हिजडा : सर्वसाधारणपणे स्त्रीवेष धारण करून स्त्रैण हावभाव करीत वावरणाऱ्या पुरुषाला हिजडा (छक्का) किंवा तृतीयपंथी असे संबोधले जाते. हिजडा ही शास्त्रीय संज्ञा नाही. प्रदेशपरत्वे अशा व्यक्तींना भिन्न नावे आढळतात. उदा., जोगत्या, जोगप्पा, जोगण्णा, नाच्या, अरावनी, पवैया, खसुआ, नपुंसकडू, मादा, कोज्जा, थिरूनंगाई इत्यादी. 

 

पुढील प्रकारच्या व्यक्ती हिजडा असू शकतात : (१) केवळ स्त्रीवेष धारण करायला आवडणारे पुरुष. (२) समलिंगी संबंध ठेवण्याकरिता पुरुष गिर्‍हाईकाच्या शोधार्थ असा वेष धारण करणारे. (३) जन्मतःच जननेंद्रियाची अर्धवट वाढ झालेल्या व्यक्ती (छद्म उभयलिंगी) . (४) क्वचित उभयलिंगी व्यक्ती असे वर्तन करतात. उभयलिंगी व्यक्तींमध्ये बीजांडात स्त्री-पुरुष बीजे व हॉर्मोने निर्माण करणाऱ्या कोशिका असतात. (५) लहानपणीच लिंग अथवा वृषण किंवा दोन्ही कापून ज्यांचे खच्ची-करण केले जाते, अशी मुले. ही मुले वयात आली तरीही टेस्टोस्टेरॉनया ⇨ हॉर्मोनाच्या अभावी बायकीच दिसतात. 

 

लैंगिक ओळख : मानवी लैंगिक ओळख ही अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. अनेक स्तरांवर ही ओळख ठरविली जाते. मूलतः गुणसूत्रानुसार XY गुणसूत्रे असतील, तर पुरुष आणि XX गुणसूत्रे असतील तर स्त्री अशी लैंगिक विभागणी होते. यालाच गुणसूत्रीय लिंगभेद असे म्हणतात. गुणसूत्रांतील दोषांमुळे काही व्यक्तींमध्ये केवळ एकच एक्स गुणसूत्र (X0) काहींमध्ये तीन एक्स गुणसूत्रे (XXX), तर अन्य काहींमध्ये एक एक्स व एकापेक्षा जास्त वाय गुणसूत्रे (XYY, XYYY) आढळतात. 

 

XX वा XY या गुणसूत्रीय लिंगभेदानुसार स्त्री वा पुरुष बीजग्रंथींची निर्मिती गर्भावस्थेतच होते. मात्र, या ग्रंथींचे कार्य ती व्यक्ती वयात आल्यावर सुरू होते. याला बीजांडीय लिंगभेद असे म्हणतात. काही वेळा पुरुष गुणसूत्र (दध) असूनही पुरुष बीजग्रंथींची वाढ होत नाही किंवा या ग्रंथींनी स्रवलेल्या पुरुष रसाला बाह्य जननेंद्रिय कोशिका दाद देत नाहीत. परिणामी बाह्य जननेंद्रिये ही स्त्रीसम तयार होतात. 

 

जरी गुणसूत्रीय लिंगभेदानुसार बीजांडीय लिंगभेद घडून आला, तरीही गर्भावस्थेतील हॉर्मोन संस्थेतील दोषांमुळे जननेंद्रियांची घडण बिघडू शकते. याला हॉर्मोन लिंगभेद असे म्हणतात. उदा., या प्रकारात स्त्री--गर्भाच्या बाह्य अवयवांवर परिणाम होऊन ते पुरुषी दिसू लागतात. अशी रचना बरेचदा पाहणाऱ्याला बुचकळ्यात पाडते. याला संभ्रमलिंगी संतती असे म्हणतात. 

 

गर्भावस्थेत तसेच पौगंडावस्थेत स्रवणाऱ्या हॉर्मोनांचा परिणाम म्हणून मेंदूतही स्त्री व पुरुष असे भेद निर्माण होतात. याला केंद्रीय तंत्रिका तंत्रगत (मज्जासंस्थागत) लिंगभेद असे म्हणतात. 

 

प्रत्येक व्यक्तीला समाजाकडून आणि कुटुंबाकडूनही लिंगभावाचे बाळकडू पाजले जात असते. कपडे, खेळ, वागणूक, भाषा वगैरेंद्वारे लैंगिक ओळख ठसविली जाते. याला पालनगत लिंगभेद असे म्हणतात. वरील सर्व स्तरांवरील लिंगभेदामुळे व्यक्तीला लैंगिक ओळख प्राप्त होते. अशा प्रकारे नेमकी लैंगिक ओळख हरविलेल्या व्यक्ती हिजडे म्हणून वावरताना दिसतात. आधुनिक वैद्यकशास्त्र हिजड्यांकडे वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून पाहते. सर्वसामान्यांपेक्षा वेगळी लैंगिक ओळख असलेलीही मंडळी आहेत. 

 

एखाद्याला स्त्रीवेष धारण करायला आवडणे अथवा समलिंगी संबंध ठेवायला आवडणे हा आजार अथवा विकृती आहे, असे आधुनिक वैद्यक मानत नाही. त्यामुळे यावर उपचारही नाहीत. खच्चीकरण झालेल्यामुलांमध्येही कायमस्वरूपी व्यंग निर्माण झालेले असते. हॉर्मोन उपचारांनी यावर काही प्रमाणात मात करता येते. जननेंद्रियांची अर्धवट वाढ झालेल्या व्यक्तींना मात्र परिणामकारक उपचाराची गरज पडते. सदोषनिर्मिती असलेली अथवा सदोष ठिकाणी आढळणारी पुरुष बीजग्रंथीही कर्करोगग्रस्त होऊ शकते (उदा., वृषणाचा कर्करोग) . अशा वेळीपुरुष बीजग्रंथी निर्हरणाची शस्त्रक्रिया करावी लागते. उभयलिंगी व्यक्तीं-मध्येही अशी शस्त्रक्रिया आवश्यक ठरते. 

 

संभ्रमलिंगी व्यक्तींमध्येही त्यांना स्त्री अथवा पुरुष बनविण्यासाठी शस्त्रक्रियादी उपचारांची गरज भासू शकते. अर्थात असे निर्णय ही एक अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. स्त्री आणि पुरुष ही दोन टोके असून त्यांमध्ये वावरणाऱ्याही व्यक्ती असतात, हे समजावून घेणे महत्त्वाचे असते. वर उल्लेखिल्याप्रमाणे अशा व्यक्तीची विविध स्तरांवरील लैंगिक ओळख कशी आहे हे लक्षात घेऊनच उपचार सुचविले जातात. पुरुष बीजग्रंथींची कमतरता हे हिजडेपणाचे मुख्य कारण आहे, हे मान्य केल्यास अशी कमतरता भरून काढण्याच्या उद्देशाने उपचार करता येतील परंतु, टेस्टोस्टेरॉन अथवा तत्सम द्रव्य कायम वरचेवर देणे शक्य नसते. अशा उपचारास व्यक्ती तयार होणेही कठीण असते. वृषणाचे आरोपण करून भविष्यकाळात असे उपचार शक्य होतील. यासाठीस्कंधकोशिका( मूळपेशी) उपचार पद्धतीही कदाचित उपयुक्त ठरेल. 

 

उपचाराच्या परिघात न येणारे वा न येऊ इच्छिणारे असे घटक हिजडा म्हणूनच वावरतात. समाजाकडून सदैव हिणकस वागणूक मिळत असल्यामुळे त्यांना भीक मागणे, रोजंदारी, वेश्या व्यवसाय वा धार्मिक कार्यक्रमांत सहभाग एवढेच चरितार्थाचे मार्ग उरतात. राजाश्रय किंवा धार्मिक प्रतिष्ठा प्राप्त झालेल्या अनेकांना मात्र मानाने जगणे शक्य झाल्याची अनेक उदाहरणे इतिहासात आढळतात. दरबारातील मानकरी, उच्च स्वरातले गायक किंवा टिपेच्या सुरात गाणारे गायक, जनानखान्यातील पहारेकरी, मंदिरामधील देवदेवतांचे सेवेकरी यांसारख्या अनेक भूमिका त्यांनी पार पाडल्या आहेत. ग्रीक, रोमन, ईजिप्शियन, चिनी, मोगल आणि भारतीय संस्कृतींमध्ये याची उदाहरणे आढळतात. प्राचीन वाङ्मयात विशेषतः रामायण-महाभारतात हिजड्यांविषयी मनोरंजक कथा आढळतात. बृहन्नडा, शिखंडी, बहुचरादेवी, अर्धनारीनटेश्वर इ. पौराणिक कथा या संदर्भात आढळतात. अल्लाउद्दीन खल्जी याने गुजरातच्या स्वारीत मिळविलेला मलिक कफूर हा तृतीयपंथी होता. तो पुढे त्याचा सेनापती झाला. 

 

मानसिक ताणतणाव, देहविक्रयामुळे होणारे विविध लैंगिक आजार ( उदा., एचआयव्ही एड्स) आणि जन्मजात दोषांमुळे उद्भवणारे वैद्यकीय प्रश्न यांवरील उपचारांबरोबरच त्यांचे सामाजिक आणि आर्थिक पुनर्वसन हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. 

 

अभ्यंकर, शंतनू 

 


सामाजिक परिस्थिती : साधारणपणे पौगंडावस्थेत किंवा कुमारवयात हिजड्यांचे वर्तन स्त्रियांसारखे दिसू लागते. या काळात समाजाकडून आणि घरातून चेष्टा व छळ झाल्यामुळे त्यांचे शिक्षण अर्धवट राहते. समाजापासून ते तुटतात. समाजाची प्रतिक्रिया तिरस्काराची किंवा भीतीची असते. त्यामुळे त्यांना रोजगार मिळणे अवघड असते. त्यामुळे ‘बधाई’ म्हणजे जन्म किंवा लग्न असलेल्या ठिकाणी शुभेच्छा द्यायला जाणे, ‘मांगती’ म्हणजे भीक मागायला जाणे आणि देहविक्रय हे व्यवसाय प्रामुख्याने चरितार्थासाठी केले जातात. 

 

संघटना : हिजड्यांच्या भेंडीबाजारवाला, बुलाकवाला, लालनवाला, लखनौवाला, पुनावाला, दिल्लीवाला, हादीर इब्राहिमवाला अशासात पारंपरिक संघटना किंवा घराणी आहेत. त्यांना ‘घराना’ म्हणतात. त्यांच्या निर्मितीविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही. प्रत्येक घराण्याच्या प्रमुखाला ‘नायक’ म्हणतात. त्याच्या खाली उतरंड असते. घराण्यात नव्याने येणारी व्यक्ती घराण्यातील एका व्यक्तीला गुरू मानते व स्वतः तिची चेला बनते. एकाच गुरूचे चेले एकमेकांना गुरुभाई म्हणतात, तर गुरूच्या गुरुभाईंना खालागुरू (मावश्या) म्हणतात. गुरूच्या गुरूला नानगुरू अशी अधिपतश्रेणी असते. प्रत्येक घराण्याचे नियम ठरलेले असतात. ते मोडल्यास दंड केला जातो. वर्षातून दोनदा हिजड्यांची पंचायत भरते. सातही घराण्यांचे नायक त्यात असतात. गुरू बदलायचा असल्यास दंड भरून गुरू बदलता येतो. घराण्याचा सभासद करण्याच्या विधीला ‘रीत करणे’ म्हणतात. रीत करताना घराण्याचा दुपट्टा डोक्यावर दिला जातो.एक साडी दिली जाते. घराण्याचे नियम समजावून दिले जातात. गुरूआणि चेला यांचे नाते हे आई व मुलीच्या नात्यासारखे असते. 

 

पुरुषाचे लैंगिक अवयव कापून टाकल्याशिवाय हिजड्याला पूर्णत्वयेत नाही, असे हिजडा समाजात मानले जाते तथापि प्रत्येक हिजड्याने लिंगच्छेद केलाच पाहिजे असा काही नियम नाही. लिंगच्छेदाच्या विधीला ‘निर्वाण’ म्हणतात. या विधीमध्ये एक पूजाविधी केला जातो. निर्वाण केल्यानंतर जखम भरून यायला महिना-दीड महिना लागतो. वनौषधींद्वारे जखम बरी करतात. निर्वाण स्थितीतील व्यक्तीने हिजडे सोडून इतर कोणाकडे पाहायचे नसते. अलीकडे काहीजण डॉक्टरकडून भुलेखाली लिंगच्छेद शस्त्रक्रिया करून घेतात. लिंगच्छेदाऐवजी लिंगबदल शस्त्रक्रियाही (सेक्स रिअसाइन्मेन्ट सर्जरी) काहीजण करून घेतात. त्यानंतर ‘दूधधार’ नावाचा विधी केला जातो. त्याची ‘हळदीमेहंदी’ केली जाते. निर्वाण झालेल्या हिजड्याला हळद लावली जाते. त्याच्या कपाळाला कुंकू लावले जाते. त्याच्याभोवती नोटा ओवाळून त्याची दृष्ट काढली जाते. नंतर ‘चटला’ विधी केला जातो. त्याला आंघोळ घालून त्याच्याकडून हिरव्या रंगाची साडी व हिरव्या रंगाचे दागिने परिधान केले जातात. त्याच्या डोक्यावर दुधाने भरलेला कलश दिला जातो. हा कलश घेऊन त्याने नदीवर किंवा समुद्रावर जायचे असते आणि ते दूध नदीला किंवा समुद्राला अर्पण करायचे असते. त्यानंतर हिरव्या झाडाला किंवा काळ्या कुत्र्याला आपले लैंगिक अवयव दाखवायचे असतात. 

 

हिजडा घराण्यांमधील व्यक्ती तमिळनाडूतील अरावन, गुजरातमधील कोंबडावाहिनी बहुचरामाता यांसारख्या हिंदू देवतांना जशा भजतात, तशाच मुस्लिमांच्या उरुसाला देखील भजतात. हिजडा व्यक्ती ज्या धर्मातून आली असेल, त्या धर्माप्रमाणे मृत्यूनंतर तिचा अंत्यविधी केला जातो. 

 

समस्या : हिजड्यांना सामाजिक स्वीकृती नाही, माणूस म्हणून समान दर्जा व मूलभूत मानवाधिकार नाहीत. समाजाकडून त्यांची हेटाळणी केली जाते. त्यांना मारझोड केली जाते. तसेच त्यांच्यावर बलात्कारदेखीलहोतात. जमावाकडून खून झाल्याच्या घटनादेखील घडल्या आहेत. हिजड्यांविषयी असलेल्या गैरसमजांमुळे किंवा तिटकाऱ्याच्या, भीतीच्या भावनेमुळे त्यांना राहायला घर मिळत नाही. सामाजिक आधारापासून ते वंचित राहतात. क्षमता असून उपजीविकेसाठी काम मिळत नाही. त्यामुळे त्यांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. कौटुंबिक आधार नसल्यामुळे त्यांच्यात एकटेपणाची भावना निर्माण होते. प्रेम, आपुलकी, जिव्हाळा यांपासून ते वंचित राहतात. पुरुष जोडीदार मिळाला तरी प्रेमभंगाचे वास्तव नेहमीच असते. तसेच सामाजिक दुजाभाव, इच्छा नसताना भीक मागणे व देहविक्रय करणे यांमुळे निराशा तसेच व्यसनांच्या आहारी जाण्याची शक्यता वाढते. 

 

सद्यस्थिती : मुंबईच्या हमसफर संस्थेप्रमाणे अनामप्रेम (पणजी, गोवा), समपंथिक ट्रस्ट (पुणे) आदी अनेक संस्था हिजड्यांच्याहक्कांसाठी, त्यांना आरोग्याच्या सुविधा पुरवण्यासाठी कामे करू लागल्या आहेत. तसेच तृतीयपंथीयांना सन्मानाने पैसे मिळतील यासाठी कार धुणे, फॅशन डिझायनिंग, नृत्यशाळा, ब्युटीपार्लर असे काही व्यवसाय सुचविले गेले आहेत. शबनम मौसीसारख्या काही हिजड्यांनी निवडणुका लढवून राजकारणात प्रवेश केला आहे. राष्ट्रीय पातळीवरील काही जनगणनांनी सर्वेक्षणादरम्यान तृतीयपंथीयांची नोंद करण्यास सुरुवात केली आहे. 

 

माहितीपट : हिजराज ऑफ इंडिया, जरीना, बाँबे यूनक, दी हिजडा–इंडियन थर्ड जेंडर, इंडियाज लेडीबॉइज, बिट्वीन दी लाइन्स, शबनममौसी, किस दी मून, कॉल मी सलमा. यांशिवाय तमन्ना, दायरा, अर्धनारी (मल्याळम्), जोगवा (मराठी) व जयजयकार यांसारख्या चित्रपटांनी हा विषय प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ‘दाई निर्वाणी’ (प्रमोद नवलकर), ‘नैसर्गिक, पण तिरस्कृत’ (पुरुषस्पंदन, कुमार नवाथे, २०११) इ. लेख आणि बॉम्बे दोस्त (मासिक), संक्रमण (विशेषांक, २०१२) या मासिकांनी हिजड्यांच्या व्यथा आणि जीवन यांविषयी तपशीलवार लिहिले आहे. जगभर व जागतिक स्तरावर त्यांच्या अनेक परिषदा आयोजित केल्या जातात. 

 

मी हिजडा, मी लक्ष्मी या लक्ष्मीनारायण त्रिपाठींच्या आत्मवृत्ताने हिजड्यांच्या जीवनाबाबतचे गूढ बऱ्याच प्रमाणात दूर होण्यास मदतकेली आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांना १५ एप्रिल २०१४ रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाने दिलासा मिळाला असून त्रिपाठी म्हणतात, “आम्ही आता कायद्याने समाजाचा भाग बनलो आहोत. आज पहिल्यांदाच आपण भारतीय असल्याचा अभिमान वाटत आहे.” या निकालात स्त्री-पुरुष जसे समाजाचे अविभाज्य घटक आहेत, तद्वतच तृतीयपंथी--हिजडे हाही समाजापासून अलग करता न येणारा घटक आहे, याचीदखल सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने घेतली असून तृतीयपंथीयांनास्त्री व पुरुष यांव्यतिरिक्त स्वतंत्र ओळख मिळवून देण्याचे मोठे काम केले आहे आणि सर्वसाधारण भारतीय नागरिकाला मिळणारे सर्व अधिकार त्यांना देण्यात यावेत, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. सामाजिक विषमतादूर करण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय दिला असून त्याचे मोल शब्दातीत आहे. अर्थात या निकालाने तृतीयपंथीयांकडे पाहण्याचा सामाजिक दृष्टिकोन लगेचच बदलेल असे नाही तथापि आपण माणसांत आल्याचे समाधान त्यांना नक्कीच मिळेल. 

 

पाटकर, रूपेश

 पहा : उभयलिंगता निर्बीजीकरण लिंग लैंगिक द्विरूपता लैंगिक वैगुण्ये स्त्री-पुंरूप.