मोक्ष : कर्म, शरीर, जन्ममरण, दुःख, पाप इ. अनिष्ट बंधनातून मुक्त झाल्यामुळे जीवाला प्राप्त होणारी पारमार्थिक कल्याणाची सर्वोत्तम अवस्था. जगातील विविध धर्म व संप्रदाय आपल्या अनुयायांना मोक्ष देण्याचे आश्वासन देत असतात आणि त्यासाठी आपण उपदेशिलेल्या मार्गाचा लोकांनी अवलंब करावा, असा त्यांचा आग्रह असतो.

भारतीय संस्कृतीमध्ये मानवी जीवनातील मूलभूत उद्दिष्टे म्हणून मानण्यात आलेल्या धर्म, अर्थ, काम व मोक्ष या चार पुरुषार्थांपैकी मोक्ष हा अंतिम व सर्वश्रेष्ठ ⇨ पुरुषार्थ होय. जन्ममरणाच्या दुःखदायक फेऱ्यातून कायमची सुटका झाल्यामुळे होणारे सर्वश्रेष्ठ पारमार्थिक कल्याण, हा स्थूलमानाने मोक्ष या संज्ञेचा पारिभाषिक अर्थ आहे. बंध व मोक्ष या परस्परविरुद्ध अर्थाच्या संज्ञा असून अज्ञानामुळे बंध व ज्ञानामुळे मोक्ष प्राप्त होतो, असे बहुतेक भारतीय दर्शनांनी व संप्रदायांनी मानले आहे. मोक्ष या अर्थाने मुक्ती, अपवर्ग, कैवल्य (शुद्धत्व, एकत्व), निःश्रेयस (आत्यंतिक कल्याण), निर्वाण (विझणे), परमपुरुषार्थ, उद्धार इ. शब्दही वापरले जातात. यांपैकी निर्वाण हा शब्द प्रामुख्याने बौद्ध व जैन दर्शने वापरतात. पारलौकिक कल्याण दर्शविण्यासाठी स्वर्ग हा शब्दही वापरला जातो. परंतु स्वर्गसुख भोगणारास पुण्यसंचय संपला असता पुन्हा जन्ममरण असल्यामुळे स्वर्ग हे फल नाशवंत आहे, तर मोक्ष अविनाशी आहे, असे भारतीय मानतात. मोक्षप्राप्तीच्या इच्छेला मुमुक्षा, तशी इच्छा बाळगणाऱ्या साधकास मुमुक्षू आणि ज्या जीवाला मोक्षप्राप्ती झाली आहे, त्याला मुक्त असे म्हणतात. मृत्यू वा स्वातंत्र्य म्हणजे मोक्ष असे मानणाऱ्या चार्वाकांसारख्या काही इहवादी नास्तिकांचा अपवाद वगळता [ → लोकायत दर्शन] भारतात उत्पन्न झालेल्या हिंदू, बौद्ध, जैन, शीख इ. सर्व धर्मांनी व त्याच्या विविध संप्रदायांनी मोक्षाची संकल्पना स्वीकारलेली आहे. एका दृष्टीने वास्तव व ऐहिक जीवनाच्या द्वेषातून मोक्षेच्छा निर्माण झाल्याचे दिसत असल्यामुळे तिच्या मुळाशी निराशावाद, पलायनवाद इ.आहेत, असे म्हणता येते. माणसे ‘मोक्षमार्गी’ बनतात हे यमतत्त्वाचे वा मूलभूत मरणप्रेरतेचे म्हणजेच फ्रॉइडने सांगितलेल्या निर्वाणतत्त्वाचे निदर्शक आहे, असे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणतात. याउलट. ऐहिक जीवनातील दुःखे, त्या जीवनाची अनित्यता इत्यादींच्या कडवट अनुभवातून मोक्षेच्छा निर्माण होत असल्यामुळे तिच्या मुळाशी नित्य टिकणारे परमसुख मिळविण्याचा स्वप्नाळू आशावाद आहे, असेही म्हणता येते.

ऋग्वेदादी संहितांच्या काळात इंद्रादी देवतांच्या कृपेने इहलोकीचे जीवन सुखी करणे, हे उद्दिष्ट लोकांच्या डोळ्यापुढे होते. हे उद्दिष्ट मोक्षापासून तत्त्वतः भिन्न होते. उपनिषदांपासून पारमार्थिक कल्याणाचे उद्दिष्ट अधिकाधिक स्पष्ट होऊ लागले. पुरुषार्थांच्या संकल्पनेचा इतिहास पाहिला, तरी प्रथम धर्म, अर्थ व काम या त्रिवर्गाची कल्पना करण्यात आली होती आणि नंतरच्या काळात मोक्षासह चतुर्वर्गाची कल्पना स्वीकारण्यात आली. त्यानंतरच्या काळात सात्र सदैव मौक्षालाच परमपुरुषार्थ मानल्याचे दिसते.

मोक्षाची संकल्पना कर्माच्या व पुनर्जन्माच्या सिद्धांतांशी निगडीत आहे. कर्मांचा आणि पुनर्जन्माच्या परंपरेचा नाश झाल्यानंतरच मोक्ष प्राप्त होतो. दुःखाचा नाश या स्वरूपात मोक्ष अभावात्मक आहे, की परमसुखाचा अनुभव या स्वरूपात भावात्मक आहे, याविषयी विविध संप्रदायांत मतभेद आहेत. जीवात्म्याने आपल्या मूळ स्वरूपात स्थिर होणे, ईश्वराशी एकरूप होणे, ईश्वराच्या अखंड सान्निध्याचा किंवा दास्याचा आनंद भोगणे, केवळ दुःखाच्याच नव्हे तर सुखाच्याही पलीकडे जाणे इ. विविध प्रकारे मोक्षस्वरूपाचे वर्णन करण्यात आले आहे. हे वर्णन करण्यासाठी अभयत्व, अक्षयत्व, केवलत्व, शुद्धत्व, बुद्धत्व, नित्यत्व, अनिर्वचनीयत्व इ. संज्ञा वापरल्या जातात. ज्ञान, योग, निष्काम कर्म व भक्ती यांपैकी कोणत्या तरी एका मार्गाने वा एकापेक्षा अधिक मार्गांच्या समुच्चयाने मोक्ष प्राप्त करता येतो.

मोक्षाचे वा मुक्तीचे विविध प्रकार मानण्यात आले आहेत. देहपातानंतर लगेच प्राप्त होणारी ती सद्योमुक्ती देहपातानंतर काही काळाने क्रमशः प्राप्त होणारी ती क्रममुक्ती अज्ञान नष्ट झाल्याबरोबर देहपातापूर्वीच प्राप्त होणारी ती जीवन्मुक्ती आणि देहपातानंतर प्राप्त होणारी ती विदेहमुक्ती होय. रामानुज, निंबार्क इत्यादींना जीवन्मुक्ती मान्य नाही. शंकराचार्य आणि सांख्य, जैन व बौद्ध ही दर्शने जीवन्मुक्ती मानतात. निर्गुण उपासनेने मिळणारा तो निर्गुण मोक्ष आणि सगुण उपासनेने मिळणारा तो सगुण मोक्ष होय. भक्तीसंप्रदायात मुक्तीचे सलोकता, समीपत, सरूपता व सायुज्यता असे चढत्या श्रेणीचे चार प्रकार मानले आहेत [ → भक्तिमार्ग]. भागवतामध्ये सार्ष्ट्य म्हणजे ईश्वरी सामर्थ्य प्राप्त करणे, असा एक प्रकार मानला आहे.


विविध संप्रदायांनी मांडलेला मोक्षविचार स्थूलमानाने पुढीलप्रमाणे आहे :व्याकरणशास्त्राच्या अध्ययनाने मोक्ष प्राप्त होतो, असे वैयाकरण मानतात. रसेश्वरनामक आयुर्वेददर्शनात मोक्ष ज्ञानाने, ज्ञान अभ्यासाने व अभ्यास निरोगी देहाने प्राप्त होत असल्यामुळे शरीराविना मोक्ष नाही, असे मानले आहे. नकुलीश पाशुपत दर्शन हे वैष्णव दर्शनांप्रमाणे मुक्त जीवाला ईश्वराचा दास मानत नाही. दास परतंत्र असल्यामुळे खऱ्या अर्थाने मुक्त असत नाही म्हणून मुक्तात्मे हे परमेश्वरासारखेच असतात, असे या दर्शनाचे मत आहे. [→ पाशुपत पंथ].

न्यायदर्शनातील मोक्षप्रक्रिया शंकराचार्यांनी आदराने स्वीकारली आहे, ती अशी : दुःखातून मुक्ती हे अंतिम साध्य होय. देहामुळे दुःख प्राप्त होते. देह धर्म व अधर्म प्रवृत्तींमुळे प्राप्त होतो. धर्म व अधर्म प्रवृत्ती रागद्वेष आणि मोह या दोषांमुळे उत्पन्न होतात. हे दोष मिथ्याज्ञानाचे म्हणजे देह हाच आत्मा या भ्रमामुळे उत्पन्न होतात. यथार्थ ज्ञानाने म्हणजे आत्मा देहाहून भिन्न आहे अशा ज्ञानाने मिथ्या ज्ञान नष्ट झाले की दोष नष्ट होतात, दोष नष्ट झाले की धर्माधर्म प्रवृत्ती नाहीशी होते, प्रवृत्तीनाशामुळे जन्मप्राप्ती होत नाही म्हणजे देह लाभत नाही आणि लाभला नाही म्हणजे दुःख प्राप्त होत नाही. ही स्थिती म्हणजेच मोक्षस्थिती होय. सर्व मोक्षवादी भारतीय दर्शने ही न्यायदर्शनोक्त प्रक्रिया मान्य करतात.

यथार्थ ज्ञानामुळे कर्मजन्य दुःखाचा नाश होऊन मोक्ष मिळतो, मुक्त आत्मा जसा दुःखहीन होतो तसाच ज्ञानहीन आणि सर्व गुणांनी रहित होतो इ. विचार वैशेषिकांनी मांडले आहेत. [→ वैशेषिक दर्शन]. विवेकज्ञानामुळे आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक अशा त्रिविध दुःखांतून कायमची सुटका होणे म्हणजे मोक्ष, असे सांख्य दर्शनाचे मत आहे [ → सांख्य दर्शन]. यमनियमापासून समाधीपर्यंतच्या आठ अंगांनी युक्त अशा योगाची साधना केल्यामुळे चित्तवृत्तींचा निरोध होतो आणि अखेरीस प्रकृती व पुरुष हे भिन्न आहेत असे ज्ञान होऊन त्यांचा संयोग नष्ट होतो आणि आत्मा स्व-रूपामध्ये अवस्थित होतो. हाच मोक्ष होय असे योगदर्शन मानते [→ योगदर्शन]. मोक्षप्राप्तीचे साधन या दृष्टीने इतर दर्शनांनीही योगांचे महत्त्व मान्य केले आहे. प्रारंभीचे मीमांसक स्वर्ग हेच परमकल्याण मानत होते, परंतु नंतर मोक्ष म्हणजे जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटका, हे परमकल्याण मानले जाऊ लागले. [→ पूर्वमीमांसा].

शांकर वेदान्तानुसार ‘मी ब्रह्म आहे’ असे आत्मज्ञान झाले, की जीवाला मोक्ष मिळतो. वस्तुतः जीव नित्यमुक्तच असतो. परंतु अज्ञानामुळे बंधनात अडकल्याचा भ्रम निर्माण झालेला असतो. जीव नित्यमुक्त असल्यामुळे मोक्ष ही काही नव्याने प्राप्त होणारी अवस्था नव्हे. आत्मज्ञान प्राप्त झाल्याबरोबर संचित व क्रियमान कर्मे नष्ट होतात. परंतु प्रारब्ध कर्मे मात्र भोगूनच संपवावी लागतात. ती संपल्यावर देह नष्ट होतो. [→ केवलाद्वैतवाद]. भक्ती व ईश्वराचा अनुग्रह यांच्यामुळे मोक्ष प्राप्त होतो. आणि त्या अवस्थेतही जीव ईश्वराशी एकरूप होत नाही, असे रामानुजादी वैष्णव आचार्य मानतात.[→ विशिष्टाद्वैतवाद]. श्रीकृष्णाच्या व्यापिवैकुंठातील गोलोकात जाऊन तेथील कृष्णलीलांमध्ये सामील होणे म्हणजे मोक्ष, असे ⇨ वल्लभाचार्यांच्या ⇨ पुष्टिमार्गात मानण्यात आले आहे. ⇨ मध्वाचार्यांच्या द्वैत मतानुसार मुक्तावस्थेत जीवाला जगाची निर्मिती करण्याचे सामर्थ्य, लक्ष्मीचा पती असणे आणि श्रीवत्साची प्राप्ती हे तीन गुण सोडून परमेश्वराचे सर्व गुण प्राप्त होतात. ईश्वराशी भिन्नाभिन्न या स्वरूपाचे साम्य प्राप्त होणे हा मोक्ष, असे ⇨ निंबार्क मानतात. [→ कर्मवाद द्वैतवाद व्दंताद्वैतवाद शुद्धाद्वैतवाद].

बौद्ध धर्मामध्ये मोक्ष या अर्थाने निर्वाण हा शब्द वापरला जातो. दुःखाचा आत्यंतिक नाश म्हणजे निर्वाण होय. दुःख व त्याचा नाश यांची चर्चा करण्यासाठी गौतम बुद्धांनी चार आर्यसत्ये सांगितली आहेत. संम्यक् दृष्टी वगैरे आर्य अष्टांगिक मार्गाच्या आचरणाने निर्वाणाची प्राप्ती होते. निर्वाण या शब्दाचा अर्थ ‘विझणे’ असा असल्यामुळे निर्वाण भावात्मक असते की अभावात्मक याविषयी बौद्धधर्माच्या विविध संप्रदायात उलटसुलट चर्चा झाल्याचे आढळते. मृत्यूनंतर मुक्त आत्म्याचे स्वरूप काय असते, याची चर्चा करावयाचे स्वतः गौतम बुद्धांनी नाकारले होते. निर्वाणाचे उपाधिशेष व निरूपाधिशेष असे दोन प्रकार मानण्यात आले असून ते हिंदूंच्या अनुक्रमे जीवनमुक्ती व विदेहमुक्ती या मोक्षप्रकारांशी समान आहेत. महायान पंथाने ⇨ बोधिसत्त्वाच्या अप्रतिष्ठित निर्वाणाचा एक प्रकार मानलेला आहे. [→ बौद्ध धर्म].


जैन दर्शनाच्या मते मिथ्याकारण, अविरती, प्रमाद, क्रोधादी कषाय आणि योग (आस्त्रव) ही बंधकारणे होत. जीव पूर्वकर्मानुसार योग्य त्या पुद्‌गलांचे ग्रहण करतो. पुद्‌गल म्हणजे अजीव असे मूर्त द्रव्य होय.कर्मपुद्‌गलांचा जीवामध्ये जो प्रवेश होतो तो आस्त्रव असून संक्षेपाने त्यालाच संसाराचे कारण म्हणतात. जीवामध्ये येणाऱ्या पुद्‌गलांना अडवणे म्हणजे संवर आणि आलेल्यांना नष्ट करणे म्हणजे निर्जरा होय. संवर व ⇨ निर्जरा यांच्या द्वारे सर्व प्रकारच्या कर्मांतून पूर्णपणे मुक्त होणे हाच मोक्ष होय. सम्यक् दर्शन, सम्यक्‌ ज्ञान व सम्यक् चरित्र या त्रिरत्नांमुळे कर्मनाश होऊन मोक्ष प्राप्तहोतो. [→ जैन दर्शन तीर्थकर].

शीख धर्मामध्ये दहा गुरू हे मुक्तात्मे असल्याचे मानले आहे. सृष्टिकर्त्या ईश्वराचा साक्षात्कार म्हणजे मोक्ष असून गुरूच्या कृपेने तो प्राप्त होतो, गुरू शिष्याला नाम देतो आणि नामाच्या स्मरणाने मायेचा बंध तुटून मोक्ष प्राप्त होतो. [→ शीख धर्म].

आत्मा शरीरातून मुक्त झाला म्हणजे त्याला मोक्ष मिळतो, असे शांकर वेदान्त वगैरेंनी मानले आहे. परंतु पारशी, यहुदी, ख्रिस्ती व इस्लाम या धर्माच्या मते अखेरचा निवाडा होतो [→ निवाड्याचा दिवस],तेव्हा मृत व्यक्तीचे शरीर व आत्मा यांचा पुन्हा संयोग होतो आणि त्या व्यक्तीला आपल्या पापपुण्यानुसार कायमचा नरकवास वा कायमचा स्वर्गवास (मोक्ष) मिळतो. [→ पाप-पुण्य स्वर्ग व नरक].

प्राचीन ईजिप्तमध्ये इ. स.पू.सु.२४०० या काळापासून मोक्षाची कल्पना होती. मृत्यूनंतर जीवांचा निवाडा केला जातो आणि पाप्याला द्वितीय मृत्यूची शिक्षा मिळते. या द्वितीय मृत्यूच्या शिक्षेतून सुटका मिळणे व ⇨ ओसायरिस या देवतेच्या साम्राज्यात प्रवेश मिळविणे.वा तिच्याशी एकरूप होणे हा मोक्ष, अशी तेथील कल्पना होती. ⇨ पारशी धर्मानुसार ⇨ अहुर मज्दाने अहरिमनचा पाडाव केल्यानंतर प्रथम मृतांना जिवंत करून निवाडा केला जातो व त्यांच्या पापपुण्यांना अनुसरून त्यांना नरक वा स्वर्ग दिला जातो. या तात्पुरत्या स्थितीनंतर त्यांना आपापल्या पापानुसार यातना भोगाव्या लागतात. हे दिव्य केल्यावर सर्वजण ⇨ अहरिमनच्या प्रभावातून मुक्त होऊन अमर बनतात. अशा रीताने मरणोत्तर यातनांमधून मुक्त होणे म्हणजे मोक्ष होय. यहुदी धर्मामध्ये व्यक्तिगत मोक्षापेक्षा इझ्राएलच्या लोकांसाठी सामूहिक मोक्ष मिळणार, अशी कल्पना असून अखेरच्या निवाड्याच्या वेळी ईश्वर आपले निवडक लोक असलेल्या इझ्राएलच्या लोकांचा उद्धार करील, असे मानले जाते. ईश्वराच्या आज्ञेचे पालन केल्यामुळे मोक्ष मिळतो, असे हा धर्म मानतो. [→ ज्यू धर्म].

ख्रिस्ती धर्म हा विशेषत्वाने मोक्षधर्म आहे. कारण येशू ख्रिस्तांचा अवतार, मृत्यू व ⇨ पुनरुत्थान हे सर्व मानवजातीच्या उद्धारासाठी असल्याचे मानले जाते. मानवाची पापातून मुक्तता करण्याच्या हेतूने पापाचे प्रायश्चित घेऊन ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी मानवाच्या वतीने त्यांनी क्रूसावर चढून प्रातिनिधिक बलिदान केले. असे मानले जाते. ⇨ येशू ख्रिस्तांवर विश्वास ठेवणारास मोक्ष मिळतो, विश्वास ठेवणारास ईश्वर निवडतो, ईश्वराच्या कृपेने मोक्ष मिळतो. मानवाचा ईश्वराशी योग्य संबंध प्रस्थापित करण्याचे कार्य येशू ख्रिस्त करतात इ. प्रकारचे मोक्षविषयक विचार ख्रिस्ती धर्मांत आढळतात. [→ ख्रिस्ती धर्म].

अखेरचा निवाडा होईल तेव्हा पापी जीवांना शिक्षा दिली जाणार असून या शिक्षेतून सुटका प्राप्त करणे हा मोक्ष, अशी इस्लाम धर्माची भूमिका आहे. ईश्वर दयाळू असल्यामुळे त्याला शरण जाणे, हाच इस्लामनुसार मोक्षाचा मार्ग आहे. [→ इस्लाम धर्म].

संदर्भ : 1. Hastings, James, Ed. Encyclopaedia of Religion and Ethics, Vol. XI, New York, 1958.

             2. Joshi, G. N. Evolution of the Concept of Atman and Moksha in Different Systems of Indian Philosophy, Ahmadabad, 1965.

             ३. माधावाचार्य संपा. ऋषी, उमाशंकर शर्मा, सर्वदर्शनसंग्रह, वाराणसी. १९७८.

साळुंखे, आ. ह.