समूह केंद्र : (कम्यूनिटी सेंटर). समाज हितवर्धक आसमंत. तो समाजशास्त्रात समेट गृह (सेट्लमेंट हाउस), समूह केंद्र किंवा आसमंतगृह (नेबरहूड हाउस) या भिन्न संज्ञांनी आढळतो. विद्यमान शहरे गुंतागुंतीच्या अवस्थेत जाऊन पोहोचली आहेत. तिथे तरूणांच्या रोजंदारीचा/नोकरीचा प्रश्र्न निर्माण झाला आहे. समूह केंद्र ही संकल्पना प्रामुख्याने भांडवलदारी समाज आणि विकसनशील समाज यांमधील संबंधांबद्दलची आहे. समूह केंद्र-परिसर हा वाक्प्रचार राजकीय भूगोल, राजकीय समाजशास्त्र यांमध्ये अधिक रूढ आहे आणि तो प्रामुख्याने कामगार-बाजारांबद्दल बोलतो. कोणत्याही उदयोगप्रधान समाजाच्या विकसित वसाहतीत मुख्य प्रशासकीय केंद्र असते. तेथे सर्व महत्त्वाची कार्यालये, शेअर बाजार, पैशांची उलाढाल करणारी कार्यालये असतात. तर त्यापेक्षा कमी महत्त्वाची कार्यालये वा बाजार तेथून दूरवरच्या परिसरात, कधीकधी उपनगरांत असतात. समूह केंद्र किंवा समेट गृह संस्था स्थापनेविषयीच्या हालचाली (चळवळ) एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस ग्रेट ब्रिटनमध्ये सुरू झाल्या. लंडनमध्ये १८८४ मध्ये ‘टॉयन्बी हॉल’ची स्थापना करण्यात येऊन सॅम्यूअल ऑगस्टस बार्नेट या पाद्रयने सपत्नीक नाडणूक झालेल्या शहरातील विदयार्थ्यांना पाचारण केले आणि मदतकार्य आरंभिले. पुढे ही चळवळ अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत चार्ल्स स्टोव्हर या अधि-व्याख्यात्याने सुरू केली (१८८६) आणि न्यूयॉर्कमध्ये शेजारश्रेणी (नेबरहूड गिल्ड) नामक समूह केंद्र काढले. पुढे शिकागो (१८८९) आणि इंडियानापोलिसमध्ये समूह केंद्रे निघाली. ही या संकल्पनेची प्राथमिक अवस्था होती.

जागतिक पातळीवर उत्पादन आणि वितरण व्यवस्था ही एका विश्र्लेषण-केंद्राभोवती केंद्रित झालेली आहे. जागतिक पातळीवर अविकसितपणा केवळ पारंपरिकतेचा परिणाम नसून उलट भांडवलदारी व्यवस्था विकसित करण्याच्या प्रकियेतील तो एक जाणीवपूर्वक साधलेला प्रयत्न असतो. नागरी जीवनात शेतीला स्थान नसून व्यवसायांना महत्त्व आहे. येथे वकील, डॉक्टर, चार्टर्ड अकौंटन्ट वगैरे भिन्न प्रकारच्या व्यवसायांच्या लोकांना एकत्र रहाता येते. येथे औदयोगिक उत्पादन होऊन विविध वस्तूंचा व्यापार चालतो. या सगळ्यांच्या जीवनात भिन्नता आढळते. नैसर्गिक जीवनाला हे लोक मुकलेले असतात.

याउलट आसमंतात (परिसरात) राहणारे लोक हे अ-व्यापारी निम-व्यापारी प्रेरकांनी एकत्र राहत असतात. नातेसंस्था किंवा अशीलवकील यांच्यातील मानवी संबंधांनी ते प्रेरित झालेले असतात. गामीण समुदायात स्तरीकरण दिसून येत असले, तरी ते एवढे तीव नसते.

नागरी समुदायात प्रचंड प्रमाणात स्तरीकरण झालेले आढळते. येथील स्तर रचनेतील भिन्नता अधिक जाणवते. विसाव्या शतकात नगरांच्याविविध अवस्थांचा अभ्यास झाला. या अभ्यासाचे मानकरी रॉबर्ट पार्क (द. सिटी, १९२५ ), आर्. डी. मॅकेंझी (मेट्नोपॉलिटन कम्यूनिटी, १९३३), सोरोक्यिन अँड झिम्मरमन (रूरल अँड अर्बन सोशिऑलॉजी, १९२९), ममफोर्ड (नगराच्या उत्थान आणि पतन यांच्या सहा अवस्था) वगैरे होत. या अवस्था नगराच्या रचनेची कल्पना स्पष्ट करतात. या पहिल्या अवस्थेतच समाजात विविध प्रकारची विविधता आढळून येते.व्दितीय अवस्था म्हणजे इंडियानापोलिसमध्ये कारखानदारी आणि श्रमविभाजनाचा विकास होय. तिथे शिक्षण, कलाविकास, प्रशासन कार्ये यांचा विकास झाला. या विकासामुळे नगरे वाढली. त्यावेळी तृतीय अवस्था म्हणजे मेट्नोपलिस (राजधानीचे शहर, प्रमुख महानगरे) उभी राहिली. मुख्य कार्यालये एकाच क्षेत्रात उभी राहिली, तर वाहतुकीच्या सोयींमुळे छोटी-छोटी उपनगरे झाली व लोक तेथे राहू लागले. भूमिहीन शेतकृयांची संख्या वाढली. अभिजनवर्गाची वृद्धी झाली. महाविदयालये आणि व्यापार-संघटना स्थापन झाल्या. तांत्रिक-यांत्रिक प्रगतीने विज्ञानाचा पाया घातला. महानगरांमध्ये कुशल लोक तयार झाले. पैसा मिळविण्याची प्रेरणा जागृत झाली आणि आधुनिक मूल्यांचा-व्यक्तिवाद, व्यक्तिस्वातंत्र्य, स्पर्धा यांचा¾प्रसार झाला. चतुर्थ अवस्थेत मेट्नोपलिसपेक्षाही मोठे मेगापलिस निर्माण झाले. भांडवलशाहीचा आणि मुक्तस्पर्धेचा विकास झाला. विविध संस्कृतींची केंद्रे निर्माण झाली. भौतिकवादी संस्कृतीच्या विकासाने व्यक्तीला भावनाहीन बनविले. पाचव्या अवस्थेत टाइरेन्नो पोलिसकामगार वर्ग, मजुर वर्ग, विदयार्थी वर्ग, गिऱ्हाईकांचा वर्ग असे वेगवेगळ्या स्थितींतील वर्ग निर्माण झाले. वर्गा-वर्गांमध्ये अंतर वाढले. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय संबंध परस्परविरोधी बनले. या समूह केंद्रांमध्ये दरी वाढली. दारिद्र्य आणि भूकबळी, गुन्हेगारी, भिकारी आदी समस्या वाढल्या. सहाव्या अवस्थेत निकॉपलिसची निर्मिती झाली. नव्या आधुनिक समाजात ही लोकसमुदायाची केंद्रे या ना त्या स्वरूपात टिकून राहतील मग ती आकाराने लहान असोत वा मोठी. त्यांच्या एकत्र रहाण्यातून निर्माण झालेली संस्कृती ही त्यांचा स्थायीभाव बनते. तेथील लोकांची एक जीवनशैली तयार होते. त्यांची मुलेबाळे तेथेच लहानाची मोठी होतात. लोक ज्या केंद्रात राहतात, ती त्यांची जीवनशैली बनते.

कोणत्याही मोठया शहरात जुने खेडे मध्यभागी तसेच रहाते. याची साक्ष ८०-१०० वर्षांपूर्वी बांधलेली अवशिष्ट घरे अजूनही देतात. वाढत्या कारखानदारींबरोबर नवीन कामगार-वसाहती तयार झाल्या. याशिवाय भोवताली उच्च्वर्गीय लोकांची बंगलेवजा वसाहत तयार झाली. डॉ. सुभाषचंद्र यांनी ‘अर्बन नेबरहूड’ (नागरी आसमंत) बाबत असा निष्कर्ष काढला आहे की, भारतीय शहराचा मोठा आकार, घनत्व आणि लोकसंख्येचा बहुजिनसीपणा या तीन बाबी नागरी जीवनाच्या पद्धतीला पोषक ठरतात. या बाबींनी पाश्चिमात्य जीवनात बदल घडवून आणला आहे. शिक्षण, अनौपचारिक सहभागाचे प्रमाण, उच्च्स्तरीय सामाजिक दर्जा आणि आर्थिक स्थिती हे घटक नागरीकरणाचे प्रमाण निश्र्चित करतात. म्हणूनच समूह केंद्रे आर्थिक सुस्थिती, उच्च् शिक्षण, जात, धर्म, भाषा, प्रांत, प्रदेश यांनुसार एकमेकांशेजारी रहाणाऱ्या लोकांची बनतात. जी. के. पायने यांनी शहरातील निवासस्थानांसंबंधीच्या समस्यांचा अभ्यास करताना असे निदर्शनास आणून दिले आहे की, शहरात प्रत्येकजण आपली सोय बघून आपला धर्म, जात, प्रदेश एक असणाऱ्या लोकांजवळ राहतो. आपल्या लोकांजवळ आपण सुरक्षित राहू शकू, असे त्यांना वाटते.

दिवसेंदिवस समूह केंद्रे व त्या भोवतालची गर्दी वाढते आहे. घरांची संख्या कमी पडू लागली आहे. रस्त्यांवर छोटी दुकाने, टपृया, फुटपाथवरच राहाणाऱ्यांची संख्या वाढते आहे. रस्ते लहान पडू लागले आहेत. त्यामुळे स्वच्छता तर रहातच नाही, पाणीही दुषित होते. रोगराई वाढते. सर्वसामान्य माणसांचे मानसिक संतुलन बिघडते. आई-वडिलांचे मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होते. शाळेतील मुलामुलींचे गळतीचे प्रमाण तर वाढतेच पण त्याहूनही गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते. वेश्यावृत्ती, अनैतिकता वाढते आहे व त्यामुळे बेकार तरूणांमध्ये दुराचार, चोऱ्या करणे, मुलींचे लैंगिक शोषण करणे आणि प्रसंगी त्यांचे खून करणे, हे गुन्हे करण्याकडे कल वाढत आहे.

वास्तविक समूह केंद्रे ही विकास केंद्रे असली पाहिजेत. विविध ठिकाणी लोकसंख्येचे पुनर्विभाजन करून मागास प्रदेशांचा विकास घडवून आणला पाहिजे. तसेच तेथील वस्त्यांत पायाभूत सुधारणा करणे आवश्यक आहे. ज्यांना कमालीची निकड आहे अशांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सर्वेक्षण, समुपदेशन, सहकारातून सामूहिक योजना राबविणे गरजेचे आहे. रोजगार केंद्रे समुहकेंद्रांजवळ उभी करून हातांना काम मिळेल अशी व्यवस्था असावयास हवी. समूह केंद्रे एका अर्थाने विकासबिंदू बनली पाहिजेत.

काळदाते, सुधा