लूटव्हिख आंड्रेआस फॉइरबाख

फॉइरबाख, लूटव्हिख आंड्रेआस : (२८ जुलै १८०४-१३ सप्टेंबर १८७२). जर्मन तत्ववेत्ता व धर्मशास्त्रवेत्ता. जन्म लांट्‌शूट, बव्हेरिया येथे. विद्यार्थिदशेत तो प्रथम ख्रिस्ती धर्म शास्त्राचा अभ्यासक होता पण १८२५ मध्ये ⇨ जी. डब्ल्यू. एफ्. हेगेल (१७७०-१८३१) याच्या प्रभावाखाली येऊन त्याने एर्लांगेन येथे तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला आणी डॉक्टरेट घेतली (१८२८). ख्रिस्ती धार्मिक सिद्धांतावर प्रतिकूल भाष्य करणारे पुस्तक (थॉट्‌स ऑन डेथ अँड इम्‌मॉर्‍लिटी– १८३०) प्रसिद्ध केल्यामुळे विद्यापीठातील प्राध्यापकाच्या नोकरीला त्याला मुकावे लागले. १८२८-३२ ह्या काळात त्याने एर्लांगेन येथे अधिव्याख्याता म्हणून काम केले होते. त्यानंतर त्याने आपले आयुष्य धर्मशास्त्र, तत्त्वज्ञान आणि निसर्गविज्ञाने यांचा व्यासंग करण्यात आणि ह्या विषयांवर लेखन करण्यात घालविले. त्याचे मित्र आणि चहाते यूरोपभर पसरले होते आणि त्यांच्याशी त्याचा विस्तृत पत्रव्यवहार चालू असे. आयुष्याच्या अखेरच्या पर्वात त्याला दारिद्र्य प्राप्त झाले आणि मित्रांच्या औदार्यावर अवलंबून रहावे लागले. १८६७ सालापासून त्याची प्रकृती बिघडली आणि अखेरीस न्यूरेंबर्ग येथे त्याचे निधन झाले.

फॉइरबाखचे सर्वांत महत्त्वाचे ग्रंथ त्याच्या पूर्वायुष्यात लिहिले गेले. त्याची सर्व ग्रंथरचना जर्मनमध्ये असून त्यांतील महत्त्वाच्या ग्रंथांची इंग्रजीत भाषांतरेही झाली आहेत. त्याने पूर्वायुष्यात रचलेल्या ग्रंथांत पुढील ग्रंथांचा अंतर्भाव आहे : टोवर्ड द क्रिटिक ऑफ द हेगेलियन फिलॉसॉफी (१८३९ म. शी. हेगेलवादी तत्त्वज्ञानाची चिकित्सा), द एसेन्स ऑफ क्रिश्चॅनिटी (१८४१- म. शी. ख्रिस्ती धर्माचे सार), लेक्चर्स ऑन द एसेन्स ऑफ रिलिजन (१८४६ -म. शी. धर्माचे सार : व्याख्याने).

हेगेलचे ⇨ चिद्‌वादी तत्त्वज्ञान तसेच धार्मिक श्रद्धेचा आशय असलेले सिद्धांत ह्यांच्यावर फॉइरबाखने केलेल्या टीकेमध्ये आणि ⇨ जडवादावर आधारलेल्या ⇨ मानवतावादाच्या त्याने केलेल्या पुरस्कारामध्ये त्याच्या तत्वज्ञानाचे सार आढळले. हे सार थोडक्यात असे मांडता येईल : वास्तव विश्व जडवस्तूंचे बनलेले आहे व ह्या जडवस्तूंचे आपल्याला इंद्रियसंवेदनांद्वारे ज्ञान होते. माणूस ही एक जडवस्तू आहे पण माणसाला जाणीव आणि विचारशक्तीही आहे. ह्या मानसिक धर्मामुळे माणूस केवळ जडवस्तू राहत नाही. त्याच्या अस्तित्वाच्या स्वरूपामध्ये गुणात्मक फरक घडून येतो. अनेक जडवादी या गोष्टीचे महत्त्व ध्यानात घेत नाहीत. उलट ज्या ⇨ विवेकवादी तत्त्वज्ञानाची परिणती हेगेलच्या चिद्‌वादात झाली ते तत्त्वज्ञान केवल आणि शुद्ध विचार हीच अंतिम आणि खरीखुरी वास्तवता आहे असे मानते आणि ह्या केवल आणि शुद्ध विचारापासून इंद्रियगोचर जड विश्व आणि मानवी अनुभव व विचार निष्पन्न करू पाहते. हा उलटा न्याय आहे. मानवी जाणीव हीच खरीखुरी अस्तित्वाची असलेली जाणीव आहे आणि तो जडवस्तूचा धर्म आहे. केवल विचार हीच अंतिम वास्तवता असली, तरी जड विश्वामध्ये स्वतःला प्रकट करूनच त्याला मूर्त अस्तित्व लाभू शकते, हा हेगेलचा सिद्धांत आत्मविसंगत आहे. ह्या विसंगतीतून हेगेलने चिद्‌वादापलीकडे जाणाऱ्या पण चिद्‌वादाने प्रकट केलेल्या महत्त्वाच्या सत्यांना स्वतःमध्ये सामावून घेणाऱ्या ‘शिक्षित’ जडवादाकडे नेणारी पायवाट मोकळी केली आहे. मानवी जाणिवेच्या वेगवेगळ्या आविष्कारांचे जे वर्णन आणि विश्लेषण हेगेलने केले, तो जडवादाला चिद्‌वादाकडून लाभलेला महत्त्वाचा वारसा आहे.

माणूस आपल्या जाणिवेमुळे निसर्गाशी आणि इतर माणसांशी संबंध जोडू शकतो. इतर माणसांशी सायुज्यता पावण्याची प्रेरणा-प्रेमाची प्रेरणा-ही माणसाची मूलभूत प्रेरणा आहे. ह्यातून मानवी समाज शक्य होतो. स्वतःपलीकडे जाण्याची माणसाची जी ही शक्ती आणि प्रवृत्ती असते, तिच्यामुळे माणूस केवळ प्राणी राहत नाही. पण चिद्‌वादात ज्याप्रमाणे माणसाच्या जाणिवेला माणसापासून तोडण्यात येते आणि मग तिला स्वयंभू, परिपूर्ण जाणीव असे स्वरूप देऊन तिच्यापासून माणसाची जाणीव निष्पन्‍न करण्याचा प्रयत्‍न करण्यात येतो तसाच तो धर्मातही करण्यात येतो. माणसाला परिपूर्णतेचा ध्यास असतो, प्रेमाच्या द्वारा इतरांशी एकरूप बनण्याची ओढ असते. ह्या प्रेरणांचे माणूस ‘प्रक्षेपण’ करतो. म्हणजे ज्याच्यात हे आदर्श मूर्त झाले आहेत असे एक वस्तुनिष्ठ अस्तित्व आहे–ईश्वर आहे–असे मानतो, आणि ह्या काल्पनिक, परिपूर्ण अस्तित्वावर प्रेम करून त्याच्या द्वारा माणसांवर प्रेम करतो. ह्या आभासात्मक धार्मिक जाणिवेचे निरसन करून, माणसाचे ईश्वरावरील प्रेम हे वस्तुतः माणसाचे इतर माणसांवरील साक्षात् प्रेम असते, ईश्वराच्या ठिकाणी मानलेली परिपूर्णता ही माणसाच्या परिपूर्णतेच्या आकांक्षेचे प्रतिबिंब असते, वास्तव जगात अधिकाधिक निरामय आणि उत्कृष्ट असे वैयक्तिक व सामाजिक जीवन घडविण्याच्या प्रयत्नाचे ते प्रतिबिंब असते असे दाखवून दिले पाहिजे देवशास्त्र व धर्मशास्त्र यांची जागा नैसर्गिक विज्ञानांवर आधारलेल्या मानवशास्त्र आणि मानवतावादी नीतिशास्त्राने घेतली पाहिजे.

फॉइरबाखला त्याच्या काळी वस्तुनिष्ठ, चिकित्सक, मुक्त विचारांचा प्रवर्तक म्हणून जर्मनीत आणि यूरोपात प्रतिष्ठेचे स्थान होते. नंतरच्या काळात तत्वज्ञानात्मक आणि सामाजिक विचारात हेगेलपासून कार्ल मार्क्सपर्यंत जी उत्क्रांती झाली तिच्यातील एक महत्त्वाचा दुवा म्हणून त्याला ओळखण्यात येते. ⇨ कार्ल मार्क्स (१८१८-८३) याने व ⇨ फीड्रिख एंगेल्स (१८२०-९५) याने त्याच्या विचाराचे केलेले मूल्यमापन थोडक्यात असे आहे : फॉइरबाखने एका तडाख्यात चिद्‌वादातील विसंगतींचा चक्काचूर केला व जडवादाचे प्रतिष्ठापन केले. पण तो अर्ध्या अंतरावर थांबला. तो अर्धा जडवादी आणि अर्धा चिद्‌वादी राहिला. माणुसकीतून धर्म उदयाला येतो हे त्याने दाखवून दिले पण माणुसकी ही व्यक्तीच्या सामाजिक संबंधांत सामावलेली असते आणि सामाजिक परिवर्तन करून सामाजिक संबंधांमधील विसंगती दूर केल्याशिवाय धार्मिक आभासाचे निरसन करता येणार नाही, हे त्याने ओळखले नाही. मार्क्स-एंगेल्स यांच्याशिवाय ⇨मार्टिन हायडेगर (१८८९-१९७६), ⇨ झां पॉल सार्त्र (१९०५-८०) आणि कार्ल बार्त (१८८६-१९६८) ह्या तत्त्ववेत्त्यांवरही फॉइरबाखचा प्रभाव दिसून येतो.

संदर्भ: 1. Chamberlain, W. B. Heaven Wasn’t His Destinetion : The Philosophy of Ludwig Feuerbech, London, 1941.

2. Evans, M. Trans. The Essence of Chrsitianity, New York, 1957.

3. Hook, S. From Hegel to Marx, New York, 1936.

4. Marcuse, H. Reason and Revolution, London, 1941.

5. Tucker, R. Philosophy and Myth in Karl Marx, Cambridge, 1960.

रेगे, मे. पुं.