वक्तृत्व: श्रोतृवर्गावर वाणीच्या (वक्तृत्वशैलीद्वारे) माध्यमाद्वारे प्रभाव पाडण्याची कला, भाषणाच्या माध्यमाने श्रोत्याला आकर्षितकरून आपल्या विचार-विकार-भावनांची श्रोत्यांवर छाप पाडून त्यांना आपले विचार पटवून देण्याचे कौशल्य वक्तृत्वकलेत असते. वक्तृत्व हे एक शास्त्र (ऱ्हेटारिक्स) असून ती एक कलाही आहे. रिटोरिकी (Rhetorike) या ग्रीक शब्दावरून रिटोरिका (Rhetorica) हे लॅटिन रूप तयार झाले. त्यावरून ऱ्हेटारिक्स हे इंग्रजी रूप बनले. ‘ऱ्हे (रे) टारिक्स’ या मूळ इंग्रजी शब्दाचा वक्तृत्वशास्त्र हा मराठी प्रतिशब्द. रेटॉर (Rhetor) म्हणजे वक्ता आणि आयकॉस (Ikos) म्हणजे शब्द यांवरून ही संज्ञा बनली आहे.

वक्तृत्व ह्या संकल्पनेचा उगम ग्रीकांच्या वसाहतीत सिराक्यूझ येथे झाला परंतु या संकल्पनेचा विकास आणि वृद्धी ग्रीक व रोमन संस्कृतीत प्रामुख्याने अथेन्स व रोम या नगरींत झाली. सिसिलीतील सिराक्यूझ या ग्रीक वसाहतीत इ. स. पू. ४६६ मध्ये लोकशाही शासनप्रकार कार्य़वाहीत आला, तेव्हा तेथील हद्दपारीतील जुन्या लोकांनी संपत्तीच्या संदर्भात जुलमी लोकांवर खटले भरले होते. परंतु त्यांच्याकडे लखित पुरावे फारसे नव्हते. त्यांना आपली बाजू प्रभावीपणे मांडणारे वाक्पटू हवे होते. अशा वेळी सिसिलियन ग्रीक कोरॅक (Korax) पुढे आला व त्याने आपल्या वाक्चातुर्याने हे खटले चालविले. तोच वक्तृत्वकलेचा प्रणेता वा संस्थापक मानण्यात येतो. त्याने टिसिअस या शिष्याच्या मदतीने पुढे सार्वजनिक ठिकाणी व्याख्यान देण्यासंबंधी एक नियमावली बनविली व भाषणाचे मुद्दे कसे संकलित करावेत, ह्याचे तीत पद्धतीशीर विवेचन केले. त्याच्या मते, प्रास्ताविक, संगतवार कथन, अंगभूत टीका, मुद्देसूद सारांश आणि संक्षिप्त आढावा या पाच भागांचा कोणत्याही व्याख्यानात समावेश असावा.

सिराक्यूझमधून ही वक्तृत्वकला अथेन्मध्ये प्रसृत झाली आणि तेथील लोकशाहीला अधिक स्फुरण मिळाले व ती उत्तरोत्तर विकसित झाली, प्राचीन ग्रीक संस्कृतीत अथेन्समधील बहुतेक सर्व पुरुष नागरिक सार्वजनिक सभेतील धोरणात्मक कार्यात व न्यायदानाच्या प्रशासनात सहभागी होत असत. न्यायालयात त्यांपैकी काही पंच म्हणूनही हजर असत. अशा प्रकारे बचावात्मक भाषणे होऊ लागली आणि वक्तृत्वकलेस आपापतः प्रोत्साहन मिळाले. तत्कालीन शिक्षणक्रमातही या कलेचा समावेश झाला. प्रोटॅगरस, गॉर्जीअस, हिपीअस इ. सॉफिस्ट शिक्षकांनी चर्चासत्राची तत्त्वे, वकृत्त्वाची शैली, स्मरणशक्ती व अस्खलितपणा या मुद्यांचे विवरण केले. त्यामुळे वक्तृत्वकलेचे रीतसर अध्यापन सुरू झाले. वक्तृत्वकला ही एक ललितकला म्हणून इ. स. पू. पाचव्या–चवथ्या शतकांत विकसित झाली. ⇨पेरिक्लीझ (इ. स. पू. ४९५–४२९) आणि ⇨डिमॉस्थिनीझ इ. स. पू. ३८४–३२२) हे दोन अथेनियन अभिजात ग्रीक वक्ते. थ्यूसिडिडीझ याने आपल्या हिस्टरी ऑफ द पेलोपनीशियन वॉर या ग्रंथात पेरिक्लीझचे ‘फ्यूनरल ओरेशन’ हे प्रसिद्ध भाषण उद्धृत केले आहे. डिमॉस्थिनीझ त्यांच्या राष्ट्रभक्तिपर भाषणांसाठी प्रसिध्द होता. वक्तृत्वावरीलप्रमुख ग्रीक लेखकांत ॲरिस्टॉटलची गणना केली जाते. त्याने रेटारिक या ग्रंथात उत्तम वकृत्त्वासाठी इथिकल (नीतिपर), पॅथेटिक (करुणरसोत्पादक) व लॉजिकल (तार्किक) या तीन गोष्टी प्रतिपादिल्या. रोमनांनी अनेक बाबतींत ग्रीकांचेच अनुकरण केले आहे. त्यांनी ही कला वृद्धिंगत केली, जोपासली आणि तिच्या संवर्धनासाठी एक तत्त्वप्रणाली तयार केली. केटो व सिसरो (इ. स. पू. १०६–४३) हे थोर वक्ते व वक्तृत्वशास्त्रावरील विचारवंत–लेखक होत. सिसरोने रेटोरिका अँड हेरे नियम हा ग्रंथ इ. स. पू. ८६ मध्ये लिहिला. त्यात भाषणाच्या प्रमुख पाच पायऱ्या सांगितल्या आहेत : (१) नवी कल्पना (भाषणाच्या परिस्थितीचे विश्लषण व श्रोतृवर्ग – तसेच भाषणाचा अभ्यास–आणि त्यारिता लागणारे साहित्य यांची जुळवाजुळव), (२) आविष्कारमांडणी–(प्रास्ताविकाची मांडणी,मुद्यांची चर्चा आणि अनुमान), (३) शैली–(भाषेची, विशेषतः वाक्यरचना, वाक्प्रचार यांद्वारे बिनचूक माहिती आणि असंदिग्ध विचारांची मांडणी), (४) स्मरणशक्ती–(तपशिलांचे पाठांतर अस्खलितपणे निवेदन करणे), (५) व्याख्यानाची पद्धत–(वाक्चातुर्य–सुस्पष्ट शब्दांची मांडणी). द ओरेटर या ग्रंथात सिसरोने वक्ता हा विद्वान, व्यासंगी, भाषेवर प्रभुत्व असलेला (भाषाप्रभू) आणि श्रोतृवर्गाची भावना व नस जाणणारा असावा, असे जाणीवपूर्वक प्रतिपादिले आहे. वरील सर्व मुद्यांचे स्पष्टीकरण त्याने या पुस्तकाच्या विविध भागांत दिले आहे. सिसरोनंतरचा या विषयावरील थोर लेखक व शिक्षक म्हणजे मार्कस फेबिअस क्विंटिल्यन (इ. स. ३५–१००) हा असून त्याने इन्स्टिट्यूशिओ ओरेटिरिया (इ. स. ९०) या ग्रंथात वक्तृत्वशास्त्राच्या अध्यापनाविषयी तसेच वक्त्यांच्या शिक्षणाविषयी बहुमोल चर्चा केली आहे. वर्तमानकाळातसुद्धा चांगले वक्ते तयार करण्यास हा बहुव्यापक असा ग्रंथ आहे. रोमन नगरांतील विद्यालयांतून हा विषय त्यावेळी शिकविला जात असे. ग्रेको–रोमन संस्कृतिकाळापासून वक्तृत्वकला दिवसेंदिवस विकसित होत गेली आणि काही काळ तिचा तत्कालीन अभ्यासक्रमात एक महत्त्वाचा विषय म्हणून समावेशही करण्यात आला. यावर विविध तत्त्वज्ञ–लेखकांनी लेखन केले आणि वक्तृत्वकलेची काही तात्विक सूत्रे व तत्त्वे संगृहित केली. त्यानुसार पुढे वक्तृत्वकला जोपासली जाऊ लागली. मध्ययुगात चर्चचे वर्चस्व वाढले, वक्तृत्वकलेत काही फेरफार झाले आणि राजकीय विषयांऐवजी धर्मप्रचारासाठी तिचा वापर होऊ लागला. तरी वक्तृत्वशास्त्रातील नियम आणि तत्वप्रणाली तीच राहिली. भाषणापासून श्रोत्यांना प्रेरणा, आनंद व मानसिक प्रसन्नता लाभावी, अशी खबरदारी वक्त्याने घ्यावी. मध्य व समारोप यांचा सांगोपांग विचार करून नेमके विचार मांडणे आणि सांगणे हे लेखन–वाचन–व्यासंग यांनी साधते. कल्पकतेला वाव मिळतो, भावना प्रभावीपणे व्यक्त करता येते आणि मुख्यतः वक्त्याचा आत्मविश्वास वाढतो यांवर भर देण्यात आला. भाषणाची सुरवात ही श्रोत्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी, मध्य त्याच्या गाभ्यात प्रवेश करण्यासाठी, तर समारोप आपल्या विचारांचा श्रोतृमनावर चिरस्थायी ठसा बिंबविण्यासाठी उपयोगी पडतो. भाषाशैली, नाट्यपूर्ण हावभाव, आवाजातील आरोह-अवरोह, मुद्देसुद मांडणी व टिपणांचा चपखल वापर इत्यादींमुळे व्याख्यान प्रभावी ठरते. धर्मसुधारणा आंदोलन (इ. स. १५००–१६००) व प्रबोधनकाल (इ. स. १४००–१६००) या कालखंडांत यूरोपचे धार्मिक, राजकीय व वैचारिक जीवन ढवळून निघाले. चर्चच्या एकछत्री वर्चस्वाला विरोध करणाऱ्या शक्ती मध्ययुगाच्या अखेरीस उदयास आल्या. राजकीय वक्त्यांची जागा धर्मोपदेशकांनी घेतली. मार्टिन ल्युथर व जॉन कॅल्व्हिन या आध्वर्यूंनी आपल्या वक्तृत्वातून प्रभावीपणे मांडलेले धर्मसुधारणेचे मूलभूत सिद्धांत लोकप्रिय झाले आणि आध्यात्मिक क्षेत्रात सर्व ख्रिस्ती समान आहेत आणि प्रॉटेस्टंट नीतीमुळे सर्व क्षेत्रांत, विशेषतः आर्थिक व राजकीय, चैतन्य आणि गतिशीलता उफाळून आली. याच संदर्भात जॉन नॉक्स, ऑगस्टीन इत्यादींचा उल्लेख महत्त्वपूर्ण ठरतो. जॉन नॉक्सने आपल्या वक्तृत्वशैलीने प्रेसविटरियन चर्चचा प्रसार-प्रचार केला. अठराव्या शतकातील जॉन वेस्ली व जॉर्ज व्हाइटफील्ड यांनी मेथडिस्ट संप्रदायाच्या तत्त्वांचा अत्यंत कौशल्याने प्रचार-प्रसार केला. या काळात वक्तृत्वकलेचा व्याकरण आणि न्याय या उदात्त कलांबरोबर पदवीपूर्व शिक्षणक्रमात समावेश करण्यात आला. प्राचीन रोमन आणि ग्रीक लेखकांनी या विषयावर लिहिलेली पुस्तके पाठ्यपुस्तके म्हणून अभ्यासाला लावण्यात आली. यांशिवाय लिअनार्ड कॉक्सचे द आर्ट ऑर क्राफ्ट ऑफऱ्हेटोरिक (१५२४) आणि टॉमस विल्सनचे द आर्ट ऑफ ऱ्हेटोरिक (१५५३) हे तत्कालीन लेखकांचे या विषयावरील ग्रंथही महत्त्वपूर्ण ठरले. अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध (१७७४–८३) आणि फ्रेंच राज्यक्रांती (१७८९) यानंतर स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या तत्त्वत्रयीचा प्रसार होऊन लोकशाही झपाट्याने विकसित झाली. इंग्लंडमध्ये या सुमारास राजेशाहीवर मर्यादा पडून संसदीय लेकशाही प्रगल्भावस्थेकडे वाटचाल करीत होता. विल्यम पिट, एडमंड वर्क, चार्ल्स फॉक्स (इंग्लंड) आलिग्येअरी दान्ते, ओनॉरे मीरावो, रोब्झपीअर (फ्रान्स) पॅट्रिक हेन्री, जोनथन एडवर्ड्स (अमेरिका) हे काही तत्कालीन प्रसिद्ध राजकीय वक्ते संसदेतील आपल्या प्रभावी भाषणांमुळे संसदपटू म्हणून प्रसिद्धी पावले आणि लोकमानसात त्यांना मान व प्रतिष्ठा लाभली. याच काळातील मायकेल फॅराडे हा प्रभावी वक्तृत्वशैलीसाठी प्रसिद्ध असलेला इंग्लिश भौतिकीविज्ञ आणि संशोधक. त्याने वक्तृत्वकलेविषयी व्यक्त केलेले विचार उद्बोधक आहेत. तो म्हणतो वत्त्याने आपले सर्व कौशल्य पणाला लावून श्रोतूवर्गाचे मन आणि बुद्धी संपूर्णपणे आपल्याकडेच वेधून राहील, अशा पद्धतीने सर्व विचार व कल्पना मांडाव्यात. श्रोत्यांची उत्सुकता टप्प्याटप्प्याने वाढत जाईल आणि उत्स्फूर्त होईल, अशा पद्धतीने विषयाची रचना करावी. वक्ता निर्भय, मनमोकळा, एकाग्रचित्त आणि ठामपणे विषय मांडणारा असावा. त्याचे विचार स्पष्ट व निःसंदिग्ध आणि त्याचे ज्ञान निश्चित असावे.” वक्तृत्वकला विद्यापीठीय अभ्यासक्रमातून वगळली गेली तथापि पश्चिमी देशांत वक्तृत्व शिकविणाऱ्या खाजगी संस्था उदयाला आल्या आणि विद्यार्थ्यांना त्यासंबंधीचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर प्रमाणपत्रे आणि पदव्याही त्यांच्याकडून देण्यात येऊ लागल्या.


एकोणिसाव्या-विसाव्या शतकांत राजकीय नेते आणि समाजसुधारक यांनी आपल्या ओघवती शैलीने जनमानसाला मंत्रमुग्ध केलेली अनेक भाषणे प्रसिद्ध असून त्यांपैकी चार्ल्स समनरचे द क्राइम अगेन्स्ट कॅन्सस (१८५०), अब्राहम लिंकनचे गेटीझबर्ग येथील गुलामांच्या मुक्तीविषयीचे व लोकशाहीची व्याख्या विशद करणारे (१९ नोव्हेंबर १८६३) किंवा दुसऱ्या महायुद्धातील विन्स्टन चर्चिल यांचे मायभूमीच्या स्वातंत्र्याविषयीचे तडफदार वक्तव्य (१९४२), वेनीतो मुसोलिनी व अँडॉल्फ हिटलर यांची त्यावेळची देशवासियांना युद्धाला उद्युक्त करणारी भडक शैलीतील वक्तव्ये आणि युद्धोत्तर काळातील वुड्रो विल्सन, वेंडेल विल्की, जॉन एफ्. केनेडी यांची देशवासियांना अधुनिक प्रवाहात स्वकर्तुत्वावर सामील होण्यासाठी केलेली भाषणे इतिहासात प्रसिद्ध आहेत. काळ्यांना नागरी हक्क प्राप्त झालेच पाहिजेत, याचा हिरिरीने पुरस्कार करणाऱ्या मार्टिन ल्युथर किंगचे १९६३ मधील ‘ आय हॅव ए ड्रीम…’हे वॉशिंग्टन डी. सी. मधील भाषण पुढे जगद्विख्यात झाले.

भारतात प्रवचन, गोंधळ, कीर्तन, पुराण इ. जुन्या परंपरागत संस्थांत वक्तृत्त्वाचा आविष्कार काही प्रमाणात होत असला, तरी नव्या काळाची गरज या संस्था पुरवू शकत नाहीत, हे अनुभवांती लक्षात आले. प्रामुख्याने टिळकयुगात गणेसोत्सव व शिवजयंती उत्सव आणि म. गांधीच्या काळात स्वदेशी चळवळी-असहकारितेचा प्रसार, सत्याग्रह यांसाठी झालेल्या प्रचार सभांतून विसाव्या शतकात बहुसंख्य वक्ते निर्माण झाले. स्वातंत्र्यपूर्व काळात विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी निबंधमालेत वक्तृत्वावर एक निबंध लिहून वक्तृत्वकलेची साक्षेपी चर्चा केली आहे. लाल (लजपत राय), पाल (बिपिनचंद्र) व बाल (टिळक) यांनी आपल्या जहाल वक्तृत्वशैलीने ब्रिटिशांबद्दलचा विरोध वाढीस लावला आणि स्वदेशीचा प्रसार-प्रचार केला. स्वामी विवेकानंद, एम्. आर्. जयकर, श्रीनिवासशास्त्री इ. वक्त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळातआपल्या ओघवती शैलीने श्रोत्यांची मने जिंकली. शि. म. परांजपे यांनी आपल्या वकृत्त्वात वक्रोक्तीचा उत्तम वापर करून ब्रिटिश शासनावर टीकेची झोड उठविली. राम मनोहर लोहिया, नाथ पै, बाळासाबेह खर्डेकर, अटलबिहारी वाजपेयी हे थोर संसदपटू म्हणून ख्यातनाम आहेत. त्यांच्या वक्तव्यात शासनावरील टीकेबरोबरच मर्म विनोद, काव्य आणि कोट्या आढळतात. स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्राने बाळशास्त्री हरदास, गोळवलकर गुरुजी, प्र. के. अत्रे, बाबासाहेब पुरंदरे, शिवाजीराव भोसले, बाळासाहेब ठाकरे इ. अनेक नामवंत वक्ते दिले. ठिकठिकाणच्या वसंत व्याख्यानमाला, वक्तृत्वोत्तेजक सभा व शाळा-महाविद्यालयांतील वक्तृत्वृ-स्पर्धा यामधून अनेक चांगले वक्ते निर्माण झाले आहेत.

लोकशाहीत वक्तृत्वाला नियतकालिक निवडणुकांमुळे अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. ध्वनिक्षेपकाच्या शोधामुळे लाखो श्रोत्यांना वक्तृत्वाचा लाभ घेता येतो. प्रचारसभांतून वक्तृत्वाची कसोटी लागते. राज्ययंत्रणा चालविण्यासाठी व ती उलथून टाकण्यासाठी वकृत्त्व हे एक फार मोठे प्रभावी हत्यार वापरले जाते. संस्था, मंडळे, कंपन्या, समित्या, महामंडळे, परिषदा इत्यादींमध्ये निवडणुकांची पद्धती असून तेथे वक्तृत्वाचा उपयोग होतो. वक्तृत्व हे शिक्षक, विमा एजंट, दुकानदार, विक्रेते, वकील इ. व्यावसायिकांना अत्यावश्यक असते. मुलाखतीसाठी जाणाऱ्या उमेदवाराला वक्तृत्त्व आणि संभाषणकला अवगत असेल, तर त्याची तात्काळ छाप पडते.

विद्यमान तांत्रिक युगात वक्तृत्व ही संज्ञा हळूहळू अप्रतिष्ठा पावत असून तिचा वारंवार गैरवापर आढळतो. बार्नेट बास्करव्हिल द पीपल्स व्हॉइस (१९७९) या ग्रंथात म्हणतात, ‘लोकांची रुची बदलली असून त्यांना दोन तासांऐवजी वीस मिनिटांचे वक्तव्य अधिक रुचते. आता वक्ता हा मंत्रमुग्ध करणारा लोकनेता उरला नाही.’ आकाशवाणी व दूरदर्शन या प्रसार-माध्यमांच्या वाढत्या प्रभावामुळे वक्तृत्वातील शब्दावडंबर आणि प्रगल्भता यांवर स्वाभाविक बंधने आली असून ते अधिकाधिक संभाषणात्मक, अनौपचारिक, त्रोटक व चपखल शब्दांत बसविले जाते आणि लोकांनाही त्याची आता सवय झाली आहे.

संदर्भ: 1. Baskerville, Barnet, The People’s Voice, Lexington, 1979.

          2. Oliver, Robert T. History of Public Speaking in America, Greenwood, 1978.

          3. Thonssen, Lester Baird, A. C. Barden, Waldo W. Speech Criticism, Krieger (N. Y.), 1981. 

          ४. गडकरी, माधव,सभेत कसे बोलावे ? मुंबई, १९८४.

          ५. गाडगीळ, न. वि. वक्तृत्वशास्त्र कला-तंत्र-मंत्र पुणे, १९५८.

देशपांडे, सु. र.