मृत्यु : सजीवतेचा नाश म्हणजे मृत्यू. प्रत्येक सजीव ही एक संघटित व एकात्म प्रणाली असते आणि तिच्यातील सर्व जैव प्रक्रिया कायमच्या बंद पडणे म्हणजे मृत्यू आणि सर्व जैव प्रक्रिया अनिवार्यपणे बंद पडणारच अशी खात्री देणारी अवस्था म्हणजे मृत्यू. तथापि जीवविज्ञान, वैद्यकशास्त्र, विधी वा कायदा, समाजशास्त्र, मानसशास्त्र, धर्मशास्त्र इ. विषयांत मृत्यूचा विचार निरनिराळ्या दृष्टिकोनांतून केला जात असल्याने सर्व विषयांना संमत अशी मृत्यूची एकच व्याख्या करणे अवघड आहे. प्रस्तुत नोंदीत प्रथम जीवविज्ञान व वैद्यकशास्त्र या विषयांतील मृत्यूसंबंधीचे विवरण केलेले असून नंतर इतर विषयांतील विवेचन दिलेले आहे.

जीवविज्ञान व वैद्यक : जीवविज्ञानाच्या दृष्टीने मृत्यू म्हणजे सजीवतेचा अभाव. याचा अधिक स्पष्ट अर्थ म्हणजे सजीवातील (जैव प्रणालीतील) नवीन रेणू तयार करण्याची क्षमता खात्रीने संपणार आहे अशी देहाची अवस्था, श्वसनक्रिया, जीवनावश्यक पदार्थांची (पाणी, शरीरातील भौतिक व रासायनिक घडामोडींत म्हणजे चयापचयात निर्माण होणारे पदार्थ इत्यादींची) देवाण-घेवाण, द्वित्वीकरण किंवा द्विगुणन ही सजीवतेची सर्वसाधारणपणे मान्य असणारी लक्षणे होत. कनिष्ठ वर्गीय जीवांमध्ये एकाच वेळी ती दिसत नाहीत. व्हायरस हा सूक्ष्मजंतूपेक्षा अतिसूक्ष्म असणारा जीव त्याला आश्रय देऊ शकणाऱ्या कोशिकेबाहेर (पेशीबाहेर) असताना वरीलपैकी एकही लक्षण दर्शवीत नाही परंतु योग्य आश्रयी कोशिकेत त्याचा अंतर्भाव होताच तो जननक्षम होऊन सजीवतेची लक्षणे दाखवितो. अयोग्य परिसरीय वातावरणात कवके (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पती) व सूक्ष्मजंतू सजीवतेची लक्षणे दाखवीत नसली, तरी योग्य परिस्थिती प्राप्त होताच ती सजीव होतात. सजीवतेची लक्षणे नसलेली अशी अवस्था (प्रसुप्तावस्था) हेच सुचविते की, मृत्यूची पूर्वीपासून मान्यता पावलेली लक्षणे आता मृतावस्था ठरविण्यास पुरेशी राहिलेली नाहीत. मानवाबाबतही विजेच्या धक्क्यामुळे मृत झालेल्या, प्राण्यात बुडून मेलेल्या किंवा एखाद्या औषधाच्या अती मात्रेमुळे मृत झालेल्या व्यक्तीमध्ये वरील लक्षणांविषयी चाचण्या करूनही मृत्यूची खात्री देणे अथवा सजीवतेची अतिसूक्ष्म धुगधुगी अस्तित्वात नसल्याचे ठामपणे सांगणे अशक्य झाले आहे. बंद पडलेली हृदयक्रिया (नाडी न लागणे), बंद श्वसनक्रिया, डोळे किंवाहातापायातील ⇨ प्रतिक्षेत क्रियांचा अभाव, विद्युत् हृल्लेख (विशिष्ट उपकरणाच्या मदतीने हृदयाच्या क्रियेमुळे उत्पन्न होणाऱ्या विद्युत् प्रवाहाची मिळणारी आलेखरूपी नोंद) व विद्युत् मास्तिष्कालेख (मेंदूच्या क्रियेमुळे होणाऱ्या विद्युत् प्रवाहाची मिळणारी आलेखरूपी नोंद) यांचे नेहमीप्रमाणे तरंगाकार न मिळता सरळ रेषाच मिळणे यांसारख्या मृत्युदर्शक गोष्टीसुद्धा अलीकडील संशोधनामुळे मृत्यू ठरविण्यास अपुऱ्या पडू लागल्या आहेत.

बहुकोशिकीय (अनेक कोशिकांनी ज्याचे शरीर बनलेले आहे अशा) प्राण्याच्या शरीरातील सर्व भाग एकाच वेळी मृत होत नाहीत, हे प्राचीन काळापासून ज्ञात आहे. हृदय हा सर्वांत जास्त महत्त्वाचा भाग मानला गेल्यामुळे त्याचे कार्य बंद पडणे म्हणजे इतर जीवनावश्यक भागांच्या मृत्यूची सुरुवात हा समज दृढ झाला. मेंदू, हृदय व फुफ्फुसे या तीन अवयवांच्या कार्यांना ‘जीवनत्रयी’ म्हणतात. या जीवनत्रयीचे कार्य पुनरावर्तित न होण्यासारखे बंद पडणे म्हणजे मृत्यू अशीही मृत्यूची व्याख्या करता येईल. 

अलीकडील अवयव प्रतिरोपणाच्या [→ अंतस्त्य प्रतिरोपण] शस्त्रक्रियेतील प्रगतीमुळे मृत्यूच्या व्याख्येला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. मृत शरीरातील हृदय किंवा वृक्क (मूत्रपिंड) यासारखा अवयव योग्य वेळी काढून घेऊन जरूर त्या व्यक्तीच्या शरीरात प्रतिरोपित करण्याकरिता काही आवश्यक गोष्टींची पूर्तता व्हावी लागते. निदानीय (प्रत्यक्ष निरीक्षणे व चाचण्या करून निर्धारित केलेला) मृत्यू आल्याचे स्पष्ट समजल्यानंतर प्रतिरोपणास योग्य अशा अवयवांची जीवनक्षमता अतिजलद प्रमाणात कमी होत जाते. अशा वेळी जीवनत्रयी किंवा तीपैकी एक पुन्हा कार्यक्षम होणार नाही हे ठरविणे मृत्यूची वेळ ठरविण्यापेक्षा अधिक महत्त्वाचे असते. हृदयक्रिया व श्वसनक्रिया बंद पडणे म्हणजे मृत्यूची सुरुवात असेही म्हणता येत नाही. आधुनिक श्वसनयंत्र (लोह फुफ्फुस), हृदय गतिकारक अथवा स्पंद-नियंत्रक (हृदयाची गती व स्पंदने नियंत्रित करणारे उपकरण) व इतर विविध अत्याधुनिक उपकरणांचा उपयोग करून सजीवता बराच काळपर्यंत टिकविता येते. मेंदू संपूर्णपणे अक्रिय असतानादेखील हृदय व फुफ्फुस यांच्या क्रिया चालू ठेवणे शक्य झाले आहे. यामुळे एक प्रकारची सजीवता शिल्लक राहिली, तरी ती मानवी जिवंतपणाच्या नेहमीच्या कल्पनेशी न जुळणारी असते. 

वैद्यकशास्त्राच्या दृष्टिकोनातून मृत्यूविषयीचे विवरणाचे पुढील विभाग पाडले आहेत : (अ) जैव मृत्यू, (१) कायिक मृत्यू (२) ऊतक मृत्यू, (३) कोशिका मृत्यू, (४) कोशिकांग मृत्यू (आ) मृत्यूची कारणे व प्रकार (इ) न्यायवैद्यक व मृत्यू (ई) मृत्यूसंबंधीच्या काही नवीन समस्या.

(अ)जैव मृत्यू : अती गंभीर इजा किंवा अपघात वगळल्यास उच्च वर्गीय सजीव क्रमशः मृत्यू पावतात. प्रथम ऊतके (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांचे समूह) व कोशिका, नंतर अवयव व जीवनावश्यक तंत्रे (संस्था) आणि शेवटी संपूर्ण शरीर मृत्यू पावते. जीववैज्ञानिकांनी मानवी मृत्यूसंबंधी पुढील माहिती मिळविलेली आहे.

कायिक मृत्यू : संपूर्ण प्राण्याचा मृत्यू म्हणजे कायिक मृत्यू. सर्वसाधारणपणे हृद्स्पंदन हस्तस्पर्शाला न लागणे किंवा श्रवण यंत्राने (स्टेथॉस्कोपने) कानांना ऐकू न येणे, हाताला नाडी न लागणे, डोळ्यातील स्वच्छमंडल (बुबुळाच्या पुढील पारदर्शक भाग) प्रतिक्षेप (स्वच्छमंडलास स्पर्श करताच पापण्या मिटणे) न मिळणे आणि देहनीलता (ऑक्सिजन न मिळाल्यामुळे त्वचा निळी पडणे) या लक्षणांवरून कायिक मृत्यू झाल्याचे समजतात. वैद्यकशास्त्रातील आधुनिक प्रगतीमुळे वरील लक्षणांखेरीज कधी कधी विशेष चाचण्या केल्याशिवाय कायिक मृत्यू झाल्याचे निश्चित ठरविता येत नाही. यासंबंधी वर उल्लेख केलेला आहे. 


कायिक मृत्यूच्या लक्षणांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे करतात : (१) तात्काळ दिसणारी, (२) थोड्या अवधीनंतर दिसणारी आणि (३) उशीरा दिसणारी.

(१)तात्काळ दिसणारी लक्षणे : श्वसनक्रिया व रक्तभिसरण पूर्णपणे कायमचे बंद पडतात. श्रवण यंत्राने छातीचे सतत पाच मिनिटे तपासणी केल्यानंतर व जरूर वाटल्यास काही वेळाने पुन्हा तपासणी करून या क्रिया निश्चित बंद पडल्याचे सांगता येते. कधी कधी या दोन्ही क्रिया बंद असलेली तरीही सजीवता असलेली अवस्था (विलंबित सजीवता) अर्धा तासापेक्षाही जास्त काळ टिकल्याचे आढळते. अशा वेळी वर उल्लेखिलेल्या विशेष चाचण्या उपयुक्त असतात. विद्युत् हृल्लेख सतत पाच मिनिटे सरळ रेषाच मिळणे हे हृदयक्रिया बंद पडल्याचे निश्चित लक्षण असते.

(२)थोड्या अवधीनंतर दिसणारी लक्षणे : (क) डोळे : मृत्यूनंतर थोड्याच वेळात डोळे निस्तेज होतात स्वच्छमंडलाची प्रतिक्षेपी क्रिया नष्ट होते व ते अपारदर्शी बनून धुरकटलेल्या काचेसारखे दिसते. नेत्रगोलांतर्गत दाब कमी होऊन डोळे खोल गेल्यासारखे दिसतात. (ख) त्वचा : त्वचेतील सर्व केशवाहिन्यांतील (सूक्ष्म रक्तवाहिन्यांतील) रक्त इतरत्र वाहून गेल्यानंतर त्वचा (विशेषकरून गौरवर्णियांमध्ये) पांढरी व फिकट दिसते. त्वचेची प्रत्यास्थता (ताण काढून घेतल्यावर पूर्व स्थिती प्राप्त होण्याची क्षमता) नाहीशी होते. मृत्यू काविळीमुळे वा फॉस्फरस विषबाधेमुळे झाला असल्यास त्वचेचा पिवळा रंग मृत्यूनंतरही तसाच राहतो. (ग) शारीरिक तापमान : मृत्यूनंतर शारीरिक तापमान हळूहळू कमी होऊन परिसरीय तापमानाएवढे होते. संपूर्ण पृष्ठभाग थंड होण्यास १२ तास व अंतःस्थ अवयव थंड होण्यास २० ते २४ तास लागतात. थंड होण्याच्या प्रमाणावर शरीरावस्था (कृश वा लठ्ठ) व आकार, मृत्यूचे कारण व मृत शरीराचा परिसर यांचा परिणाम होतो. मृत शरीराच्या गुदाशयातील तापमान व परिसरीय तापमान यांची वेळोवेळी नोंद करून मृत्यूची वेळ अंदाजी ठरविता येते. (घ) मरणोत्तर नीलता : मृत्यूनंतर शरीरातील रक्त गुरूत्वाकर्षणाच्या नियमानुसार शरीराचा जो भाग जमिनीजवळ असतो त्यात उतरते व त्या ठिकाणच्या त्वचेला जो नीलवर्ण प्राप्त होतो त्याला ‘मरणोत्तर नीलता’ म्हणतात. मरणोत्तर नीलता मृत्यूनंतर एक तासाने सुरू होते व साधारणतपणे ४ ते १२ तासांत स्पष्ट दिसते. मात्र ती गौरवर्णियांत अधिक स्पष्ट दिसते. नीलतेच्या प्रकारावरून कधीकधी मृत्यूच्या कारणाचा अंदाज करता येतो. उदा., कार्बन मोनॉक्साइड किंवा हायड्रोसायानिक अम्ल यांच्या विषबाधेमुळे मृत झालेल्यात नीलतेचा रंग चेरी फळासारखा लाल किंवा गुलाबी दिसतो.

(३)उशीरा दिसणारी लक्षणे : (क) स्नायूंतील मरणोत्तर बदल : (क) मरणोत्तर प्राथमिक शैथिल्य : मृत्यूनंतर साधारणपणे दोन ते तीन तासांत शरीरातील सर्व स्नायू शिथिल पडतात. खालचा जबडा खाली पडून तोंड उघडे राहते. हातपाय ढिले पडतात व सांधे सहज हलवता येतात. या अवस्थेत स्नायूंची आकुंचनशीलता व विद्युत् चेतनक्षमता शिल्लक असतात. म्हणजे स्नायूंचा कायिक मृत्यू झालेला असतो. पण त्यांतील रेवणीय सजीवता शिल्लक असते. (क) मरणोत्तर काठिण्य : स्नायूंच्या रेणवीय मृत्यूनंतर ताबडतोब शरीरातील सर्व ऐच्छिक व अनैच्छिक स्नायू कठीण (ताठ) व आखूड होतात. स्नायूकोशिकांतील प्रथिनांमधील रासायनिक बदलामुळे उत्पन्न होणाऱ्या या काठिण्याला ‘मरणोत्तर काठिण्य’ म्हणतात. ही क्रिया प्रथम अनैच्छिक स्नायूंत सुरू होते. मरणानंतर एक तासात ती हृदयाच्या स्नायूंत आढळते. मरणोत्तर काठिण्य बहुधा ठराविक क्रमाने पसरते व त्याच क्रमाने नाहीसे होते. ते साधारणपणे १ ते २ तासांत सुरू होऊन १२ तासांनी शरीर व्यापते व पुढील १२ तास टिकून राहून नंतरच्या १२ तासांत नाहीसे होते. वय, शरीररचना, मृत्यूचा प्रकार व परिसरीय हवामान यांचा त्यावर परिणाम होतो. (क) दुय्यम शैथिल्य : मरणोत्तर काठिण्य संपल्यानंतर स्नायू शिथिल पडू लागतात. याला ‘दुय्यम शैथिल्य’ म्हणतात. या अवस्थेत स्नायू विद्यूत् वा यांत्रिक उद्दीपनांना प्रतिसाद देत नाहीत. यानंतर पूतीभवनास (शव कुजण्यास वा सडण्यास) सुरुवात होते.

(ख) पूतीभवन :  मृत शरीराचे पूतीभवन मृत्यूचे खात्रीलायक लक्षण मानले जाते. हळूहळू घडणाऱ्या या क्रियेत मृदूकरण व द्रवीकरण यांचा प्रामुख्याने समावेश असतो. निर्जंतुक अवस्थेतही कोशिकांतून मुक्त होणारी एंझाइमे (जीवरासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणारी प्रथिने) या आत्मविलयनास कारणीभूत असतात. याशिवाय शवोपजीवी (सडणाऱ्या पदार्थांवर उपजीविका करणारे) सूक्ष्मजंतू किण्व उत्पादनाद्वारे (सडण्याच्या क्रियेस चालना देणाऱ्या पदार्थाच्या उत्पादनाद्वारे) शरीरातील जटिल ऊतकांचे साध्या अकार्बनी पदार्थात रूपांतर करतात. पूतीभवनामध्ये मृत शरीरात बाह्यरंग बदल, ऊतकांत वायू तयार होऊन फुगोटी येणे, त्वचेवर जागजागी द्रवयुक्त फोड येणे, अळ्या पडणे इत्यादींचा समावेश होतो. शरीरातील अंतस्त्ये (अंतर्गत इंद्रिये) एकाच वेळी पूतीयुक्त होत नाहीत. हाडे व दात बराच काळपर्यंत प्रतिरोध करतात. परिसरीय तापमान, आर्द्रता, हवा, प्रेत पुरण्याची पद्धत, वय, शरीररचना, मृत्यूचे कारण या गोष्टी पूतीभवनावर परिणाम करतात.

ऊतकमृत्यू : सस्तन प्राण्यांच्या शरीरातील ऊतकरचना त्या त्या ऊतकाच्या कार्यास योग्य अशीच असते. प्रत्येक अवयव निरनिराळ्या प्रकारच्या कोशिकांचा मिळून बनलेला असला, तरी त्यातील प्रमुख ऊतककोशिका विशिष्ट कार्याकरिताच असतात. उदा., हृदयातील स्नायुकोशिका इतर अनेक स्नायुकोशिका गटांसह आकुंचन पावून रक्तवाहिन्यांत रक्त पंप करण्याचे कार्य करतात. ⇨ अंतःस्त्रावी ग्रंथीतील विशिष्ट कोशिका निरनिराळे स्त्राव उत्पन्न करण्याचेच कार्य करतात. प्रत्येक ऊतकात हजारो कोशिका असतात व त्यांपैकी थोड्यासुद्धा अवयवांचे कार्य चालू ठेवण्यास पुरेशा असतात. म्हणजेच प्रत्येक अवयवात राखीव कोशिकांचा मोठा साठा असतो व त्यामुळे काही कोशिका नाश पावूनही कार्यात फारसा व्यत्यय येत नाही. 

विविध ऊतकांची जन्मजात कोशिका-पुनर्जननक्षमता निरनिराळी असते. काही ऊतकांमध्ये कोशिका-पुनर्जनन सतत चालूच असते उदा., रक्तोत्पादक तंत्र त्वचा. काही ऊतकांमध्ये संधी मिळताच नाश पावलेल्या किंवा खराब झालेल्या कोशिकांची जागा पुनर्जनित नव्या कोशिकांनी भरून काढण्याची क्षमता असते. यामध्ये यकृत, फुफ्फुस, वृक्क, अस्थी व संयोजी ऊतक यांचा समावेश होतो. मेंदू व हृदय यांतील कोशिकांचे पुनर्जनन होत नाही. तेथे नाश पावलेल्या कोशिकांची जागा हृदयात व्रणोतकाने व मेंदूत द्रवार्बुदाने (द्रवयुक्त गाठीने) घेतली जाते. 


विविध ऊतकांची आत्मविलयनक्षमताही निरनिराळी असते. रक्तपुरवठा कायमचा बंद पडताच ऊतकात आत्मविलयन सुरू होते. ज्या ऊतकामध्ये जलविच्छेदक (पाण्याच्या विक्रियेने रेणूचे तुकडे करणारी) प्रथिने अपघटक (घटक द्रव्ये अलग करणारी) एंझाइमे (कॅथेप्सीने) पूर्वीपासून असतात त्याच्यामध्ये आत्मविलयन लवकर व जलद होते उदा., ⇨ अधिवृक्क ग्रंथी, ⇨ अग्निपिंड. ज्या ऊतकामध्ये चयापचयाचे प्रमाण अधिक असते त्यामधील आत्मविलयन मध्यम गतीने होते. अत्यल्प चयापचय असलेल्या त्वचा, अस्थी, उपास्थी (कूर्चा) व रक्तवाहिन्या या ऊतकांतील आत्मविलयन अती मंदगतीने होते. [→ ऊतकमृत्यु].

कोशिका मृत्यू: कायिक मृत्यूसंबंधीची माहिती जेवढी अस्पष्ट आहे तेवढीच ती कोशिका मृत्यूसंबंधीही आहे. बहुकोशिकीय प्राण्यामध्ये सर्वांत लहान कार्यक्षम एकक म्हणजे कोशिका. रोगामुळे कोशिका मृत्यू व नंतरचा कोशिका ऱ्हास ही नेहमी आढळणारी प्रक्रिया आहे. प्रत्येक कोशिका कलाच्छादित (पातळ पटलाने आच्छादित) कोशिकाद्रव्य व कलाच्छादित केंद्रक (कोशिकेच्या कार्यावर नियंत्रण ठेवणारा गोलसर जटिल पुंज) मिळून बनलेली असते. वाढ, सात्मीकरण (अन्नपदार्थाचे कोशिकाद्रवात रूपांतर करणे), विभाजन व स्वजनन यांचा कोशिका कार्यात समावेश होतो. प्रत्येक जिवंत कोशिकेचे कार्य तिची स्वनियंत्रित समस्थिती अबाधित असेपर्यंत चालू असते. बिघडलेली समस्थिती झाल्यास कोशिकाही पूर्ववत होते परंतु हा बिघाड जेव्हा अपरिवर्तनीय असतो तेव्हा कोशिका मृत्यूकडे जाते. हा अपरिवर्तनीय बिघाडाचा नेमका क्षण अद्यापही अज्ञात आहे. 

काही संवर्धित (कृत्रिम रीत्या पोषक द्रव्यात वाढविलेल्या) ऊतककोशिकांना इजा झाल्यानंतर त्यांच्या प्रथिन संश्लेषणाच्या कार्यात बिघाड झाल्याचे आढळले आहे. प्रथिन संश्लेषणातील बिघाड शेवटी प्रथिने न्यूनतेस कारणीभूत होऊन कोशिकामृत्यूस कारणीभूत होत असावा. 

कोशिकेतील मृत्यूपूर्व व मरणोत्तर बदल यांचा सखोल अभ्यास करणे ⇨ इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्क्षकामुळे शक्य झाले आहे. इजा झालेली, मरू घातलेली व मृत अशा सर्व अवस्थांतील कोशिकेचे निरीक्षण या सूक्ष्मदर्क्षकाने करता येते. 

शरीरातील निरनिराळ्या ऊतककोशिकांची आयुर्मर्यादा निरनिराळी असते. मेंदूतील १०,००० ते १,००,००० कोशिका दर दिवशी मृत होतात. त्यांचे कधीही पुनर्जनन होत नाही. केसातील कोशिका दर १८ तासांनी मृत्यू पावतात. स्नायू व तंत्रिका (मज्जा) कोशिका कधीही मृत्यू पावत नाहीत. यकृत कोशिका २-३ महिन्यांत मरतात. आंत्रमार्ग (अन्नमार्ग) कोशिका व त्वचा कोशिका दर १८ तासांनी मरतात. रक्तातील लाल कोशिकांची आयुर्मर्यादा एक महिना, तर श्वेत कोशिकांची सरासरी आयुर्मर्यादा दोन आठवडे असते. [→ कोशिका]. 

कोशिकांग मृत्यू : कोशिकेच्या मृत्यूनंतर कोशिकांगे [→ कोशिका] अनिश्चित काळपर्यंत कार्यशील राहतात. रक्त-अल्पताजन्म मृत कोशिकेतील कलकणू (ज्यांचा स्त्राव कोशिका श्वसन व पोषण या कार्यांत उपयोगी पडतो असे धाग्यासारखे घटक) एक तासपर्यंत श्वसन करीत राहतात. लायसोसोम (जल विच्छेदक एंझाइमे असलेले अतिसूक्ष्म कण) ३७ से. तापमानात दोन दिवस क्रियाशील राहू शकतात. कोशिकेतील सर्व सूक्ष्म भाग फुगतात व भंग पावतात. कोशिका विदारणाने आजूबाजूच्या ऊतकात आतील भाग विखुरले जातात. याला ‘कोशिका विलयन’ म्हणतात. फक्त केंद्रक फुगून त्याचे विदारण होते (केंद्रक-विलयन) किंवा त्याचे तुकडे होतात अथवा त्याचे संकोचन होते.

(अ)मृत्यूची कारणे व प्रकार : मृत्यूच्या कारणाचा उल्लेख करताना सर्वसाधारण माणूस एखाद्या रोगाचा (उदा., विषमज्वर, कर्करोग वगैरे) उल्लेख करतो. प्रत्येक मृत्यूमागे एकच शरीरक्रियावैज्ञानिक कारण असते आणि ते म्हणजे शरीरात अव्याहत चालू असणाऱ्या ऑक्सिजन चक्रामध्ये खंड पडणे, हे होय. ऑक्सिजनाशिवाय मानवी जीवन अशक्य आहे. शरीरातील निरनिराळी ऊतके व अवयव हे ऑक्सिजन चक्र आपसातील अन्योन्य क्रियांद्वारे चालू ठेवतात. उदा., मस्तिष्क स्तंभातील [ तंत्रिका तंत्र] श्वसन केंद्र श्वसन यंत्रणेचे नियंत्रण करतात. फुफ्फुसे अंतःश्वसनाबरोबर आलेल्या हवेतील ऑक्सिजनाचे रक्तात अभिसरण होण्यास मदत करतात. हृदय ऑक्सिजनयुक्त रक्त रक्तवाहिन्यांत पंप करते. रोहिणिका व केशवाहिन्या हे रक्त ऊतक कोशिकांपर्यंत पोहोचवतात. कोशिका कार्य सुरळीत चालू राहण्यासाठी अनेक निरनिराळ्या पदार्थांची गरज असली, तरी ऑक्सिजनाचा सतत पुरवठा अत्यावश्यक असतो. एकूण पुरवठ्यापैकी २५ टक्के ऑक्सिजन मेंदूला लागतो व त्यात खंड पडताच त्याच्या अपकर्षास सुरुवात होते.

ऑक्सिजन चक्रातील खंड हे जरी मृत्यूचे मूळ कारण असले, तरी मृत्यूच्या कारणांच्या वर्गीकरणाकरिता त्याचा उपयोग करीत नाहीत. कारण मृत्यूस कारणाभूत असणारा रोग वा शारीरिक बिघाड एकापेक्षा अधिक अवयवांशी व ऊतकांशी संबंधित असू शकतो. 


नैसर्गीक वा अपघाती सर्व प्रकारांच्या मृत्यूचे तीन प्रकार ओळखले जातात आणि ते तीन प्रमुख अवयवांच्या म्हणजे मेंदू, हृदय व फुफ्फुस या जीवनत्रयींच्या कार्यक्षमतेवर आधारलेले आहेत : (१) बेशुद्धी (प्रामुख्याने मेंदूशी संबंधित), (२) हृदयक्रियास्तंभन अथवा मूर्च्छा (प्रामुख्याने हृदयाशी संबंधित) आणि (३) श्वासरोध वा श्वासस्थगन (फुफ्फुसांशी संबंधीत).

(१)बेशुद्धी: निरनिराळ्या कारणांमुळे मस्तिष्क स्तंभातील जीवनावश्यक केंद्रांवर दुष्परिणाम होऊन संवेदनशून्यता उत्पन्न होण्याला बेशुद्धी म्हणतात. प्रमुख कारणांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे करता येते: (क) मेंदूवरील आघात किंवा विकृतिजन्य संपीडन (दाब पडणे). (ख) विषबाधा : अफू, बार्बिच्युरेटे, अल्कोहॉल वगैरे. (ग) अंतर्जन्य विषबाधा, ॲसिटोन, यूरिया इ. शरीरात उत्पन्न होणारी द्रव्ये रक्तात मिसळून उद्‌भवणारी विषबाधा [→ बेशुद्धी].

(१)हृद्क्रियास्तंभन अथवा मूर्च्छा : हृदयक्रिया बंद पडून मृत्यू पुढील कारणांनी होतो : (क) अतिरक्तस्त्रावजन्य रक्तक्षय : मोठ्या रक्तवाहिन्याची इजा, फुफ्फुस, प्लिहा (पानथरी) या अवयवांची गंभीर इजा, मोठ्या रोहिणी विस्फाराचे (रोहिणीच्या भित्तींचे विस्तारण होऊन बनलेल्या व रक्ताने भरलेल्या पिशवीचे) विदारण. (ख) हृद्‌स्नायूंची जोर कमी पडून येणारी हृद्‌दुर्बलता : हृद्‌स्नायू अभिकोथ (रक्त पुरवठ्यात एकाएकी रोध उत्पन्न झाल्यामुळे त्या भागातील हृदय स्नायू कोशिकांचा मृत्यू), हृद्‌वसापकर्ष (हृद्‌ स्नायू कोशिकांत अपसामान्य वसा निर्मिती), महोरोहिणी प्रत्यावर्तन (महारोहिणी झडपेच्या विकृतीमुळे डाव्या निलयातून आलेले संपूर्ण रक्त पुढे न जाता काही भाग निलयातच परत जाणे). (ग) अधिजठर, डोके या भागांवरील आघातामुळे किंवा अचानक भयग्रस्ततेमुळे उत्पन्न होणाऱ्या अवसादात (सार्वदेहिक प्रतिक्षोभात) प्रतिक्षेपजन्य हृद्‌स्तंभन होते. जास्त वेळ उन्हात काम केल्यानंतर पुष्कळ गार पाणी पिणे, तुंबलेले मूत्र मूत्राशयातून संपूर्ण व जलद काढणे किंवा जलोदरातील जल अतिशय जलद काढणे यांमुळेही हृदयक्रिया थांबण्याचा संभव असतो.

श्वासरोध अथवा श्वासस्थगन : ऑक्सिजनाचा पुरवठा बंद पडून हृदयक्रिया बंद पडण्यापूर्वी मृत्यू येतो तेव्हा तो श्वासरोधामुळे झाला असे म्हणतात आणि त्यास पुढील गोष्टी कारणीभूत होतात : (क) वायुमार्गातील अडथळे : बाह्य पदार्थ, स्त्राव, अर्बुद (नवीन कोशिकांची अत्याधिक वाढ होऊन निर्माण झालेली गाठ), पाण्यात बुडणे, गळफास, गळा दाबणे वगैरे. (ख) ऑक्सिजनाचा अपुरा पुरवठा : अती उंचीवरील विरळ हवा, कार्बन मोनॉक्साइडाचे आधिक्य, सायनाइड विषबाधा. (ग) कोणत्याही कारणामुळे उद्‌भवणारी श्वसनक्रियेसंबंधीच्या स्नायूंची अक्रियता : उदा., अफू किंवा बार्बिच्युरेटे यांची विषबाधा, धनुर्वात, कुचल्याची विषबाधा. (घ) कोणत्याही कारणांमुळे उद्‌भवणारा फुफ्फुस निःपात.

वर वर्णिलेले प्रकार अगदी काटेकोरपणाने कधीच अलग आढळत नाहीत कारण जीवनत्रयीतील अवयव परस्परावलंबी आहेत. एकाच वेळी त्रयीपैकी अधिक अवयव मृत्यूस कारणीभूत होण्याचा नेहमी संभव असतो. मृत्यूचे कारण बेशुद्धी किंवा श्वासरोध असे न म्हणता ‘मस्तिष्कावरणशोथजन्य बेशुद्धी’ किंवा ‘गळा दाबल्यामुळे श्वासरोध’ असे सांगितले जाते.

(इ)न्यायवैद्यक व मृत्यु : न्यायवैद्यकाचा व मृत्यूचा नेहमी घनिष्ट संबंध येतो. वर दिलेली कायिक मृत्यूसंबंधीची व मृत्यूच्या कारणासंबंधीची माहिती न्यायवैद्यक दृष्ट्या अधिक महत्त्वाची आहे. मृत्यूचे कारण, वेळ, मृताची ओळख इ. न्यायदानाकरिता आवश्यक असणारी माहिती या शास्त्रातील तज्ञ वैद्य खात्रीलायकपणे पुरवू शकतो. पुष्कळ वेळा ही माहिती मिळविण्याकरिता प्रेताची संपूर्ण तपासणी करावी लागते. या तपासणीला ⇨ शवपरीक्षा किंवा मरणोत्तर परीक्षा म्हणतात. कधीकधी वैद्यकीय ज्ञानात भर टाकण्याच्या हेतूने ही परीक्षा केली जाते. मात्र अशा वेळी मृताच्या जवळच्या नातलगाची लेखी अनुमती घेणे आवश्यक असते. अनेक वेळा अनुभवी वैद्यांना सुद्धा शवपरीक्षेमध्ये त्यांना संशयही आल्या नसलेल्या विकृती आढळलेल्या आहेत.

(ई)मृत्यूसंबंधीच्या काही नवीन समस्या :वैद्यकशास्त्रातील प्रगतीमुळे मृत्यूसंबंधी अनेक नवे प्रश्न उभे राहिलेले आहेत. तंत्रविज्ञानातील प्रगतीमुळे जीवनत्रयी स्वयंजनित रीत्या कार्यशील नसतानाही बराच काळपर्यंत सजीवता टिकविणे शक्य झाले आहे. नव्या साधनांमुळे पूर्वी जे मृत झाल्याचे निश्चितपणे सांगितले गेले असते तेदेखील पुनर्जीवित झाले आहेत. मृत शरीरातून काढून घेऊन रुग्णाच्या शरीरातील रोगी अवयवांच्या जागी प्रतीरोपित केलेले अवयव पूर्णपणे कार्यशील होतात. हे सिद्ध झाले आहे.

शरीराची सर्व अंतःस्थ क्रियांचे एकात्मीकरण करण्याची क्षमता हेच जिवंतपणाचे एकमेव लक्षण आहे. ही अपरिवर्तनीयपणे नाश पावणे म्हणजे मृत्यू होय. शरीरक्रियांचा अपरिवर्तनीयपणे नाश कोठे व केव्हा झाला हे ठरविण्याचे काम फक्त जीववैद्यक शास्त्रज्ञाचे आहे. हार्व्हर्ड मेडिकल स्कूलमधील एका आंतरराष्ट्रीय समितीने मृत्यूच्या नव्या निकषासंबंधी संशोधन करून १९६८ मध्ये मेंदूच्या कायमच्या (अपरिवर्तनीय) अकार्यक्षमतेकरिता पुढील चार निकष सुचविले : (१) अग्रहणशील व प्रतिसादरहित अवस्था : बाह्य उद्दीपन व अंतःस्थ गरजा या दोन्हींच्या बाबतीत (२) उत्स्फूर्त श्वसनक्रिया हालचालींचा अभाव (३) मेरुरज्जूसंबंधीच्या (पाठीच्या कण्यातील मणक्यांमधील पोकळ मार्गातून जाणाऱ्या तंत्रिका तंत्रांच्या दोरीसारख्या भागासंबंधीच्या) प्रतिक्षेपी क्रिया वगळून इतर सर्व प्रतिक्षेपी क्रियांचा अभाव आणि डोळ्यातील बाहुल्या स्थिर व विस्फारित राहणे (४) विद्युत् मस्तिष्कालेख सरळ रेषा (प्रतिसादरहित) मिळणे हा शेवटचा निकष केवळ खात्री करण्याकरिताच वापरावा व तो सक्तीचा नसावा, असेही या समितीने सुचविले आहे. चोवीस तासांनंतर वरील निकष पुन्हा लावण्यात यावेत आणि तापन्यूनता अधवा अल्पतप्तता किंवा अवसाद-उत्पादक औषधांचा परिणाम नसल्याची खात्री असल्यास मेंदू मृत झाल्याचे समजावे. 


आधुनिक अवयव प्रतिरोपण शस्त्रक्रिया तंत्रातील प्रगतीमुळे मृत शरीरातील शक्य तेवढे ताजे अवयव मिळविण्यावर भर देण्यात येत आहे. यामुळे अनेक वैद्यकीय, मानसशास्त्रीय, नैतिक व कायदेविषयक प्रश्न झाले आहेत. यांपैकी सर्वांत महत्त्वाचा प्रश्न मृत्यू ठरविण्याविषयीचा आहे आणि तो सर्वस्वी वैद्यावर अवलंबून असतो. मृत्यूची निश्चिती ठरविणारे निकष अजून सर्व ठिकाणी (अमेरिकेत निरनिराळ्या राज्यांतूनही) सारखे नाहीत. अमेरिकेच्या अध्यक्षांनी नेमलेल्या एका वैद्यकीय सल्लागार समितीने १९१८ मध्ये मृत्यू निश्चितीचे पुढील मार्गदर्शक निकष सुचविले आहेत : ज्या व्यक्तीमध्ये तपासणीनंतर विभाग (अ) किंवा विभाग (आ) मधील परिणाम आढळतील ती मृत समजावी. 

विभाग (अ) : हृद्‌-फुप्फुस : ज्या व्यक्तीमध्ये रक्ताभिसरण व श्वसनक्रिया अपरिवर्तनीय अवस्थेत बंद आहेत. (१) क्रिया बंद असल्याचे योग्य वैद्यकीय तपासणीनंतर ठरविले असले पाहिजे. प्रतिसादाचा अभाव, हृद्‌स्पंदन व श्वसनक्रिया बंद. (२) अपरिवर्तनीयता ठरविताना योग्य निरीक्षण काळ आणि / किंवा चाचणी चिकित्सा विचारात घेतली पाहिजेत. 

विभाग (आ) : तंत्रिका तंत्र : ज्या व्यक्तीमध्ये मस्तिष्क स्तंभासहित संपूर्ण मेंदूचे कार्य अपरिवर्तनीय अवस्थेत बंद असेल ती मृत समजावी. कार्य बंद आहे हे पुढील दोन गोष्टींवरून ठरवावे. (१) प्रमस्तिष्क क्रिया बंद आहेत. (२) मस्तिष्क स्तंभ क्रिया बंद आहेत. अपरिवर्तनीयता पुढील तीन गोष्टींवरून ठरवावी : (१) बेशुद्धीचे कारण निश्चित झालेले असून ते मेंदूच्या कार्याचा नाश होण्यास पुरेसे आहे. (२) मेंदूचे कोणतेही कार्य पुनःप्रस्तापित होण्याची शक्यता उरलेली नाही. (३) मेंदूचे संपूर्ण कार्य बंद पडल्याचे योग्य काळ निरीक्षण आणि/किंवा चाचणी चिकित्सा विचारात घेतली पाहिजेत. 

कुलकर्णी, श्यामकांत भालेराव. य. त्र्य. 

मृत्यू आणि कायदा : व्यक्तीच्या मृत्यूनंतर तिच्या प्रेताची विल्हेवाट लावण्यापूर्वी मृत्यूचा दाखला मिळवण्याचे कायदेशीर बंधन बहुतेक देशांत आढळते. भारतात कायद्यानुसार प्रत्येक जन्म-मृत्यूची नोंद करणे सक्तीचे आहे. मृत्यूपूर्व काळात औषधोपचार करणारा वैद्य मृत्यूस प्रत्यक्षाप्रत्यक्षपणे कारणीभूत झालेल्या गोष्टींचा निर्देश करणारे प्रमाणपत्र देऊ शकतो. स्थानिक नगरपालिका, महानगरपालिका यांच्या कार्यालयांतून मृत्यूचा दाखला नातलगांना घ्यावा लागतो. प्रेत एका गावावरून दुसऱ्या गावी नेण्याबाबत, तसेच इतरही काही बाबतीत कायदेशीर तरतुदी केलेल्या आहेत.

मृत्युपूर्वी संबंधीत व्यक्तीने दिलेल्या तोंडी किंवा लेखी जबाबाला मृत्यूपूर्व जबाब म्हणतात. हा जबाब मृत्यूच्या कारणासंबंधी किंवा परिस्थितीसंबंधी असतो. गुन्ह्याशी संबंधित असलेल्या व्यक्तीचा मृत्युपूर्व जबाब घेण्यासाठी दंडाधिकारी किंवा ‘जस्टिस ऑफ द पीस’ यांची उपस्थिती आवश्यक असते. अपवादात्मक परिस्थितीत संबंधित वैद्य मृत्युपूर्व जबाब घेऊ शकतो. 

आधुनिक काळात अवयव प्रतिरोपण शस्त्रक्रियांच्या प्रगतीमुळे मृत व्यक्तीचे संपूर्ण शरीर किंवा काही अवयव दान करण्याकडे कल वाढत आहे. काही देशांत यासंबंधी कायदेही केलेले आढळतात. काही व्यक्ती मृत्यूपूर्वीच आपले शरीर किंवा एखादा अवयव रूग्णालये किंवा वैद्यकीय शिक्षणसंस्थांना दान करण्याची इच्छा प्रकट करतात. या इच्छेची परिपूर्ती करणे मयताच्या नातलगांवर अवलंबून असते व ते अवयवदान किंवा शरीरदान नाकारू शकतात. प्रतिरोपणक्षम अवयव मृत्यूनंतर ठराविक अवधीतच काढावे लागतात. उदा., डोळ्याचा भाग प्रतिरोपणाकरता मृत्यूनंतर तीन तासांच्या आतच वापरावा लागतो. नेत्रदानाबद्दल अलीकडे विशेष प्रसार केला जातो. [→ नेत्रपेढी]. 

पुरलेले शव कायदेशीर परवानगीने उकरून काढता येते. मृताची ओळख पटली नसल्यास किंवा मृत्यूच्या कारणाबद्दल संशय किंवा अनिश्चितता असल्यास शव उत्खनन करून त्याची संपूर्ण परीक्षा करावी लागते. भारतात याविषयी कालमर्यादा घातलेली नाही. [→ शवपरीक्षा].

कायद्याच्या दृष्टीने व्यक्तीच्या मृत्यूची निश्चित वेळ आणि त्याची नैसर्गिक किंवा अनैसर्गिक कारणे-उदा., ⇨ अपघात, ⇨ आत्महत्या, मनुष्यवध इ. – या गोष्टी महत्त्वाच्या असतात कारण मृत व्यक्तीची मालमत्ता, ऋण, विमा, संपत्तीचा वारसा किंवा वारसाचे इतर लाभ यांच्याशी त्या निगडीत असतात. दान किंवा मृत्युपत्रान्वये मालमत्तेची विल्हेवाट लावली असेल, तर मृत व्यक्तीची मिळकतीचा मालकीहक्क वैध होता किंवा काय, हे सिद्ध करावे लागते. मृत व्यक्तिच्या संपत्तीचे हस्तांतरण, संपादन इ. बाबतीत कायदेशीर तरतुदी आहेत. उदा., भारतीय उत्तराधिकार अधिनियम – १९२५ व हिंदू उत्तराधिकारी अधिनियम – १९५६.

एखादी व्यक्ती दीर्घकाल (काही देशांत ७ वर्षे) बेपत्ता असल्यास कायदेशीर दृष्ट्या ती मृत झाल्याचे गृहीत धरण्यात येते. तथापि असे गृहीतक त्याचप्रमाणे मृत म्हणून धरलेल्या व्यक्तिच्या मालमत्तेची विल्हेवाट यांसंबंधी वेगवेगळ्या देशांत वेगवेगळे कायदे आढळतात. त्याचप्रमाणे बेवारशी शव किंवा त्याचे अवशेष यांची अंतीम विल्हेवाट लावण्यासंबंधीही वेगवेगळे कायदेकानू आढळतात. न्यायालयात चालू असलेल्या एखाद्या दाव्यात वादी अथवा प्रतिवादी मृत्यू पावल्यास त्याचा दाव्यावर होणारा परिणाम व त्यातून उद्‌भवणारी परिस्थिती याबाबतही नियम आहेत. [→ उत्तराधिकार विधि]. 

भालेराव, य. त्र्यं. 


समाजशास्त्र, मानसशास्त्र, धर्म इ. व मृत्यू : मृत्यू अनेक कारणांनी येऊ शकतो. त्यांची वर्गवारी अशी : (१) आत्महत्या, (२) अपघात, (३) खून, (४) मृत्युदंड, (५) युद्ध, (६) आजार व (७) वार्धक्य. यांतील पहिली सहा कारणे टाळता येणे शक्य आहे कारण त्यात कोणत्या ना कोणत्या प्रकारे मानवी हस्तक्षेप किंवा प्रयत्न यांचा वाटा असतो. त्यामुळेच या प्रकारच्या मृत्यूस अनैसर्गिक मृत्यू म्हणतात, तर वार्धक्यामुळे येणाऱ्या मृत्यूस नैसर्गिक मृत्यू म्हणतात. वृद्धापकाळात येणारा मृत्यू आयुमर्यादा संपल्याचा निदर्शक ठरतो व तो अपेक्षितही असतो आयुर्मर्यादा देशकालपरिस्थितीनुसार कमीअधिक आढळते. [→ आयुर्मान, सरासरी लोकसंख्या]. 

मृत्यूचे भय व त्याच्या अपरिहार्यतेची जाणीव सार्वत्रिक असून त्याचे मानवी वर्तनावर दूरगामी व सखोल परिणाम होतात. मृत्यूच्या जाणिवेमुळे मानवी वर्तन सतत नियंत्रित होत असते. मृत्यू घडतो तेव्हा त्या व्यक्तीच्या सामुदायिक अस्तित्त्वाचा एक भाग निखळून पडतो. मृत्यूमुळे परस्परांवर आधारलेल्या विविध सामाजिक संबंधांवर विलक्षण ताण निर्माण होतो अनेक संबंधांचा विच्छेद होतो व त्यांची लगेचच पुन्हा जुळणी करावी लागते. कुटुंबप्रमुख, अधिपती, शास्ता, राजा, गुरू, वारस इत्यादींची मृत्यूमुळे रिक्त झालेली पदे पुन्हा भरावी लागतात. मृत्यूमुळे संबंधित व्यक्तीवर वैधव्य, विधुरता, अनाथता यांसारख्या आपत्ती येतात. मालमत्तेच्या वाटणीत वारसाचे प्रश्न निर्माण होतात. 

मृत्यूबाबतची सर्वसाधारण मानवी प्रतिक्रिया म्हणजे त्याचे भय व तो टाळण्याची प्रवृत्ती. प्राचीन कालापासून सर्वच धार्मिक-तात्त्विक संप्रदायांनी व विचारप्रणालींनी मृत्यूची अपरिहार्यता गृहीत धरून मानवी जीवनास एक अर्थपूर्ण वैचिरिक बैठक प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला आहे. ⇨ सिग्मंड फ्रॉइड (१८५६–१९३९) या मनोविश्लेषणज्ञाने जीजीविषा-जगण्याची वासना-आणि निर्वाण तत्त्व–मृत्यूची वासना-या दोन मूलभूत प्रेरणा मानल्या आहेत. सौंदर्य, प्रेम, मैत्री यांसारखी सार्वत्रिक मूल्ये तसेच मानवी कर्तृत्व, कौशल्य, यश या सर्वांचा मृत्यूमुळे निकाल लागतो. मरणोन्मुख व्यक्तीस होणाऱ्या वेदना हा मृत्यूच्या भयातील एक घटक आहे. कुटुंबाकडून तसेच इतरांकडून होणारी उपेक्षा, शारीरिक अपंगत्व, परावलंबित्व, स्वतःवरील नियंत्रण सुटणे, स्वकीयांनी टाकणे, हीही मृत्यूभयाची कारणे असतात. इतर गोष्टींचे भय व मृत्यूचे भय यांत फरक आहे. मृत्युभय त्या व्यक्तीचे सबंध अस्तित्व व्यापते व तिला त्या भयात संपूर्ण बुडवून टाकते. त्यामुळे कोंडी होऊन व्यक्तीचे मानसिक व भावनिक जीवन उद्‌ध्वस्त होते. इतर भयांत भयाची उद्दीपके दूर झाली, की भयही नाहीसे होते. मृत्यूचे तसे नाही कारण या भयाचा उद्दीपक नष्ट होत नाही.

मानवाच्या मृत्यूचे कोडे उलगडण्याचा प्रयत्न सर्वच समाजांत, धर्मांत व संस्कृतींत आदिम कालापासून आजवर होत आल्याचे दिसते.मृत्यूनंतर आत्मा वा जीव कोठे जातो याबाबतचे चिंतन ⇨ मरणोत्तरस्थितिविज्ञानात (एस्कटॉलॉजी) केले जाते. माणूस मृत्यू पावला म्हणजे त्याचे केवळ शरीर मरते आत्मा वा जीव अमर असून तो पुन्हा दुसऱ्या योनीत वा शरीरात जन्म घेतो असे मानणारी विचार सरणी ⇨ पुनर्जन्माचा पुरस्कार करणारी म्हटली जाते. हा पुनर्जन्म जीवाच्या चांगल्या-वाईट पूर्वकर्मानुसार वेगवेगळ्या योनींत प्राप्त होत असतो यास ⇨ कर्मवादाप्रमाणे कर्मविपाक म्हणतात. येशू ख्रिस्ताला क्रूसावर चढविल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्याचे ⇨ पुनरूत्थान झाल्याचे ख्रिस्ती धर्म मानतो. ज्यू व ख्रिस्ती धर्मांत निवाड्याच्या दिवशी सर्वच मृतांच्या पापपुण्यांचा निवाडा ईश्वर करणार आहे असे म्हटले आहे. त्यांना त्यांच्या पापपुण्यानुसार स्वर्ग वा नरक प्राप्त होतो. [→ निवाड्याचा दिवस]. इस्लाम धर्मातही ‘कियामत’ च्या दिवशी सर्व मृतात्म्यांच्या पापपुण्याप्रमाणे त्यांना गती प्राप्त होईल अशी श्रद्धा आहे. आदिम समाजांत मृतात्मा भूतादी योनींत प्रवेश करतो अशी समजुती आहेत. [→ आदिवासी]. 

देहापासून प्राण वेगळा होऊन बाहेर जाणे वा प्राण व देह यांच्या वियोगास मृत्यू म्हटले जाते. दुसऱ्या योनीत जाणे म्हणजे मृत्यू. मृत्यू व अपमृत्यू असे मृत्यूचे दोन प्रकार होत. मृत्यूची जी कारणे मानवी हस्तक्षेपाने एरवी टाळता येणे शक्य झाले असते अशा कारणांनी येणारा मृत्यू ते अपमृत्यू आणि वार्धक्याने येतो तो नैसर्गिक मृत्यू होय. अधिक काळ जगण्यासाठी म्हणजे मृत्यू टाळण्यासाठी माणसाची सतत धडपड चाललेली दिसते. अनेक औषधे, रसायने, मंत्रतंत्र, कर्मकांड, योगसाधना इ. मार्गांचा त्यासाठी माणूस अवलंब करत आला आहे. मरण कधीच येऊ नये म्हणून अमरत्व प्राप्तीसाठी किंवा अमृत मिळविण्यासाठी देवदानवांनी प्रयत्न केल्याच्या पुराणकथा बहुतांश धर्मांत आढळतात. ‘मृत्योर्मा अमृतं गमय’ यांसारख्या वचनांतून असाच विचार मांडला आहे. मृत्यूबाबत जिज्ञासा बाळगणारा उपनिषदांतील नचिकेतस प्रसिद्ध आहे. त्याने मृत्युदेवता यमाकडून मृत्यूचे रहस्य म्हणजे आत्मविद्या जाणून घेतली (कठोपनिषद १·१·२०–२९). मरणोत्तर कुठल्याही प्रकारे अस्तित्व उरत नाही, असे एक मत कठोपनिषदात सांगितले असून चार्वाकादी नास्तिक या मताचा पुरस्कार करतात. 

जैन धर्मात वार्धक्य, असाध्य रोग, दुर्भिक्ष्य, उपसर्गादी कारणांनी जेव्हा जगण्याची आशा संपते, तेव्हा धर्म म्हणून ⇨ संलेखना व्रत आचरून किंवा अनशन करून देहत्याग करणे विहित मानले आहे. बौद्ध धर्मांतही मृत्यू अटळ मानला आहे. तिबेटमधील लामा धर्मात जराजर्जर देह त्यागण्याची धर्मविहित प्रथा पूर्वापार चालत आली आहे. भीष्माने उत्तरायणात इच्छामरण स्वीकारले. कृतिशील जीवनकार्य संपते तेव्हा किंवा जराप्राप्त होऊन जगण्यात अर्थ उरत नाही तेव्हा योग-समाधी, जलप्रवेश, अग्निप्रवेश, अनशन इ. मार्गांनी देहत्याग करणे हिंदू धर्मात विहित मानले आहे. दुर्धर रोगाने त्रस्त व्यक्तीने ईशान्य दिशेकडे प्रस्थान ठेवावे व केवळ पाणी व वायू भक्षण करून देहपात होईपर्यंत चालत राहावे, असे मनुस्मृतीत (६·३१) म्हटले आहे. 

पहा : अंत्यविधि व अंत्यसंस्कार मृत्युपत्र.

भोपटकर, चिं. त्र्यं.

संदर्भ : 1. Choran, Jacques, Death and Western Thought, New York, 1963.

             2. Cutler, D. Updating Life and Death: Essays in Ethics and Medicine, Boston, 1969.

             3. Deshpande, M. G. Philosophy of Death, Pune, 1979.

             4. Evans, W. E. D. Chemistry of Death, Springfield, 1963.

             5. Feible, Herman, Ed, The Meaning of Death, New York. 1959.

             6. Glaser, Barney Strauss, Anselm, Awareness of Dying : A Study of Social Interaction, Chicago, 1965.

             7. Kastenbaum, Robert Aisenberg, Ruth, The Psychology of Death, London, 1974.

             8. Korein, J. Brain Death : Interrelated Medical and Social Issues, New York, 1978.

             9. Kubler Ross, E. On Death and Dying, New York, 1969.

             10. Myers, Frederick W. H. Human Personality and Its Survival of Bodily Death, 2 Vols., New York, 1954.

             11. Parikh, C. K. A Simplified Textbook of Medical Jurisprudence, Bombay, 1970.

             12. Shneidman, E. S. Ed. Death: Current perspectives, Hamilton, Calif., 1976.

             13. Simpson, K. Ed. The Mysteries of Life and Death, New York, 1979.