रानडे, रामचंद्र दत्तात्रेय : (३ जुलै १८८६ – ६ दून १९५७). आधुनिक विद्याविभूषित तत्त्वज्ञ व संत. त्यांचा जन्म जमखंडी (कर्नाटक) येथे एका मध्यवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे शालेय शिक्षण तेथेच परशुरामभाऊ हायस्कुलात होऊन ते मॅट्रिकची परीक्षा जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ती मिळवून १९०२ मध्ये उत्तीर्ण झाले. पुढील शिक्षणासाठी ते पुण्याच्या डेक्कन कॉलेजात आले व गणित हा विषय घेऊन बी. ए. आणि तत्त्वज्ञान विषय घेऊन एम्. ए. नंतर काही दिवस त्यांनी डेक्कन कॉलेजातील हस्तलिखित ग्रंथालयाचे गुरुदेव रानडेप्रमुख म्हणून काम केल्यावर १९१३ मध्ये त्यांची नेमणूक फर्ग्युसन कॉलेजात इंग्रजीचे शिक्षक म्हणून झाली पण तत्त्वज्ञान-विभागात प्रवेश झाला व पुढे १९२४ मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या आजीव सभासदत्वाचा राजीनामा देईपर्यंत, म्हणजे सु. दहा वर्षे त्यांनी ‘ॲकॅडमी ऑफ फिलॉसॉफी अँड रिलिजन’ ही संस्था स्थापन केली व डॉ. बेलवलकर यांच्या सहकार्याने व मुंबई विद्यापीठाच्या पुरस्काराने त्यांनी भारतीय तत्त्वज्ञानाच्या इतिहासखंडांची योजना आखली परंतु काही कारणांमुळे ती पूर्ण होऊ शकली नाही. १९२८ मध्ये अलाहाबाद विद्यापीठाचे तेव्हाचे कुलगुरू सर गंगानाथ झा यांनी त्यांना अलाहाबाद येथे सन्मानपूर्वक बोलावून घेतले व तेव्हापासून १९४३ मध्ये सेवानिवृत्त होईपर्यंत सु. २० वर्षे ते त्या विद्यापीठातील तत्त्वज्ञान-विभागाचे प्रमुख प्राध्यापक होते. सेवानिवृत्तीनंतरचा काळ त्यांनी निंबाळ (जि. विजापूर, कर्नाटक) व अलाहाबाद या दोन ठिकाणी आलटूनपालटून घालविला.

रानडे यांची कीर्ती तत्त्वज्ञ-संत म्हणून आहे. त्यांच्या तत्त्वज्ञानविषयक विचारांचा विकास कसा झाला, ते त्यांच्या ‘द इव्हलूशन ऑफ ओन थॉट’ या लेखावरून समजते. प्रारंभी त्यांची प्रवृत्ती तत्त्वज्ञानाकडे नव्हती पण १९०८ मध्ये प्रो. वुडहाउस यांच्यामुळे बनारसला जाण्याचा योग आला असताना तेथील शंकराचार्यांच्या मठात आचार्यांची भक्तिपर स्तोत्रे त्यांच्या कानावर पडली व त्यामुळे अद्वैत आणि भक्ती ही एकत्र असू शकतात हे त्यांना जाणवले. त्यापूर्वीच ते भाऊसाहेब महाराज उमदीकर या सत्पुरुषाच्या संप्रदायात समाविष्ट झाले व त्यांना काही पारमार्थिक अनुभवही येऊ लागले होते. या अनुभवांचे तात्विक अधिष्ठान शोधण्यासाठी म्हणून ते तत्त्वज्ञानाच्या अभ्यासात प्रवृत्त झाले. १९२६ मध्ये रानड्यांचा उपनिषदांवरील ग्रंथ प्रसिद्ध झाला. रानडे यांचा भर पांडित्यावर नसून नवनिर्मितीवर होता. उपनिषदांचे आणि त्यापाठोपाठ मराठी, हिंदी व कन्नड संतवाङ्‍मयातील साक्षात्कारवादाचे सर्वेक्षण करून त्यांनी एक नवीन तत्त्वज्ञान दिले. ते म्हणजे साक्षात्काराचे तत्त्वज्ञान. ते त्यापूर्वी कोणी सांगितले नव्हते असे नाही उपनिषत्कालापासून ते चालत आले आहे परंतु रानडे यांनी त्याचे सुसंगत विवरण केले. त्यांची विवेचनपद्धती आधुनिक आहे, इतकेच नव्हे, तर ती रचनात्मक आहे. त्यांची चार किंवा पाच ‘वचनामृते’ म्हणजे संतवाङ्‍मयातील केवळ उतारे नसून त्यांच्या मिस्टिसिझम इन महाराष्ट्र या इंग्रजी ग्रंथाचे ते आधार आहेत. ही लेखनपद्धती त्यांनी सर्वत्र योजली. त्यांचा भगवद्‌गीतेवरील ग्रंथ तेवढा चर्चात्मक आहे कारण त्यात त्यांना गीताविषयक विविध मतांचा परामर्ष घेऊन स्वतःचा किंवा ज्ञानेश्वरांचा साक्षात्कार-सिद्धांत मांडावयाचा होता.

केवळ ग्रंथनिर्मिती करण्यातच त्यांनी समाधान मानले नाही. तत्त्वज्ञान हा त्यांच्या केवळ अभ्यासाचाच नव्हे, तर त्यांच्या भक्तीचा विषय होता. १९०१ मध्ये भाऊसाहेब महाराज उमदीकर यांच्याकडून नाममंत्र घेतल्यापासून त्यांनी परमार्थ हे आपले मुख्य साध्य ठरवून पतंजलीने म्हटल्याप्रमाणे दीर्घकाल, निरंतर व सत्कारयुक्त नामसाधन केले आणि त्याचे फळ म्हणून ते साक्षात्काराचे अधिकारी झाले. त्यांनी स्वतःचे पारमार्थिक अनुभव कोठे लिहून ठेवलेले नाहीत. पण त्यांचे सर्व ग्रंथ मिळून त्यांचे पारमार्थिक आत्मचरित्रच सिद्ध होते. बौद्धिक तत्त्वज्ञान आणि आध्यात्मिक अनुभूती यांचा मनोज्ञ संगम त्यांच्या ठिकाणी झाला. याप्रमाणे भारतीय तत्त्वज्ञानाचा व संतकाव्याचा सखोल अभ्यास करून, त्याचा पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाशी समन्वय साधून, उत्कृष्ट व भरदार अशी ग्रंथनिर्मिती करून तत्त्वज्ञानाच्या विद्यार्थ्यांच्या दोन पिढ्या तयार करून आणि मुख्य म्हणजे स्वतःच्या आयुष्याचे पारमार्थिक सार्थक करून त्यांनी जगाचा निरोप घेतला.

त्यांचे बहुतांश लेखन इंग्रजीत असून ते मराठीत अनुवादितही झाले आहे. काही महत्त्वपूर्ण इंग्रजी ग्रंथ पुढीलप्रमाणे : अ कन्स्ट्रक्टिव्ह सर्व्हे ऑफ उपनिषदिक फिलॉसॉफी (१९२३), मिस्टिसिझम इन महाराष्ट्र (१९३३), पाथ वे टू गॉड इन हिंदी लिटरेचर (१९५४), द कन्सेप्शन ऑफ स्पिरिच्यूअल लाइफ इन महात्मा गांधी अँड हिंदी सेंट्स (१९५६), फिलॉसॉफिकल अँड अदर एसेज (१९५६), द भगवद्‌गीता ॲज अ फिलॉसॉफी ऑफ गॉड रिअलायझेशन (१९५९), पाथवे टू गॉड इन कन्नड लिटरेचर (१९६०), एसेज अँड रिफ्लेक्शन्स (१९६४), वेदान्त : द कल्मिनेशन ऑफ इंडियन थॉट (१९७०) इत्यादी. यांशिवाय त्यांनी मराठीतही काही ग्रंथरचना केली आहे ती अशी : ज्ञानेश्वरवचनामृत (१९२६), संतरचनामृत (१९२६), तुकारामवचनामृत (१९२६), रामदासवचनामृत (१९२६), परमार्थ-सोपान (१९५४), एकनाथवचनामृत (१९५५) इत्यादी.

संदर्भ : 1. Deshpande, M. S. Dr. Ranade’s Life of Light, Bombay, 1963.

2. Kelkar, V. C. Autobiography : Gurudev, R. D. Ranade : A Discovery, Pune, 1980.

3. Kulkarni, Padma, Gurudev Ranade as a Mysitic, 1986.

4. Sharma, S. R. Ranade : A Modern Mystic, Pune 1961.

५. तुळपुळे, ग. वि. गुरुदेव रानडे : साक्षात्काराचे तत्त्वज्ञान व सोपान, १९६२.

६. तुळपुळे, शं. गो. गुरुदेव रा. द. रानडे : चरित्र आणि तत्त्वज्ञान, पुणे, १९५८.

तुळपुळे, शं. गो.