सोन्थायमर, गुंथेर डीट्स : (२१ एप्रिल १९३४-२ जून १९९२). जर्मन प्राच्यविद्यापंडित, हिंदू धर्म व समाज यांचे अभ्यासक व विवेचक. त्यांचा जन्म वॉल्टर आणि हेर्मा या दांपत्यापोटी उल्म (प. जर्मनी) येथे झाला. सुरुवातीचे शिक्षण जन्मगावी घेऊन ते एबरहार्डलूडविग जिम्नॅशियममधून मॅट्रिक झाले (१९५३). माध्यमिक शिक्षणाच्या काळातच काही सहाध्यांमुळे भारत व भारतविद्या यांसंबंधी त्यांच्यात जिज्ञासा निर्माण झाली आणि त्यांच्याच सहकार्याने ‘भारत मजलिस’ या अभ्यासगटाची स्थापना करून तिचे नेतृत्व केले. सोन्थायमर यांना भारतीय समाजजीवन व भारतविद्येचे खूप आकर्षण होते परंतु वडिलांच्या स्वप्नपूर्ततेसाठी त्यांनी ट्यूबिंजेन विद्यापीठात कायद्याचे शिक्षण पूर्ण केले (१९५८), तथापि वकिलीचा व्यवसाय केला नाही. हिंदू विधी व धर्मशास्त्राच्या अभ्यासासाठी ते भारतात आले. १९५८ ते १९६१ या काळात प्राचीन हिंदू धर्मशास्त्राचा अभ्यास पुण्याच्या लॉ कॉलेजचे प्राचार्य जी. व्ही. पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली केले तसेच संस्कृत भाषेचा अभ्यास प्रा. वि. म. बेडेकर यांसोबत केला. याच कालखंडात डी. डी. कोसांबी यांच्याशी परिचय झाला आणि त्यातून लोकसंस्कृतीविषयी जिज्ञासा निर्माण झाली. कोसांबी यांच्या विचारधारेचा खोलवर ठसा त्यांच्या मनावर उमटला. १९६१ मध्ये त्यांनी लंडनच्या स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीजमध्ये प्रवेश घेतला. तेथील प्राच्यविद्यापंडित जे. डी. एम्. डेरेट यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच्.डी.चा अभ्यास केला. त्यांच्या प्रबंधाचा विषय होता ‘द जॉईंट हिंदू फॅमिली : इट्स ईव्हॅलूशन ॲज ए लिगल इन्स्टिट्यूशन’ आणि पदव्योत्तर पदविकेचा विषय होता ‘द कन्सेप्ट ऑफ दाय : ए कंपेरेटिव्ह स्टडी’ हे त्यांचे दोन्ही प्रबंध ग्रंथरूपात प्रसिध्द झाले. पीएच्.डी. प्राप्त केल्यानंतर (१९६४) भारतविद्येच्या अध्ययनासाठी आणि संशोधनासाठी विशेष प्रसिध्द असलेल्या हायडेलबर्ग विद्यापीठात त्यांनी प्रवेश घेतला. पुढील बहुतेक कार्य या विद्यापीठातच केले. येथे प्राध्यापक असताना संशोधनासाठी भारताच्या विविध भागांत ते जात असत.

सोन्थायमर यांनी संस्कृत, हिंदी, मराठी, तेलुगू या भाषा आत्मसात केल्या. त्यामुळे हिंदूंच्या अगदी तळागाळातल्या समाजांपर्यंत ते सहज पोचून त्यांचे आचारधर्म, विचार समजून घेणे त्यांना शक्य झाले. मराठी भाषेतील प्रावीण्यामुळे महाराष्ट्रातील धनगर समाजांशी सहज संवाद साधता आला, इतका की धनगर मंडळी त्यांना आपल्यातील एक असे समजू लागली. या समाजाचे आचार, उत्सव, देवदेवता यांविषयीचे ज्ञान प्राप्त केले. महाराष्ट्रात खेडोपाडी आढळणारे वीरगल व सतीचे दगड हा त्यांच्या कुतूहलाचा, जिज्ञासेचा आणि अभ्यासाचा विषय बनला होता. त्याची माहिती त्यांनी ‘मेमोरिअल स्टोन्स : ए स्टडी ऑफ देअर ऑरिजिन, सिग्निफिकन्स अँड व्हरायटी’ (सहलेखक सेत्तार) या व्याप्तिलेखात दिली आहे. शिवाय मध्य प्रदेश भागातील तसेच कोरकू, गोंड जमातींतील मृतांची स्मारके इत्यादींचा परामर्श त्यांनी घेतला. हायडेलबर्ग विद्यापीठात त्यांनी अध्यापनाबरोबर संशोधनही केले. त्याच विद्यापीठाच्या साउथ एशिया इन्स्टिट्यूट या दिल्लीस्थित शाखेत प्रमुख प्राध्यापक म्हणून त्यांनी अध्यापन केले (१९७३-७५). पुढे व्होल्क्सवॅगन फाउंडेशनच्या वतीने त्यांनी १९७९ ते १९९१ दरम्यान क्षेत्रीय प्रकल्पांत महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी राज्यांत संशोधनात्मक कामे केली.

हिंदू धर्माच्या अंतर्गत किती वैविध्ये दडली आहेत, याने ते स्तिमित झाले आणि सर्वांचा एकत्र विचार करून हिंदू धर्म म्हणजे काय आहे, तो कसा समजून घेता येईल याविषयीची त्यांनी तार्किक मांडणी केली. प्रथमच त्यांनी स्पष्ट केले की, ख्रिश्‍चन, इस्लाम वा ज्यू धर्मांप्रमाणे हिंदू धर्माला संस्थापक नाही, धर्मग्रंथ नाही, संघटना नाही. ते केवळ धर्माचे विशिष्ट स्वरूप ज्यांच्या परिचयाचे आहे त्या विशेषतः पाश्‍चात्त्य अभ्यासकांना हे स्वरूप बाजूस ठेवावे लागते. त्यांच्या मते हिंदू धर्म हा एक विशाल, काहीसा अथांग असा प्रवाह आहे. यात वेळोवेळी मतमतांचे अनेक झरे येऊन मिसळले आहेत. या सर्वांना सामावून घेऊन हा प्रवाह अविरत पुढे चालला आहे मात्र याचे पाच घटक ओळखून येतात. ते असे : ब्राह्मणांनी प्राचीन काळी निर्माण केलेले वाङ्मय-वेद, धर्मशास्त्र इ संन्यासमार्ग संसाराचा त्याग करून जप, तप, योग इ. मार्गांनी अंतिम सत्याचा शोध घेण्याचा यत्न करणारे विविध पंथ आज वनवासी असलेल्या किंवा झालेल्या जमातींचे आचार, देवदेवता इ. लोकधर्मपशुपालनासारख्या व्यवसायातील धनगरांसारखे समाज, त्यांच्या खंडोबासारख्या देवता (त्यांचा उगम) आचारधर्म इ. आणि सगळ्यात शेवटी भक्तिमार्ग, मूर्तिपूजा आणि कृष्ण, शिव यांसारख्या दैवतांची भक्ती करणारे पंथ व त्यांचे ग्रंथ, आचार इ. हे सर्व घटक एकमेकांवर सतत परिणाम करीत आलेले आहेत. याचे अत्यंत विस्तृत व उदाहरणांसहित वर्णन व चर्चा सोन्थायमर यांनी हिंदुइझ्म : द फाईव्ह कम्पोनन्ट्स अँड देअर इंटरॅक्शन (त्याचीच सुधारित आवृत्ती हिंदुइझ्म रिकंसिडर्ड-१९९७) या निबंधात केली आहे. याशिवाय त्यांच्या बीरोबा, म्हस्कोबा अँड खंडोबा… या जर्मन ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर ॲन फेल्डहौस यांनी पॅस्टोरल डेअटीज ऑफ वेस्टर्न इंडिया (१९९८) या ग्रंथाद्वारे केले आहे. ज्यात धनगर इ. पशुपालक समाजांचे स्वरूप इत्यादी विषयी त्यांनी चर्चा केलेली आहे. हिंदु धर्माची पूर्वग्रहविरहित चिकित्सा ही त्यांची सगळ्यात मोठी देणगी होय.

अल्पशा आजाराने त्यांचे अचानक दॉसनहिम (राइन-नेकर) येथे निधन झाले.

माटे, म. श्री.