वर्णव्यवस्था : चातुर्वर्ण्य म्हणजे चार वर्ण. ते ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शुद्र होत. ब्राह्मण सर्वांत उच्च. त्याच्या खालोखाल क्षत्रिय. क्षत्रियाच्या खालोखाल वैश्य व वैश्याच्या खाली शुद्र, असा हा उच्चनीच भाव धर्मशास्त्राने गृहीत धरला आहे. या चार वर्णांचा समाज बनतो. या चार वर्णांचा अनुलोम विवाहाने होणारा संकर निषिद्ध नाही. या चार वर्णांचा प्रतिलोम संकर निषिद्ध आहे. अनुलोम संकर म्हणजे उच्चवर्णाचा पुरुष व खालच्या वर्णाची स्त्री यांचा विवाह. वरच्या वर्णाची स्त्री व खालच्या वर्णाचा पुरुष यांचा संभोग व निर्माण झालेली संतती म्हणजे प्रतिलोम संकर होय. या अनुलोम-प्रतिलोम संकरांच्या योगाने भारतीय समाज बनला आहे.

वर्णभेद हा रक्ताचा म्हणजे रक्ताचा बीज भेद होय अशी संकल्पना लक्षात घेऊन धर्मशास्त्रातील वर्णजातिविचार लक्षात घ्यावा. समान वर्णाच्या स्त्री-पुरुषांपासून समान वर्णाचीच संतती होते, हा समान वर्णाचा अत्यंत प्रशस्त मानला आहे. ब्राह्मण पुरुष आणि क्षत्रिय स्त्री यांच्यापासून ‘मूर्धावसिक्तनामक’ जाती निर्माण होते. ब्राह्मण पुरुष आणि वैश्य स्त्री यांच्यापासून ‘अंबष्ठ’ या नावाची जाती निर्माण होते. ब्राह्मण पुरुष व शूद्र स्त्री यांच्या विवाहातून ‘पारशव’ किंवा ‘निषाद’ नावाची जाती उत्पन्न होते. क्षत्रियापासून वैश्य स्त्रीच्या ठिकाणी ‘माहिष्यनामक’ जाती निर्माण होते व शूद्र स्त्रीच्या ठिकाणी क्षत्रियापासून जी संतती होते, तिला ‘उग्र’ जाती असे म्हणतात. वैश्य पुरुषापासून शूद्र स्त्रीच्या ठिकाणी जी संतती निर्माण होते, ती जाती ‘करण’ होय. ही अनुलोम संकरासंबंधी माहिती झाली.

क्षत्रिय पुरुषापासून ब्राह्मण स्त्रीच्या ठिकाणी निर्माण झालेली संतती ‘सूत’ जाती होय. वैश्यापासून निर्माण झालेली ‘वैदेहक’ जाती होय. ब्राह्मणीच्या ठिकाणी शूद्र पुरुषापासून जी संतती निर्माण होते, ती ‘चंडाल’ होय. ती अत्यंत नीच व बहिष्कृत होय, असे मानीत. क्षत्रिय पुरुषापासून वैश्य स्त्रीच्या ठिकाणी जी संतती होते, ती  ‘माहिष्य’ जाती होय. वैश्य पुरुषापासून शूद्र स्त्रीच्या ठिकाणी ‘करणी’ नामक जाती उत्पन्न होते. त्या करणीच्या ठिकाणी माहिष्यय पुरुषापासून ‘रथकार’ नामक जाती निर्माण होते.

क्षत्रियाच्या पाचव्या पिढीला, उच्च वर्णाची प्राप्ती कर्मामुळे होते. वैश्याच्या सातव्या पिढीला कर्मामुळे उच्च वर्णाची प्राप्ती होते. हे वर्णपरिवर्तन वर्णाची कर्मे म्हणजे कर्तव्य बदलल्यामुळे होते, असे याज्ञवल्क्यस्मृतीत म्हटले आहे.

वर्णाची कर्तव्ये व अधिकार : ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य यांची धार्मिक कर्तव्य अध्ययन, यजन व दान ही होत. अध्यापन, यज्ञाचे पौरोहित्य व प्रतिग्रह (दक्षिणेच्या रूपात) यांचा अधिकार ब्राह्मणांनाच आहे. धनुर्विद्या व राज्यप्रशासन हे क्षत्रियाचे उपजीविकेचे साधन आणि व्यापार व कृषिकर्म हे वैश्यवर्णाचे आणि ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांची सेवा हे शूद्राचे कर्तव्य होय व तेच उपजीविकेचे साधन होय.

चार वर्ण, अनुलोम संकरजन्य जाती व प्रतिलोम संकरजन्य जाती यांचे परंपरेने प्राप्त असे व्यवसाय निश्चित झालेले आहेत.

ही वर्णजातिव्यवस्था ढासळलेली आहे. वर्णाश्रमव्यवस्था ढासळलेली आहे, असे आद्य शंकराचार्य यांनी ब्रह्मसूत्रभाष्यात म्हटले आहे. केव्हातरी ती नीट होती, असे त्यांचे मत आहे.

पहा : जातिसंस्था.

 जोशी, लक्ष्मणशास्त्री