कॉलिंगवुड, रॉबिन जार्ज : (२२ फेब्रुवारी १८८९— ९ जानेवारी १९४३). ब्रिटिश तत्त्ववेत्ता आणि इतिहासकार. जन्म कॉनिस्टन (उत्तर लॅंकाशर) येथे. त्याचे शिक्षण रग्बी आणि ऑक्सफर्ड येथे झाले. १९३४ मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठातील तत्त्वमीमांसेचा ‘वेन्फ्लेट प्राध्यापक’ म्हणून त्याची नेमणूक झाली; पण १९४१ मध्ये प्रकृतीच्या कारणामुळे तो निवृत्त झाला. कॉनिस्टन येथेच त्याचे निधन झाले. तत्त्वज्ञान हे कॉलिंगवुडचे प्रमुख कार्यक्षेत्र असले, तरी उत्खननाने लाभलेल्या रोमनकालीन ब्रिटनच्या अवशेषांची व्यवस्था लावणे, ह्या पुराव्याच्या आधाराने तत्कालीन समाजस्थितीची अटकळ करणे, ह्याबाबतीत त्याने पहिल्या दर्जाची कामगिरी बजावली आहे. तत्त्वज्ञानातील त्याची कामगिरी तीन कालखंडांत विभागता येईल. १९१२ ते १९२७ ह्या पहिल्या कालखंडात त्याने चिद्वादाची नव्याने मांडणी केली. स्पेक्यूलम मेन्टिस (१९२४) हा ग्रंथ ह्या कालखंडात मोडतो. त्याच्यात कला, धर्म, विज्ञान, इतिहास व तत्त्वज्ञान ह्या पाच अनुभवप्रकारांचे विश्लेषण करून अगोदरच्या अनुभवप्रकारातील उणीव नंतरच्या अनुभवप्रकारात कशी भरून निघते, हे दाखवून देण्याचा प्रयत्न त्याने केला आहे आणि तत्त्वज्ञान ह्या अनुभवप्रकारातच संपूर्ण सत्याचे आकलन आपल्याला होऊ शकते, ही भूमिका मांडली आहे. कलेमध्ये कल्पनाशक्तीद्वारा विषयाची जाणीव आपल्याला होते, पण ह्या जाणिवेत वास्तव विश्वासंबंधीचे विधान नसते; धर्मात असे विधान असते, पण ते केवळ प्रतीकात्म असते, बुद्धिनिष्ठ नसते. विज्ञानात वास्तव विश्वासंबंधीची बुद्धिनिष्ठ विधाने असतात, पण ती एकांगी असतात, वैज्ञानिक ज्ञान अमूर्त असते. उलट इतिहासात विवक्षित व्यक्ती व घटना ह्यांचे मूर्त ज्ञान आपल्याला होते; पण ह्या व्यक्ती आणि घटना भूतकालीन असल्यामुळे जाणणाऱ्याच्या मनाला त्या परक्या, दूरस्थ असतात. तत्त्वज्ञान हे परक्या वस्तूंचे ज्ञान नसते; ते आत्मज्ञान असते. आपल्याच विविध अनुभवप्रकारांत अंतर्भूत असलेल्या सत्याचे आकलन आणि त्याबरोबरच ह्या सत्यातील उणिवांचे आकलन घडविणे, हे तत्त्वज्ञानाचे कार्य आहे. उणिवांच्या आकलनाने आपण उणिवांपलीकडे जातो.

कॉलिंगवुडने १९२७ ते १९३७ ह्या दुसऱ्या कालखंडात ह्या भूमिकेचा विकास केला, पण तिला मुरडही घातली. इतिहासाचा विषय भूतकालीन व म्हणून परका असतो, ही भूमिका त्याने आयडिया ऑफ हिस्टरी (१९४६) या ग्रंथात सोडून दिली. ऐतिहासिक घटना समजून घ्यायची, तर तिची मानसिक पुनर्रचना करावी लागते. ऐतिहासिक घटना ही कृती असल्यामुळे तिच्यात काही विचार व्यक्त झालेला असतो. ह्या विचाराची पुनर्रचना करायची म्हणजे तोच विचार इतिहासकाराने आपल्या मनात परत उभा केला पाहिजे. ऐतिहासिक घटनांत व्यक्त झालेला विचार आणि आपल्या मनात पुनरुज्जीवित झालेले विचार एकच आहे, हे कसे पारखायचे ? ज्या बाह्यकृती, उक्ती ह्यांतून भूतकालीन विचार व्यक्त झालेला असतो, त्यांच्याशी म्हणजे आपल्या समोर असलेल्या ऐतिहासिक पुराव्याशी आपण कल्पिलेला विचार सुसंगत आहे का; ज्या ऐतिहासिक घटना घडल्या असे आपल्याला माहीत आहे, त्यांच्याद्वारा ह्या कल्पित विचाराचा तत्कालीन परिस्थितीत स्वाभाविकपणे आविष्कार झाला असता, की वेगळ्या रीतीने झाला असता; ह्या प्रश्नांची उत्तरे शोधून हे पारखायचे असते. इतिहासकार भूतकालाच्या अंतरंगात शिरतो किंवा भूतकाल त्याच्या अंतरंगात परत जागृत होतो आणि म्हणून इतिहासाचा विषय इतिहासकाराला परका नसतो. इतिहासासंबंधीची संशयवादी भूमिका ज्याप्रमाणे कॉलिंगवुडने ह्या कालखंडात सोडून दिली, त्याचप्रमाणे वैज्ञानिक ज्ञान अमूर्त असल्यामुळे सदोष असते, ही भूमिकाही सोडून दिली. विज्ञानात आपल्याला खरेखुरे ज्ञान मिळते का, असा प्रश्न उपस्थित न करता विज्ञान हे खरेखुरे ज्ञान आहे, हे आपण मान्य केले पाहिजे

रॉबिन जॉर्ज कॉलिंगवुड

आणि विज्ञानात ज्या स्वरूपाचे ज्ञान आपल्याला लाभते ते प्राप्त करून घेणे कसे शक्य होते ? असा प्रश्न आपण विचारला पाहिजे, ही भूमिका त्याने द आयडिया ऑफ नेचर (१९४५) ह्या ग्रंथात स्वीकारली. ग्रीक विज्ञान, प्रबोधनकालीन विज्ञान आणि आधुनिक विज्ञान अशा विज्ञानाच्या तीन भिन्न अवस्था आहेत व विज्ञानाची ही रूपे भिन्न आहेत. कारण त्यांच्या बुडाशी निसर्गाची भिन्न ‘दर्शने’ आहेत, हे मत त्याने मांडले. पण निसर्गाची ही दर्शने बदलत का जातात, ह्याचा उलगडा त्याने केला नाही. इतिहास आणि विज्ञान ही सदोष नसली, तरी मर्यादित आहेत हे मत मात्र ह्या कालखंडात त्याने सोडून दिले नाही. विज्ञानात सार्वत्रिक नियमांचे ज्ञान आपल्याला होते; पण हे नियम अस्तित्वात असलेल्या वस्तूंचे साक्षात ज्ञान देत नाहीत, ते सोपाधिक, ‘जर असे असे घडले तर असे असे होईल’, असे सांगणारे असतात. इतिहासात विवक्षित व्यक्तींचे व घटनांचे ज्ञान आपल्याला होते, पण ते सार्वत्रिक नसते. परिपूर्ण ज्ञान हे अस्तित्वाविषयीचे ज्ञान असले पाहिजे, पण ते सार्वत्रिकही असले पाहिजे. सर्व अस्तित्वांना स्वत:मध्ये सामावून घेणारे अस्तित्व जर असेल, तर अशा अस्तित्वाचे ज्ञान सार्वत्रिक असेल आणि अस्तित्वाविषयीचेही असेल. अशा स्वरूपाचे अस्तित्व हा तत्त्वमीमांसेचा विषय असतो व तत्त्वमीमांसा हे परिपूर्ण ज्ञान आहे. संकल्पनाअमूर्त आणि म्हणून संकल्पनांद्वारा घडणारा वैज्ञानिक विचार अस्तित्वाचे यथार्थज्ञान देऊ शकत नाही, ह्या चिद्वादी सिद्धांतावर एसे ऑन फिलॉसॉफिकल मेथड (१९३३) ह्या ग्रंथात मांडलेली ही भूमिका आधारली आहे.

पण हा चिद्वादी दृष्टीकोन त्याने शेवटच्या म्हणजे तिसऱ्या कालखंडात सोडून दिला. कॉलिंगवुडचा बदललेला दृष्टीकोन द प्रिन्सिपल्स ऑफ आर्ट (१९३८) ह्या ग्रंथात प्रथम व्यक्त झाला आहे. कलाकृती ही कल्पनाशक्तीची निर्मिती असते. भावांचा संभार असलेले वेदन हे अनुभूतीचे मूळ स्वरूप असते आणि अनुभूतीला जाणिवेत सुस्पष्ट स्वरूप देणे म्हणजे तिचा आविष्कार करणे. अनुभूतीचा आविष्कार करणे हा भाषिक व्यवहार आहे. कोणताही आविष्कार भाषिकच असतो. तेव्हा कल्पना, आविष्कार आणि भाषा ही एकच होत. सारेच मानसिक व्यवहार भाषिक व्यवहार असतात. अनुभूतीचा आविष्कार अविकृतपणे, यथार्थपणे झाला, तर ती कलाकृती चांगली असते. संकल्पना अमूर्त असतात. पण अमूर्त असणे हे त्यांचे स्वरूप आहे. संकल्पनात्मक ज्ञानात ज्ञेय वस्तूंचे स्वरूप विकृत होते असे समजायचे कारण नाही. उलट संकल्पनांमुळे मूळ अनुभूतीचा आविष्कार अधिक संपन्न व व्यापक होतो. केवळ संकल्पनात्मक असा ‘शुद्ध’ विचार असूच शकत नाही. संकल्पनात्मक विचार अनुभूतीच्या भाव आणि वेदन ह्यांच्या आविष्काराचे एक अंग असते.

सर्वसमावेशक अस्तित्वाचे ज्ञान करून घेणे हे तत्त्वमीमांसेचे प्रयोजन आहे, ही भूमिकाही त्याने या कालखंडात सोडून दिली. विज्ञानात आपण काही प्रश्न उपस्थित करून त्यांची उत्तरे शोधीत असतो; पण आपण कोणते प्रश्न उपस्थित करतो, हे आपल्या पूर्वगृहीतकांवर (प्रीसपोझिशन्स) अवलंबून असते. एखाद्या कालखंडातील विज्ञान आणि संस्कृती ह्यांना आधारभूत असलेली मूलभूत पूर्वगृहीतके स्पष्ट करणे हे तत्त्वमीमांसेचे कार्य आहे. ही पूर्वगृहीतके खरीही नसतात किंवा खोटीही नसतात. त्यांच्यावर आधारलेल्या प्रश्नांची उत्तरे मात्र खरी किंवा खोटी असतात. तेव्हा पूर्वगृहीतकांची चिकित्सा करणे, हे तत्त्वमीमांसेचे कार्य असू शकत नाही, तर वेगवेगळ्या कालखंडांतील विज्ञान आणि संस्कृतींमध्ये कोणत्या पूर्वगृहीतकांचा आविष्कार झाला आहे हे उघड करणे, एवढेच तिचे कार्य असते. अमुक कालखंडात अमुक मूलभूत पूर्वगृहीतके स्वीकारण्यात आली होती, एवढे ऐतिहासिक विधान करणे तत्त्वमीमांसेचे कार्य असते. कॉलिंगवुडच्या ह्या भूमिकेप्रमाणे तत्त्वमीमांसेचे स्वरूप ऐतिहासिक आहे.

संदर्भ : 1. Donagan, Alan, The Later Philosophy of R. G. Collingwood, Oxford, 1962.

2. Tomlin, E. W. F. R. G. Collingwood, London, 1953.

दामले, प्र. रा.