इमॅन्युएल स्वीड्न बॉर्ग

स्वीड्न बॉर्ग, इमॅन्युएल : (२९ जानेवारी १६८८-२९मार्च १७७२). स्वीडिश वैज्ञानिक, ख्रिस्ती गूढवादी तत्त्वज्ञ आणि ईश्वर-शास्त्रवेत्ता (थिऑलॉजियन ). जन्म स्टॉकहोम शहरी. मूळ नाव इमॅन्युएल स्वीडबॉर्ग. त्याचे वडील येस्पर स्वीडबॉर्ग हे स्वीडिश धर्मोपदेश-कांच्या वर्तुळात महत्त्वाचे स्थान बाळगून होते. त्याचप्रमाणे अप्साला विद्यापीठात ईश्वरशास्त्राचे प्राध्यापक होते. नंतर स्कारा येथे ते बिशप म्हणून नेमले गेले. अप्साला विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर (१७०९) इमॅन्युएलचे वास्तव्य पाच वर्षे परदेशांत होते. गणित आणि निसर्गविज्ञाने ह्या विषयांकडे त्याचा ओढा होता आणि त्यांचा अभ्यास करण्यासाठी त्याने इंग्लंड, हॉलंड, फ्रान्स आणि जर्मनी ह्या देशांना भेटी दिल्या. त्याने यंत्रविद्याही शिकून घेतली. १७१५ मध्ये तो स्वीडनला परतला आणि स्वीडनमधील पहिले वैज्ञानिक जर्नल त्याने काढले. स्वीडनच्या राजाकडून त्याचीखाणींशी संबंधित असलेल्या ‘रॉयल बोर्ड ऑफ माइन्स ‘मध्ये असेसर एक्स्ट्राऑर्डिनरी आणि नंतर असेसर म्हणून नियुक्ती झाली. तेथे तीस वर्षे काम करून त्याने स्वीडनमधील धातूंच्या खाणींशी निगडित असलेल्या उद्योगक्षेत्राचा विकास घडवून आणला. अनेक वर्षे तो विविध वैज्ञानिक आणि तत्त्वज्ञानीय प्रश्नांबद्दल लेखनही करीत होता. बीजगणिताचे स्वीडिश भाषेतील पहिले लेखनही त्याचेच. रसायनशास्त्र आणि भौतिकी या विषयांवरही त्याने लेखन केले. निसर्ग तत्त्वज्ञान (नॅचरल फिलॉसफी )आणि रसायनशास्त्र या विषयांवर त्याने दोन ग्रंथ लॅटिनमध्ये लिहिले. १७३४ मध्ये त्याने ‘फिलॉसॉफिकल अँड लॉजिकल वर्क्स’ (इं. शी.३ खंड) हा ग्रंथ लिहिला या तीन खंडांपैकी ‘प्रिन्सिपल्स ऑफनॅचरल थिंग्ज’ (इं. शी.) ह्या पहिल्या खंडात त्याने आपले निसर्ग-विषयक परिपक्व तत्त्वज्ञान मांडले. विगामी युक्तिवादांच्या आधारे त्याने या ग्रंथात जे अनेक निष्कर्ष काढले, त्यांचे आधुनिक वैज्ञानिकांनी मांडलेल्याप्रणालींशी बरेच साम्य आहे. उदा., स्वीड्नबॉर्गने अशी मांडणी केली, की द्रव्य (मॅटर) हे अनिश्चितपणे अविभाज्य असलेल्या कणांपासून बनलेले असते आणि हे कण कायम गोलाकार गतीने फिरत असतात. ही कल्पना अणुकेंद्र आणि त्याचे इलेक्ट्रॉन ह्यांच्या संदर्भातील आधुनिक कल्पनेशी साम्य दर्शविते. त्याचप्रमाणे सूर्यमालेतील ग्रहांच्या उत्पत्तीच्या संदर्भातत्याने मांडलेली कल्पना, सूर्य आणि इतर ग्रह ह्यांची उत्पत्ती एकाच अभ्रिकेपासून झाली, ह्या ⇨ लाप्लास (१७४९-१८२७) याच्या गृहीत-काशी जुळणारी आहे. ⇨ इमॅन्युएल कांटनेही (१७२४-१८०४) अशी कल्पना मांडली होती.

१७४०-४१ मध्ये स्वीड्नबॉर्गचा द इकॉनॉमी ऑफ द ॲनिमल किंग्डम (दोन खंड) हा ग्रंथ प्रसिद्ध झाला. एक वैज्ञानिक म्हणून स्वीड्नबॉर्गच्या कारकिर्दीचा हा एक नवा टप्पा होता. विश्वनिर्मितीचा आत्मा शोधून काढण्यासाठी त्याने माणसाचा आत्मा समजून घेण्याचा प्रयत्न केला. शरीर हे माणसाचे राज्य. त्या राज्यातच त्याचा आत्मा जाणून घेण्यासाठी त्याने मानवी शारीर (ॲनॅटॉमी) आणि शारीरक्रियाविज्ञान यांचा पूर्ण अभ्यास केला. त्यातही रक्त आणि मेंदू यांवर त्याने विशेष लक्ष केंद्रित केले मात्र मानवी शरीर हा त्याचा विषय नव्हता. मानवी शरीर आणि आत्मा ह्यांचे नेमके नाते ह्या विषयावर त्याचे चिंतन केंद्रित झाले होते. आत्मा हे मानवी रक्ताचे आंतरिक जीवन असून त्याचे स्थान मेंदूत आहे, असा त्याचा विश्वास होता. मानसशास्त्रातही त्याने काही संशोधन केले होते.

स्वीड्नबॉर्गच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा दस्तऐवज म्हणजे त्याचे एक जर्नल (जर्नल ऑफ ड्रीम्स, १७४३-४४, इं. भा.). भूतकाळातत्याने अनुभवलेल्या विविध स्वप्नांचा वृत्तान्त तसेच त्याला आलेले काही आध्यात्मिक अनुभव त्यात त्याने नोंदलेले आहेत. मार्च ते ऑक्टोबर १७४४ ह्या काळात रात्री हे अनुभव त्याने घेतले. पुढे त्याच्या मृत्यूनंतर १८५९ मध्ये हे जर्नल प्रसिद्ध झाले. त्यातील काही स्वप्ने ढळढळीतपणे लैंगिक स्वरूपाची असल्यामुळे अनेकांना धक्का बसला.

स्वीड्नबॉर्गला बौद्धिक अहंकार होता. थोर वैज्ञानिक म्हणूनआपल्याला मान्यता मिळावी, ही त्याची महत्त्वाकांक्षा होती तथापि७ एप्रिल १७४४ रोजी त्याला ख्रिस्ताचे पहिले दर्शन झाले. त्या दर्शनाने त्याला बरीच मनःशांती लाभली. एप्रिल १७४५ मध्ये लौकिक ज्ञानाचा त्याग करण्याची ईश्वरी सूचना त्याला मिळाली. त्यानंतर त्याने हाती घेतलेल्या निसर्गविज्ञानविषयक ग्रंथांचे लेखन अपूर्णच ठेवले. यानंतरच्या काळात त्याने बायबल चा अर्थ लावण्याच्या कामी त्याची सारी कार्यशक्ती वाहिली. १७४९-७१ या काळात त्याने सु. ३० लॅटिन ग्रंथ लिहिले खरे तथापि त्यांतील बरेच अनामिकपणे लिहिले होते आणि त्यांचे विषयही त्याच्या ईश्वरश्रद्धेशी निगडित होते. त्यांत हेवन्ली अर्काना (८ खंड, १७४९-५६, इं. भा.), अपोकॅलिप्स एक्सप्लेंड (४ खंड, १७८५-८९, इं. भा.) ह्यांंचा समावेश होतो. बायबलमधील उत्पत्ती (जेनिसिस ), निर्गम (एक्सोडस) आणि प्रकटीकरण (बुक ऑफ रेव्हिलेशन) ह्यांच्या आध्यात्मिक अर्थावरील ही त्याची भाष्ये आहेत. ट्रू ख्रिश्चन रिलिजन (१७७१, इं. भा.) या ग्रंथात त्याचे ईश्वरविद्याविषयक चिंतन आले आहे. ऑन हेवन अँड इट्स वंडर्स अँड ऑन हेल (१७५८, इं. भा.) हा त्याचा ईश्वरविद्याविषयक ग्रंथ सर्वोत्कृष्ट होय.

स्वीड्नबॉर्गच्या मते, ईश्वरी प्रेम आणि ईश्वरी प्रज्ञा हाच सर्व उत्पत्तीचा उगम होय. देव, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्या त्रयींतून ईश्वराच्या प्रेम, प्रज्ञा आणि कृती (ॲक्टिव्हिटी) ह्यांचा प्रत्यय येतो. हीच पवित्र ईश्वरी त्रयी मानवी जीवांत आत्मा, शरीर आणि मन ह्या रूपांत प्रकटते. सर्व जीव हे ह्याच ईश्वरी प्रेमाचे आणि प्रज्ञेचे विशिष्ट पैलू होत आणि ते भौतिक पातळीवर असले, तरी ते आध्यात्मिक सत्यांशी संवादी असतात तथापि मनुष्य आपल्या संकल्पस्वातंत्र्याचा दुरुपयोग करीत असल्यामुळे ह्या व्यवस्थेत बिघाड होतो. ईश्वरी प्रेमापासून दूर होऊन मनुष्य आपल्या अहंकारावर आपले प्रेम केंद्रित करतो आणि त्यामुळेच या जगात दुष्टता आली. ह्या दुःस्थितीतून मनुष्याला वाचविण्यासाठी, त्याचा उद्धार करण्यासाठी ख्रिस्ताने मेरीकडून मानवी शरीर मिळवले आणि तो या जगात आला. ह्या जगात अनेक मोहांचा प्रतिकार केल्यानंतर तो ईश्वरी आत्म्याचे मूर्तिमंत रूप बनला. स्वीड्नबॉर्गच्या मते, ख्रिस्ताच्या अनुकीर्तनातून मानवजातीचे पुनर्निर्माण होऊन ती ईश्वरी प्रतिमेत एकरूप होणे म्हणजेच तिचा उद्धार होय.

त्रयदेवाच्या आणि उद्धाराच्या सनातनी कल्पना त्याने नाकारल्या. पिता म्हणजे ईश्वर स्वतः, पुत्र म्हणजे ईश्वरी आत्म्याचे मूर्तिमंत मानवी रूप आणि ईश्वरी आत्मा म्हणजे ईश्वरी मानव जो ख्रिस्त, त्याची पुण्यकर्मे अशी त्याची धारणा होती. उद्धाराच्या पारंपरिक कल्पनेचाही त्याने अव्हेर केला. स्वीड्नबॉर्गच्या मते, उद्धार म्हणजे दुष्टतेच्या वर्चस्वापासून मानवजातीची सुटका. ईश्वरी सत्याला प्रतिसाद देऊन त्याचा स्वीकार करण्यावरच माणसाची मुक्ती अवलंबून असते.

लंडनमध्ये तो निधन पावला. स्वीडिश सरकारच्या विनंतीवरून १९०८ मध्ये त्याचे पार्थिव अप्साला येथे नेऊ दिले गेले. त्यानंतर तेथील कॅथीड्रलमध्ये त्याचे दफन केले गेले.

संदर्भ : 1. Sigstedt, Cyriel O. The Swedenborg Epic : The Life and Works of Emanuel Swedenborg, 1971.

           2. Tafel, R. L. Document Concerning the Life and Character of Emanuel Swedenborg, 2 Vols., 1948–55.

कुलकर्णी, अ. र.