गलिच्छ वस्त्या : एखाद्या गावात वा शहरात सर्वसाधारण स्वच्छतेच्या तेथील रूढ कल्पनेच्या दृष्टीतून इतर वस्त्यांपेक्षा गलिच्छ असलेल्या वस्त्या. भिन्न भिन्न समाजात वेगवेगळ्या काळी गलिच्छ वस्त्या या संज्ञेचा अर्थ वेगवेगळा संभवतो. स्वच्छता व निवासस्थान यांविषयीच्या कल्पना जशा बदलत जातील, त्यांनुसार गलिच्छ वस्तीची व्याख्या आणि लक्षणे बदलणे अपरिहार्य ठरते. म्हणूनच विकसित व अविकसित देशांमध्ये, शहरांमध्ये व खेड्यांमध्ये तसेच औद्योगिकीकरणाच्या पूर्वोत्तरकालीन नागरीकरणामध्ये गलिच्छ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वस्त्या भिन्न प्रकारच्या दिसून येतात. 

औद्योगिकीकरणपूर्व काळातील गलिच्छ वस्त्या ह्या काही विशिष्ट गावांत अगर शहरांतच दिसून येत असत. माणसांची अधिक वर्दळ असेल तेथे, किरकोळ खरेदी-विक्रीचा व्यवहार मोठ्या प्रमाणात होत असेल तेथे तसेच जीवनोपयोगी साधनांच्या जवळपास दुकानांची व घरांची गर्दी होणे स्वाभाविक आहे. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी मुख्य देवस्थानाच्या भोवती अशी गर्दी आजही दिसून येते. त्याचप्रमाणे नळाची सोय नसलेल्या गावी, नदी अगर तलाव हेच पाणीपुरवठ्याचे मुख्य साधन असल्यास व त्याचे पात्र बंदिस्त असल्यास, त्याभोवती घरांची गर्दी होण्याची शक्यता असते. शहरातील इतर वस्त्यांबरोबरच गलिच्छ वस्ती ही फार पूर्वीपासून मानवाच्या परिचयाची आहे. ईजिप्त आणि बॅबिलन संस्कृतींतही गलिच्छ वस्त्यांचे अस्तित्व आढळून येते. मुख्य शहराभोवती किल्ला किंवा भिंत असली, की त्याच्या हद्दीबाहेर वेशील लागून किंवा जवळच गलिच्छ वस्त्या असल्याचे उल्लेख सापडतात. परंतु गलिच्छ वस्त्या व त्यांच्या समस्या प्रामुख्याने आधुनिक नागरीकरणाच्या प्रक्रियेतूनच उद्‌भवल्या आहेत.

 आधुनिक गलिच्छ वस्त्यांची लक्षणे संयुक्त राष्ट्रांच्या नागरी जमीन धोरणांच्या अहवालात नमूद केली आहेत, ती अशी : ‘अपुऱ्या राहत्या जागेत झालेली माणसांची दाटी, त्या जागेचा खालावलेला दर्जा, अनारोग्यकारक परिसर किंवा स्वच्छतेच्या सोयी-सवलतींचा अभाव आणि त्यांमुळे तेथील रहिवाशांच्या अगर एकंदर समाजाच्या आरोग्याला, सुरक्षिततेला किंवा नीतिमत्तेला पोहोचणारा धोका इ. लक्षणांची युक्त असलेली एखादी इमारत, इमारतींचा समूह अगर प्रदेश यांना गलिच्छ वस्त्या’, असे म्हणता येईल.  

ह्या लक्षणांवरून गलिच्छ वस्त्यांमध्ये घरे जुनाट असून मोडकळीस आलेली असतात. अपुर्‍या जागेत माणसे कशीबशी राहत असतात. शयनगृहे व स्‍नानगृहे ह्यांची, विशेषत: स्त्रियांसाठी, स्वतंत्र सोय नसते. वेगवेगळ्या आकारांची व उंचींची ओबडधोबड घरे अव्यवस्थितपणे एकामेकांना लागून असतात. घरांभोवती मोकळी जागा नसते. घरांच्या रांगांमध्ये रस्ता असला, तरी तोही कच्चा, ओबडधोबड आणि अरुंद असतो. हवा व उजेड यांना घरांत वाव नसतो. स्वतंत्र संडासाची सोय नसते. सांडपाणी वाहून नेण्यासाठी गटारांची सोय नसते. वीज व पाणी यांचा पुरवठा पुरेसा किंवा अजिबात नसतो. स्वच्छता आणि आरोग्याच्या दृष्टीने स्थानिक शासनाचे या वस्त्यांकडे मुळीच वा पुरेसे लक्ष नसते. म्हणून भोवतालचा परिसर दुर्गंधीयुक्त कचऱ्याने व पाण्याने भरलेला असतो. गलिच्छ वस्त्यांमध्ये मोडकळीस आलेल्या घरांचा जसा समावेश होतो तसेच बांबू, पत्रे, ताडपत्री इत्यादींनी बांधलेल्या झोपड्याही त्यांत येतात. भारतात निकृष्ट दर्जाच्या चाळी, झोपडपट्‌ट्या तसेच भटक्या लोकांच्या तात्पुरत्या वस्त्या ह्या गलिच्छ वस्त्या म्हणून ओळखल्या जातात. गलिच्छ वस्त्या ह्या सार्वत्रिक आहेत व विकसित आणि अविकसित अशा दोन्ही प्रकारच्या देशांत त्या दिसून येतात. म्हणून गलिच्छ वस्त्यांचे निर्मूलन हा नागरी शासनाचा, सामाजिक कार्यकर्त्यांचा तसेच नागरी समाजशास्त्रज्ञांचा एक कायमचा प्रश्न बनला आहे.

गलिच्छ वस्त्यांचा उगम, वाढ व निर्मूलन यांविषयीचा अभ्यास सतत चालू आहे. तसेच निर्मूलनाचे प्रयोगही ठिकठिकाणी केले जात आहेत. परंतु गलिच्छ वस्ती संपूर्णपणे कोणत्याच देशातून नष्ट झालेली नाही.

दारिद्र्य, स्पर्धात्मक अशी भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि शासन व समाज ह्यांची या समस्यांबद्दलची उपेक्षाही गलिच्छ वस्ती निर्माण होण्यामागील मुख्य कारणे समजली जातात. समाजातील प्रचलित अर्थव्यवस्थेत व सांस्कृतिक जीवनात समरस वा स्वीकृत न झालेले व आर्थिक-सांस्कृतिक दृष्ट्या आगदी हीन पातळीवर असलेले लोकच गलिच्छ वस्तीत राहणे पतकरतात किंवा तेथेच त्यांना राहणे सोयीचे अगर क्रमप्राप्त ठरते, असे म्हटले जाते. ज्याप्रमाणे घरांची रचना, त्यांच्या वाढत्या किंमती आणि स्वच्छतेच्या सोयी-सवलतींचा अभाव यांमुळे गलिच्छ वस्त्या निर्माण होतात त्याचप्रमाणे एखाद्या वस्तीत राहणाऱ्या लोकांच्या स्वच्छतेच्या कल्पना आणि सवयी यांमुळेही ती वस्ती कालांतराने गलिच्छ बनत जाते. गलिच्छ वस्तीत नागरी समाजरूपी शरीरातील रोग समजावा, की नगरवाढीतील एक अपरिहार्य ठप्पा समजावा, याबद्दल शास्त्रज्ञांमध्ये दुमत आहे. 


नागरीकरणाच्या सततच्या प्रक्रियेमध्ये शहरातील विविध भागांची, औद्योगिक उत्पादने, करमणूक, किरकोळ व ठोक व्यापार, सावकारी पतपेढ्या, दळणवळण आणि संपर्क तसेच कौटुंबिक वसतिस्थाने ह्या उद्दिष्टांनुसार विभागणी होत जाते. वाढत्या लोकसंख्येनुसार व शहराच्या परिस्थितिजन्य जबाबदारीनुसार विविध प्रकारच्या कार्याकरिता स्वतंत्र यंत्रणा आणि जागा व्यापक प्रमाणात उपलब्ध होणे अवश्य ठरते. योजनाबद्ध रीतीने या वाढीस वाव करून न दिल्यास वाढ होण्याचे थांबत तर नाहीच, उलट एखाद्या कार्याचे क्षेत्र वाढत जाऊन ते शेजारच्या दुसऱ्या कार्याच्या क्षेत्रावर अतिक्रमण करते व त्या कार्यक्षेत्राला दुसरीकडे हुसकून लावते, असे अनेक शहरांच्या वाढीच्या अभ्यासाने सिद्ध झाले आहे. गलिच्छ वस्तीचे मूळ हे याप्रमाणे एखादे क्षेत्र पूर्वीच्या कार्यास अपात्र अगर अवास्तव ठरून दुसऱ्याच कार्याचे अतिक्रमण त्यावर होत राहण्यामध्ये आणि त्यामुळे जमिनीच्या किंमतींत चढउतार होण्यामध्ये आहे, असे म्हटले जाते. सर्व शहरांत सामान्यपणे या प्रक्रियेस अनुसरून गलिच्छ वस्त्या निर्माण झाल्याचे दिसून येते. शहरातील मध्यवर्ती आर्थिक व्यवहारांची व व्यापारी उलाढालींची व्याप्ती वाढत जाऊन त्यांचे भोवतालच्या कौटुंबिक निवासस्थानांच्या क्षेत्रावर अतिक्रमण होते. त्यामुळे तेथील जमिनींच्या किंमती वाढू लागतात आणि घरभाडी वाढतात. शिवाय व्यावसायिक व्यवहारांच्या वाढत्या गजबजाटामुळे कौटुंबिक जीवनाला ती वस्तीच अयोग्य ठरते. म्हणून तेथील कुटुंबे उपनगरांकडे किंवा शहराच्या सीमेवरील वस्तीकडे धाव घेतात. त्या ठिकाणच्या राहत्या घरांची दुर्दशा होते. घर केव्हातरी खाली करावे लागणार, म्हणून त्याच्या दुरूस्तीकडेही दुर्लक्ष केले जाते. अशा परिस्थितीत कमी उत्पन्नाची कुटुंबे अनेक अडचणी सोसून तेथे राहणे पतकरतात. व्यावसायिक व्यवहारांकरिता लांबून येणार्‍या लोकांना अनेक सुखसोयी उपलब्ध करून देणाऱ्या संस्था (उदा., खाणावळी, निवासस्थाने इ.) वा व्यक्ती (उदा., वेश्या इ.) याही असली घरे पसंत करतात. साहजिकच तेथे अनेक प्रकारचा गलिच्छपणा वाढीस लागतो. एखाद्या विशिष्ट कार्याकरिता राखून ठेवलेल्या आणि काही काळ रिकाम्या झालेल्या जागेतही विशेषतः बाहेरून कामाच्या शोधार्थ असलेल्या आणि खालच्या दर्जाची कामे करीत असलेल्या लोकांची वस्ती असते. ही बहुधा झोपडपट्टीच असते. त्या जागेच्या किंमती जास्त असतात, म्हणून कायमची घरे बांधायला ती जागा परवडत नाही. शहरविस्ताराच्या प्रक्रियेत विशिष्ट कारणाकरिता राखून ठेवलेल्या अगर अन्य मोकळ्या जागांवर झोपड्या बांधल्या जातात आणि नंतर त्यांना अन्यत्र हलविणे दुरापास्त होऊन बसते. शहरविस्ताराच्या प्रक्रियेत लोहमार्ग, इतर दळणवळणाचे मार्ग आणि उत्पादक व दुरुस्तीकामाचे कारखाने हे महत्त्वाचे घटक समजले जातात. या कारखान्यांच्या नोकरवर्गांपैकी जो खालचा वर्ग असेल, तो बहुधा दैनंदिन कामाच्या जागेजवळच घर घेणे पसंत करतो. म्हणूनच शहराबाहेर लोहमार्गांच्या व इतर मार्गांच्या पट्‌ट्याला लागून तसेच कारखान्यांजवळ झोपडपट्‌ट्या किंवा निकृष्ट दर्जाची घरे दिसून येतात. लोकांचे दारिद्र्य, घाणेरड्या सवयी आणि इतर सुविधांचा अभाव यांमुळे अशा वस्त्या गलिच्छ बनतात.

 गलिच्छ वस्ती नाहीशी करावयाची झाल्यास दोन उपाय मुख्यत्वेकरून सुचविले जातात : (१) गलिच्छ वस्तीतील लोकांना अन्य ठिकाणी– विशेषतः आरोग्य व राहणीमान यांच्या दृष्टीने योग्य अशा घरांत– हलविणे व गलिच्छ वस्ती संपूर्णतया नष्ट करणे. (२) खेड्यांतील शेतीचे उत्पादन वाढवून, उपलब्ध शेतजमिनींचे फेरवाटप करून, लहान लहान शहरांमध्ये उद्योगधंद्यांकरिता नव्यांना संधी प्राप्त करून देऊन, अन्य औद्योगिक वा तत्सम वसाहती स्थापून मोठ्या शहरांकडे धाव घेणाऱ्यांची संख्या कमी करणे किंवा आटोक्यात आणणे. पैकी पहिला उपाय अधिक तातडीने करता येण्यासारखा आहे आणि सध्या अस्तित्वात असलेल्या गलिच्छ वस्त्यांकरिता तो आवश्यकही आहे. याविषयीही संयुक्त राष्ट्रसंघाच्या, नागरीकरणाविषयीच्या १९६८ च्या अहवालात खालील चार प्रकार सांगितले आहेत :

 (१) शहरवाढीस बाधक ठरणाऱ्या वस्तीस अन्यत्र निर्वेध अशा जागी हलविणे. (२) भविष्यकाळात बाधक ठरणाऱ्या वस्त्यांना आरोग्याच्या सोयी आणि सवलती उपलब्ध करून देऊन त्यांच्यात सुधारणा घडवून आणणे. (३) स्वतःची घरे बांधू न शकणाऱ्या किंवा बांधू न इच्छिणाऱ्या लोकांची राहण्याची सोय करून देणे. (४) ज्यांना कशीबशी घरे बांधणे शक्य आहे किंवा ज्यांची तशी इच्छा आहे, अशा व्यक्तींना आवश्यक त्या सोयी व सवलती उपलब्ध करून देणे.

 वरील उपाय आज अनेक राष्ट्रांत योजिले जात आहेत. परंतु गलिच्छ वस्तीनिर्मूलनाचा अंतिम उपाय हाती लागला आहे, असे निश्चितपणे म्हणता येत नाही. नियोजनाच्या अभावी तर गलिच्छ वस्त्या वाढतातच परंतु नियोजनपूर्वक अगदी नव्याने उभारलेल्या चंडीगढसारख्या शहरातही गलिच्छ वस्त्या कालांतराने निर्माण झाल्या आहेत. यावरून या समस्येचा परिहार आज तरी संपूर्णपणे झाला आहे, असे म्हणता येत नाही.

 गलिच्छ वस्तीची समस्या सामाजिक आरोग्य आणि नीतिमत्ता या दृष्टींनी अत्यंत महत्त्वाची आहे. गलिच्छ वस्तीत गुन्हेगारी बळावते, अनैतिक व अवैध व्यवहारांस तिथे आसरा मिळतो, असेही सिद्ध झाले आहे. तसेच गलिच्छ वस्तीचे अस्तित्व हे आधुनिक पक्षीय राजकारणात प्रतिपक्षाविरुद्ध प्रचार करण्याचे एक महत्त्वाचे साधन झाले आहे, हेही निर्विवाद आहे.

भारतातील बहुतेक राज्यांत सरकारी गृहनिर्माण मंडळे स्थापन झालेली असून त्यांच्यामार्फत गलिच्छ वस्त्यांतील लोकांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्‍न केला जात आहे. केंद्र सरकारही या बाबतीत मदत देत असून त्यामार्फत गलिच्छ वस्त्या सुधारण्याची एक योजनाही जारी केलेली आहे.

पहा : इमारती व घरे.

संदर्भ : 1. Barnes, Harry, The Slum-Its Story and Solution, London, 1931.

    2. Desai, A.R. Pillai, S.D. Slums and Urbanisation, Bombay, 1970.

कुलकर्णी, मा. गु.