मिशन व मिशनरी : ‘पाठविणे’ या अर्थाच्या मूळ लॅटिन धातूपासून बनलेले आणि आता मराठीत रूढ झालेले इंग्रजी शब्द पाठविण्याची कृती, संदेशवहानचे कार्य, संदेशवाहक वृत्तांचा समूह इ. अर्थांनी ‘मिशन’ शब्द वापरला जातो. प्रारंभीच्या काळात हा शब्द धार्मिक क्षेत्राबरोबरच राजकीय वगैरे क्षेत्रांशीही निगडित होता. परंतु सतराव्या शतकापासून तो प्रामुख्याने धार्मिक क्षेत्रामध्ये वापरला जात आहे. त्यामुळे ‘मिशन’ या शब्दाला धर्मप्रचाराचे कार्य, धर्मप्रचार करणारी संस्था व्यक्ती वा धर्मसंस्थेने धर्मप्रचारासाठी पाठविलेली व्यक्ती असा अर्थ रूढ झाला आहे. मराठीमध्ये ‘मिशनरी’ हा शब्द नामाप्रमाणेच ‘धर्मप्रचारात्मक’ इ. अर्थाने विशेषण म्हणूनही वापरला जातो. जगातील विविध धर्मानी कमीअधिक प्रमाणात मिशनरी स्वरूपाचे कार्य केले आहे. ख्रिस्ती, बौद्ध इ. धर्मांनी अधिक प्रमाणात, तर हिंदू, ज्यू इ. धर्मांनी ते कमी प्रमाणात केले आहे.

आपण ज्या धर्माचे अनुयायी आहोत, त्या धर्माचेच पालन केल्यामुळे ईश्वराची कृपा होऊन मानवाला सर्वश्रेष्ठ कल्याण प्राप्त होऊ शकते, अशी अनेक लोकांची धारणा असते. हे कल्याण केवळ स्वतःला प्राप्त व्हावे, एवढे त्यांना पुरेसे वाटत नाही. आपल्याप्रमाणेच इतरांचेही कल्याण व्हावे, अशी त्यांची इच्छा असते. त्यासाठी त्यांना स्वतःच्या मूळ धर्माचा त्याग करावयास लावून आपल्या धर्मात आणणे आवश्यक आहे, असे या लोकांना वाटत असते. अशा प्रकारचे धर्मांतर घडविण्यासाठी ते धर्मप्रचार करतात. हा धर्मप्रचार करताना कधी आपल्या श्रेष्ठत्वाचा अहंकार असतो, तर कधी इतरांच्या कल्याणाची खरीखुरी तळमळही असू शकते.

जगातील विविध धर्मांचा इतिहास पाहता धर्मप्रचारासाठी विविध मार्गाचा अवलंब झाल्याचे आढळते. युद्ध, हिंसाचार, जोरजबरदस्ती, फसवणूक, प्रलोभन, हृदयपरिवर्तन, सेवा, रोगनिवारण, दुष्काळ वगैरे संकटप्रसंगी केलेली मदत आणि साक्षरताप्रसार हे त्यांपैकी काही मार्ग होत. युद्ध, व्यापार वगैरे हेतूंनी इतर समाजांच्या संपर्कात येणारे लोक धर्मप्रसार करीत असले, तरी त्यांचे ते ध्येय आनुषंगिक व गौण असते. असे असले, तरी या मार्गांनी फार मोठ्या प्रमाणात ⇨ धर्मांतरे घडली आहेत. याउलट, धर्मप्रसाराच्या उद्देशानेच बाहेर पडणाऱ्या मिशनरी लोकांचा मात्र धर्मप्रसार हाच मुख्य उद्देश असतो. धर्मप्रसार करणाऱ्या लोकांचे धार्मिक या धर्मबाह्य कारणांनी स्वागत झाल्याची उदाहरणे आहेत. तशीच त्यांना विरोध झाल्याचीही उदाहरणे आहेत. मिशनरी लोकांच्या कार्यामुळे भिन्नभिन्न समाजांमध्ये सांस्कृतिक देवाणघेवाण होऊन समाजाच्या प्रगतीला हातभार लागल्याची जशी उदाहरणे आहेत, तशीच त्यांचे कार्य भिन्नभिन्न समाजांमध्ये द्वेष निर्माण करण्यास कारणीभूत झाल्याची उदाहरणे आढळतात. विविध धर्मांतील मिशनरी लोकांनी अज्ञाननिर्मूलन, साहित्यनिर्मिती, आरोग्य, जीवनमानातील सुधारणा इ. क्षेत्रांत केलेले कार्य अनेक दृष्टींनी महत्त्वपूर्ण ठरले आहे. या लेखात यहुदी वा ज्यू, पारशी, बौद्ध, हिंदू, ख्रिस्ती आणि इस्लाम या धर्मांतील मिशन व मिशनरी कार्याचा आढावा थोडक्यात घेतला आहे.

यहुदी वा ज्यू : स्थूलमानाने पाहता ज्यू धर्म हा मिशनरी स्वरूपाचा धर्म नाही. ज्यू धर्म हा निवडक म्हणजेच फक्त इस्राएली लोकांचा धर्म आहे, अशी प्राचीन काळातील ज्यू लोकांची धारणा होती. त्यामुळे इतरांना धर्मांतरीत करून आपल्या धर्मात आणण्याचा प्रयत्न त्या लोकांनी केला नाही. परंतु, परमेश्वर जगातील सर्व लोकांचा आहे, अशी भूमिका काही ज्यू विचारवंतांनी घेतल्यामुळे धर्मप्रचाराला आधार मिळाला होता, असे एक मत आढळते. प्रारंभीच्या रोमन साम्राज्यातील लोकसंख्येपैकी सु. एक दशांश लोक ज्यू होते. याचा अर्थ ज्यू लोक धर्मप्रचाराचे कार्य करीत होते, असाच होतो. इ. स. ७० मध्ये जेरूसमेलचा पाडाव झाल्यानंतर ज्यू लोकांना यातना भोगाव्या लागल्या आणि त्यानंतर धर्मप्रचाराचे कार्य कायमचे संपले, असे दिसते [⟶ ज्यू धर्म].


पारशी : पारशी धर्माची सुरुवात मिशनरी धर्म म्हणूनच झाली. सर्व लोकांना आपल्या धर्मात आणण्याची आकांक्षा ⇨ जरथुश्त्रांनी व्यक्त केल्याचे आढळते. बाल्खचा राजा विश्तास्प याला त्यांनी आपल्या धर्मात आणले होते आणि त्या राजाने जसजसे विजय मिळविले, तसतसा धर्माचा प्रचारही केला. धर्मप्रचार करताना मिशनरी लोकांना विरोध झाल्याची उदाहरणेही आढळतात. अवेस्ता पूर्ण झाल्यापासून ससान राजवट चालू होईपर्यंतच्या काळात या धर्माचा प्रसार आढळत नाही. परंतु ससान राजवटीचा उदय झाल्याबरोबर प्रचाराने कार्य पुन्हा सुरू झाले. या काळात चीनमध्येही या धर्माचा प्रचार झाला. या काळातच पर्शिया आणि आर्मोनिया येथे धर्मप्रचार करताना जोरजबरदस्ती झाल्याचे आढळते. अरबांनी ससान राजवटीचा अंत केल्यानंतर मिशनरी कार्य जवळजवळ समाप्त झाले. त्यानंतर पारशी लोक भारतात आले परंतु आपले वेगळेपण जपण्याची इच्छा असल्यामुळे त्यांनी धर्मप्रचार करून भारतीय लोकांना आपल्या धर्मात आणण्याचा फारसा प्रयत्न केला नाही.  [⟶ पारशी धर्म].

बौद्ध :  बौद्ध धर्म भारतात उत्पन्न झाला आणि नंतर श्रीलंका, मध्य आशिया, चीन, तिबेट, मंगोलिया, कोरिया, जपान इ. देशांतून पसरला. स्वाभाविकच, बौद्ध धर्माच्या इतिहासात मिशनरी वा धर्मप्रचाराच्या स्वरूपाचे कार्य महत्त्वाचे ठरते. एका दृष्टीने बौद्ध धर्म प्रारंभापासूनच मिशनरी स्वरूपाचा होता. स्वतः ⇨ गौतम बुद्धांनी धर्मप्रचार करता करता अनेकांना बौद्ध बनविले होते. नंतरच्या काळात सम्राट ⇨ अशोकाने (इ. स. पू. ३०३–२३२) धर्मप्रचारासाठी अद्वितीय कार्य केले आहे. त्याने बौद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी भारतात आणि भारताबाहेरही खास अधिकारी नेमले होते. स्वतःचा मुलगा वा भाऊ ⇨ महेंद्र आणि महेंद्राची बहीण ⇨ संघमित्रा यांना धर्मप्रचारासाठी त्याने श्रीलंकेला पाठविले होते. बौद्ध धर्माच्या प्रचारासाठीच त्याने पाटलिपुत्र येथे बौद्ध परिषद बोलावली होती आणि या परिषदेने ब्रह्मदेश, श्रीलंका, ग्रीस, सिरिया इ. देशांतून धर्मप्रचारक पाठविले होते. अशारीतीने अशोकाच्या काळातच धर्मप्रचाराच्या कार्याला मोठी गती प्राप्त झाली होती.

इ.स. ६७ मध्ये बौद्ध धर्म अधिकृतपणे चीनमध्ये पोहोचल्याचा ऐतिहासिक पुरावा आढळतो. तेथे मिंगती बादशहा राज्य करीत असताना ⇨ काश्यप मातंग आणि धर्मरक्षक (धर्मरत्न ?) हे दोन बौद्ध भिक्षू त्यावर्षी तेथे पोहोचले होते. इ. स. ७१ मध्ये अनेक सरदारांनी व ताओ पुरोहितांनी बौद्ध धर्म स्विकारला. पुढच्या काळात राज्यकर्त्यांनीही हा धर्म स्वीकारला. इ. स. १४८ मध्ये पार्थियामधून शिहकाओ हा भिक्षू चीनमध्ये आला. त्याने आरोग्यशास्त्राविषयी केलेले लेखन हे धर्मप्रचारकांनी या विषयावर केलेले जगातील बहुधा पहिले लेखन होय. इ. स. २२० मध्ये हान वंशाचे साम्राज्य समाप्त झाल्यानंतर तेथे छोटी छोटी राज्ये उदयास आली आणि त्यांच्या आश्रयाने धर्मप्रचाराचे कार्य चालू राहिले. याकाळात चांगान, लोयांग आणि चिएन-येह ही तीन महत्त्वपूर्ण केंद्रे निर्माण झाली. चौथ्या शतकात मध्य आशियामधून भिक्षू आले. त्यापैकी फो-तु चेंग ३१० मध्ये आला. त्याने ८९३ मठ व मंदिरे स्थापन केली. त्याच्या शिष्यांची संख्या तर दहा हजारांहून अधिक होती. भारत व श्रीलंका येथून समुद्रमार्गे भिक्षू गेल्याची वर्णने आढळतात. ⇨ कुमारजीव, बुद्धभद्र, ⇨ बोधिधर्म, कालयशस्, धर्ममित्र, गुणवर्मन इ. भिक्षूंचे कार्य महत्त्वाचे आहे. बौद्ध भिक्षूंनी भाषांतराच्या क्षेत्रात मोठे कार्य केले आहे. दुष्काळात लोकांना मदत करण्यासारखी कार्येही ते करीत असत. ताओ पंथाच्या [⟶ ताओ मत] राज्यकर्त्यांनी बौद्ध भिक्षूंचा छळ केल्याची उदाहरणे आढळतात.

सम्राट अशोकाने तिबेटात प्रचारक पाठविले होते परंतु अशोकाच्या राजवटीनंतर सु. शंभर वर्षांनी तिबेटात बौद्ध मंदिर स्थापन झाल्याची कथा आढळते. तिबेटी बौद्ध धर्माच्या दृष्टीने सातवे शतक अत्यंत महत्त्वाचे आहे. या शतकात स्त्रोंग्‌-चन्‌-गम्पो या तिबेटी राजाने चिनी राजकन्येशी विवाह केला. तिने आपल्याबरोरबर बौद्ध मूर्ती, ग्रंथ व काही भिक्षू आणले आणि त्यानंतर बौद्ध धर्माचा तिबेटमधील प्रचार वाढला. ३७४ मध्ये चीनमधून दोन भिक्षू कोरियामध्ये गेले आणि त्यानंतर कोरियात बौद्ध धर्माचा प्रसार सुरू झाला. सुमारे दीड शतकात संपूर्ण कोरिया बौद्ध बनला. कोरियामधून भिक्षू, कारागीर, वैद्य इ. बरोबर बौद्ध धर्म जपानमध्ये पोहोचला. तेथे प्रारंभीच्या काळात त्याला काहीसा विरोध झाला तरी पुढे तो मावळला. शोटोकूच्या कारकिर्दीत (५९३–६२२) बौद्ध धर्म हा राजधर्म बनला. या काळात कोरिया व चीनमधून भिक्षू बोलावले गेले आणि जपानी भिक्षूंना अध्ययनासाठी चीनमध्ये पाठविण्यात आले. चीनमध्ये बौद्ध धर्मप्रचाराच्या ओघात भाषांतराची कामे प्रमुख व वैद्यकीय मदतीसारखी जनहिताची कामे दुय्यम होती. परंतु जपानमध्ये मात्र जनहिताच्या कामांनाच प्राधान्य होते. जपानमध्ये बौद्ध धर्मप्रचाराच्या ओघात राष्ट्रीय ऐक्याचे कार्यही साधले गेल्यामुळे तेथे ते केवळ धार्मिक मिशन न राहता राजकीय मिशनही बनले होते, असे मानले जाते. [⟶ बौद्ध धर्म].


हिंदू : हिंदू धर्माचे स्वरूप मिशनरी कार्याला पोषक नव्हते व नाही असे दिसते. आपल्या धर्माच्या अनुयायांची संख्या वाढविण्याच्या दृष्टीने हिंदूनी प्रयत्न केल्याचे फारसे आढळत नाही. भारताबाहेरून भारतात आलेल्या अनेक मानवसमूहांना हिंदूनी आत्मसात करून घेतले असले, तरी या घटनेचे स्वरूप मिशनरी कार्याचे नाही. आग्नेय आशियात हिंदूची राज्ये निर्माण झाली, तेव्हा तेथे हिंदू धर्म पसरला होता. परंतु ती राज्ये गेल्यावर तेथील हिंदू धर्मही क्षीण झाला. हिंदूंनी इतर धर्मांतून आपल्या धर्मात कोणाला आणावयचा प्रयत्न केला नाही एवढेच नव्हे तर काही तात्कालिक कराणांनी इतर धर्मातील व्यक्तींच्या संपर्कात आलेले हिंदू बाटले असे मानून त्यांनी त्यांना दूर लोटले. शुद्धत्वाच्या कल्पना, धर्मांतरित व्यक्तीला चातुर्वर्ण्य आणि जातिव्यवस्था यांमध्ये स्थान देण्याच्या बाबतीतील तात्त्विक व व्यावहारिक अडचणी इ. मुळे हिंदूनी धर्मप्रचार करावयाचे टाळले, असे दिसते. आधुनिक काळात ⇨ आर्य समाज, ⇨ बाह्मोसमाज, ⇨ थिऑसॉफी, ⇨ रामकृष्ण मिशन इ. संस्थांनी व ⇨ विवेकानंदांसारख्या व्यक्तींनी बाह्य जगात हिंदू धर्माविषयी आकर्षण निर्माण केल्याचे आढळते. रामकृष्ण मिशनसारख्या संस्थांनी जनहिताची कामेही मोठ्या प्रमाणावर केली आहेत. या संस्थांनी हिंदूचे इतर धर्मात होणारे धर्मांतर टाळण्यात बरेच यश मिळविले आहे हे खरेअसले, तरी इतरांनी हिंदू धर्मात आणण्याच्या कृतीवर त्यांचा फारसा भर नाही आणि त्यामुळे त्यांचे कार्य मिशनरी म्हणता येईल, अशा स्वरूपाचे नाही. बौद्ध, जैन इ. एतद्देशीय धर्मांतील लोकांनी हिंदू धर्म स्वीकारावा, या दृष्टीने हिंदूंनी कार्य केले होते. हे कार्य मात्र मिशनरी स्वरूपाचे होते, असे म्हणता येईल. तसेच, हिंदू धर्मातील विविध संप्रदायांनी आपापल्या संप्रदायांत आणण्यासाठी केलेले प्रयत्नही काही अंशी मिशनरी स्वरूपाचे म्हणता येतील. [⟶ हिंदू धर्म].

साळुंखे, आ. ह.

ख्रिस्ती : ‘मिशन व मिशनरी’ हे शब्द उच्चारताच दुसऱ्या कोणत्याही धर्मापेक्षा ख्रिस्ती धर्माचीच आठवण होते यावरून ख्रिस्ती धर्मातील ‘मिशन’ ह्या संकल्पनेचे महत्त्व स्पष्ट होते. स्वतः ⇨ येशू ख्रिस्तापासूनच मिशनरी कार्याचा प्रारंभ झाला होता, असे दिसते.

येशूने स्वतःचे कार्यक्षेत्र जरी इस्राएल राष्ट्रापुरतेच मर्यादित केले होते, तरी सर्व राष्ट्रांतील लोकांस माझे शिष्य करा, असा त्याने आपल्या शिष्यांना शेवटचा आदेश दिला होता.

येशूचा शेवट जेवढ्या क्रूरपणाने केला गेला होता तेवढ्याच किंबहूना त्यापेक्षाही अधिक क्रूरपणाने रोमी सरकार व यहुदी धर्मगुरू ह्यांनी ख्रिस्तांच्या शिष्यांचा छळ केला. ह्या सत्त्वपरीक्षेतूनच पार पडत असता ख्रिस्ताच्या शिष्यांनी संत पौलाच्या (पॉलच्या) आदेशानुसार मोठ्या निष्ठेने, जिद्दीने व प्रेमाने धर्मप्रचाराचे कार्य केले. संत पौल व इतर धर्मदूत [⟶ अपॉसल] तसेच फिलिप, बार्नाबस, मार्क अपोलो व सिलास इ. पहिले ख्रिस्ती मिशनरी होत. ख्रिस्ताच्या बारा धर्मदूतांपैकी सेंट टॉमस हा एक असून त्याने भारतात येऊन केरळमध्ये सात ठिकाणी ख्रिस्ती चर्चेसची स्थापना केली. पौलाच्या मिशनरी दौऱ्यामुळे मध्य आशिया व दक्षिण यूरोपमध्ये एक मोठी धर्मक्रांती घडून आली. गरीब व विधवा ह्यांची काळजी घेणे, आर्थिक गरजा भागविणे, रोग्यांची शुश्रृषा करणे इ. कार्याचा समावेश पहिल्या शतकातच मिशनरी चळवळीत करण्यात आला. नंतरच्या काळात निओसेसरीयाचा बिशप ग्रेगरी थाऊमाटर्गास (इ.स. सु. २१३–२७०?–२७५?) ह्याने या दृष्टीने महत्त्वपूर्ण कार्य केले. लवकरच ख्रिस्ती धर्माचा प्रसार सर्व रोमन यूरोपमध्ये झाला. चौथ्या शतकाच्या प्रारंभास ग्रेगरी द इलूमिनेटरने स्वदेशात म्हणजे आर्मेनियात धर्मप्रचाराचे कार्य एवढ्या मोठ्या प्रमाणात केले, की तो संपूर्ण देश ख्रिस्ती झाला. हा इतिहासातील सर्वांत पहिला ख्रिस्ती देश होय. अरेबिया आणि हिंदुस्थान ह्या देशांतही ख्रिस्ती धर्माची स्थापना झाली.


पश्चिम यूरोपातही ख्रिस्ती धर्माचा प्रचार करण्यात आला. पोप ग्रेगरी पहिला याने ५९७ मध्ये सेंट ऑगस्टीनला ४० सहकाऱ्यांसह इंग्लंडला पाठविले. सहाव्या व सातव्या शतकांत आयर्लंडकडून ख्रिस्ती परिव्राजक स्कॉटलंड, जर्मनी, इटली, स्वित्झर्लंड येथपर्यंत गेले व त्यांनी तेथे ख्रिस्ती चर्चची स्थापना केली. आर्यलंडच्या कोलंबा (५२१–५९७) नावाच्या परिव्राजकाने स्कॉटलंडच्या धर्मपरिवर्तनासाठी ५६३ मध्ये आयोना नावाच्या बेटावर एक मठ स्थापन केला. सातव्या शतकात ब्रिटिश बेटाचे संपूर्ण धर्मांतर झाले. तेथील धर्मसेवकांनी उत्तर यूरोपात मिशनरी कार्य चालू ठेवले. जर्मनीतील कॉर्व्हे केंद्रातून धर्मप्रारक स्कॅडिनेव्हियन देशांत गेले. कॉन्स्टॅंटिनोपल (आजचे इस्तंबूल) आणि जर्मनीतील काही केंद्रांतून मिशनऱ्यांनी ख्रिस्ती धर्म स्लाव्ह लोकांपर्यंत नेऊन पोहचविला. सेंट सिरील (मृ. ८६९) आणि त्याचा भाऊ सेंट मिथोडिअस (मृ. ८८५) हे स्लाव्ह लोकांतील श्रेष्ठ मिशनरी होते.

नेस्टोरियन पंथाच्या ख्रिस्ती लोकांनी सातव्या, आठव्या आणि चौदाव्या शतकांत मिशनऱ्यांना चीनमध्ये पाठविले. आज बेजिंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काम्बालिक (काम्बाटिक) येथे मॉंटे कोर्नोच्या जॉनने (१२४७–१३२८) पोपचा प्रतिनिधी म्हणून ३४ वर्षे कार्य केले पण १३८० मध्ये टॅमरेलेनने चीनमधील ख्रिस्ती धर्माचा नायनाट केला.

सोळाव्या शतकापासून पुढे कॅथालिकांमध्ये मिशनरी कार्य फार भरभराटीस आले. त्यामुळे उत्तर, मध्य व दक्षिण अमेरिका, आफ्रिका व आशियात ख्रिस्ती धर्माचा प्रसार झाला. या चळवळीवर प्रकाश टाकणारे काही मुद्दे खालीलप्रमाणे आहेत : १५३२ मध्ये काँगोत स्वदेशी बिशप होते. ⇨ सेंट फ्रान्सिस झेव्हिअर यांचे १५४२ मध्ये गोव्यात आगमन झाले. १५४५ मध्ये मलॅका (पूर्व मेशिया) येथे, १५४६ मध्ये मोलकाझ (इंडोनेशिया) येथे आणि १५४९ मध्ये जपान येथे शुभवर्तमान सांगितले गेले. १५८१ पासून फिलिपीन्समधील मानिला ही बिशपची कर्मभूमी झालेली आहे. उत्तर, मध्य व दक्षिण अमेरिकेत मिशन केंद्रे स्थापन करण्यात आली आणि ही केंद्रे आज भरभराटीस आलेली शहरे आहेत. मोगलसम्राट अकबराने १५८० मध्ये त्याच्या फतेपुर सीक्री येथील दरबारात रिडॉल्फो आक्वाव्हीव्हा यास बोलावून घेतले होते. १६०१ सालापासून माटेओ रीत्ची हा बेजिंग या चीनच्या राजधानीत राहिला. काही मिशनऱ्यांनी, विशेषतः जेझुइटांनी, ‘संस्कृति-स्वीकृती’ चा पुरस्कार केला. या पद्धतीद्वारे प्रत्येक संस्कृतीतील ‘सत्यंशिवंसुंदरम्‌’ चे जतन करावे प्रत्येक संस्कृतीतील ‘सत्यंशिवंसुंदरम’ चा नाश करता पुरस्कार केल्यामुळे ख्रिस्तीत्व हे परकीय न वाटता, ते स्वदेशी आशा आकांक्षांची पूर्ती करेल असे त्यांना वाटत होते. या संदर्भात चीनमध्ये माटेओ रीत्ची (१५५२–१६१०) यांचे व भारतात ⇨ फादर स्टीफन्स (१५४९–१६१९), रॉबेर्तो डी नोबीली (१५७७–१६५६) आणि ⇨ रेव्हरंड बेस्की (१६८०–१७४६) यांचे कार्य महत्त्वपूर्ण आहे.

पोप पंधरावे ग्रेगरी यांनी १६२२ मध्ये विश्वासप्रसारक संस्था (प्रॉपगेशन ऑफ द फेथ) स्थापन केली कारण पोर्तुगीज आणि स्पॅनिश सत्तेशी जवळचे संबंध असलेले मिशनरी कार्य त्यांना मुक्त करावयाचे होते. विश्वासप्रसारक संस्थेचे पहिले मोठ्या प्रमाणातील कार्य इंडोचायनामध्ये आणि कॅनडातील रेड इंडियन लोकांमध्ये सुरू झाले. यूरोपमधील राजकीय अस्थिरतेमुळे आणि तेथील कॅथलिक राज्यकर्त्यांच्या दडपणामुळे पोपला कॅथलिक मिशन यांतील सर्वांत मोठा असलेला जेझुइट संघ १७७३ मध्ये विसर्जित करावा लागला (१८१४ मध्ये त्याची पुर्नस्थापना झाली) आणि त्यामुळे अठराव्या शतकाच्या शेवटास कॅथलिक मिशनऱ्यांच्या कार्याला जवळजवळ पूर्णविराम देण्यात आला.

प्रॉटेस्टंट चर्च अस्तित्वात येऊन अनेक पिढ्या होऊन गेल्यानंतरच त्यांनी धीमेपणाने मिशनरीकार्यास जगभर आरंभ केला. सुरुवातीला त्यांच्या मिशनरी चळवळींचा रोख-विशेषतः स्वातंत्र्यप्राप्तीनंतर उत्तर अमेरिकन राष्ट्रांत – त्यांच्या राष्ट्रांतील धार्मिक चर्चेसच्या धार्मिक नूतनीकरणाकडे होता. त्यासाठी स्वदेशी मिशन (होम मिशन) ची योजना आखण्यात आली. त्यामुळे आलेल्या अनुभवाचा फायदा घेऊन त्यांनी यूरोप, युनायटेड स्टेट्‌स, इंग्लंड ह्या देशांत विदेशी (फॉरेन) मिशनची स्थापना केली. उत्तर अमेरिकेत प्रॉटेस्टंट मिशनचा प्रारंभ झाला. जॉन इलिक्ट (१६०४–९०) व मुख्यत्वे डेव्हिड ब्रेनर्ड (१७१८–४७) ह्यांचे मिशनरी कार्य नंतरच्या पिढीस आदर्शभूत ठरले.


इंग्लंडमध्ये सोसायटी फॉर द प्रोपगेशन ऑफ द गॉस्पेल इन फॉरेन पार्ट्‌स – एस्‌ पी. जी. (१७०१), द. सोसायटी फॉर प्रॉपगेटिंग ख्रिश्चन नॉलेज – एस्‌. पी. सी. के. (१६९९) इ. संस्था स्थापन करण्यात आल्या. त्या आजही कार्यरत आहेत. अठराव्या शतकाच्या शेवटी व एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी विदेशी मिशनची चळवळ सर्व यूरोपभर पसरली. हिंदुस्थान, आफ्रिका, मध्य आशिया, पूर्व आशिया इ. देशांत यूरोप व अमेरिकेतून वेगवेगळया ख्रिश्चन पंथांची विदेशी मिशन्स येऊ लागली. प्रथम प्रॉटेस्टंट लोकांनीच नव्याने सुरू झालेल्या आधुनिक मिशनरी कार्याचा पुरस्कार केला. त्यांच्यानंतर कॅथलिकांनी सुरुवात केली.

विल्यम कॅरी (१७६१–१८३४) हे भारतातील आधुनिक मिशनरी कार्याचे संस्थापक होत. १७९३ मध्ये ते कलकत्त्यात आले पण इंग्रजांनी त्यांच्या हद्दीच्या जागेत त्यांना राहू न दिल्यामुळे ते जवळीलच डॅनिशांच्या ताब्यातील सेरामपूर येथे स्थायिक झाले. मिशनरी कार्याबरोबरच शिक्षण व इतर सेवाकार्य करणे, बायबल विविध भारतीय भाषांत अनुवादित करून प्रकाशित करणे या गोष्टी भारतातील आधुनिक मिशनरी कार्यास आदर्शभूत ठरल्या. धर्मांतराच्या उद्देशाने धर्मप्रसार हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट होते. शाळा व दवाखाने काढून पाश्चिमात्य आचारविचारांचा फैलाव करणे, आर्थिक साहाय्य करणे इ. मार्गाचा त्यासाठी अवलंब करण्यात येऊ लागल्यामुळे ह्या कार्याला थोडाबहुत विरोध होता व आहेही. स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वी हिंदुस्थानात जी नामांकित शाळा, महाविद्यालये, दवाखाने सुरू करण्यात आले, ते मुख्यत्वे मिशनऱ्यांनीच सुरू केले आहेत.

गरीब आणि दलितांसाठी, समभावाच्या शिक्षणप्रसारासाठी मनुष्याला व्यक्ती म्हणून महत्त्व देण्यासाठी, स्त्रीसुधारणेसाठी, कामाच्या प्रतिष्ठेसाठी आणि सेवेच्या धार्मिक समर्पकतेसाठी जागृती निर्माण करण्यास मिशनरी कार्य चैतन्यदायी ठरले.

दुसऱ्या महायुद्धानंतर या कार्याचा परिणाम म्हणून तिसऱ्या जगातील लोकांत जागृती निर्माण होऊ लागली व मिशनरी कार्याऐवजी स्वदेशी ख्रिस्तमंडळी रूढ होऊ लागली. आजच्या ख्रिस्तमंडळीला स्वदेशी नेतृत्व लाभले असून ते स्वतःच जबाबदार घटक आहेत. प्रथम ख्रिश्चनांनी पुरस्कृत केलेली सेवाकार्ये (शिक्षण, अनाथगृहे, औषधोपचार इ.) आज मोठ्या प्रमाणात सर्वधर्मियांनी आणि सरकारनेही चालू केली आहेत. सेवेच्या नवीन पद्धती (अनौपचारिक शिक्षण, लोकजागृती इ.) सर्वधर्मीयांच्या सहकार्याने करण्यात येत आहेत. [⟶ ख्रिस्ती धर्म].

आयरन, जे. डब्ल्यू.


इस्लाम : इस्लाम धर्माचा प्रचार कसकसा झाला, याची मुसलमान इतिहासकारांनी फारशी नोंद केलेली नाही. याउलट इस्लामच्या प्रसाराकडे भयपूर्वक पाहणाऱ्या ख्रिस्ती धर्मगुरूंच्या लेखनातूनच इस्लामी धर्मप्रचाराची विस्तृत माहिती मिळते. पुरोहितशाही, धर्मप्रचारसंघ, प्रशिक्षित धर्मप्रचारक इत्यादींचा इस्लाममध्ये अभावच होता. धर्मप्रचारासाठी स्थापन झालेले भारत, ईजिप्त इ. देशांतील संघ एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस निर्माण झाले आहेत. त्यामुळे इस्लाम धर्मात ख्रिस्ती धर्मासारखे धर्मप्रचाराविषयीचे विस्तृत साहित्य आढळत नाही. परंतु स्वत: ⇨ मुहंमद पैगंबरांच्या चरित्रामधून धर्मप्रचाराविषयीची बरीच माहिती मिळते. धर्मप्रचाराच्या कार्याला स्वतः त्यांच्या जीवनापासूनच प्रारंभ झाला होता. इस्लामचा प्रचार करण्याविषयीचे आदेश प्रत्यक्ष कुराणातही आढळतात. पैगंबरांनी प्रथम आपल्या कुटुंबियांचे धर्मांतर केले आणि त्यानंतर तीन वर्षांनी सार्वजनिक स्वरूपात धर्मप्रचारास प्रारंभ केला. प्रारंभीच्या काळात त्यांना मोठ्या प्रमाणात यश मिळाले नसले, तरी हळूहळू त्यांचे प्रयत्न यशस्वी झाले, असे दिसते.

मंगोल लोकांमध्ये धर्मप्रचार करताना इस्लामला ख्रिस्ती व बौद्ध धर्मांबरोबर स्पर्धा करावी लागली. तेराव्या शतकातील बराकखान हा इस्लाम धर्म स्वीकारणारा पहिला मंगोल राज्यकर्ता होय. मंगोलांचा राज्यविस्तार चीनपर्यंत झाल्यामुळे चीनमध्ये इस्लामचा प्रचार होणे सुलभ झाले भारतामध्ये आठव्या शतकापासूनच सिंध व मलबार येथे इस्लामचा प्रचार सुरू होता. भारत व अरबस्तान येथील व्यापाऱ्यांमुळे सुमात्रा बेटात इस्लामचा प्रचार झाला. आफ्रिकेतही इस्लामचा मोठ्या प्रमाणात प्रचार झाला आहे. धर्मप्रचारकांच्या प्रयत्नानाबरोबरच युद्धातील विजय, व्यापार इ. कारणांनीही धर्मप्रचार झाल्याचे आढळते.

काही विचारवंतांच्या मते प्रत्येक मुस्लिम व्यक्ती ही धर्मप्रचारक असते. तुरुंगातील कैद्यांनीही धर्मप्रचार केल्याची उदाहरणे आढळतात. एका कैद्याकडूनच पूर्व यूरोपात इस्लाम धर्माचा प्रवेश झाला. भारतात शेख अहमद मुजादीद याने सतराव्या शतकात कैदेत असताना अनेकांचे धर्मांतर घडविले होते. मुसलमान स्त्रियांनी मंगोल वा ख्रिस्ती पतीशी लग्न झाल्यानंतरही इस्लाम धर्माचा प्रसार घडवून आणल्याची उदाहरणे आढळतात. [⟶ इस्लाम धर्म].

संदर्भ : 1. Baptista, E. W. The East Indians, Catholic Community of Bombay, Bombay, 1967.

             2. Buehlmann, W. The Coming of The Third Church, England, 1976.

             3. Dwight, H. O. and   Others, Ed. The Encyclopaedia od Missions, 1904.

             4. Latourette, K. S. A History of the Expansion of Christianity, 7 Vols, (2 nd ed.), London, 1971.

             5. Perumalil, A. C. The   Apostles in India, Patna, 1971.