सँ-सीमाँ, द्यूक द : (१५ जानेवारी १६७५–२ मार्च १७५५). फ्रेंच सैनिक आणि साहित्यिक. जन्म पॅरिसचा. त्याचे वडील क्लॉद द ऱ्यूव्हर्वा ह्यांना फ्रान्सचा राजा तेरावा लूई ह्याने उमरावपदी चढविले होते. तरुण सँ-सीमाँ हा फ्रान्सच्या सैनिकी सेवेत होता (१६९१– १७०२). ह्या काळात तो रोजनिशी लिहीत असे. सैनिकी सेवेतून बाहेर पडल्यानंतर चौदाव्या लूईच्या व्हर्साय येथील दरबारात तो दाखल झाला. तो अभ्यासू होता आणि दरबारी रीतिरिवाजांची त्याला उत्तम जाण होती तथापि चौदाव्या लूईच्या मर्जीतून तो उतरल्यामुळे त्याने त्याच्या कारकीर्दीत सँ-सीमाँला कोणतेही अधिकारपद दिले नाही. पंधरावा लूई अज्ञान असताना त्याचा प्रतिनिधी म्हणून राज्यकारभार पाहणारा द्यूक द ऑर्लेआं ह्याने त्याला आपल्या कार्यकारी मंडळात (काउन्सिल ऑफ रीजन्सी) घेतले त्याला एका राजनैतिक कामगिरीवर स्पेनला पाठविले (१७२१). द्यूक द ऑर्लेआंचे निधन झाल्यानंतर (१७२३) फ्रान्सच्या दरबारातून सँ-सीमाँ निवृत्त झाला.

फ्रेंच साहित्यात सँ-सीमाँला जे स्थान आहे ते त्याने लिहिलेल्या संस्मरणिकांमुळे. आपल्या मेम्वार्स (प्रकाशित १८२९– ३०, म. शी. ‘संस्मरणिका’) मध्ये त्याने१६९१ ते १७२३ ह्या कालखंडातील दरबारी जीवनाचे तसेच राजकीय स्थितीचे मनोवेधक चित्रण केले आहे. व्हर्साय-दरबारच्या डौलदारपणाबरोबरच तेथील भष्टाचाराचेही वर्णन त्याने त्यात केले आहे. वस्तुस्थितीचा आणि घटनांचा अन्वयार्थ लावण्यातल्या काही चुका त्याच्याकडून झालेल्या दिसतात तथापि त्याचे इतिहासाचे ज्ञान आणि जाणीव मार्मिक होती. सत्ता वापरताना पारंपरिक नियंत्रणांचे आणि समतोलवृत्तीचे जे भान ठेवावे लागते, ते चौदाव्या लूईच्या निरंकुश सत्तावादाने नाहीसे झाल्याचे तो जाणून होता, हे त्याच्या संस्मरणिकांतून दिसते. पुढे झालेल्या फ्रेंच राज्यक्रांतीवरूनही ह्याचे प्रत्यंतर आले. दरबारी राजकारणातली कटकारस्थाने त्याने वेधक शैलीत वर्णिली आहेत. ड्यू क ऑफ बर्गंडी आणि चौदावा लूई ह्यांच्या मृत्यूचे त्याने केलेले वर्णनही प्रभावी आहे. ज्या दरबारीमंडळींत तो वावरला, त्यांचीही मार्मिक शब्दचित्रे त्याने रेखाटली आहेत. त्याच्या काळाचा एक ऐतिहासिक दस्तऐवज म्हणूनही त्याच्या संस्मरणिका महत्त्वाच्या आहेत.

पॅरिस येथे त्याचे निधन झाले.

पहा : संस्मरणिका.

कुलकर्णी, अ. र.