झाक मारीतँ

मारीतँ, झाक : (१८ नोव्हेंबर १८८२–२८ एप्रिल १९७३). नव-टॉमस मताचे फ्रेंच तत्त्ववेत्ते. जन्म पॅरिस येथे. आणि हायडल्‌बर्ग विद्यापीठांत. ⇨ आंरी बेर्गंसाँ (१८५९–१९४१) हे त्या काळी ‘कॉलेज द फ्रान्स’ मध्ये देत अलसेल्या तत्त्वज्ञानावरील व्याख्यानांचाही मारीतँ ह्यांच्या विचारांवर प्रभाव पडला आहे. सॉर्‌बॉनमध्ये अध्ययन करत असतानाच त्यांचा तेथेच अध्ययन करणाऱ्या रायसा ऑमनसॉफ ह्या रशियन ज्यू युवतीशी परिचय झाला व पुढे १९०४ मध्ये तिच्याशी विवाहही झासा. सुरुवातीस मारीतँ प्रॉटेस्टंट होते पण नंतर १९०६ मध्ये त्यांनी व त्यांच्या पत्नीने कॅथलिक पंथाची दीक्षा घेतली. अनेक ग्रंथही ह्या उभयतांनी मिळून लिहिले आहेत. १९४५ ते ४८ ह्या काळात मारीतँ व्हॅटिकन येथे फ्रान्सचे राजदूत म्हणून होते नंतर त्यांनी प्रिन्स्टन विद्यापीठात १९५६ मध्ये सेवानिवृत्त होईपर्यंत अध्यापन केले. टोराँटो, कोलंबिया विद्यापीठ, शिकागो विद्यापीठ व नोत्रदाम विद्यापीठांतही त्यांनी अध्यापन केले, १८५८ मध्ये नोत्रदाम विद्यापीठीत ‘द झाक मारीतँ सेंटर’ ची स्थापना झाली. तेथे मारीतँ यांच्या तत्त्वज्ञानाच्या धर्तीवर केल्या जाणाऱ्या संशोधनास उत्तेजन दिले जाते. फ्रान्समध्ये तूलूझ येथे ते निधन पावले.

मारीतँ ह्यांनी आपले तत्त्वज्ञान पन्नासापासून अधिक ग्रंथांतून आणि अगणित लेखांतून विशद केले आहे. हे तत्त्वज्ञान प्रामुख्याने ॲरिस्टॉटल आणि टॉमस अक्काय्‌नस ह्यांच्या सिद्धांतांवर आधारलेले आहे. तथापि अनेक प्राचीन आणि अर्वाचीन तत्त्ववेत्यांनी विकसित केलेल्या महत्त्वाच्या विचारांचा तसेच समाजशास्त्र, मानसशास्त्र इ. मानव्यविद्यांत लागलेल्या शोधांचा आधारही आपल्या तत्त्वज्ञानाची मांडणी आणी समर्थन करताना मारीतँ ह्यांनी घेतला आहे.

मारीतँ यांच्या मते मानवी ज्ञानाची भिन्न पण परस्परसंबंधित अशी क्षेत्रे आहेत. इंद्रियगोचर वस्तूंना परिमाणे असतात. ह्या परिमाणांचे शास्त्र म्हणजे गणित. ह्या वस्तू परिवर्तन पावत असतात आणि ह्या घटनांचे निरीक्षण व तर्क ह्यांच्या आधारे विश्लेषण आणि स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे निसर्गविज्ञान. पण ह्या वस्तूंना अस्तित्वही असते, त्या सत् असतात आणि त्यांच्या ठिकाणी ही जी सत्ता असते ती म्हणजे इंद्रियगोचर धर्म नसतो. सत्ता बुद्धिग्राह्य असते. जे सत् आहे त्याचे सत् म्हणून ज्ञान प्राप्त करून घेणे हे तत्त्वमीमांसा (मेटॅफिजिक्स) ह्या शास्त्राचे कार्य असते. म्हणून इंद्रियगोचर वस्तूंचा (म्हणजे निसर्गाचाही) एका प्रकारच्या सत्तावान वस्तू म्हणून (म्हणजे अस्तित्वाचा किंवा सत्तेचा एक प्रकार म्हणून) तत्त्वमीमांसेमध्येच विचार होतो. पण ह्याच्या पलीकडे जाऊन तत्त्वमीमांसेमध्ये सत्‌चा केवळ सत्‌ म्हणून परामर्ष घेण्यात येतो आणि सत्‌च्या ठिकाणी जे धर्म अनिवार्यतेने वसत असताना त्यांचे विवरण करण्यात येते. हे धर्म म्हणजे एकता किंवा अद्वैत, कल्याणमयता आणि सत्य. सत् हे अनिवार्यतेने एक असते, कल्याणरूप असते आणि सत्य असते. पण सत्‌चे स्वरूप निःशेषपणे ह्या धर्मांचे मिळून बनलेले असते असे म्हणता येत नाही. हे धर्म त्याच्यात समाविष्ट असले, तरी ते त्यांच्याहून काही अधिक असते.

जे जे सत् आहे त्याचे कारण म्हणजे ईश्वर. ईश्वराच्या अस्तित्वाची जी पाच प्रमाणे ⇨ सेंट टॉमस अक्काय्‌नस (१२२५ ?–७४) ह्यांनी दिली आहेत ती मारीतँ ह्यांनी स्वीकारली आहेत आणि त्यांची आधुनिक उदाहरणांच्या साहाय्याने नवीन मांडणीही केली आहे. ह्याशिवाय स्वतःचे एक सहावे प्रमाण त्यांनी दिले आहे. ते असे : जाणीव असलेला किंवा विचार करणारा असा माणसाचा जो प्रत्येक आत्मा आहे तो नित्य आहे. पण त्याला प्रारंभही आहे. तेव्हा त्याचे नित्यत्व अबाधित राखण्यासाठी नित्य व परिपूर्ण अस्तित्वाच्या-ईश्वराच्या-ज्ञानाचा नित्य विषय तो असला पाहिजे असे मानावे लागते. म्हणजे चेतन असा आत्मा जर असेल, तर त्याचे अधिष्ठान म्हणून ईश्वर असला पाहिजे असे हे अनुमान आहे.

पण मारीतँ यांच्या मते तत्त्ववेत्यांच्या अनुमानांद्वाराच ईश्वराचे ज्ञान आपल्याला होते असे नव्हे. आपल्या नेहमीच्या जीवनात सत्याचा शोध घेताना, काव्य आणि कला ह्यांच्या द्वारा सौंदर्याचा शोध घेताना, नैतिक आचरणाने आपले कल्याण प्राप्त करून घेण्याच्या प्रयत्‍नांतून आपण, आपल्याला त्याची जाणीव असो-नसो, ईश्वराचाच शोध घेत असतो.

आपल्या नैतिक तत्त्वज्ञानात, माणूस ही काही निसर्गाचा घटक असलेली वस्तू नाही, ती एक व्यक्ती असते ह्यावर मारीतँ भर देतात. मानवी अस्तित्वाच्या स्वरूपाचे आकलन करण्यासाठी मानसशास्त्र, समाजशास्त्र, मानवशास्त्र इ. शास्त्रांपासून माणसाविषयी मिळणारी माहिती जशी ध्यानात घेतली पाहिजे त्याप्रमाणे माणसाचा ईश्वराशी असलेला संबंध, ईश्वराचा माणसावर होणारा अनुग्रह हाही ध्यानात घेतला पाहिजे आणि मानवी प्रकृतीच्या अशा यथार्थ आकलनावर नीतिशास्त्राची उभारणी केली पाहीजे, असा त्यांचा दृष्टिकोन आहे.


माणूस हा समाजाचा घटक असतो आणि म्हणून तो समाजाहून गौण असतो, प्रसंगी समाजाचे कल्याण साधण्यासाठी व्यक्तीने स्वतःचे बलिदान करणे योग्य असते हे जितके खरे आहे तितकेच प्रत्येक मानवी व्यक्तीला अविनाशी आत्मा असतो आणि हा आत्मा ईश्वराशी चिरंतन सायुज्य साधू शकतो आणि म्हणून मानवी व्यक्ती समाजाहून श्रेष्ठ आहे, हेही खरे आहे. समाज आणि व्यक्ती ह्यांचे योग्य नाते कोणते ह्याचा निर्णय करताना माणसाविषयीच्या ह्या दोन्ही सत्यांची सामाजिक व राजकीय तत्त्वज्ञानाने दखल घेतली पाहिजे, असे मारीतँ यांचे म्हणणे आहे. शिवाय माणसाचा इतिहास म्हणजे अनेक भिन्न युगांचा क्रम होय. प्रत्येक युगाचे वैशिष्ट्यपूर्ण असे वैचारिक वातावरण असते. आधुनिक संस्कृतीचे वैशिष्ट्य असे, की ती इहवादी संस्कृती आहे. माणसाचे इहलोकीचे कल्याण साधणे आणि विशेषतः व्यक्तीच्या स्वातंत्र्याचे व प्रतिष्ठेचे संरक्षण व संवर्धन करणारी सामाजिक आणि राजकीय व्यवस्था निर्माण करणे हे तिचे साध्य आहे. ह्यामुळे आधुनिक युगात भिन्न धार्मिक पंथांच्या व्यक्ती ह्या इहवादी उद्दिष्टासाठी सहकार्य करू शकतात. चर्चची समाजावर किंवा राज्यसंस्थेवर अधिसत्ता नसते. पण चर्च समाजातील व्यक्तींना आध्यात्मिक प्रेरणा देऊ शकते. ही प्रारणा देणे हे चर्चचे आधुनिक संस्कृतीच्या संदर्भात कार्य असते.

ईश्वर विश्वाची जी निर्मिती करतो तीच माणूस कलाकृतींच्या निर्मितीद्वारा आपल्या परीने चालू ठेवतो, अशी मारीतँ यांची भूमिका आहे. पण माणूस शून्यातून निर्मिती करू शकत नाही. निसर्ग आणि मानवी जीवन यांच्यापासून मिळणाऱ्या सामग्रीतून तो कलाकृती निर्माण करतो. सर्व यशस्वी कलाकृतींतून काव्यात्म ज्ञान व्यक्त झालेले असते. हे ज्ञान संकल्पनात्मक, सैद्धातिक नसते. ते भावनिक, प्रतिभानाच्या (इंटुइशन) स्वरूपाचे असते आणि स्वतःला एका पूर्ण वस्तूमध्ये-कलाकृतींमध्ये-मूर्त करते. प्रत्येक कलाकृती म्हणजे स्वयंपूर्ण व अर्थपूर्ण असे एक छोटे जग असते.

विसाव्या शतकातील तत्त्वज्ञान आणि सांस्कृतिक जीवनातील एक प्रभावी शक्ती म्हणून मारीतँ यांच्याकडे पाहिले जाते. टॉमस अक्काय्‌नसच्या विचारांचे आधुनिक दृष्टीने अर्थविवरण करणारे तसेच नवटॉमस मताच्या तत्त्वज्ञानाची मांडणी करणारे अत्यंत महत्त्वाचे तत्त्ववेत्ते म्हणून त्यांची गणना होते. तरल संवेदनशीलता असलेले मारीतँ यांचे असंख्य चित्रकार, कवी व इतर कलावंत जवळचे मित्र होते. कलेच्या तत्त्वज्ञानाची मांडणी व विकास करणारे तत्त्वज्ञ तसेच मानवतावादी आणि कँथलिक चर्चवर फार मोठा प्रभाव असलेले विचारवंत म्हणून त्यांचे स्थान महत्त्वपूर्ण आहे.

मारीतँ यांचे बहुतांश लेखन फ्रेंचमध्ये असून त्यांचे काही ग्रंथांची इंग्रजीत भाषांतरेही झाली आहेत. त्यांचे काही महत्त्वाचे ग्रंथ (भाषांतरित) पुढीलप्रमाणे : बेर्गसाँनियन फिलॉसॉफी अँड टॉमिझम (१९१४, इं. भा. १९५५), द डिग्रीज ऑफ नॉलेज (१९३२, १९५९), फिलॉसॉफी ऑफ नेचर (१९३५, १९५१), प्रिफेस टू मेटॅफिजिक्स : सेव्हन लेक्चर्स ऑन बिइंग (१९३४, १९३९), एक्झिस्टनंट (१९४७, १९४८), सायन्स अँड विजडम (१९३५, १९४०), ट्रू ह्युमॅनिझम (१९३६, १९३८), द पर्सन अँड स्कोलॅस्टिसिझम अँड द फ्रँटिअर्स ऑफ पोएट्री (१९३५, १९६२), द सिच्युअशन ऑफ पोएट्री (१९३८, १९५५) मॅन अँड द स्टेट (१९५१), मॉरल फिलॉसॉफि (१९६०, १९६४) इत्यादी.

पहा : नत्र-टॉमस मत स्कोलॅस्टिक तत्त्वज्ञान.

संदर्भ : Even, Joseph W. Ed. Jacques Maritain : The Man and His Achievement, New York. 1965.

रेगे, मे. पुं.