अभीष्टचिंतन : एखाद्या व्यक्तीच्या, कुटुंबाच्या, संस्थेच्या, समाजाच्या अगर देशाच्या उत्कर्षाची इच्छा व्यक्त करणे म्हणजे ‘अभीष्टचिंतन’ होय. ह्या दृष्टीने ती एक सामाजिक क्रिया ठरते. जीवनातील एखादा महत्त्वाचा टप्पा गाठल्याचा प्रसंग अगर शुभसंस्काराचा दिवस, आप्तेष्टांना आणि इतर हितसंबंधियांना बोलावून त्यांच्यासह आनंदाने साजरा करण्याची पद्धत सर्व समाजांत सर्व काळी दिसून येते. आपला आनंद स्वतःपुरता न ठेवता तो इतरांपुढे व्यक्त करणे आणि आपल्या आनंदात इतरांनाही सहभागी करून घेणे ही एक सामाजिक प्रवृत्ती आहे. अशा वेळी आप्तेष्टांनी व इतर हितसंबंधियांनी प्रत्यक्षपणे हजर राहून अगर अन्यमार्गांनी संबंधित व्यक्तीचे, कुटुंबाचे, संस्थेचे अगर देशाचे अभीष्ट चिंतणे, ही तिची पूरक क्रिया आहे. वडीलधाऱ्यांनी लहानांचे अभीष्टचिंतन करणे म्हणजेच आशीर्वाद देणे होय.

 वाढदिवशी, वर्षारंभी, काही धार्मिक सणांच्या वा शुभसंस्कारांच्या दिवशी, देशाच्या स्वातंत्र्यदिनी वा संस्थेच्या वर्धापनदिनी संबंधित व्यक्तींचे किंवा इतर सामाजिक घटकांचे अभीष्ट चिंतणे हे सर्वत्र आढळते.

 परस्परांच्या जीवनात आनंद, आपुलकी व स्‍नेहभाव वृद्धिंगत होणे, या दृष्टीने या सामाजिक आचाराचे महत्त्व प्राचीन काळापासून आजतागायत यत्किंचितही कमी झालेले नाही.

हस्तांदोलन, आलिंगन, चुंबन, पाठ थोपटणे, टाळ्या वाजविणे, ओवाळणे, दृष्ट काढणे, पुष्पहार वा गुच्छ अर्पण करणे, हुर्रे…हुर्रे असा चीत्कार करणे हे अभीष्टचिंतनाचे आचार लोकप्रिय आहेत. प्रत्येक समाजाच्या अभीष्टचिंतनाच्या  प्रथा वैशिष्ट्यपूर्ण असतात. पत्रे, तारा, भेटकार्डे पाठवून शुभसंदेश देणे व सदिच्छा व्यक्त करणे हाही अभीष्टचिंतनाचा लोकप्रिय आधुनिक प्रकार आहे. 

पहा : अभिवादन.

कुलकर्णी, मा.गु. काळदाते, सुधा