‘मुस्लिम सत्यशोधक मंडळा’चे संस्थापक हमीद दलवाई.

मुस्लिम सत्यशोधक मंडळ : भारतातील मुस्लिम समाजात प्रबोधन घडवून आणण्यासाठी पुण्यात मुस्लिम युवकांच्या बैठकीत हमीद दलवाई (२९ सप्टेंबर १९३२–३ मे १९७७) यांनी २२ मार्च १९७० रोजी ही संघटना स्थापन केली. इहवादी जीवनमूल्ये, राष्ट्रीय एकात्मता व वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा पुरस्कार करून अलगतावादी प्रवृत्ती व अंधश्रद्धा दूर करणे, स्त्रियांना समान हक्क मिळवून देणे इ. व्यापक उद्दिष्टे समोर ठेवून पण मुख्यतः मुस्लिम समाजातील प्रबोधनावर भर देणारे कार्य या मंडळाने हाती घेतले आहे. म. फुले, आगरकर, महर्षी कर्वे आदींच्या विचारकार्यातूनच या मंडळाला प्रेरणा मिळाली असून, त्याचे कार्यक्षेत्र प्राधान्याने महाराष्ट्रातच आहे. पुणे, मुंबई, फलटण, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, श्रीगोंदे, अमरावती, अचलपूर, परतवाडा, औरंगाबाद, इ. ठिकाणी या मंडळाच्या शाखा आहेत.

या मंडळाचे संस्थापक हमीद दलवाई यांचे जन्मस्थान मिरजोळी (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी). त्यांचे शालेय शिक्षण चिपळूण येथे व उच्च शिक्षण मुंबईत झाले. ते चांगले मराठी लेखक होते. लाट (१९६१) हा कथासंग्रह व इंधन (१९६५) ही कादंबरी ही त्यांची ललित साहित्यनिर्मिती. मुस्लिम जातीयतेचे स्वरूप-कारणे व उपाय (१९६८) आणि इस्लामचे भारतीय चित्र (१९८२) ही त्यांची वैचारिक पुस्तके होत. मुस्लिम पॉलिटिक्स इन सेक्युलर इंडिया (१९७०) हे त्यांचे इंग्रजी पुस्तक होय. १९६६ मध्ये मुंबईत जबानीतलाक तसेच सवतीची पद्धत यांविरुद्ध मुस्लिम स्त्रियांनी काढलेल्या मोर्च्यांत त्यांनी पुढाकार घेतला. तेंव्हापासून मुस्लिम समाजातील प्रबोधनकार्यास त्यांनी स्वतःस वाहून घेतले. ‘इंडियन सेक्युलर सोसायटी’च्या स्थापनेतही (१९६६) त्यांचा सहभाग होता. १९७६ मध्ये अमेरिकेत भरलेल्या ‘वर्ल्ड युनिटी कॉन्फरन्स’ला एक प्रतिनिधी म्हणून हमीद दलवाई गेले होते. त्या दौऱ्यात त्यांनी इंग्लंड, फ्रान्स आणि जर्मनी या देशांना भेटी दिल्या होत्या. मूत्रपिंडाच्या विकाराने त्यांचे मुंबईत निधन झाले. आपल्या शवावर कोणतेही धार्मिक संस्कार करू नयेत आणि त्याचे दहन करावे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. त्याप्रमाणेच त्यांचा अंत्यसंस्कार करण्यात आला.

मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे कार्य हे मुख्यतः तलाकपीडित मुस्लिम स्त्रियांच्या प्रश्नांशी निगडीत असले, तरी समान नागरी कायदा, मुस्लिमांनी आपापल्या प्रादेशिक भाषांतून शिक्षण घेण्याचा आग्रह, कुटुंबनियोजनाचा पुरस्कार यांसारख्या इतरही बाबतीत मंडळाने अखंडपणे कार्य केले आहे. यासाठी निवेदने, निदर्शने, चर्चासत्रे, मेळावे, शिबिरे, अधिवेशने, ठराव इ. मार्गांचा संघटितपणे अवलंब करण्यात आला. मंडळाच्या उद्दिष्टांसाठी विरोधी व विसंगत असलेल्या गोष्टींचा, जाहिरपणे, मोर्चे व पत्रके काढून निषेध नोंदवण्याचे कार्यही या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केले आहे. १९७१ साली या मंडळाच्या पुढाकाराने दिल्ली येथे ‘ऑल इंडिया फॉर्वर्ड-लुकिंग मुस्लिम कॉन्फरन्स’ भरवण्यात आली. या परिषदेत महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, प. बंगाल व दिल्ली येथील प्रतिनिधी उपस्थित होते. समान नागरी कायद्याच्या मागणीचा ठराव त्यावेळी संमत करण्यात आला. १९७३ सालच्या कोल्हापूर येथील मुस्लिम शिक्षण परिषदेत मुसलमानांनी आपापल्या प्रादेशिक भाषेच्या माध्यमातून शिक्षण घ्यावे, असा ठराव करण्यात आला. १९७५ साली मंडळाचे सरचिटणीस सय्यदभाई यांच्या नेतृत्वाखाली ‘जेहाद-ए-तलाक’ चळवळ सुरू करण्यात आली व तलाकपीडित महिलांना व त्यांच्या मुलांना कायदेशीर संरक्षण मिळावे, अशी मागणी केली गेली. शरीयत कायद्याच्या जबानी तलाक व सवत या कालबाह्य तरतुदींना या मंडळाचा विरोध आहे. मंडळाने २३ नोव्हेंबर १९७५ रोजी पुणे येथे तलाकपीडित मुस्लिम स्त्रीयांची (बहुधा जगातील पहिली) परिषदही भरवली होती. १९८० साली कोल्हापूर येथे हुसेन जमादार यांनी तलाकपीडित महिलांच्या मुलांसाठी वसतिगृह सुरू केले तसेच १९८४ सालापर्यंत मंडळाचे कार्यकर्ते शेख वजीर पटेल यांच्या पुढाकाराने अमरावतीस कुटुंबनियोजनाची शिबिरे आयोजित करून सु. ५,००० शस्त्रक्रिया घडवून आणल्या. तलाकपीडित व गरजू मुस्लिम स्त्रियांना सनातन्यांनी लादलेल्या चित्रपटबंदीविरुद्ध रजिया पटेल यांनी चळवळ केली. केंद्र सरकारच्या कौटुंबिक न्यायालयाच्या प्रस्तावाचे या मंडळाने स्वागत केले व याचा फायदा मुस्लिम महिलांनाही मिळावा, अशी सूचना केली. पुण्यात १९८२ साली मुस्लिम महिला मदत केंद्र सुरू झाले. जुलै  १९८४  मध्ये मंडळाच्या कार्यकर्त्या श्रीमती अख्तरून्निसा सैय्यद यांनी दत्तक घेण्याच्या प्रश्नावरून सर्वोच्च न्यायालयात दाद मागणारा अर्ज दाखल केला. मुंबईत श्रीमती मेहरून्निसा दलवाई आपल्या पतीचे कार्य नेटाने पुढे चालवत आहेत.

या मंडळातील कार्यकर्त्यांना अनेकदा विरोधकांच्या हल्ल्यांना तोंड द्यावे लागले आहे. हमीद दलवाईच्या निधनानंतरही या मंडळाचे कार्य नेटाने वाटचाल करीत आहे.

थत्ते, यदुनाथ