गोषापद्धति : स्त्रियांनी आपले मुख अगर सर्व शरीर अवगुंठित करण्याची प्रथा म्हणजे गोषापद्धती होय. अपरिचित पुरुषांच्या पुढे, सार्वजनिक ठिकाणी वा घरांतील वडीलधाऱ्या माणसांपुढे, विशेषतः सासू-सासऱ्यांच्या समोर, गोषा स्वीकारण्याची पद्धत आहे. भिन्न भिन्न समाजांत गोषापद्धतीची कारणे व स्वरूप यांत भिन्नता आढळते.

स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने न वागविता त्यांच्या स्वातंत्र्यावर आणि समाजात मोकळेपणाने वावरण्यावर बंधने घातल्याची उदाहरणे अनेक समाजात आढळून येतात. परंतु गोषापद्धतीची पूर्णावस्था मात्र इस्लाम धर्मीयांतच पहावयास मिळते. इस्लाम धर्मीयांनी ही पद्धती तत्पूर्वीच्या यहुदी समाजाकडून उचलली आणि तिला धार्मिक अधिष्ठान प्राप्त करून दिले, असे मानले जाते. म्हणून इस्लाम धर्माबरोबर गोषापद्धतीही सर्वत्र पसरल्याचे दिसून येते. आधुनिक काळात मात्र इस्लामी राष्ट्रांमध्ये ही पद्धती राष्ट्रवाद, शिक्षण, प्रचलित विचारसरणी आणि आर्थिक दडपण या कारणांमूळे हळूहळू नष्ट होत आहे. तुर्कस्तानात केमाल अतातुर्क याच्या आज्ञेवरून १९२६ साली, इराणमध्ये १९३५ साली आणि अफगाणिस्तानात १९५९ साली ही पद्धती बंद करण्यात आली. इंडोनेशियात ही पद्धती कधीच अस्तित्वात नव्हती. पाकिस्तानात याविषयी धर्माचा पगडा तीव्र असला, तरी काही स्त्रीधुरीणांच्या प्रयत्नाने ही पद्धती अशिक्षित व खालच्या स्तरावरील स्त्रियांपुरतीच मर्यादित राहिली आहे. भारतीय हिंदूंमध्ये गोषापद्धती नसली, तर घरातील वडीलधाऱ्या माणसांना आदर दाखविण्याकरिता त्यांच्यासमोर स्त्रियांनी तोंडावर पदर ओढण्याची रूढी अजूनही पारंपरिक कुटुंबांमध्ये दिसून येते.               

कुलकर्णी, मा. गु.