ससाणे, ग्यानोबा कृष्णाजी (साळकरी ससाणे) : (१७ मार्च १८५१-२० जानेवारी १९३२). सत्यशोधक समाजाचे एक निष्ठावंत अनुयायी व कृतिशील कार्यकर्ते. पुण्याजवळ हडपसर येथे ग्यानोबांचा जन्म सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. जुन्या एतद्देशीय शाळेत त्यांचे शिक्षण झाले. त्यांना मोडी लिपीचे उत्तम ज्ञान होते. बालपणापासून त्यांच्या मनाला अध्यात्माची ओढ असल्याने त्यांनी खूप भ्रमन्ती केली. वारकरी पंथाच्या साधु-संतांच्या सहवासातही काही काळ ते राहिले, भटकले पण फार काळ काही रमले नाहीत. ग्यानोबांना वडिलोपार्जित थोडी शेती मिळाली होती पण एकूण आर्थिक परिस्थिती बेतासबातच होती. आर्थिक हलाखीमुळे उभरत्या वयात गुरे राखली. अवेक्षकाच्या ( ओव्हरसियर ) हाताखाली कष्टदायक कामे उपसली. त्यापूर्वी सोलापूरच्या सडकेवर दगड पुरविण्याचे वेदनादायक कामही केले. शेवटी म. जोतीबांच्या सहवासात ते आले आणि आयुष्याच्या अखेरपर्यंत सत्यशोधक समाजाच्या परिवर्तनाच्या रचनात्मक कार्यात पार रंगून गेले.

म. फुले यांच्या ध्येयधोरणानुसार ग्यानोबांनी १८६९ मध्ये वनकुटे येथे शाळा काढली. कंत्राटी कामे घेत घेत १८७६ ला हडपसर येथे दुसरी शाळा उघडली. स्वत: शिक्षकही झाले. पुढे त्यांनी १८८२ साली शिक्षकपदाचा राजीनामा दिला आणि शाळा दुसऱ्यास चालविण्यास देऊन टाकली थोडीबहुत जी काही कमाई केली होती ती हडपसर शिक्षण फंडाला देणगीदाखल दिली. जोतीरावांच्या पूना कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनीचे दगड पुरविण्याचे काम सुरूच होते. त्याकाळी रामशेट बापूशेट उरवणे हे जोतीरावांचे भागीदार झाले व भागीदार शिंदे यांनी स्वतंत्र नोकरी धरल्यामुळे भागीदारी सोडली. तसेच दीनबंधु कार कृष्णराव भालेकर यांनीही भागीदारी सोडली होती. हे भागीदार या ना त्या कारणास्तव त्यांच्यापासून वेगळे झाले. त्यावेळी ग्यानोबा ससाणे ह्यांना त्यांनी आपल्या धंदयात नोकरीस घेतले. कंपनीच्या वतीने पुण्याच्या मंडईत भाज्या खरेदी करण्याचे काम ग्यानोबांनी जवळजवळ चार महिने केले पण हा धंदा विशेष फायदेशीर ठरला नाही. त्यामुळे नाखुशीने जोतीरावांनी धंदा बंद केला व ग्यानोबा ससाणे यांनाही नोकरीतून मुक्त केले. जोतीरावांच्या आग्रहामुळेच ते सरकारी नोकरी सोडून जोतीरावांना येऊन मिळाले होते. ससाण्यांनी एकनिष्ठेने जोतीरावांकडे नोकरी केली, त्याबद्दल जोतीरावांनी गुणगाहकता दर्शविण्याच्या दृष्टीने ग्यानोबांना एक प्रशस्तिपत्र दिले. ग्यानोबांनी हडपसर येथे २ मार्च १९१० रोजी सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी शाखेची स्थापना केली. अनेक वर्षे तिच्या पतसंस्थेचे ते अध्यक्ष होते. गरजूंना या पतसंस्थेची मदत कशी होईल आणि संस्थेचा लौकिक कसा वाढेल याचा समन्वय साधत ग्यानोबांनी पतसंस्था नावारूपास आणली. गोरगरीब विदयार्थ्यांसाठी तर त्यांचा नेहमीच मदतीचा हात होता.

दीनबंधु आणि दीनमित्र या सत्यशोधक चळवळीच्या वृत्तपत्रांचे ते स्वत: वर्गणीदार तर झालेच शिवाय या वृत्तपत्रांना अनेक वर्गणीदार मिळवून देण्यात ग्यानोबा अग्रभागी होते.

अखिल भारतीय सत्यशोधक समाज स्थापनेच्या वेळी (२४ ऑक्टोबर, १८७३) ग्यानोबा म. फुल्यांच्या सोबत होते. स्थापनेच्या बैठकीसही ते उपस्थित होते. बहुतेक सर्व सत्यशोधक चळवळीच्या कार्यात ते सहभागी झाले. त्यांनी १८८० च्या मद्यपान बंदीविरूद्धच्या मोहिमेत हिरिरीने भाग घेतला होता. पुढे साधारणत: सहा महिन्यांच्या अंतराने ७ मे १८७४ रोजी  ग्यानोबांचा पुणे येथे जुनागंज परिसरात म. फुले यांच्या वाडयात विवाह झाला. विवाहाचे पौरोहित्य स्वत: म. फुले यांनी केले होते. काशीबाई निंबाळकर ही ग्यानोबांची त्यावेळची वधू. त्या काळात बाह्मण पुरोहिताशिवाय लावलेले लग्न बेकायदेशीर मानले जात असे. इथे रूढ अर्थाने पुरोहित नव्हता. अशा प्रकारचा हा दुसरा सत्यशोधकीय विवाह होता. पहिला विवाह सीताराम जावजी आल्हाट यांचा होता. त्यातही पुरोहित नव्हता. त्यामुळे अडथळे, अडचणी आणि मन:स्ताप भरपूर होते. पुढे सत्यशोधक चळवळीच्या रेटयामुळे १९२१ साली जोशी वतन रद्द करण्याचे विधेयक आले. ३ ऑगस्ट १९२६ ला सत्यशोधक रावबहादूर सी. के. बोले यांनी मांडलेल्या या विधेयकाचे कायदयात रूपांतर झाले आणि कोर्टकचेऱ्यात अडकून पडलेले अवघड प्रश्न हळूहळू मार्गी लागले.

काशीबाई व ग्यानोबा ससाणे यांच्या सत्यशोधक समाजाच्या वतीने झालेल्या ह्या क्रांतिकारी विवाहाचा वृत्तांत तत्कालीन सत्यदीपिका मासिकात आला होता.

जोतीरावांचा दत्तक मुलगा यशवंत याचे लग्नाचे वय होऊन गेले होते. तो एका बाह्मण विधवेचा मुलगा असल्यामुळे त्याला मुलगी कोण देणार, हा एक प्रश्न होता. त्यावेळी जोतीरावांच्या इच्छेचा आदर करून ग्यानोबांनी आपली तिसऱ्या इयत्तेत शिकत असलेली राधा ही मुलगी यशवंताला दिली. सावित्रीबाईंनी तिचे पुढील शिक्षण केले. ग्यानोबा ससाणे हे भगवद्‌गीताज्ञानेश्वरी चे मर्मज्ञ वाचक होते. तसेच तुकाराम गाथा व म. फुल्यांचा गुलामगिरी हा गंथ यांच्या सततच्या आलोडनाने व परिशीलनाने ग्यानोबांचे चित्त हरिद्वारच्या गंगा नदीच्या मनोहारी संगमाप्रमाणे नेहमी शांत, निश्चल व तृप्त राहिले, असे ते मनविभोर होऊन मित्रमंडळींना सांगत.

संदर्भ : १. कीर, धनंजय, महात्मा जोतीराव फुले : आमच्या समाज-क्रांतीचे जनक, मुंबई, १९७३.

             २. माळी, गजमल, ग्यानोबा कृष्णाजी ससाणे : सीताराम तारकुंडे यांनी लिहिलेल्या चरित्रासह, औरंगाबाद, १९९६.

भोसले, एस्. एस्.