सिमेलव्हाईस, इग्नाझ फिलिप : (१ जुलै १८१८— १३ ऑगस्ट १८६५). हंगेरियन वैद्य. त्यांनी ⇨ प्रसूती-पूतिज्वर (बाळंतरोग) होण्याची कारणे शोधून काढली. तसेच त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात प्रथमच पूतिरोधनाचा उपयोग करण्यास सुरुवात केली. त्यांच्या या संशोधनाने या रोगामुळे होणारे मातांच्या मृत्यूचे प्रमाण कमी झाले [ ⟶ पूतिरोधके].

सिमेलव्हाईस यांचा जन्म हंगेरीतील बूडा (ऑस्ट्रियन साम्राज्य आताचे बूडापेस्ट) येथे झाला. त्यांनी पेस्ट व व्हिएन्ना विद्यापीठांतून शिक्षण घेतले. त्यांनी व्हिएन्ना विद्यापीठातून १८४४ मध्ये वैद्यकीय पदवी संपादन केली. त्यांची व्हिएन्ना येथील प्रसूती रुग्णालयात वैद्यक मदतनीस म्हणून नेमणूक झाली (१८४७). तेथे त्यांनी प्रसूति-पूतिज्वरासंबंधी संशोधन केले. त्यानंतर त्यांनी पेस्ट येथील सेंट रोचेस रुग्णालयात सहा वर्षे काम केले (१८४८— ५३). त्यांची १८५५ मध्ये पेस्ट विद्यापीठात प्रसूतिविज्ञानाचे प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. १८५७ मध्ये त्यांनी झुरिक विद्यापीठात प्रसूतिविज्ञान अध्यासनाचे प्रमुख म्हणून काम केले.

यूरोपमध्ये रुग्णालयांतील प्रसूतिगृहांत त्या काळी प्रसूति-पूतिज्वराने होणारे मातांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त होते. ते जवळजवळ २५— ३०% इतके होते. सिमेलव्हाईस यांनी याबाबतचे संशोधन हाती घेतले. त्यावेळी बहुतेक स्त्रियांची घरीच प्रसूती होत असे. काही गरीब स्त्रिया, कुमारी वा प्रसूतीमध्ये समस्या निर्माण झालेल्या स्त्रिया रुग्णालयात दाखल होत असत. सिमेलव्हाईस यांच्या निरीक्षणानुसार रुग्णालयातील पहिल्या विभागात प्रसूति-पूतिज्वरामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण दुसऱ्या विभागापेक्षा दोन ते तीन पटींनी जास्त होते. रुग्णालयातील पहिल्या विभागात शिकाऊ वैद्यकीय विद्यार्थी काम करीत व दुसऱ्या विभागात सुईणी (परिचारिका) काम करीत. दोन्ही विभागांतील सुविधा सारख्याच होत्या. त्यांच्या एका मित्राचा मृत्यू जखमेच्या संसर्गातून झाला. हा मित्र पहिल्या विभागात काम करीत होता. यावरुन त्यांनी विच्छेदनगृहातून प्रसूतिगृहात येणारे वैद्यकीय विद्यार्थी या रोगाच्या प्रसाराला कारणीभूत होत आहेत म्हणजे ते या रोगाचे जंतू निरोगी मातांपर्यंत पोहोचवितात, असा निष्कर्ष काढला. या वैद्यकीय विद्यार्थ्यांनी त्यांचे हात क्लोरीनयुक्त पाण्याने (कॅल्शियम क्लोराइड विद्रावाने) धुवावेत व नंतरच स्त्रियांची तपासणी करावी असा आदेश सिमेलव्हाईस यांनी दिला. यामुळे १८४८ च्या मार्च महिन्यात पहिल्या विभागातील मृत्यूचा दर १८·२५% वरुन १·२७% इतका कमी झाला आणि नंतरच्या ऑगस्ट महिन्यात एकाही महिलेचा या रोगाने मृत्यू झाला नाही. व्हिएन्ना येथील तरुण वैद्यकीय व्यावसायिकांनी त्यांच्या शोधाचे महत्त्व ओळखले व त्यांना सर्व प्रकारची मदत केली. मात्र सिमेलव्हाईस यांचे वरिष्ठ त्यांच्या कार्याचे महत्त्व ओळखू शकले नाहीत.

पेस्ट येथील सेंट रोचेस रुग्णालयात प्रसूतिविभागाचे प्रमुख म्हणून काम करताना त्यांनी तेथील कामाच्या पद्घतीत सुधारणा केल्या. यामुळे तेथील प्रसूति-पूति-ज्वरामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण ०·८५% इतके कमी झाले. त्यावेळी प्राग व व्हिएन्ना येथे या रोगामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण १०— १५% इतके होते. हंगेरी शासनाने परिपत्रक काढून जिल्हाप्रमुखांना सिमेलव्हाईस यांची प्रोफॅलॅरीक पद्घत सुरु करण्यास सांगितले. मात्र व्हिएन्ना शासनाने त्यांचे संशोधन शेवटपर्यंत स्वीकारले नाही.

सिमेलव्हाईस यांनी १८६१ मध्ये Die Antilogie der Begriff und die prophylaxis kindbettfibers (इं. शी. दि एन्टिऑलॉजी अंडरस्टँडिंग अँड प्रिव्हेन्शन ऑफ चाइल्डबेड फीव्हर) हा ग्रंथ लिहिला. त्यांनी हा ग्रंथ जगातील प्रमुख प्रसूतितज्ञांकडे पाठविला परंतु त्यांच्या प्रतिकिया फारशा अनुकूल नव्हत्या. जर्मन शरीरक्रियावैज्ञानिक तसेच निसर्गवैज्ञानिकांच्या परिषदेत बहुतेक वक्त्यांनी तसेच विकारविज्ञ ⇨ रुडोल्फ लूटव्हिख कार्ल फिरखो यांनी त्यांचा सिद्घांत स्वीकारला नाही. या विरोधामुळे ते मानसिक दृष्ट्या खचले. त्यांना मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले.

व्हिएन्ना येथे त्यांचा मृत्यू झाला.

पाटील, चंद्रकांत प.