उपनयन: ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य बालकांचे शिक्षणाचे वय वर्णक्रमाने ८, ११ वा १२ वर्षे झाले असता, त्यांना वेद व इतर विद्या यांच्या अध्ययनाचा अधिकार प्राप्त करून देणारा हा संस्कार आहे. वेदाध्ययनाचा अधिकार नसलेल्या शूद्र बालकांचा उपनयन संस्कार वैष्णवांच्या पांचरात्रगमात सांगितला आहे. तो वेदेतर विद्यांचा अधिकार प्राप्त होण्याकरिता आहे. वेदकाली वेदाध्ययनाची इच्छा असलेल्या कुमारिकांचाही उपनयन संस्कार होत असे, असे हरितधर्मसूत्रात म्हटले आहे.

मराठीत उपनयनास मुंजकिंवा मुंजीम्हणतात व्रतबंधमौंजीबंधनअसेही म्हणतात. ब्रह्मचर्य व्रत हे बालकांनी विद्याप्राप्तीच्या म्हणजे शिक्षणाच्या वयात पाळावयाचे असते. या व्रताचा उपदेश उपनयन संस्काराच्या वेळी आचार्य करतो. उपनयन याचा, जवळ नेणे, असा व्युत्पत्यर्थ आहे. शिक्षणाकरिता किंवा वेदाध्ययनार्थ आचार्याजवळ नेणे असा त्याचा भावार्थ होय. उपनयन संस्कार आचार्याने म्हणजे गुरूने करावयाचा असतो. पिता वेदविद्यानिष्णात असल्यास तोही आचार्य होऊ शकतो. या संस्काराने ब्रह्मचर्य या आश्रमाचा कुमार स्वीकार करतो. वेदांच्या इतर विद्यांच्या अध्ययनाने ऋषींचे ऋण मनुष्य फेडतो. वेद किंवा इतर विद्या हे ऋषींकडून प्राप्त होणारे दिव्य धन होय व त्याच्या स्वीकारानेच ते ऋण फेडता येते. उपनयन संस्काराने कुमाराला द्विजत्व प्राप्त होते. द्विजत्व म्हणजे दुसरा जन्म. हा जन्म आचार्यापासून होतो. पहिला जन्म मातेपासून व दुसरा आचार्यापासून.

उपनयन या संस्काराचा विधी प्रथम व्यवस्थित रीतीने गृह्यसूत्रांमध्ये आढळतो. तत्पूर्वीच्या ग्रंथांत म्हणजे अथर्ववेद, शतपथब्राह्मण, छांदोग्य उपनिषद व बृहदारण्यक उपनिषद  यांच्यामध्येही या संस्काराचा संक्षिप्त स्वरूपात निर्देश आढळतो. हा आर्यांचा फार प्राचीन संस्कार आहे व तो वेदपूर्वकालापासून चालत आलेला आहे. भारतीय आर्य व इराणी आर्य हे एकत्र असताना हा संस्कार होत असावा. अशा तऱ्हेचा नवजोतया नावाचा संस्कार पारशी लोकांत आहे.

या संस्काराचे थोडक्यात स्वरूप असे : आचार्य कुमाराला उजव्या बाजूस बसवून अग्नीची स्थापना करतो, नंतर होम होतो, होमानंतर मुलास कौपीन म्हणजे लंगोटी नेसवितो, अजिन म्हणजे हरणाचे कातडे पांघरावयास देतो, यज्ञोपवीत म्हणजे जानवे घालतो. पुन्हा हवन होते आणि अग्निसमक्ष कुमाराचा हात धरून त्याच्या तोंडून काही मंत्र म्हणवितो. मुलगा गोत्रप्रवर व स्वतःचे नाव सांगून आचार्याचे चरणास स्पर्श करतो. नंतर आचार्य सावित्री मंत्राचा म्हणजे सविता देवाच्या प्रार्थनेच्या मंत्राचा व व्रतांचा उपदेश करतो. गायत्री छंदातील सावित्री मंत्राचा तत्सवितुर्वरेण्यम्‌ असा आरंभ आहे. क्षत्रिय व वैश्य कुमारांना या मंत्राऐवजी सविता देवाच्या प्रार्थनेचे दुसरे मंत्रही सांगितले आहेत. आचार्य मंत्रोपदेशानंतर मुंजतृणाची तिपेडी मेखला कुमाराच्या कमरेत बांधतो. क्षत्रिय व वैश्य कुमारांना याऐवजी अन्य प्रकारच्याही मेखला सांगितल्या आहेत. नंतर आचार्य कुमाराच्या हाती कायम धारण करावयाचा पळसाचा किंवा इतर दंड देतो. नंतर काही होम करावयाचे असतात. ते संपल्यानंतर उपनीत कुमाराने लगेच भिक्षा मागावयाची असते. भिक्षा प्रथम मातेकडे मागावयाची, ती नसल्यास मातृसदृश व्यक्तीकडे मागावयाची असते. भिक्षा आचार्याच्या स्वाधीन करावयाची व त्याच्या अनुमतीने सेवन करावयाची असते. उपनयन वर्णक्रमाने विहित कालावधीत म्हणजे १६, २२ वा २४ वर्षांपर्यंत न झालेला आर्य सावित्रीपतित म्हणजे व्रात्य म्हटला जातो. त्याची प्रायश्चित्ताने शुद्धी होते.

पहा : आश्रमव्यवस्था ऋणत्रय ब्रह्मचर्य संस्कार.

संदर्भ : १. निर्णयसागर प्रेस, मनुस्मृतिसटीक, मुंबई, १९२०.

          २. निर्णसागर प्रेस, याज्ञवल्क्यस्मृतिमिताक्षरेसह, मुंबई, १९२६.

जोशी, लक्ष्मणशास्त्री