हरीश हांडेहांडे, हरीश : (१ मार्च १९६७). ख्यातनाम भारतीय सामाजिक कार्यकर्ते व सेल्को इंडिया या कंपनीचे सहसंस्थापक. त्यांचा जन्म कर्नाटक रा ज्या ती ल उडपी जिल्ह्यातील (कुंडपुरा तालुका) हंदातू येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे बालपण व शालेय शिक्षण ओडिशा रा ज्या ती ल राउरकेला येथे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत झाले. आय्.आय्.टी., खरगपूर (प. बंगाल) या संस्थेतून ऊर्जा अभियांत्रिकी या विषयातपदवी घेऊन उच्च शिक्षणासाठी ते अमेरिकेत गेले. तेथील मॅसॅचूसेट्स लॉवेल विद्यापीठातून त्याच विषयातील एम्.एस्. व पीएच्.डी. (१९९५) या पदव्या त्यांनी संपादित केल्या. त्यानंतर लगेचच भारतात येऊन त्यांनी सौरऊर्जा प्रकल्पाची स्थापना केली. अमेरिकेतील आपले वर्गमित्र नेवीले विल्यम्स यांच्या सहकार्याने ‘सेल्को इंडिया’ (सोलर इलेक्ट्रिक लाइट कंपनी) हा सौरऊर्जा प्रकल्प त्यांनी सुरू केला (१९९५). ग्रामीणभागात सौरऊर्जा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या प्रकल्पाची स्थापना केली गेली.

 

देशातील ग्रामीण भागात, विशेषतः जिथे वीज अद्यापि पोहोचलेली नाही त्या भागातील जनतेला सौरऊर्जेच्या माध्यमातून प्रकाश मिळावा व दारिद्र्य निर्मूलनाला हातभार लागावा या प्रमुख उद्देशाने सेल्को कार्यरत आहे.संपूर्ण भारतीय बनावटीचे हे तंत्रज्ञान विकसित करून स्थापन केलेल्याया सामाजिक उपक्रमाचे कर्नाटकातील बंगळुरू (बंगलोर) येथे प्रधान कार्यालय आहे. तसेच कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्र, बिहार, तमिळनाडू या राज्यांत अडतीस सेवाकेंद्रे निर्माण केलेली आहेत. या सेवाकेंद्रांच्या माध्यमातून आजमितीला पंच्याण्णव हजारांहून अधिक ऊर्जाप्रणालींची निर्मिती करण्यात आलेली असून यापासून चार लाखांहून अधिक लोकांना प्रत्यक्ष, तर लाखो लोकांना अप्रत्यक्ष लाभ मिळालेला आहे. वीजवापराचा खर्च सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर असल्याने त्यांना कमीत कमी खर्चात सौरशक्ती (अपारंपरिक ऊर्जा) उपलब्ध करून देण्यावर हांडे यांच्या कंपनीचा भर आहे. सौरदिव्यांच्या साहाय्याने ग्रामीण भागातील अंधार दूर होईल, यासाठी व्यापक प्रमाणावर प्रयत्न चालू आहेत. सौरवीज व तापमापक (हीटिंग) यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठीचा खर्च जास्त असल्याने वित्तीय संस्थांच्या सहकार्याने तसेच शासकीय अनुदानाच्या माध्यमातून ग्राहकांना सवलती देण्यात येत आहेत. ना नफा ना तोटा या तत्त्वावर सौरऊर्जा प्रकल्प चालू असून साडेअठरा कोटी रुपये एवढीत्याची उलाढाल होती (२०११-१२).

 

सेल्को ऊर्जा प्रणालीचे संच (पॅनेल्स), बॅटरी व विद्युत् दाबनियंत्रक (व्होल्टेज रेग्युलेटर) असे तीन प्रमुख घटक असून कमी विद्युत् दाबाचे दिवे, पंखे, दूरदर्शन संच, रेडिओ, भ्रमणध्वनी भारण (चार्जिंग) यांसाठी ही प्रणाली वापरली जाते. सौरऊर्जा संच दिवसा सूर्यप्रकाशाच्या तीव्रतेने भारण होऊन विद्युत् शक्ती साठवतात व ही ऊर्जा नंतर साधारणपणे रात्री बारा तास उपलब्ध होऊ शकते. शिवाय सेल्कोच्या ग्राहकांना विक्रीपश्चात सेवा उपलब्ध करून दिली जाते. तसेच उत्पादनांची हमीही दिली जाते.

 

हांडे यांच्या उपक्रमशीलतेचा व सामाजिक कार्याचा गौरव त्यांना अनेक पुरस्कार देऊन करण्यात आला आहे. त्यांपैकी त्यांच्या सेल्को कंपनीला मिळालेला ॲशदेन पुरस्कार (२००५ व २००७) तर त्यांना मिळालेला इंडिया टुडे या साप्ताहिकाचा एकविसाव्या शतकातील एक उद्यमशील तरुण पुरस्कार (२००८), प्रतिष्ठेचा मॅगसेसे पुरस्कार (२०११), कर्नाटक राज्योत्सव प्रशस्ती पुरस्कार (२०११), मॅसॅचूसेट्स विद्यापीठाची डॉक्टर ऑफ ह्यूमन लेटर्स ही सन्माननीय पदवी (२०१३) इ. महत्त्वाचे व मान्यवर पुरस्कार होत.

 

हरीश हांडे सध्या आपली पत्नी रुपल त्रिवेदी ( सॉफ्टवेअर इंजिनिअर, यू. एस्.) व मुलगी अधिश्री यांसमवेत बंगलोर येथे वास्तव्यास आहेत.

चौधरी, जयवंत

Close Menu
Skip to content