बोस,निर्मलकुमार : (२२ जानेवारी १९०१ – १५ ऑक्टोबर १९७२). भारतीय मानवशास्त्रज्ञ. भारतीय सामाजिक- सांस्कृतिक समस्यांच्या बाबतीत गांधीवादी दृष्टिकोनाचा त्यांनी पुरस्कार केला. जन्म कलकत्ता येथे. शालेय शिक्षण पाटणा येथे. कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून भूविज्ञान या विषयातील बी. एस्‌सी.ची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण (१९२१). त्याच विषयात एम्.एस्‌सी. करण्याच्या विचाराने त्यांनी नाव नोंदविले परंतु महात्मा गांधींच्या असहकारितेच्या चळवळीत भाग घेतल्यामुळे (१९२२) त्यांना शिक्षण मध्येच सोडावे लागले.

निर्मलकुमार बोस

पुढे काही काळ जगन्नाथपुरी येथे वास्तव्य आणि ओडिसी वास्तुशिल्पाचा अभ्यास. तेथेच बंगालचे सुप्रसिद्ध विचारवंत ⇨आशुतोष मुकर्जी   यांची भेट झाली व त्यांच्या प्रेरणेने मानवशास्त्राकडे वळले. कलकत्ता विद्यापीठातून मानवशास्त्रातील एम्.एस्‌सी. पदवी प्राप्त केली (१९२५). तेथेच काही काळ मानवशास्त्र विभागात प्रागैतिहासिक पुरातत्त्वविद्या या विषयाचे व्याख्याते म्हणून नंतर १९३७ ते ५९ पर्यंत तेथील भूगोल विभागात मानवजातिभूगोल या विषयातील प्रपाठक म्हणून काम केले. भारत सरकारने भारतीय मानवशास्त्रीय सर्वेक्षणाचे संचालक म्हणून त्यांची नियुक्ती केली (१९५९-६४). त्यानंतर अनुसूचित जाति-जमातींचे आयुक्त म्हणूनही त्यांनी काम केले (१९६७-७०). मध्यंतरी अमेरिकेतील कॅलिफोर्निया, शिकागो इ. विद्यापीठांत अभ्यागत प्राध्यापक म्हणून व्याख्याने दिली (१९५७-५८). सिमला येथील भारतीय प्रगत अभ्यास संस्थेतही अभ्यागत प्राध्यापक म्हणून ते वर्षभर राहिले (१९६६). एशियाटिक सोसायटी व वंगीय साहित्य परिषद या संस्थांचे ते अध्यक्ष होते. १९५३ पासून अखेरपर्यंत (१९७२ पर्यंत) ते मॅन इन इंडिया   या त्रैमासिकाचे संपादक होते. कलकत्ता येथे त्यांचे निधन झाले.

गांधींजींनी पुकारलेल्या १९२२ च्या असहकारितेच्या चळवळीप्रमाणेच १९३०-३२ च्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीत आणि १९४२ च्या ⇨छोडो भारत आंदोलनातही त्यांनी हिरिरीने भाग घेतला होता. १९३४ साली त्यांची गांधीजींशी प्रथम भेट झाली. तेव्हापासून गांधींजीशी त्यांचे निकटचे संबंध होते. पूर्व बंगालमधील (सध्याचा बांगला देश) नोआखाली येथे पेटलेल्या दंगली शमविण्याकरिता गांधीजींनी शांतियात्रा सुरू केली तेव्हा बोस गांधींजींचे खाजगी चिटणीस आणि दुभाषे म्हणून त्यांच्याबरोबर होते (१९४६-४७).

निर्मलकुमार बोस यांनी बंगाली आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमधून सांस्कृतिक मानवशास्त्र. वास्तुशिल्प, हिंदु समाजरचना, आदिवासींच्या समस्या, नगर-विस्तार तसेच गांधीजींचे जीवन व विचार इ. विषयांवर विपुल लेखन केले आहे.

बोस यांची काही महत्त्वाची पुस्तके पुढीलप्रमाणे आहेत : कल्चरल अँथ्रॉपॉलॉजी (१९२९) कॅनन्स ऑफ ओरिसन आर्किटेक्चर (१९३२) स्टडीज इन गांधीझम (१९४०) हिंदू मेथड ऑफ ट्रायबल ॲबसॉर्प्शन (१९४१) सिलेक्शन्स फ्रॉम गांधी (१९४८) द स्ट्रक्चर ऑफ हिंदू सोसायटी (मूळ बंगाली, १९४९) माय डेज विथ गांधी (१९५३) मॉडर्न बेंगॉल (१९६४) कल्चर अँड सोसायटी इन इंडिया (१९६७) गांधी इन इंडियन पॉलिटिक्‌स (रावसाहेब पटवर्धन यांच्या सहकार्याने, १९६७) प्रॉब्लेम्स ऑफ इंडियन नॅशनॅलिझम् (१९६९) अँथ्रॉपॉलॉजी अँड सम इंडियन प्रॉब्लेम्स (१९७२) नवीन ओ प्राचीन (निबंधसंग्रह बंगाली) परिव्राजकेर डायरी (प्रवासवर्णन) इत्यादी.

त्यांच्या लिखाणात शास्त्रज्ञाची वस्तुनिष्ठता, गांधीजींची समन्वयात्मक विधायकता आणि सततच्या क्षेत्रकार्यातून निर्माण झालेली जनजीवनाबद्दलची आत्मीयता यांचा सुंदर मिलाफ दिसून येतो. भारतीय समाज हे एक जटिल साकल्यरूप आहे व बहुजिनसीपणा आणि उच्चनिचश्रेणी ही त्याची वैशिष्ट्ये त्या जटिल साकल्यरूपाचेच घटक आहेत, असा त्यांचा दृष्टिकोन होता. आदिवासी हे जरी हिंदू समाजाच्या, दैनंदिन संपर्कापासून अलिप्त राहिले असले, तरी क्रमशः ते हिंदू समाजाच्या चौकटीत एखाद्या जातीचे स्थान मिळवून सामील होत आले आहेत, असे त्यांचे मत होते.

परळीकर, नरेश.