कल्याणवाद : आयुष्यात आपण कशाच्या तरी पाठीमागे असतो, काही तरी शोधीत असतो. ते मिळाल्याने जीवन कृतार्थ होईल अशी आपली धारणा असते. जीवनाच्या या परमप्राप्तव्यास ‘कल्याण’ असे नाव देता येईल. पण केवळ असे नाव देऊन विचारव्यवस्थेच्या दृष्टीने विशेष काही साधत नाही. कारण कल्याण कशात सामावलेले आहे, हाच खरा महत्त्वाचा प्रश्न असतो.

या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी ॲरिस्टॉटलने (३८४ – ३२२ इ. स. पू.) अशी भूमिका घेतली, की इतर सर्व गोष्टींप्रमाणे माणसाचीसुद्धा ओढ त्याच्या स्वाभाविक स्थितीकडे अथवा ‘स्व’त्वाकडे असते. माणसाचे स्वत्व अथवा माणूसपणा कशात आहे? त्याचा ‘स्व’भाव कोणता? विवेकशीलता हा माणसाचा खरा स्वभाव आहे, असे ॲरिस्टॉटलचे उत्तर आहे. मात्र हे लक्षात ठेवले पाहिजे, की विवेक हे आपले स्वरूप आपल्या ऊर्मी, प्रवृत्ती, वासना आणि आकांक्षा यांहून सर्वस्वी अलग नाही. विविध वासना आणि प्रवृत्ती यांच्यातील संघर्ष टाळून त्यांच्यात संवादित्व निर्माण करणे व अशा रीतीने उभे जीवन सुसंघटित व एकप्राण करणे, हे विवेकाचे काम होय. हे विवेकशील जीवन म्हणजेच सद्‌गुणी माणसाचे जीवन होय. सद्‌गुण हा कृतिपरायण असतो. कधी तरी आकस्मिक होणारी कृती म्हणजे सद्‌गुण नव्हे, ती कृती सतत अभ्यासाने निर्माण होणाऱ्‍या सवयीचा भाग असावयास हवी. वासनांचा अथवा ऊर्मींचा ऐकांतिक उद्रेक टाळून त्यांचा सुवर्णमध्य निवडण्याची आणि तद्‌नुसार कृती करण्याची सवय म्हणजे सद्‌गुण होय. ज्या विवेकातून हा सद्गुण जन्मतो, तो कृतिसंबद्ध विवेक अथवा व्यावसायिक बुद्धी होय. पण याहून वेगळी अशी विशुद्ध बुद्ध असते. तिचे कार्य चिंतन हे आहे. सद्‌गुणी माणसाने चिरंतन सत्याचे चिंतन करीत राहणे हे परिपूर्ण जीवन होय. असे परिपूर्ण जीवन हेच मानवाचे परमकल्याण होय, असा ॲरिस्टॉटलच्या कल्याणवादाचा सारांश आहे. [→ॲरिस्टॉटल].

परिपूर्णता हेच परमकल्याण होय, हा विचार हेगेल (१७७० — १८३१) या जर्मन तत्त्वचिंतकाच्या तत्त्वचर्चेचाही भाग आहे. निरपेक्ष चित्तत्त्व हे, हेगेलच्या मते विश्वाचा आधार आणि पर्यवसान आहे. इतिहासाच्या द्वंद्वात्मक विकासक्रमात हे चित्तत्त्व विषयरूपाने स्वतःचाच प्रक्षेप करते. ऐतिहासिक प्रक्रियेतून सिद्ध झालेल्या निरनिराळ्या सामाजिक संस्थांचे व्यूह हे त्या विश्वचैतन्याचे उत्तरोत्तर पूर्णतेकडे पोहोचणारे आविष्कार होत. प्रत्येक व्यक्ती हीसुद्धा या चित्तत्त्वाचा अपूर्ण आविष्कार होय. म्हणून सामाजिक संस्थांचे व्यूह असलेल्या समाजाशी, सामाजिक संस्थांत मूर्त झालेल्या सामाजिक संकल्पनांशी एकरूप होण्याने व्यक्ती पूर्णतेकडे जाऊ शकते. कुटुंब, व्यवसाय इ. संस्थांचा व्यूह असलेल्या व शासनाद्वारा एकात्म झालेल्या समाजाला हेगेल राज्य म्हणतो. ह्या राज्यातून व्यक्त होणाऱ्‍या संकल्पशक्तीशी आपल्या इच्छा-आकांक्षा तद्रूप करण्यानेच व्यक्तीआत्मस्वातंत्र्याचा अनुभव घेऊ शकते. हा स्वसंवेद्य स्वातंत्र्यानुभव म्हणजे व्यक्तीचे कल्याण होय, असा हेगेलच्या मताचा आशय आहे. या तत्त्वज्ञानाचा सामाजिक परिणाम प्रस्थापित हितसंबंधांचे रक्षण करण्याकडे होईल असा आक्षेप त्याच्यावर कित्येकदा घेण्यात येतो. [→ हेगेल, जॉर्ज व्हिल्हेल्म फ्रीड्रिख].

ग्रीन (१८३६ — १८८२) या इंग्रज तत्त्वचिंतकाच्या विचारावर हेगेलचा प्रभाव असला, तरी त्याचा सामाजिक आशय उदारमतवादी आहे, असे म्हटले जाते. इतरांहून आपण विभक्त आहोत अशी स्वभावत: जाणीव असणारे, व्यक्तीच्या ठिकाणी राहणारे कालातीत आत्मतत्त्व आणि निसर्गाच्या बुडाशी असणारे चित्तत्त्व ही दोन्ही मूलत: एकच आहेत अशी त्याची भूमिका आहे. व्यक्तीमध्ये सुप्त रूपाने असणाऱ्‍या गुणांचा विकास करून वैश्विक आत्मतत्त्वाच्या प्रवासाची प्रतिकृती स्वतःच्या जीवनात उमटविण्याचा प्रयत्न, हाच त्याच्या मते नैतिक जीवनाचा अर्थ होय. जीवनामध्ये आपण स्वत:लाच शोधीत असतो. ‘स्वत:ला’ याचा अर्थ स्वतःच्या अधिक उन्नत स्वरूपाला. स्वत:च्या उन्नत स्वरूपाचा आदर्श स्वत:तून निर्माण करण्याची आत्म्याची कुवत हाच त्याचा चित्स्वभाव होय. स्वत:च्या अधिकाधिक उन्नत स्वरूपाचा आविष्कार करीत पूर्णत्वास म्हणजे स्वत:च्या वास्तविक स्थितीस पोहोचणे हेच अंतिम कल्याण होय. या अंतिम कल्याणात ‘माझे’ आणि ‘परक्याचे’ असा विरोध असणार नाही. जे कल्याण आहे, ते व्यक्तिनिरपेक्षपणे सर्वांचेच कल्याण असले पाहिजे. [→ग्रीन, टॉमस हिल].

ब्रॅड्ली (१८४६ — १९२४) व बोझंकेट (१८४८ — १९२३) या दोघा इंग्रज तत्त्वचिंतकांच्या विचारासही ‘कल्याणवाद’ अथवा ‘पूर्णतावाद’ असे म्हणता येईल. त्याचा सारांश असा : इच्छा ही स्वतःच्या तृप्तीकडे धाव घेत असते. त्याचबरोबर हेही खरे, की इच्छेच्या द्वारा आपण स्वतःलाच प्राप्त करून घेऊ पाहतो. मला कीर्ती पाहिजे असते, याचा अर्थ ती कीर्ती माझी आहे म्हणून मला ती पाहिजे असते. हा ‘माझेपणा’ काढून घेतल्यास कीर्ती हा इच्छा-विषय राहत नाही. गृह-दार-पुत्र-वित्त इ. ज्या अनेक प्राप्तव्य गोष्टी असतात, त्यांच्या द्वारा आपण स्वतः स्वत:लाच प्राप्त करू पाहतो. इच्छेचा विषय प्राप्त झाल्यावर चित्ताचे समाधान झाले पाहिजे. पण पुष्कळदा असे दिसते, की इच्छेचा विषय प्राप्त झाला, तरीही मूळची अतृप्ती अथवा एक प्रकारची पोकळी तशीच राहते. अशा वेळी ती इच्छा आभासमान होती, खरी नव्हती, असे म्हणावे लागेल. ती इच्छा माझी असे म्हटल्यास, तिचा धनी जो मी तोही आभासमान ठरतो. खरा मी प्राप्त झाल्यानेच समाधान मिळेल. त्या प्राप्तीलाच ‘आत्मलाभ’ अथवा ‘कल्याण’ म्हणता येईल. [→ ब्रॅड्ली, फ्रान्सिस हर्बर्ट बोझंकेट, बर्नार्ड].

खऱ्या ‘मी’चा लाभ कसा करून घ्यावयाचा? इच्छा आभासमान ठरते, याचे कारण तिचा माझ्या अन्य इच्छांशीसंघर्ष येतो हे आहे. इच्छांचा एकमेकींशी संघर्ष टाळून जे सुसंघटित व्यक्तिजीवन निर्माण करता येईल, तेच खऱ्‍या ‘स्व’च्या दिशेने चाललेले जीवन होय. पण एका व्यक्तीच्या जीवनाचा संघर्ष समाजातील इतर व्यक्तींच्या जीवनाशीही येईल. तो नाहीसा करण्याच्या दिशेने इतिहासक्रमात समाजाची वाटचाल सुरूच आहे. निरनिराळे कायदे, नीतिकल्पना, शासनयंत्रणा इत्यादींच्या रूपाने वास्तविक अथवा खरा ‘मी’ रूप घेत आहे. या ऐतिहासिक प्रक्रियेत प्रत्येक व्यक्तीला  तिचे स्थान आपोआप मिळालेले असते. त्या स्थानाला अनुलक्षून काही कर्तव्येही समाज-नियमांनी ठरलेली असतात. ती योग्य रीतीने आणि मनापासून करण्यात जीवनाची कृतार्थता आहे. त्यातच व्यक्तीला तिचा खरा आत्मा सापडतो. तेच तिचे कल्याण.  

पहा : नीतिशास्त्र. 

संदर्भ : 1. Bradley, F. H. Ethical studies, Oxford, 1927.

    2. Greenm, T. H. Prolegomena to Ethics, Oxford, 1883.

दीक्षित, श्री. ह.