ब्रूनो, जोर्दानो: (? १५४८-१७ फेब्रुवारी १६००). प्रबोधनकालीन इटालियन तत्त्ववेत्ता. जन्म नेपल्सजवळील नोला या गावी. ह्याने प्रथम ‘डोमिनिकन’ ह्या ख्रिस्ती भिक्षुसंघाच्या नेपल्स येथील मठात १५६५ मध्ये प्रवेश घेतला होता पण पाखंडी मताचा आळ आल्यामुळे तो तेथून १५७६ मध्ये बाहेर पडला.

प्रबोधनकालात हेर्मेटिक पंथाला नवीन प्रतिष्ठा प्राप्त झाली होती आणि ब्रूनोवर प्रामुख्याने ह्या पंथाच्या तत्त्वज्ञानाचा प्रभाव पडला होता. प्राचीन ईजिप्शियन तत्त्ववेत्ता हेर्मेस ट्रिस्मेजिस्टस ह्याच्या ग्रंथांत हे तत्त्वज्ञान प्रथम ग्रथित करण्यात आले, प्लेटोच्या तत्त्वज्ञानाचा उगम ह्याच तत्त्वज्ञानात आहे आणि ख्रिस्ती धर्मांचा उदयही ह्या तत्त्वज्ञानातून झाला, असे ह्या पंथाचे अनुयायी मानीत. निसर्गात गूढ शक्ती ओतप्रोत भरून राहिली आहे सूर्य, तारे, ग्रह, वनस्पती, प्राणी आणि माणूस हे सर्व ह्या शक्तीचे आविष्कार आणि वाहक आहेत तिच्याशी तादात्म्य पावून माणूस अत्युच्च, गूढ ज्ञान प्राप्त करून घेतो व आपला उद्धार साधतो, असे हेर्मेटिक तत्त्वज्ञानाचे सार आहे. म्हणून मंत्रशक्ती, जादू यांच्यावर आधारलेल्या विधींना आणि साधनेला हेर्मेटिक पंथात महत्त्वाचे स्थान होते. ब्रूनोवर मुख्य प्रभाव हेर्मेटिक तत्त्वज्ञानाचा होता. सेंट ऑगस्टीनने ह्या तत्त्वज्ञानाचा पाखंडी म्हणून निषेध केला होता. ब्रूनो ह्या तत्त्वज्ञानाचा समर्थक असल्यामुळे त्याच्यावर पाखंडाचा आरोप होणे साहजिक होते.

जोर्दानो ब्रूनो

नेपल्स येथील मठातून बाहेर पडल्यानंतर ब्रूनो प्रथम जिनीव्हा, तुलूझ व नंतर पॅरिस येथे गेला (१५८१). पॅरिस येथे त्याने सार्वजनिक व्याख्याने दिली व स्मरणकलेवर दोन ग्रंथ प्रसिद्ध केले. स्मरणाच्या कलेला हेर्मेटिक साधनेत विशिष्ट स्थान आहे. त्याच्या मागचा सिद्धांत असा आहे, की माणसाचे चित्त वा मन हे दिव्य असते आणि म्हणून निसर्गात जे दिव्य चैतन्य आविष्कृत झालेले असते त्याचे प्रतिबिंब ह्या मनात पडलेले असते. ह्या प्रतिबिंबाच्या घटकांना आपल्या जाणिवेत जागृत करण्यासाठी साधकाला आपल्या कल्पनाशक्तीचा व स्मरणशक्तीचा उपयोग करावा लागतो. स्मरणकलेवरील आपल्या ग्रंथात ब्रूनोने हा उपयोग कसा करावा, ह्याच्या तंत्रांचे विवेचन केले आहे. ह्या ग्रंथामुळे ब्रूनो हा हेर्मेटिक पंथातील ‘मॅगस’–मांत्रिक- आहे हे समकालीनांना स्पष्ट झाले. ह्या पंथातील पूर्वसूरींचा प्रभावही ह्या ग्रंथावर स्पष्टपणे आढळतो. कॅथलिक चर्चच्या दृष्टीने हे तत्वज्ञान पाखंडी असल्यामुळे चर्चचा ब्रूनोवर रोष होणे स्वाभाविक होते. परंतु विद्वानांच्या विचारांवर आणि वैचारिक अभिव्यक्तीवर चर्चची पूर्वी अतिशय भक्कम असलेली पकड प्रबोधनकालात ढिली झाली होती आणि विचारवंतांना ‘पाखंडी’ विचार मांडायला काहीशी मोकळीक निर्माण झाली होती.

ब्रूनोची पॅरिस येथील व्याख्याने फ्रान्सचा राजा तिसरा हेन्री ह्याला पसंत पडली होती. १५८३ मध्ये त्याच्याकडून शिफारसपत्रे घेऊन ब्रूनो इंग्लंडला गेला व पुढील दोन वर्षे लंडन येथील फ्रेंच वकिलातीत फ्रेंच वकीलाच्या संरक्षणाखाली राहिला. लंडन येथे एका नवीन धर्माचे समर्थन करणारे आपले काही लिखाण त्याने प्रसिद्ध केले. प्रेम, जादू आणि तांत्रिक साधना यांच्यावर हा धर्म आधारलेला आहे. ह्यातील एक ग्रंथ ऑक्सफर्ड विद्यापीठाचे कुलगुरू आणि आचार्य यांना अर्पण केलेला आहे. ऑक्सफर्ड येथे त्याने काही व्याख्यानेही दिली.

इंग्लंडमध्ये असताना ब्रूनोने इटालियन भाषेत लिहिलेले पाच संवाद प्रसिद्ध केले. द ॲश वेन्स्डी सपर ह्या संवादात त्याने कोपर्निकसच्या सूर्यकेंद्री सिद्धांताचे समर्थन केले आहे. अनंतत्व, विश्व आणि जग ह्या संवादात विश्व अनंत आहे आणि त्याच्यात असंख्य जगे आहेत असे त्याने प्रतिपादन केले आहे.


इंग्लंडमध्ये असताना ब्रूनोने इटालियन भाषेत लिहिलेले पाच संवाद प्रसिद्ध केले. द ॲश वेन्स्डी सपर ह्या संवादात त्याने कोपर्निकसच्या सूर्यकेंद्री सिद्धांताचे समर्थन केले आहे. अनंतत्व, विश्व आणि जग ह्या संवादात विश्व अनंत आहे आणि त्याच्यात असंख्य जगे आहेत असे त्याने प्रतिपादन केले आहे. सार्वत्रिक, नैतिक आणि आध्यात्मिक सुधारणा कोणत्या मार्गाने साधता येईल याचे विवेचन एका संवादात करण्यात आले असून दुसऱ्या एका संवादात कॅबाला ह्या गुह्य ज्यू आध्यात्मिक पंथाच्या शिकवणीचे विवेचन करण्यात आले आहे. शेवटचा संवाद म्हणजे  सुनीतांचा एक संग्रह असून त्याच्या सोबत ह्या कवितांच्या तत्त्वज्ञानात्मक आणि आध्यात्मिक अर्थांचा उलगडा करणारे भाष्य आहे. ब्रुनोची कीर्ती मुख्यतः ह्या ग्रंथांवर आधारलेली आहे. यांत हेर्मेटिक परंपरेत ब्रूनोने विकसित केलेले नवीन तत्त्वज्ञान, विश्वाविषयीची उपपत्ती, नवीन नीतिशास्त्र व आध्यात्मिक साधना यांची मांडणी करण्यात आली आहे. ह्यांतील तीन संवाद मिशेल द कास्तेल्‌नो मोव्हीस्येअर ह्या त्या वेळेच्या इंग्लंडमधील फ्रेंच वकीलाला आणि दोन संवाद सर फिलिप सिडनी ह्याला अर्पण करण्यात आले आहेत.

 ब्रूनो १५८५ मध्ये पॅरिसला परतला आणि आपल्या नवीन तत्त्वज्ञानाचे विवेचन करणारे व्याख्यान त्याने पॅरिस येथे दिले. पॅरिस येथे त्यावेळी गोंधळाची स्थिती होती आणि ब्रूनोच्या व्याख्यानाने ह्या गोंधळात भरच घातली. म्हणून ब्रूनोने पॅरिस सोडले आणि तो जर्मनीला गेला. व्हिटन्बेर्क विद्यापीठात त्याचे स्वागत झाले. तेथून तो प्रागला गेला. प्राग येथे गणितावर टीका करणारे पुस्तक त्याने लिहिले. गणित हे केवळ शुष्क पांडित्य आहे, निसर्गातील गुह्यांचा भेद करणारी दृष्टी गणितामुळे लाभत नाही, असे त्याचे म्हणणे होते. कोपर्निकसवरही, तो ‘केवळ गणिती’होता म्हणून ब्रूनोने आक्षेप घेतला होता. ह्यानंतर ब्रूनो हेल्मस्टेड येथे गेला. येथे त्याने जादूच्या विद्येवर, त्याच्या स्वतःच्या आयुष्यात अप्रकाशित राहिलेली पुस्तके लिहिली. नंतर ब्रूनो फ्रँकफुर्टला गेला. प्रवासात लिहिलेल्या लॅटिन कवितांचा संग्रह त्याने फ्रँकफुर्ट येथे १५९१ मध्ये प्रसिद्ध केला. ह्याच्यात लुक्रीशिअसच्या शैलीचे अनुकरण आहे आणि विश्वाच्या स्वरूपाविषयीची आपली अंतिम उपपत्ती ब्रूनोने त्याच्यात मांडली आहे. स्मरणकलेवरील आपले शेवटचे पुस्तकही ब्रूनोने फ्रँकफुर्ट येथेच प्रसिद्ध केले.

ब्रूनो १५९१ मध्ये इटलीला परतला. धार्मिक बाबतीत अधिक सहिष्णू वातावरण इटलीमध्ये निर्माण झाले आहे, असा विश्वास त्याला वाटावा अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पोप क्लेमेंट ८वा ह्यास अर्पण करण्यासाठी म्हणून एक हस्तलिखितही त्याने सोबत घेतले होते. हेर्मेटिक परंपरेवर आधारलेली जी सैद्धांतिक व नैतिक सुधारणा त्याला साधायची होती, ती रोमन कॅथलिक चर्चच्या चौकटीत साधता येईल, असा त्याचा प्रामाणिक विश्वास होता. पण व्हेनिस येथे इन्क्विझिशनने त्याला पकडले आणि तुरुंगात टाकले. व्हेनिसला त्याच्यावर जो खटला भरण्यात आला त्यात शेवटी त्याने आपली पाखंडी मते मागे घेतली. पण दुसऱ्या खटल्यासाठी त्याला रोमच्या तुरुंगात पाठविण्यात आले. तो आठ वर्षे रोम येथे तुरुंगात होता. त्याची मते पाखंडी आहेत, असा निर्णय देण्यात आला. ह्या वेळेला मात्र त्याने आपली मते माघारी घेण्याचे नाकारले व परिणामी पाखंडी म्हणून ब्रूनोला रोम येथे जिवंत जाळण्यात आले. ब्रूनोवर नेमके आरोप कोणते करण्यात आले होते आणि त्यांच्या समर्थनार्थ कोणता पुरावा दाखल करण्यात आला होता, ही माहिती उपलब्ध नाही. पण केवळ त्याच्या तत्वज्ञानात्मक मतांसाठी त्याला शिक्षा झाली असे वाटत नाही. हेर्मेटिक परंपरेवर आधारलेला नवीन धार्मिक पंथ तो सुरू करू पाहत होता, तो ‘मांत्रिक’ होता आणि मांत्रिक म्हणून त्याची शिकवण व आचरण चर्चच्या विरोधी होते, हा निर्णय त्याला झालेल्या शिक्षेमागे असणार.

एकोणिसाव्या शतकात ब्रूनोकडे आधुनिक विज्ञानाचा एक हुतात्मा म्हणून मुख्यतः पहाण्यात येत असे. ब्रूनोने कोपर्निकसच्या‘ ‘सूर्य हे ग्रहमालिकेचे केंद्र आहे’ ह्या सिद्धांताचे समर्थन केले होते आणि वैज्ञानिक उपपत्तींना अडसर बनलेल्या ॲरिस्टॉटिलिअन विश्वरचनासिद्धांतावर टीका केली होती ह्यावर ब्रूनोच्या वैचारिक कामगिरीकडे पहाण्याचा हा दृष्टिकोन आधारला होता. पण ब्रूनोकडे पहाण्याची ही दृष्टी एकांगी होती. कोपर्निकस, गॅलीलिओ, केप्लर आणि न्यूटन ह्या गणिती ज्योतिषशास्त्राचा आणि भौतिकीचा विकास साधणाऱ्या वैज्ञानिकांच्या परंपरेत ब्रूनोला स्थान नाही. कोपर्निकसचा त्याने ‘केवळ गणिती’ म्हणून अधिक्षेप केला होता. हेर्मेटिक परंपरेत त्याचे खरे स्थान आहे. ह्या दृष्टीने त्याच्या विचारांकडे पाहिले, तर आज आपल्याला अतिशय विचित्र वाटेल अशा, पण अंतर्गत दृष्ट्या सुसंगत असलेल्या अशा एका तत्वज्ञानात्मक दर्शनाची त्याने रचना केली आहे, असे आढळून येईल.

निसर्गाविषयीची त्याची संकल्पना हा त्याच्या दर्शनाचा एक भाग आहे. लुक्रीशिअसला अनुसरून विश्व अनंत आहे असे तो मानतो. पण हा अनंत निसर्ग हे अनंत ईश्वराचे प्रतिबिंब आहे आणि ह्या प्रतिबिंबाचा स्वीकार करण्यासाठी माणसाने आपले चित्त अनंत बनविण्याचा ‘थोर चमत्कार’ केला पाहिजे, असा त्याचा संदेश आहे. निसर्ग अनंत असला, तरी तो एका तत्त्वाचा आविष्कार आहे, ह्या एका तत्वापासून ज्या पायऱ्यांनी वस्तूंचे जनन होते त्याच पायऱ्या चढून बुद्धी ह्या एका तत्वाचे ज्ञान प्राप्त करून घेते जे, जे आहे ते एकत्वापासून आविर्भूत होते आणि एकत्वात विलीन होते, अशी ब्रूनोची शिकवण होती. जे, जे आहे ते सचेतन आहे हा त्याचा सिद्धांतही ह्याच मूळ शिकवणीपासून निष्पन्न होतो आणि जादूवरील ब्रूनोचा विश्वास आणि जादूवर आधारलेल्या विधींना आध्यात्मिक साधनेत त्याने दिलेले स्थान या सिद्धांतावर आधारलेले आहे.

ब्रूनो हेर्मेटिक परंपरेतील असला, तरी तो प्रतिभावान विचारवंत होता. निसर्गाच्या घडणीविषयी त्याने केलेले तर्क सतराव्या शतकात भौतिकीमध्ये विश्वरचनेविषयी जी उपपत्ती स्थिर होत नाही तिच्याशी अनेक प्रकारे सुसंगत असे होते. हे त्याचे आणि आधुनिक विज्ञानाचे नाते आहे. ॲरिस्टॉटलने निर्माण केलेली संकल्पनात्मक चौकट फोडून विश्वाच्या घडणीविषयी व स्वरूपाविषयी मुक्तपणे विचार करणे ज्या विचारवंतांमुळे शक्य आणि सुलभ झाले, त्यांच्यात ब्रूनोला महत्त्वाचे स्थान आहे. निसर्गाचे त्याचे दर्शन म्हणजे निसर्ग विस्ताराने अनंत आहे आणि सचेतन परमाणूंचा तो बनलेला आहे असे होते आणि ह्यात सचेतन परमाणूंच्या जागी गुरुत्वाकर्षणाने प्रवृत्त होणारे आणि ईश्वराने घालून दिलेल्या नियमांना अनुसरून गतिमान असणारे परमाणू घातले, तर न्यूटनचे निसर्गाविषयीचे दर्शन प्राप्त होते. तेव्हा एका दृष्टीने ब्रूनो आधुनिक विज्ञाना पासून दूर असला, तरी दुसऱ्या दृष्टीने तो त्याच्या अतिशय जवळ आहे.

संदर्भ :  1. Singer, Dorothea W. Glordano Bruno : His Life and Thought, New York, 1950.

            2. Yates, F. A. Glordano Bruno and the Hermetic Tradition, Chicago, 1964.

रेगे, मे. पुं.