सामाजिक संस्था : ( सोशल इन्स्टिट्यूशन्स ). समाजाचे अस्तित्व, सातत्य, स्वास्थ्य आणि सुरक्षितता यांच्या संवर्धनार्थ स्थापन झालेल्या सुविहित यंत्रणा. त्यांच्या प्रकारांत भिन्नता असली आणि त्यांची व्याप्ती संस्थापरत्वे लहान-मोठी असली आणि उद्देश व हेतू वेगवेगळे असले, तरी त्यांचे स्वरूप सार्वत्रिक, सार्वकालिक व परिवर्तनीय असते. सामाजिक संबंधांचे स्वरूप निश्चित व सुस्थिर राहण्यासाठी रुढी, परंपरा, लोकरीती, संकेत, लोकाचार इत्यादींचा आधार घेतला जातो. मूलभूत सामाजिक कार्याच्या पूर्तीसाठी व्यक्तिवर्तनाला संघटित रुप देणारी व्यवस्था कार्यान्वित करण्याचे काम सामाजिक संस्था करतात कारण समाजाऐबरोबर व्यक्तिगत गरजांची पूर्तताही सामाजिक संस्थांमार्फत होते. समाजस्वास्थ्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे ठरते. उदा., विवाह व कुटुंबसंस्था यांमुळे समाजाचे वंशसातत्य व लोकसंख्या नियंत्रित ठेवली जाते, तशीच ती व्यक्तीच्या भावनिक व वैवाहिक संबंधांच्या गरजा पूर्ण करते. या गरजा स्थलकाल व परिस्थितिसापेक्ष असतात. समाजनियंत्रणाच्या संदर्भात सामाजिक संस्थांकडे एक प्रभावी साधन म्हणून पाहिले जाते. काळाच्या बदलाबरोबर संस्थांमध्ये नवमताचा प्रवाह येणे, परिवर्तन होणे, रचनात्मक व कार्यात्मक नियम बदलणे, नवी प्रतीके व मूल्ये संपादन केली जाणे, या गोष्टी अटळ असतात व त्या घडत राहतात मात्र सर्व समाजाकडून त्यास सहमती मिळतेच असे घडत नाही कारण बहुसंख्य गटांची त्याविषयी स्वतंत्र तत्त्वप्रणाली, मते व दृष्टिकोण असतात त्यांच्या नियंत्रणपद्घतीमध्ये फरक आढळतो. संस्थांच्या जडणघडणीवर सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि भौगोलिक परिस्थितीचा प्रभाव व परिणाम होत असतो. मानवी समाजात संस्थांचे स्थान उत्कांतिवादी व सार्वत्रिक आढळते. त्यात मानवाचे मूलभूत गुण व वैशिष्ट्ये यांचे दर्शन होते.

प्रत्येक संस्थेचे कार्य, स्वरुप, हेतू व क्षेत्र ठरलेले असते. कुटुंब व नातेव्यवस्था या संस्था समाजातील व्यक्तीचे जैविक संबंध व प्रजनन यांवर नियंत्रण ठेवतात. शैक्षणिक संस्था व्यापक व विस्तारित स्वरूपात कार्य करतात आणि लहान बालकापासून प्रौढ व्यक्तीपर्यंतच्या सर्वांना ज्ञानदान करतात. व्यक्तिमत्त्व विकासात त्यांचा महत्त्वाचा वाटा असतो. या संस्थांद्वारे समाजाचा सांस्कृतिक वारसा व आदर्श मूल्ये एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सुपूर्द केली जातात. अर्थकारण व अर्थशास्त्र या क्षेत्रांशी निगडित संस्था उत्पादन, विभाजन, सेवा व वस्तुविनिमय, त्यांचा उपभोग यांबाबत दक्ष असतात. समाजात त्यांना महत्त्वाचे स्थान असते. राजकीय संस्था सर्व नियमनांद्वारे समाजात शांतता, सुव्यवस्था राखून अराजकी शक्तींवर नियंत्रण ठेवण्याचे काम करतात. सांस्कृतिक संस्था ह्या मुख्यत्वे धार्मिक, वैज्ञानिक व कलात्मक क्षेत्रांना योगदान देऊन सांस्कृतिक ठेव्याचे संरक्षण-संवर्धन करतात तसेच संस्कृतीचे काटेकोरपणे संरक्षण करतात.

या सर्व संस्थांमध्ये स्तरीकरणनामक संस्था समाजात मूलभूत भूमिका बजावते. समाजातील प्रत्येक व्यक्तीला मिळणारा दर्जा अथवा स्थान, पुरस्कार, पारितोषिके, चरितार्थाची साधने व त्यांची प्राप्ती इत्यादींची तपशिलवार नोंद ठेवून यांतील विविधता आणि विभाजनाचे कमी-अधिक प्रमाण यांबाबतच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न ती करते. ही सर्व कार्ये समाजातील ज्येष्ठ, प्रतिष्ठित व प्रभावी व्यक्ती आणि गट करीत असतात. प्रसिद्घ अमेरिकन समाजशास्त्रज्ञ ⇨टॅलकॉट एडवर्ड पार्सन्झ हे संस्थांच्या विविधतेचे विश्लेषण करताना म्हणतात, ‘सामाजिक संस्थांत आढळणारे भेद हे अर्थातच समाजाच्या स्वरूपावर, त्यांतील लोकांच्या व गटांच्या जीवनपद्घतीवर आणि समाजातील प्रस्थापित व्यवस्था यांवर अवलंबून असतात. या कारणामुळे हे वेगवेगळेपण आढळते’. अश्मयुगीन मानवापासून आधुनिक मानवापर्यंतच्या अवस्थांत होत गेलेल्या क्रमविकासामुळे सामाजिक संस्थांतही उत्कांती झालेली दिसते.

संदर्भ : 1. Eisenstadt, Samuel N. Essays on Comparative Institutions, New York, 1965.

2. Murdock, George P. Social Structure, New York, 1949.

देशपांडे, सु. र.