांच्या बाबतीत म्हणतात, की धर्मशास्त्रामध्ये निरपवाद रीतीने कांदा, लसूण यांचे भक्षण निषिद्ध केले असतानादेखील हे ब्राह्मण कांदा व लसूण खातात, त्यामुळे भ्रष्ट झालेले हे ब्राह्मण आहेत. मांसाहार वर्ज्य न करणाऱ्या व वर्ज्य करणाऱ्या अशा ब्राह्मणांच्या व इतर वर्णांच्या उपजाती बनल्या. मांसाहार न करणाऱ्या उपजाती स्वतःस अधिक श्रेष्ठ समजतात. धर्मशास्त्रांनी चारी वर्णांना निषिद्ध मानलेल्या अशा प्राण्यांचे मांस खाणाऱ्या व न खाणाऱ्या शूद्र व प्रतिलोम संकरजातीही आहेत. त्यांच्यातही त्यामुळे उपजाती पडल्या आहेत. उदा., गावडुक्कर, मांजर, उंट, म्हैस, टोणगा, कुत्रा, गाय, बैल वा उंदीर यांचे मांस खाणाऱ्या अनेक हिंदू जाती आहेत, त्या न खाणाऱ्यांच्यापेक्षा खालच्या मानल्या जातात कारण त्या निषिद्ध मांस खातात. गोमांस आणि मृत प्राण्यांचे मांस खाणाऱ्याही हिंदू जाती आहेत. त्यांना सर्वांत खालचे स्थान आहे, तसेच गोमांस खाणारे मुसलमान, ख्रिस्ती इत्यादिकांनाही खालचे स्थान आहे. निषिद्ध मांस न खाणाऱ्या आणि मद्य न पिणाऱ्या त्रैवर्णिकेतर जातींना ‘सत्‌शूद्र’ म्हणून काही स्मृतींनी निर्दिष्ट केले आहे. या संदर्भात हेही लक्षात घेणे जरूर आहे की, अहिंसा हा श्रेष्ठ धर्म म्हणून सर्वमान्य झाल्यानंतर हिंसासंबंधी व्यवसाय हे खालच्या दर्जाचे अपवित्र व्यवसाय ठरले. त्यामुळे शुद्रातील मांसभोजी उपजातींपेक्षा पारधी, खाटिक व मांसविक्रयी जाती ह्या अधिक अपवित्र ठरल्या. त्याचप्रमाणे मद्यपान हे पातक ठरल्यामुळे मद्य तयार करणारी आणि मद्यविक्रय करणारी जातही अधिक अपवित्र ठरली. त्यामुळे अशा जाती ह्या अंतर्विवाही बनल्या.

सुरापान म्हणजे मद्यपान हे एक महापातक म्हणून स्मृतींनी परिगणित केले आहे ब्राह्मणाला मद्य हे कायमचे वर्ज्य मानले आहे. मद्य पानाने ब्राह्मण कायमचा पतित ठरतो प्रायश्चित्त केले, तरी त्याचा जातिबहिष्कार कायम राहतो. क्षत्रिय व वैश्य यांना ‘सुरा’ नामक विशिष्ट मद्य अत्यंत निषिद्ध मानले आहे. त्यामुळे सुरापानाने तेही पतित ठरतात. मात्र काही प्रकारची मद्ये पिण्याची त्यांना मनाई नाही.

निषिद्ध प्रकारचा विवाह किंवा लग्नसंबंध, मांसादी पदार्थांचा आहार, अस्पृश्य जातींबरोबर सहभोजन इ. अत्यंत निषिद्ध अशा आचरणांचे निर्बंध जातिजमातींनी दीर्घकाळ पाळले. अशा निर्बंधांचे अतिक्रमण झाल्यास कुळातील, जातीतील किंवा गावातील वृद्ध, वरिष्ठ, सन्मान्य अशा व्यक्तींच्या किंवा जातपंचायती व ग्रामपंचायती यांच्या आधिपत्याखाली अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तींवर अशा वरिष्ठांच्या निर्णयाप्रमाणे जातबहिष्कार पडत असे. अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तींना समाजातून वेगळे केले जात असे आणि काही महत्त्वाच्या बाबतींत परंपरागत जातिधर्म किंवा वर्णाश्रमधर्म यांचे यथायोग्य परिपालन होण्याकरिता राजसत्तेची हुकूमत चाले त्यामुळे जातिसंस्था स्थिरावली. धर्मशास्त्रात अशी अनेक पातके सांगितली आहेत, की ज्यांच्यामुळे प्रायश्चित्त घेतले तरी जातिबहिष्कार उठतच नसे त्यामुळे बहिष्कृतांच्याही वेगवेगळ्या उपजाती निर्माण झाल्या.

अस्पृश्यता : या जातिसंस्थेची मीमांसा पुरी करण्याकरिता अस्पृश्य जातींचाही परामर्श घेणे येथे युक्त ठरेल. जातिसंस्था स्थिर होत असताना, म्हणजे इ. स. पू. नवव्या-आठव्या शतकांच्या सुमारास, झालेल्या स्मृतिग्रंथांत–उदा., गौतम, आपस्तंब, वसिष्ठ  इ. धर्मसूत्रांत–चांडल नामक अस्पृश्य जातीचा उल्लेख येतो. त्या जातीची अस्पृश्यता आत्यंतिक स्वरूपात वर्णिली आहे. त्या जातीच्या व्यक्तीचे दर्शन व संभाषण हेही प्रायश्चित्तार्ह मानले आहे. चांडाल व श्वपच यांची गावाच्या बाहेरच वस्ती राहावी त्यांनी वापरलेले कसलेही भांडे वापरू नये त्यांच्याशी कसलाही करार करू नये बिनवारस प्रेताची त्यांनीच विल्हेवाट लावावी प्रेताप्रमाणेच त्यांना अपवित्र समजावे असे मनु  इ. स्मृतींमध्ये म्हटले आहे. त्यांनी विशिष्ट चिन्हे धारण करूनच आणि दिवसाच विशिष्ट कामाकरिता ग्रामप्रवेश करावा, असेही तेथे म्हटले आहे. आतापर्यंत तमिळनाडू व केरळ या प्रदेशांत अस्पृश्यांची स्पृश्यावर सावली पडून स्पृश्य अपवित्र होऊ नये, म्हणून स्पृश्यापासून त्यांनी दूर अंतरावरून चालावे, असे निर्बंध होते. काही स्मृतींमध्ये चांभार, व्याध, जाळे घालून शिकार करणारे, धोबी, खाटिक इ. जाती चांडाल आणि श्वपच यांच्याप्रमाणेच अस्पृश्य म्हणून सांगितल्या आहेत. येथे अस्पृश्य म्हणजे ज्याचा स्पर्श झाला असताना पाप होते व ते पाप सवस्त्र स्नान करूनच धुतले जाते, तो होय. महाराष्ट्रासह दक्षिण हिंदुस्थानात महार किंवा तत्सदृश धंदा करणारे, मांग किंवा मातंग, चांभार, बुरूड, धोबी, व ढोर या जाती किंवा यांचा वंशपरंपरागत धंदा करणारे आतापर्यंत अस्पृश्य समजले जातात. धर्मशास्त्राच्या भाषेत बोलणारे उच्चवर्णीय लोक अस्पृश्यांना ‘अंत्यज’ ही संज्ञा देतात. धर्मशास्त्रात धोबी, चर्मकार, नट, वरुड किंवा बुरूड, कैवर्त किंवा कोळी, मेद व भिल्ल हे सात अंत्यज म्हणून निर्दिष्ट केले आहेत. यांतील नट म्हणजे बहुरूपी किंवा कोल्हाटी व कोळी यांना रुढीप्रमाणे अश्पृश्य मानले जात नाही, म्हणून अंत्यज म्हणजे अस्पृश्य असे म्हणणे धर्मशास्त्रास धरून नाही. साधारणपणे असे म्हणता येते, की ज्या व्यवसायांचा मळ व मृत प्राणी वा त्याचा अवयव यांच्याशी संबंध आहे, ते व्यवसाय करणारे अस्पृश्य म्हणून गणले गेले आहेत. अस्पृश्यतेची चाल अतिपूर्व देशांमध्ये–उदा.,  ब्रह्मदेशापासून ते जपानपर्यंतच्या अनेक राष्ट्रांमध्ये–रूढ असलेली गेल्या शतकात आढळली आहे. म्हणजे ही संस्था वैदिक संस्कृतीने किंवा ब्राह्मणप्रधान संस्कृतीने निर्माण केलेली नाही परंतु या संस्कृतीने ती त्यांच्या पूर्वीच्या संस्कृतींमधून जशीच्या तशी स्वीकारली. गोमांसभक्षण हे गेल्या हजार-दीडहजार वर्षांपासून महापातक किंवा अत्यंत पातक म्हणून मानले गेल्यापासून गोमांसभक्षक जाती व जमाती या अस्पृश्य मानल्या गेल्या म्हणून पौराणिक धर्मशास्त्रात व नंतरच्या स्मृतींमध्ये गोमांसभक्षक जातिजमाती अस्पृश्य मानल्या. त्यांमध्ये मुसलमान, ख्रिस्ती, इत्यादिकांचादेखील समावेश होतो. प्रत्यक्ष व्यवहारात नेहमी तसे घडतेच, असे नाही.

ग्रामसंस्था, देवळे व तीर्थस्थाने यांतील श्रमविभाग व जाती :  महाराष्ट्रातील ग्रामसंस्था हे व्यवस्थित असे जातिसंस्थेचे एक रूप आहे. जे समाजशास्त्रज्ञ व्यवसायांची परस्परावलंबी रचना हे जातिसंस्थेचे मूळ मानतात, त्यांच्या विचारांचा आधार म्हणून ही ग्रामसंस्था सांगता येते. सबंध गाव (व त्या गावची शेती) ही गाय आहे आणि त्या गायीला अनेक स्तन किंवा आचळे आहेत या आचळांतील दुधाचे म्हणजे धान्यादी  उत्पन्नाचे वाटेकरी म्हणजे निरनिराळ्या व्यवसायांच्या जाती होत. यांना ⇨ अलुते -बलुते  म्हणतात. ही संस्था अठराव्या व एकोणिसाव्या शतकांत समाजशास्त्रज्ञांना वास्तव स्वरूपात आढळली. मराठ्यांचा इतिहास लिहिणारा ग्रँट डफ याच्या म्हणण्याप्रमाणे बलुतेदार ११ व अलुतेदार १२ असे एकूण २३ होते. जोशी, भाट, गुरव, सुतार, लोहार, कुंभार, मुलाणा, न्हावी, परीट, मांग व चांभार असे अकरा बलुतेदार होत आणि जंगम, गोंधळी, कोळी, सोनार, शिंपी, माळी, गोसावी, तांबोळी, घडशी, तेली, रामोशी, तराळ किंवा वेसकर असे बारा अलुतेदार होत. वेसकर किंवा महार हा काही ठिकाणी बलुतेदारही मानला होता. अलुतेदार आणि बलुतेदार कोणकोण, यासंबंधी महाराष्ट्राच्या निरनिराळ्या भागांत निरनिराळे वर्गीकरण होते. या बलुतेदारांना व अलुतेदारांना पहिली कास, दुसरी कास, तिसरी कास अशाही संज्ञा होत्या.


या संज्ञा शेतीच्या उत्पन्नाचे भाग कोणाला किती द्यावयाचे, यावर अवलंबून होत्या. पाटील, कुलकर्णी, देशमुख व देशपांडे हे शासनाचे नोकर म्हणून गावचा कारभार पहात. या बलुतेदारंतील जोशी म्हणजे ब्राह्मण पुरोहित होय. या बलुतेदार व अलुतेदार यांना कारू व नारू अशाही संज्ञा होत्या. वाटणीच्या बाबतीमध्येही निरनिराळ्या परगण्यांत निरनिराळी प्रतवारी आढळून आली. उदा., इंदापूर परगण्यात पहिली वळ किंवा कास सुतार, लोहार, चांभार व महार दुसरी कास परीट, कुंभार, न्हावी व मांग तिसरी कास सोनार, मुलाणा, गुरव, जोशी, कोळी व रामोशी. पंढरपूर भागात थोरली कास महार, सुतार, लोहार व चांभार मधली कास परीट, कुंभार, न्हावी व मांग धाकटी कास कुलकर्णी, जोशी, गुरव व पोतदार. निरनिराळ्या प्रकारची वाटणी कशी व्हावी, हे परंपरेने ठरे. हे ठरविणारा कित्येकदा गावप्रमुख, सत्ताधारी, मोठा शेतकरी असे. उत्तर प्रदेशातील ‘जजमानी’ पद्धती याच प्रकारची आहे. महाराष्ट्रातील या ग्रामसंस्थेला ‘गावगाडा’ असे नाव आहे. या गावगाड्याची अवनती झाली, अन्याय वाढला, अर्थिक व राजकीय दृष्टीने ताकददारांची मिजासखोरी वाढली इ. गोष्टींचे चित्र गावगाड्यातील समर्पक भाषेत त्रिं. ना. आत्रे यांनी गांव-गाडा  या पुस्तकात सद्यस्थितीचा आढावा घेऊन रेखाटले आहे.

यज्ञ व पूजा यांतील कर्मकांडास धरून त्यांना आवश्यक असे व्यवसाय चालत व त्या व्यवसायांची उच्चनीच श्रेणी बने. इ. स. पाचव्या शतकापासून देवळांतील मूर्तिपूजाविषयक पुरावे सापडतात. मूर्तिपूजेला गावात व नगरात मध्यवर्ती स्थान आले, तेव्हा बहुतेक सर्व ग्रामीण व नगरवासी जनांमध्ये पूजेने पुण्य लाभते व झालेले पाप धुवून जाते, अशी श्रद्धा दृढ होण्याकरिता या देवळातील देवांच्या मूर्ती, चरित्रे व माणसांचे त्यांच्याशी असलेले संबंध पंडित लोक स्पष्ट करून सांगत व अजून सांगतात. मोठमोठ्या तीर्थयात्रेच्या ठिकाणी नगरे निर्माण झाली, तेथेही पुरोहितवर्गाने तीर्थमाहात्म्य असेच सांगितले आहे. त्यांचे पूजेचे निरनिराळे प्रकार असतात. दैनंदिन व नैमित्तिक प्रसंग असतात. जमातींचा पूजेशी संबंध असतो. जन्म, विवाह, मृत्यू इ. निमित्तांनी स्नान, पूजा, भोजन, दान इ. धार्मिक कर्मकांडाला महत्त्व येते. ब्राह्मण किंवा पुजारी असल्याशिवाय हे अशा प्रकारचे  नीट कर्मकांड संपन्न होत नसते. ब्राह्मण हा सर्वोच्च म्हणून मान्य होता. तो मंत्राने मूर्तीमध्ये देवत्व आणतो, अशी समजूत आहे. मोठे पूजाविधी व उत्सव, गावातील किंवा नगरातील आर्थिक व राजकीय दृष्टीने उच्च स्थानी असलेल्या व्यक्तींच्या नेतृत्वाखाली, संपन्न होत व अजूनही होतात. ते देणग्या देतात. देवळाला भालदार-चोपदार, माळी, आचारी, हलवाई, गवई, वाजंत्री वाजविणारा आणि नृत्य करणारा किंवा नर्तकी इ. आवश्यक असतात. पुजाऱ्याला किंवा ब्राह्मणाला शुचिर्भूत व व्रतनिष्ठ रहावे लागते. देवळाकरिता व त्याच्याकरिता न्हावी, धोबी, अंत्यविधी करणारा, चांभार, भंगी, झाडूवाला यांची गरज लागते. जातींकडे पुजारी, देव व देऊळ यांची विशिष्ट सेवा सोपविलेली असते. त्या सेवेमुळे देवाचा प्रसाद प्रत्येक जातीस मिळतो. वैदिक काळी यज्ञसंस्थेमध्येसुद्धा अनेक व्यवसायांचे सामाजिक गट सेवेकरता उपलब्ध करावे लागत त्याचे सविस्तर विवरण डॉ. श्री. व्यं. केतकर यांच्या महाराष्ट्र ज्ञानकोशाच्या ‘वेदविद्या’ या प्रस्तावनाखंडात (विभाग दुसरा) दिलेले आहे परंतु येथे ते देण्याचे कारण नाही, कारण वेदकाळी जातिसंस्था होती की नव्हती, याबद्दल वैदिक विद्वानांनध्ये मतभेद आहेत. विशेषतः डॉ. पां. वा. काणे यांनी आपल्या हिस्टरी ऑफ धर्मशास्त्र (खंड २, भाग १) यामध्ये वेदकाळी जातिसंस्था असल्याचे प्रमाण सापडत नाही, असे विधान निश्चितपणे केले आहे.

जातिसंस्थेतील श्रमांची अप्रतिष्ठा सामाजिक, आर्थिक व राजकीय दौर्बल्याचे मुख्य कारण : एकंदर जातिसंस्थेचे गेल्या अडीच–तीन हजार वर्षातील स्वरूप पाहता शुद्र व तथाकथित प्रतिलोम संकरजाती यांना जातिसंस्थेत अंत्य म्हणजे खालचा सामाजिक दर्जा प्राप्त झाला. या खालच्या जातींचे सर्व व्यवसाय वरच्या द्विज व तत्सम उच्च जातींना उपकारक आहेत. त्यातील बरेचसे व्यवसाय हे कौशल्याचे आहेत व आर्थिक दृष्टीने अंत्यत महत्त्वाचे आहेत. उदा., साळी, कोष्टी, रंगारी, कुणबी, शेतकरी, माळी, तांबोळी, गवंडी, धनगर किंवा मेंढपाळ, पशुपाल, चितारी, लोणारी, तेली, चांभार, मांग, ढोर, पाथरवट, पाणबुडे, कोळी, बुरूड, नावाडी इ. शुद्र व अस्पृश्य यांचे व्यवसाय अर्थोत्पादक व समाजोपयुक्त आहेत. त्याचप्रमाणे भंगी, परीट व महार यांचे धंदे समाजास अत्यंत उपयुक्त आहेत. जातिसंस्थेत या वर्गांना खालचे स्थान दिल्यामुळे श्रमाची प्रतिष्ठा राहिली नाही. हे श्रम म्हणजे केवळ ढोरमेहनत नाही. बुद्धीमत्ता, कारागिरी व कलात्मक दृष्टी यांशिवाय यांतील बरेचसे व्यवसाय यशस्वी होऊ शकत नाहीत. श्रमाची प्रतिष्ठा ठेवली नाही, एवढेच नव्हे, श्रमाची अप्रतिष्ठाही झाली कारण प्रतिलोम संकरजाती यांचे बहुसंख्य व्यवसाय त्रैवर्णिकांच्या व्यवसायांच्या तुलनेने अपवित्र मानले. उदा., परीट, भंगी व महार यांचे व्यवसाय शुद्धी आणि स्वच्छता निर्माण करणारे आहेत. परीट कपडे स्वच्छ करतो, भंगी मळ वाहून नेतो आणि महार मृत प्राणी गावातून उचलून किंवा ओढून नेतो . असे हे शुद्धी आणि स्वच्छता करणारे व्यवसाय अत्यंत अशुद्ध व अस्वच्छ मानले गेले. त्यामुळे अत्यंत जीवनोपयुक्त श्रम निंद्य आणि अपवित्र बनले. हिंदू समाज दीर्घकाळ टिकला, जगू शकला परंतु श्रमाच्या अप्रतिष्ठेमुळे आर्थिक दृष्टिने समर्थ बनू शकला नाही.

 बौद्ध व जैन यांच्यातील जातिसंस्था : बौद्धांनी प्राचीन काळी समाजाचे दोन स्तर मानले : (१) उच्च नैतिक धर्म पाळणारे भिक्षू, राजे आणि गृहस्थ हे होते. (२) यामध्ये वेदोक्त चातुर्वर्ण्यव्यवस्था समाविष्ट केली. या दुसऱ्या स्तरात जातिव्यवस्था मान्य केली. ब्रिटीश राजवट येईपर्यंत बंगाल, बिहार, सध्याचा पाकिस्तान, हिमालयातील प्रदेश आणि श्रीलंका यांमध्ये जातिसंस्था स्थिरावली होती. बौद्धांच्या धर्मग्रंथांप्रमाणे क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य व शुद्र असा जातींचा स्थानक्रम लागतो. उत्तर हिंदुस्थानातील पश्चिम भागात इ. स. पू. काळी ब्राह्मण वरिष्ठ मानला जात असे आणि त्या ग्रंथांप्रमाणे असे दिसते की, पूर्वेस काशी, बिहार इ. प्रदेशांत क्षत्रिय वरिष्ठ मानला जात असे.

जैन धर्माने तत्त्वतः वर्णभेद व जातिभेद अमान्य केला, परंतु व्यवहारात अहिंसा धर्म मानणाऱ्या जाती उच्च मानल्या आणि मांसाहारी जाती खालच्या मानल्या. आजपर्यंत जैन धर्माच्या क्षेत्रात शेकडो जाती जैन म्हणून अस्तित्वात आहेत.


ख्रिस्ती व इस्लाम समाजातील जातिभेद : भारतातील ब्रिटीशपूर्वकाळी धर्मांतर केलेले ख्रिस्ती तत्त्वतः जातिसंस्था मानत नसले आणि धर्माप्रमाणे भेदाभेद मानणे अयुक्त मानत असले, तरी प्रत्यक्ष व्यवहारात जाती पाळतात म्हणजे उच्च व नीच जातींमध्ये लग्नसंबंध करत नाहीत. केरळात सिरियन चर्च व कॅथलिक चर्च  आहे तेथे जातिसंस्था चर्चमध्येदेखील उघडकीस येते अस्पृश्यांचे चर्च वेगळे असते. उत्तर हिंदुस्थानात मुसलमानांमधील जातिसंस्था ख्रिस्ती धर्मीयांप्रमाणेच पक्की राहिलेली नाही परंतु विवाहसंबंधात जमातींचे भेद पाळले जातात. विशेषतः अरबस्तानातील घराण्यांशी, त्यातल्या त्यात मुहंमदाच्या घराण्याशी, वांशिक संबंध सांगणारी पाकिस्तानमधील व उत्तर हिंदुस्थानातील मुसलमान घराणी शक्य तो भारतातील व पाकिस्तानातील हिंदूचे जे मुसलमान झाले, त्यांच्या घराण्यांशी विवाहसंबंध करत नाहीत. तात्पर्य असे की, हिंदू समाजाशी ज्या ज्या भिन्नभिन्न धर्मपंथांचा प्रत्यक्ष संपर्क स्थिरावला, त्यांच्यात जातिसंस्थेची काही लक्षणे अजूनही स्पष्ट आढळतात.

आधुनिक सुधारकांच्या मानवतावादाने जातिसंस्थेचे विसर्जन : ब्रिटीश राजवटीत आधुनिक पश्चिमी संस्कृतीतील मानवतावादी विचारांचा व सामाजिक न्यायसंबंधी दृष्टिकोणाचा प्रभाव भारतीय आधुनिक सुशिक्षितांवर पडून हिंदू समाजसुधारणेचे व धर्मसुधारणेचे आंदोलन राजा राममोहन रॉय, ज्योतिराव फुले इ. सुधारकांपासून सुरू झाले. मानवी समता, व्यक्तिस्वातंत्र्य व मानवी बंधुभाव या तीन तत्त्वांचा प्रभाव या सामाजिक व धार्मिक सुधारणांवर पडला. त्याचप्रमाणे आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांच्या नेतृत्वाखाली जन्मतः जातिसंस्था न मानता गुणकर्मविभागशः चातुर्वर्ण्याच्या तत्त्वाचा पुरस्कार व मूर्तिपूजेचा विरोध सुरू झाला. सतीची चाल कायद्याने बंद पाडली विधवाविवाह कायद्याने मान्य केला एका विशिष्ट कायद्याने भिन्न जातींतील व भिन्न धर्मांतील स्त्रीपुरुषांचा निधर्मी विवाह मान्य करून घटस्फोटाची संमती दिली. स्वातंत्र्योत्तर काळात तर सबंध हिंदू कायदा नवा केला या कायद्याने सर्व जातींच्या व सर्व धर्मीयांच्या समानतेला मान्यता देऊन आंतरजातीय वा आंतरधर्मीय, धार्मिक वा निधर्मी विवाहांस मान्यता दिली व त्याप्रमाणे वारसाहक्काचा जातिसंस्थेतील विषम नियम बदलल्यामुळे आंतरजातीय वा आंतरधर्मीय विवाहाने जन्मलेल्या स्त्रीपुरुष संततीला समान वारसाहक्क कायद्याने प्राप्त झाला. प्रौढ स्त्रीपुरुषांच्या विवाहाचा निर्बंध निर्माण झाला व बालविवाहास बंदी घालण्यात आली. तीच बालविवाहास केलेली बंदी स्वातंत्र्योत्तर काळातही मान्य करण्यात आली. त्याचप्रमाणे अस्पृश्यतेला कायदेशीर रीतीने नष्ट करण्यात आले. भारतीय संविधानानेच अस्पृश्यता नष्ट केली. सर्व सार्वजनिक भोजनालये व उपाहरगृहे यांच्यामध्ये सर्व जातीय व सर्व धर्मीयांना प्रवेश नाकारणे, हा कायद्याने गुन्हा ठरविला. स्पृश्य हिंदूंच्या विहिरी, तलाव इ. पाणवठ्यांवर पाणी घेण्याचा अस्पृश्यांना कायदेशीर हक्क प्राप्त झाला व हक्क नाकारणे गुन्हा ठरला. हिंदूंच्या देवळांमध्ये व अन्य सार्वजनिक पवित्र ठिकाणी प्रवेश करण्याचा अस्पृश्यांना कायदेशीर हक्क देण्यात आला. अशा रीतीने हिंदूंच्या परंपरागत जातिसंस्थेला सामाजिक, धार्मिक सुधारणांनी आणि कायद्याने विसर्जित केले.

ब्रिटीश अमदानीत खालच्या-वरच्या सर्व जातिजमातींना कोणत्याही प्रकारचा व्यवसाय करण्याचा हक्क कायद्याने मान्य केला. अस्पृश्यांचेही व्यवसाय त्यामुळे स्पृश्य जाती करू लागल्या. धोबी, चांभार, ढोर इत्यादीकांचे व्यवसाय ब्राह्मणादी जातीही करू लागल्या. पादत्राणे विकणे, धुलाई केंद्रे चालविणे, कातडी कमाविणे, रंगाऱ्याचे काम इ. उद्योग ब्राह्मणादी जाती करू लागल्या. त्यांच्यावर बहिष्कार पडेनासा झाला.  अलीकडे स्वातंत्र्योत्तर काळात जातिभ्रष्टता ज्यामुळे होते. असे आचारण करणाऱ्या व्यक्तीवर जातिबहिष्कार घालण्याचे जातपंचायती व ग्रामपंचायती यांचे अधिकार नष्ट झाले. उच्चजातींच्या शिक्षकादी व्यवसायांमध्ये अनुसूचित जाती व आदिवासी जाती यांना विशिष्ट संख्येने प्रवेश मिळण्यासंबंधी कायदेशीर उपाययोजना करण्यात आल्या. शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये आणि शासकीय व खाजगी उद्योगधंद्यांमध्ये अस्पृश्य आणि अनुसुचित जाती व आदिवासी जमाती यांचा विशिष्ट संख्येने भरणा व्हावा, म्हणून कायदेशीर व्यवस्था करण्यात आली. त्यांना शिक्षण मोफत करण्यात आले आणि शिष्यवृत्त्या देण्याचेही प्रमाण ठरविण्यात आले. अशा रीतीने जातिसंस्था मोठ्या प्रमाणात शिथिल करण्याचे मार्ग निर्माण करण्यात आले.

पहा : अनुसूचीत व जमाती अस्पृश्यता ग्रामसंस्था वर्णव्यवस्था विवाहसंस्था.

संदर्भ : 1.  Bougle, Celestin Trans. Pocock, D. F. Essays on the  Caste system, Cambridge, 1971.

            2. Dumont, Louis Trans, Sainsbury, Mark, Homo Hierarchicus : The Caste system and Its Implications, Delhi, 1970.

            3. Ghurye, G. S. Caste, Class and Occupation,Bombay, 1961.

            4. Hocart, A. M. Caste : A Comparative Study, London, 1950.

            5. Hutton, J. H. Caste in India, Bombay, 1961.

            6. Kane, P. V. History of Dharmasastra, Voll. II, Part I,Poona, 1974.

            7. Karve, Irawati, Hindu Society : An Interpretation, Poona,1961.

            8. Karve, Irawati, Kinship Organisation in India, Bombay, 1968.

            9. Marriott, McKim, Caste Ranking and Community Structure in Five Regions of India and Pakistan, Poona, 1960.

            10. Marriott, McKim, “Interactional and Attributional Theories of Caste Ranking”, Man in India, Vol. XXXIX, No. 2, 1959.

            11. Senart, EmileTrans.Ross, E. Denison, Caste in India, London, 1930.

            12.Wilson, John, Indian caste, 2 Vols, Delhi, 1976.

            १३.आत्रे, त्रिं. ना. गांव-गाडा,मुंबई, १९५९.

         १४.कुलकर्णी, मा. गु. भारतीय समाजव्यवस्था, औरंगाबाद, १९७५.

           १५. मिश्र, ज्वालाप्रसाद, जातिभास्कर, मुंबई, १९१७.

जोशी, लक्ष्मणशास्त्री