सिन्हा, शांता : (७ जानेवारी १९५० – ). सामाजिक कार्यकर्त्या. जन्म नेल्लोर (आंध्र प्रदेश) येथे. केवळ दारिद्र्यापायी आपल्या लहान मुलांना मोलमजुरी करायला लावून त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या लोकांचे प्रबोधन करुन बालकामगारांना शिक्षण देण्यासाठी आंध्र प्रदेशात त्यांनी अथक प्रयत्न केले. हैदराबाद विद्यापीठाच्या शैक्षणिक विस्तार कार्यक्रमाच्या त्या प्रमुख होत्या. वेठबिगारीतून सुटका झालेल्या मुलांसाठी त्यांनी एक शिबिर घेतले आणि त्यांना शाळेत जावयास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला. हे कार्य त्यांनी आपले आजोबा मिदिपुडी व्यंकटरंगय्या यांच्या नावाने स्थापन केलेल्या एम्व्ही प्रतिष्ठानामार्फत पुढे नेले. बालमजुरीचे निर्मूलन आणि प्रत्येक मुलाला शाळेत जाण्याच्या अधिकाराची प्रस्थापना ही उद्दिष्टे ह्या प्रतिष्ठानाने एक ‘मिशन’ म्हणून स्वीकारली. शाळेत न जाता वेठबिगारी करणारी मुले त्यांनी शोधून काढली. त्यांच्या मुक्ततेसाठी त्यांच्या मालकांना आणि पालकांना आवाहन केले. ह्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक तरुण, शिक्षक, स्थानिक अधिकारी तसेच बालमजुरांचे एकेकाळचे मालक त्यांना सहकारी म्हणून लाभले. स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय दात्यांनी आर्थिक मदतीसाठी हात पुढे केला. सध्या ५०० खेड्यांमध्ये त्यांचे काम सुरु आहे. आधी त्यांनी ‘सेतु-शाळा’ निर्माण करुन मुलांमधली मूलभूत कौशल्ये विकसित केली त्यांना मुक्त, आनंदी जीवनाचा अनुभव दिला साक्षर करुन वाचनाची गोडी लावली आणि त्यानंतर त्यांना औपचारिक अभ्यासक्रमाचा परिचय करुन दिला. एकेकाळी शिक्षणापासून वंचित असलेल्या सु. अडीच लाख मुलांना एम्व्ही प्रतिष्ठानतर्फे शिक्षणाची संधी मिळवून दिली.

गरीब मुलांना सर्वसाधारण शाळेत शिक्षण मिळाले पाहिजे, ह्यासाठी सार्वजनिक शाळांमध्ये आवश्यक त्या सुधारणा घडवून आणल्या जाव्यात म्हणून वेगवेगळ्या पातळ्यांवर त्यांनी प्रयत्न चालू ठेवले आहेत. आंध्र प्रदेश शासनानेही ह्या संदर्भात पुढाकार घेतलेला आहे. मुलांनी शाळेत जाऊन शिक्षण घेतल्याने त्यांच्या कुटुंबांची उत्पादकता वाढते. रोजगाराच्या क्षेत्रातून बालकामगार बाहेर पडल्याने प्रौढांच्या रोजगाराच्या संधी वाढतात अशी त्यांची भूमिका आणि विश्वास आहे.

सिन्हा यांच्या सामाजिक कार्याबद्दल भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ हा पुरस्कार दिला (१९९९). सामूहिक नेतृत्वासाठीच्या मागसायसाय पुरस्काराने त्यांना गौरविले गेले आहे (२००३).

ठाकूर, अ. ना.