व्याजप्रसूती : (कुव्हड). व्याजप्रसूती म्हणजे खोटेखोटे किंवा नकली बाळंतपण. एखाद्या स्त्रीच्या बाळंतपणाच्या काळात तिच्या पतीने बाळंतिणीसारखेच बंदिस्त जागेत बिछान्यावर पडून राहणे, घरात काम न करणे, बाहेरही कामावर न जाणे या वर्तनप्रकाराला ‘व्याजप्रसूती’ असे मानवशास्त्रात म्हटले जाते. यात आसन्नप्रसूती स्त्रीच्या पतीकडून खोटेखोटेच बाळंतिणीचे सोंग घेतले जाते. या प्रथेला ‘सहप्रसविता’ वा ‘सहकष्टी’ असेदेखील म्हणतात. प्रसिद्ध ब्रिटिश मानवशास्त्रज्ञ ⇨ एडवर्ड बी. टायलर (१८३२–१९१७) यांनी अगदी रानटी अवस्थेतील आदिवासी जमातींपासून ते अतिविकसित अशा समाजापर्यंत एकूण ३५० समाजांबद्दलची माहिती तपासली होती. या सर्व समाजांची वंशावळ मोजण्याच्या तत्त्वास अनुसरून मातृवंशीय, पितृवंशीय आणि दोन्हींच्या मधल्या संक्रमणावस्थेतील अशी विभागणी करून त्यांचा तौलनिक अभ्यास त्यांनी केला. तुलनेकरिता त्यांनी या तिन्ही प्रकारच्या कुटुंबातील अपहरण-विवाह आणि व्याजप्रसूती या दोन घटनांचा विचार केला. पितृवंशीय आणि पितृसत्ताक कुटुंब हे कालक्रमाने नंतर अस्तित्वात आलेले असून, सुरुवातीचे कुटुंब हे  मातृवंशीय आणि मातृसत्ताक होते, असे त्यांचे मत होते. प्रजननामध्ये पित्याची भूमिका ज्ञात झाल्यानंतर पितृत्वाला व पर्यायाने पित्याला महत्त्व आले. मातृवंशीय कुटुंबात असलेल्या स्त्रीच्या वा पत्नीच्या महत्त्वापासून पतीला महत्त्व बहाल करण्याच्या मधल्या काळात हा व्याजप्रसूतीचा विधी रूढ झाला असावा, असे त्यांनी प्रतिपादिले आहे.

फ्रान्स व स्पेन यांच्या सरहद्दीवरील पिरेनीज पर्वतराजीतील बॅस्क लोकांमध्ये प्रथम ही रूढी दिसून आली. त्यांच्यात मूल जन्मल्यावर आई उठून घरगुती कामाला लागत असे, तर पिता बाळंतिणीप्रमाणे निजून राहत असे. नंतर या रूढीचा प्रसार अन्यत्रही बर्याच जमातींमध्ये झाल्याचे दिसून आले. दक्षिण अमेरिका, आफ्रिका, चीन आणि भारत यांतील काही आदिवासी जमातींमध्ये ही रूढी अस्तित्वात असल्याचे दिसून आले परंतु सर्वच जमातींमध्ये बॅस्क लोकांप्रमाणे पुरुषाने निजून राहायचे आणि स्त्रीने उठून कामाला लागायचेच, ही प्रथा रूढ झाली नाही. व्याजप्रसूती रूढ असलेल्या सर्वच जमातींमध्ये बाळंत झालेली स्त्री आणि तिचा पती हे दोघेही निजून राहत असत. अन्य काही जमातींमध्ये जन्मलेल्या मुलाच्या मातापित्यांना दैनंदिन व्यवहाराची कामे किंवा काही अन्नपदार्थ काही दिवस वर्ज्य असत. मातेच्या बाबतीत हे निर्बंध अधिक कडकपणे पाळले जात असत.

व्याजप्रसूतीच्या रूढीमुळे जन्मलेल्या मुलाच्या आरोग्याचे तथा शरीरस्वास्थ्याचे रक्षण  होते, अशी श्रद्धा दिसून येते. मातेच्या बाबतीत विश्रांती ही तिच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक होती, तर पित्याच्या बाबतीत त्याने पित्रुत्वाची दखल घ्यावी, म्हणून सांकेतिक अर्थाने ती आवश्यक ठरली.

भारतात दक्षिणेकडील निलगिरी पर्वतराजीत राहणाऱ्या ⇨तोडा या वन्य जमातीमध्ये व्याजप्रसूतीची प्रथा असल्याची नोंद झालेली आहे. त्यांच्यात भ्रातृक बहुपतिकत्वाची चाल रूढ आहे. स्त्री बाळंत झाल्यावर तिचा एकेक पती क्रमाक्रमाने तिच्याप्रमाणे निजून राहत असे. या रूढीबरोबर ‘पुरसुतपिमी’ नावाचा विधीही त्यांच्यात रूढ आहे. गरोदर स्त्रीला तिच्याशी वैवाहिक संबंध असलेल्या अनेक भावांपैकी ज्येष्ठतेच्या क्रमानुसार एक पुरुष धनुष्यबाण देतो. यानंतर जन्मणाऱ्या दोन मुलांपर्यंत त्याचे पितृत्व गृहीत धरले जाते. ही प्रथा ⇨ खासी जमातीतदेखील आढळते. पित्याचे प्रजननातील स्थान व नवजात अर्भकाचे पितृत्व प्रस्थापित करण्यासाठी ही सांकेतिक पद्धत रूढ झाली. 

कुलकर्णी, मा. गु.