रीड, टॉमस : (२६ एप्रिल १९१०−७ ऑक्टोबर १७९६). प्रसिद्ध स्कॉटिश तत्त्ववेत्ता. व्यवहारबुद्धीचा (कॉमन सेन्स) समर्थक म्हणून रीड तत्त्वज्ञानाच्या इतिहासात प्रसिद्ध आहे. जन्म स्कॉटलंड मधील स्ट्रॉन येथे. वडिलांचे नाव लूइस व आईचे मार्गारेट. टॉमसचे प्रारंभीचे शिक्षण घरी आणि नंतर चर्चच्या शाळेत झाले. पुढे तो ॲबर्डीन येथील मॅरिशॉल कॉलेजमधून पदवीधर झाला (१७२६). नंतर विद्यापीठात ग्रंथपाल म्हणून काम करीत असताना त्याने धर्मशास्त्राचा सखोल अभ्यास केला. १७३७ मध्ये त्याची चर्च ऑफ स्कॉटलंडच्या प्रेसबिटेरियन पंथाचा धर्मगुरू म्हणून नेमणूक झाली. एलिझाबेथ रीड नावाच्या आपल्या चुलत बिहिणीशी त्याने विवाह केला (१७४०). १७५२ मध्ये त्याने आपल्या धर्मगुरुपदाचा त्याग केला व ॲबर्डीन येथील किंग्ज कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी पतकरली. त्यानंतर १७६४ मध्ये ग्लासगो विद्यापीठात ॲडम स्मिथच्या जागी त्याची नैतिक तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. सेवानिवृत्तीपर्यंत त्याने तेथेच काम केले.

टॉमस रीडआपल्या नेहमीच्या व्यवहारबुद्धीमध्ये जग आणि माणूस यांच्या स्वरूपाविषयीचे जे ज्ञान सामावलेले असते ते प्रमाण आहे, हा रीड याच्या तत्त्वज्ञानाला आधारभूत असलेला सिद्धांत होय. उदा., झाड किंवा दगड ह्या बाह्य वस्तू आहेत आणि प्रत्यक्ष ज्ञानात ह्या बाह्य वस्तूंचे आपल्याला साक्षात ज्ञान होते, असे आपली व्यवहारबुद्धी मानते. हा सिद्धांत अर्थात रीड सत्य म्हणून स्वीकारतो. ह्याच्या उलट अनुभव-वादाचा जनक म्हणून ओळखण्यात येणारा ⇨जॉन लॉक ह्याने एक वेगळाच दृष्टिकोण प्रसृत केला होता. हा दृष्टिकोण असा, की बाह्य जगातील वस्तूंचे आपल्याला साक्षात ज्ञान होऊ शकत नाही. बाह्य वस्तूंचे आपल्याला साक्षात ज्ञान होऊ शकत नाही. बाह्य वस्तूंचे आपल्याला जे ज्ञान होते ते जिचे अस्तित्व आपल्या मनात असते पण जी त्या बाह्य वस्तूची प्रतिनिधी असते अशा कोणत्या तरी वस्तुद्वारा होत असते. उदा., जेव्हा मी एक पिवळे फूल ही बाह्य वस्तू पहात असतो, तेव्हा पिवळ्या रंगाची एक संवेदना माझ्या मनात असते, तिचे मला साक्षात ज्ञान असते आणि तिच्यामार्फत मला त्या बाह्य फुलाचे, त्याच्या एका गुणाचे, ज्ञान होत असते. बाह्य फुलाचे, त्याच्या एका गुणाचे, ज्ञान होत असते. बाह्य वस्तूंच्या ह्या मानसिक प्रतिनिधींसाठी लॉक व त्याचा अनुयायी ⇨जॉर्ज बर्क्ली हा ‘आयडिया’ −कल्पना−हा. शब्द वापरीत असे. पण जर बाह्य वस्तूंचे आपल्याला साक्षात ज्ञान होतच नसेल, ज्यांचे साक्षात ज्ञान आपल्याला असते अशा आपल्या मनातील कल्पनांद्वाराच जर आपल्याला त्यांचे ज्ञान होणे शक्य होत असेल, तर मग आपल्याला बाह्य वस्तूंचे ज्ञान होणे शक्यच नसते, असे मानणे भाग पडते असे बर्ल्की याने दाखवून दिले. कारण कल्पना आपल्याला बाह्य वस्तूंचे जे ज्ञान करून देतात ते कितपत प्रमाण आहे, हे ठरविण्यासाठी कल्पना आणि बाह्य वस्तू यांची तुलना करावी लागेल व बाह्य वस्तू आपल्याला कधीच उपलब्ध होत नसल्यामुळे अशी तुलना करणे शक्य नाही.

ह्या युक्तिवादाला अनुसरून बर्क्ली बाह्य वस्तूंचे अस्तित्व नाकारतो. पण रीड वेगळी भूमिका स्वीकारतो. आपल्याला बाह्य वस्तूंचे ज्ञान मानसिक कल्पनांद्वारा (संवेदना, प्रतिमा इ.) होते असे नसून, आपल्याला बाह्य वस्तूंचे साक्षात ज्ञान होते असे तो प्रतिपादन करतो. स्मृतीची गोष्टीही प्रत्यक्ष ज्ञानासारखीच आहे. मी काल पाहिलेला एक माणूस किंवा वीस वर्षांपूर्वी पाहिलेले हिमालयाचे एक शिखर जेव्हा मला आठवते तेव्हा त्या माणसाची किंवा शिखराची मानसिक प्रतिका मला आठवता नसते, तर तो माणूस किंवा शिखरच मला आठवत असते.

बाह्य वस्तूंचे आपल्याला साक्षात ज्ञान होत असते. ह्याप्रमाणे आपल्याला साक्षात ज्ञान होत असते. ह्याप्रमाणे आपल्या व्यवहारबुद्धीत अनुस्यूत असलेले इतरही काही सिद्धांत आहेत. उदा. आपल्या मनाप्रमाणे इतरही मने आहेत किंवा काळाच्या ओघात टिकून राहाणारे तादात्म्य व्यक्तींच्या ठिकाणी असते (म्हणजे गेल्या वर्षीचा मी आणि आता असलेला मी ह्यांच्यात थोडा किंवा बराच फरक असला, तरी तो एकच मी आहे) किंवा घटना कार्यकारण नियमांना अनुसरून घडतात इत्यादी. हे जे व्यवहारबुद्धीचे मूलभूत सिद्धांत आहेत, ते मूलभूत असल्यामुळे त्यांचे प्रामाण्य सिद्ध करता येत नाही. कारण ज्यांच्यापासून त्यांना निष्पन्न करून घेऊन त्यांना सिद्ध करता येईल, अशी अधिक मूलभूत तत्त्वे उपलब्ध नाहीत. हे सिद्धात स्वतः प्रमाण आहेत. तत्त्ववेत्ते आपल्या तत्त्वज्ञानात्मक चिंतनात त्यांना अनेकदा नाकारीत असले, तरी प्रत्यक्ष व्यवहारात ह्या सिद्धांतांना अनुसरूनच त्यांचे आचरण होत असते. ज्या भाषेत आपण जगाविषयी आणि एकमेकांविषयी बोलतो, ती भाषाही ह्या सिद्धांतांनी घडविलेली असते. हे सिद्धांत म्हणजे माणसाच्या वैचारिक प्रकृतीच्या घडणीची तत्त्वे होत, असे रीडचे म्हणणे आहे.

ज्ञानाप्रमाणे नीतीच्या क्षेत्रातही सत्कृत्य आणि दुष्कृत्य यांच्यांत भेद करणारी वस्तुनिष्ठ तत्त्वे मानवी मनाला स्वाभाविकपणे अवगत असतात, तसेच आपण काय करावे ह्याचा मुक्तपणे निर्णय करून त्याप्रमाणे कृती करण्याची शक्ती माणसाला असते, असे रीड मानतो.

रीडच्या तत्त्वज्ञानाचा प्रभाव त्याच्या नंतरच्या ब्रिटिश तत्त्वज्ञानावरच नव्हे, अमेरिका आणि फ्रान्स येथील तत्त्वज्ञानावरही पडलेली आढळून येतो. अलीकडच्या तत्त्वज्ञानाच्या ⇨जी. ई. मुर याने रीडप्रमाणे व्यवहारबुद्धीला मूलभूत महत्त्व दिले आहे.

रीडचे पुढील ग्रंथ प्रसिद्ध आहेत : ॲन इन्क्वायरी इंटू द ह्यूनम माइंड ऑन द प्रिन्सिपल ऑफ कॉमनसेन्स (१७६४)−व्यवहारबुद्धीच्या तत्त्वांना अनुसरून मानवी मनाचे अन्वेषण एसेज ऑन द इंटलेक्लुअल पॉवर्स ऑफ मॅ (१७८५)− माणसाच्या बौद्धिक शक्तिविषयीचे निबंध एसेज ऑन द ॲक्टिव्ह पॉवर्स ऑफ मॅन (१७८८)− माणसाच्या क्रियाशील शक्तिविषयीचे निबंध.

ग्लासगो येथे तो मरण पावला.

पहा : व्यवहारबाद.

संदर्भ : 1. Fraser, A. C. Thomas Reid, Edinburgh, 1898.

2. Martin, T. The Instructed Vision, Bloomington (Ind.) 1961.

3. Woozley, A. D. Ed. Essays on the Intellectual Powers of Man (abridged), London, 1941.

रेगे, मे. पुं.