भगिनी निवेदिता

निवे​दिता, भ​गिनी: (२८ ऑक्टोबर १८६७–१३ ऑक्टोबर १९११). ​विवेकानंदांच्या ​शिष्या आ​णि भारतीय स्वातंत्र्याच्या व संस्कृतीच्या एक ​निष्ठावंत पुरस्कर्त्या. मूळ नाव मार्गारेट नोबल. वडील सॅम्युअल व आई इझॅबेला या आयरिश दांपत्यापोटी आयर्लंडमधील उनगॅनन गावी जन्म. वडील ​ख्रिस्ती धर्मोपदेशक ‌‌‌होते. चर्चतर्फे चालविण्यात येणाऱ्या हॅ​लिफॅकस महाविद्यालयात त्यांचे ​शिक्षण झाले. व​डिल ​निवर्तल्यानंतर लंडनमध्ये त्यांनी ​शिक्षिकेचा व्यवसाय पतकरला. पेस्टालोत्सी व फ्रबेल यांच्या नवीन ​शिक्षणपद्धतीच्या प्रभावामुळे १८९२ साली ​विंबल्डन येथे शाळा काढली. ‌‌‌१८९५ मध्ये त्यांची विवेकानंदांशी भेट झाली विवेकानंदांच्या या भेटीने त्यांची संपूर्ण ‌‌‌जीवनदृष्टीच बदलली. प​रिणामतः ​विवेकानंदांच्या आवाहनानुसार त्यांच्या कार्यास वाहून घेण्याकरिता त्या १८९८ साली २८ जानेवारी रोजी भारतात आल्या. परकीय म्हणून त्यांच्या कार्यात प्रथम पुष्कळ अडथळे आले ‌‌‌परंतु ​विवेकानंदांनी ​विरोधकांची समजूत पटवून ते दूर केले. प्रथम शारदामाता (रामकृष्ण परंमहसांची पत्नी) यांसारख्या म​हिलांकडून ​हिंदू धर्माचे अनेक संस्कार त्यांनी आत्मसात करून घेतले. कलकत्त्याच्या ‘बोस पारा लेन’ मध्ये कर्मठ लोकांच्या वस्तीत राहून आपल्या ​विनयशील, सालस व प्रेमळ ‌‌‌वागणुकीने तेथील कर्मठ लोकांनाही आपलेसे करून घेतले. ११ मार्च १८९८ रोजी कलकत्त्याच्या स्टार रंगमंदिरात आयोजित केलेल्या सभेत धर्मशिक्षण व ​हिंदभूमीची सेवा करण्याचे आपले उ​द्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. २५ मार्च १८९८ रोजी त्यांना ​विधिपूर्वक ब्रहाचा​रिणीव्रताची दीक्षा स्वामी ​विवेकानंदानी दिली व त्यांचे नाव ​निवे​दिता ठेवले. स्वामीजींबरोबर प्रवास केल्यामुळे ​हिंदू लोक व त्यांच्या चालीरीती, धर्मकल्पना आ​णि इतिहास यांची त्यांना जवळून कल्पना आली. १२ नोव्हेंबर १८९८ रोजी ​दिवाळीच्या ​दिवशी त्यांनी कलकत्त्यातील बागबाजार येथे एका बा​लिका ​विद्यालयाची स्थापना करून राष्ट्रीय​ शिक्षणकार्यास आरंभ केला. फेब्रुवारी १८९९ साली कलकत्त्यात उद्‌भवलेल्या प्लेगच्या साथीत त्यांनी सेवाकार्य केले. त्याच साली अमेरिकेत गेल्या व तेथे त्यांनी रामकृष्णसाहाय्य संस्था स्थापन केली.पॅ​रिस व लंडन येथील प्रवासानंतर १९०२ साली त्या ‌‌‌भारतात परतआल्या. त्याच वर्षी ​विवेकानंदांचे ​निधन झाले व निवेदितांनी रामकृष्ण मंडळाबाहेर पडून राष्ट्रीय स्वातंत्र्य आंदोलनास वाहूनघेतले. १९०२ ते १९०४ या काळात सर्व भारतात प्रचारदौराकरून लोकांत जागृती ​निर्माण केली. जुन्या व नव्या उपयुक्त आचारविचारांचा समन्वय करून स्वतंत्र, संघ​टित व‌‌‌ समर्थ भारत बन​विण्याचे ​विवेकानंदांचे ध्येय साकार करण्याक​रिता त्यांनी ​जिद्दीने प्रयत्न केला. त्याक​रिता त्यांनी देशप्रेमी व स्वार्थत्यागी तरूणांची संघटना उभारली. त्या काळातील प्रमुख राजकीय पुढाऱ्यांशी व सशस्त्र क्रां​तिवादी संघटनांशीही त्यांचा संबंध होता. १९०२ साली पुण्याला जाऊन ‌‌‌हुतात्मे झालेल्या चाफेकर बंधूच्या मातेची पायधूळ डोक्यासलावली. १९०५ साली बनारसला भरलेल्या काँग्रेस अ​धिवेशनात भाग घेतला व स्वदेशी चळवळीला पाठिंबा देऊन स्वदेशीचे व्रत अंगीकारले. त्याच साली लॉर्ड कर्झनच्या ‌‌‌बंगाल-फाळणीच्या योजनेला त्यांनी कडवा ​विरोध केला. जामिनाक​रिता हवी असलेली रक्कम काही तासात जमा करून भूपेंद्रदत्त यास त्यांनी जा​मिनावर सोड​विले. १९०६ साली पूर्व बंगालमध्ये दुष्काळाने व पुराने थैमान घातले असताना, त्यांनी अ​विश्रांत प​रिश्रम घेऊन लोकांना मदत केली., यूरोपात व अमे​रिकेत असलेल्या ‌‌‌भारतीयांना इंग्रज राजवटीविरूद्ध संघ​टित करण्याचाही त्यांनी प्रयत्न केला.

निवे​दिता भारतात येण्यापूर्वीही लेखन करीत होत्याच भारतात आल्यानंतर त्यांचे अनेक लेख ​रिव्हू ऑफरिव्हूज, द प्रबुद्ध भारत, मॉडर्न रिव्हू इ. ​नियतका​लिकांतून प्रसिद्ध झाले. काली द मदर (१९००), द वेब ऑफ इंडियन लाइफ (१९०४ ), क्रेडल टेल्सऑफ हिंदूइझम (१९०७), इंडियन स्टडीज ऑफ लव्ह अँड डेथ (१९०९) आ​णि मास्टर ज आय सॉ हिम (१९१०) ही त्यांची महत्त्वाची पुस्तके होत. त्यांचे समग्र लेखन चार खंडांत प्र​सिद्ध झाले आहे (१९६७). ​निवे​दितांचे हे सर्वच लेखन भारतीय संस्कृतीची, ​विशेषतः पा​श्चिमात्यांना, यथार्थपणे ओळख करून देणारे ‌‌‌आहे. जगदीशचंद्र बोस, अवनींद्रनाथ टागोर यांसारख्यांना प्रोत्साहन व मदत देण्याचे कार्यही त्यांनी पार पाडले.

त्यांची बु​द्धिमत्ता, ​हिंदू धर्मावरील व भारतावरील ​निष्ठा, ध्येयवा​दित्त्व व त्याग इ. गुणविशेषांमुळे त्या भारतीयांच्या कायमच्या आदरास पात्र ठरल्या.

संदर्भ : Pravrajika, Muktiprana, Bhagini Nivedita, Calcutta, 1968.

खोडवे, अच्युत