केलर, हेलेन अॅडॅम्स: (२७ जून १८८०–१ जून १९६८). अंधत्वावर विजय मिळविणारी जगप्रसिद्ध आणि कर्तृत्वसंपन्न अमेरिकन महिला व लेखिका. अमेरिकेच्या ॲलाबॅमा राज्यातील टस्कंबिआ येथे जन्म. वडिलांचे नाव आर्थर व आईचे कॅथरिन. सु. दीड वर्षांची असतानाच एका असाध्य मेंदूविकारामुळे ती आंधळी, बहिरी व मुकी झाली. वयाच्या सातव्या वर्षापासून ती ॲन मॅन्सफील्ड सलिव्हन (१८६६–१९३६) या शिक्षिकेजवळ ब्रेल लिपीतून शिकू लागली. अंधत्वाच्या आपत्तीतून अंशतः वाचलेली विलक्षण जिद्दीची ही तरुणी ‘पर्किन्झ स्कूल फॉर ब्लाइंड्स’ची पदवीधारिका होती. २ मार्च १८८७ ही दिवस केलर आपल्या ‘आत्म्याचा जन्मदिवस’ मानते कारण हा तिच्या शिक्षणाचा पहिला दिवस होता. स्पर्शसंवेदनांच्या साह्याने एका महिन्यातच केलरला भाषा अवगत झाली. अकराव्या पाठानंतर प्रथमच केलरच्या तोंडून ‘मी आता मुकी नाही’ हे वाक्य उच्चारले गेले. सलिव्हनची सातत्याने लाभत असलेली शिकवण व ‘हॉरिस मॅन स्कूल फॉर द डेफ’सारख्या संस्थांचे मार्गदर्शन यांमुळे ती लेखन, वाचन, वक्तृत्व यांच पारंगत झाली. एवढेच नव्हे, तर औपचारिक शिक्षणातही तिने अनन्यसाधारण यश मिळविले.

हेलेन केलर

रॅड्‍‌क्लिफ महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी १८९६ मध्ये ती मॅसॅचूसेट्स राज्यातील ‘केंब्रिज स्कूल फॉर यंग लेडीज’ या संस्थेत जाऊ लागली. तेथे तिने इंग्लिश व जर्मन भाषांत विशेष प्रावीण्य संपादन केले. नंतर १९०० मध्ये रॅड्‌क्लिफ महाविद्यालयात प्रवेश घेऊन पुढील वर्षी तिने पदवी संपादन केली. या काळात तिला सलिव्हनचे सतत साहचर्य व मार्गदर्शन लाभले. या दोघींतील नाते केवळ गुरुशिष्यत्वापुरतेच मर्यादित नव्हते, तर ते एक आदर्श स्नेहाचे, मैत्रीचे नाते होते. सलिव्हनच्या मृत्यूनंतर मेरी ॲग्नेस ऊर्फ पॉली टॉम्पसन (१८८५–१९६०) ही केलरची मैत्रीण बनली. एच्. एच्. रॉजर्झ, मार्क ट्वेन, यूजीन डेब्ज अशा अनेक व्यक्तींनी तिला विविध प्रकारे साहाय्य केले. चार्ल्स कोपलंडने तिची प्रतिभा जागृत करून तिला लेखनास प्रवृत्त केले आणि लेखन, व्याख्याने व अपंगसेवा हेच तिचे पुढील आयुष्यातील महत्त्वाचे व्यवसाय ठरले.

१९२३ पासून न्यूयॉर्कच्या ‘अमेरिकन फाउंडेशन फॉर ब्लाइंड्स’ या संस्थेत बरीच वर्षे केलरने काम केले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात तिने अनेक सैनिकी रुग्णालयांत जखमी जवानांची शुश्रूषा केली. अंधांना शिकता यावे म्हणून आणि इतरही समाजकार्यास हातभार लावावा, या हेतूने तिने ‘हेलेन केलर एन्डोमेंट फंड’सुरू केला. त्यासाठी अमेरिका, यूरोप व जपान येथे व्याख्याने दिली.

तिला मिळालेले मानसन्मान : ‘पिक्टोरिअल रिव्ह्यू कंपनी’कडून कर्तृत्वपदक, नॅशनल एज्युकेशन असोसिएशनचे सुवर्णपदक (१९३८), शव्हाल्येज रिबन ऑफ द फ्रेंच लिजन ऑफ ऑनर (१९५२) इत्यादी. शिवाय हेलेन केलर इन हर स्टोरी  द मिरॅकल वर्कर  हे तिच्या जीवनावर आधारित चित्रपटही निघालेले आहेत.

तिने लिहिलेल्या पुस्तकांपैकी बऱ्याचशा पुस्तकांचे पन्नासांहून अधिक भाषांत रूपांतर झालेले आहे. तिची द स्टोरी ऑफ माय लाइफ (१९०३), द साँग ऑफ द स्टोन वॉल (१९१०), मिडस्ट्रीय माय लेटर लाइफ (१९३०), लेट अस हॅव फेथ (१९४०) इ. पुस्तके प्रसिद्ध आहेत. तिने लिहिलेले एक महाकाव्य मात्र तिच्या निवास स्थानास लागलेल्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.

दृष्टी नसून मानवी आकांक्षेचे सौंदर्य ती अनुभवू शकली व श्रवणशक्ती नसून अलौकिक प्रेमाचा सुसंवाद ऐकू शकली. केलरचे चरित्र व कार्य दुर्दैवी अपंग व्यक्तींना चिरंतन स्फूर्तिदायक ठरणारे आहे. कनेक्टिकट राज्यातील ईस्टन येथे तिचे निधन झाले.

संदर्भ : Harrity, Richard Martin, R. G. The Three Lives of Helen Keller, New York, 1962.

गोखले, विमल