द्वैताद्वैतवाद : परमात्मा, जीवात्मा आणि जगत् वा जड विश्व हे एकमेकांपासून भिन्न आहेत तथापि जीवात्मा आणि जगत् हे परमात्म्याहून अभिन्न आहेत, असे सांगणारे तत्त्वज्ञान म्हणजे द्वैताद्वैतवाद होय. परमात्मा हा स्वतंत्र, नित्य, ज्ञानरूप, आनंदरूप व स्वयंपूर्ण असून अनंत जीवात्मे आणि जडप्रकृती व तिच्यातून परिणाम पावलेले दृश्य विश्व हे परमेश्वरीचे अंश आहेत. परमेश्वर व जीवात्मे हे नित्य व अविकारी आहेत परंतु सूक्ष्म प्रकृती ही विकारी आणि तिचे परिणाम हे विकार होत प्रकृतीहून तिचे विकार वेगळे नाहीत. प्रकृती विकारी असली, तरी तीही नित्यच आहे. हे विकार म्हणजे सृष्टी होय. उत्पत्ती आणि स्थितीकाली ते व्यक्त दशेस येतात आणि प्रलयकाली प्रकृतीत विलीन  होऊन अव्यक्त होतात. चित् हे परमेश्वर व जीवात्मा यांचे स्वरूप आहे आणि प्रकृती तेवढी अचित् आहे, असे शंकराचार्यांच्या नंतर मांडलेल्या द्वैताद्वैतवादी तत्त्वज्ञानाचे तात्पर्य आहे परंतु शंकराचार्यांच्या अगोदर झालेल्या एका द्वैताद्वैतवादाप्रमाणे प्रकृतीदेखील अचित् म्हणजे जड नसून तीसूद्धा चित् म्हणजे चैतन्यस्वरूपच आहे. समुद्राच्या लाटा आणि समुद्र किंवा शुद्ध सोने आणि शुद्ध सोन्याचे अलंकार हे जसे एकाच स्वरूपाचे असतात, तशीच प्रकृतीही चैतन्यस्वरूपच आहे.⇨ काश्मीर शैव संप्रदाय आणि ज्ञानदेवांचा ⇨ चिद्विलासवाद यांच्याशी हे प्राचीन मत अत्यंत जुळणारे आहे.

शंकराचार्यांचा ⇨ केवलाद्वैतवाद किंवा मध्वाचार्यांचा द्वैतवाद यांपेक्षा द्वैताद्वैतवाद हा प्राचीन उपनिषदांशी आणि बादरायणाच्या ब्रह्मसूत्रांशी जसा संपूर्णपणे सुसंगत आहे, तसाच ⇨ विशिष्टाद्वैतवादही आहे. कारण मायावाद उपनिषदांत आणि ब्रह्मसूत्रांत स्पष्टपणे कोठेही सांगितलेला नाही. अद्वैतवादी संदर्भ उपनिषदांत पुष्कळ आहेत. छांदोग्याच्या सहाव्या अध्यायात मायावाद सूचित होतो परंतु निश्चितपणाने सूचित होत नाही. मायावाद व केवलाद्वैतवाद त्यांतून निघत नाही. द्वैतवाद सांगणारी वचनेही उपनिषदांमध्ये व ब्रह्मसूत्रांत पुष्कळ आहेत परंतु त्याबरोबरच अद्वैतवादी वचनेही पुष्कळ आहेत म्हणून मध्वाचार्यांचा द्वैतवादही सुसंगतरूपाने त्यांतून निघत नाही. द्वैताद्वैतवाद वा विशिष्टाद्वैतवाद हाच त्यांतून सुसंगतपणे निघतो.

हा द्वैताद्वैतवाद म्हणजेच ब्रह्मपरिणामवाद होय. ब्रह्म अविकृत राहूनच जीव व जगत् रूपांनी परिणाम पावते म्हणून ब्रह्म, जीव व जगत् ही तिन्ही सारखीच सत्य, असा याचा अभिप्राय आहे. शंकराचार्यांच्या पूर्वी काही प्राचीन उपनिषदांवर, विशेषतः छांदोग्य आणि बृहदारण्यक या उपनिषदांवर, द्वैताद्वैतवादी आचार्यांची भाष्ये होती, असे शंकराचार्यांच्या बृहदारण्यकोपनिषदावरील (२·१·३० ३·८·१२ ५·१·१) आणि ब्रह्मसूत्रांवरील (२·१·१४) भाष्यांवरून निश्चित होते. नवव्या शतकात झालेल्या ब्रह्मसूत्रांवरील भास्करभाष्यावरूनही वाक्यकार व वृत्तिकार म्हणून निर्दिष्ट केलेले ब्रह्मसूत्राचे द्वैताद्वैतवादी भाष्यकार होते, असे निश्चित करता येते.

चार पक्ष : शंकराचार्यांनी द्वैताद्वैतवादाचे चार पक्ष (बृहदारण्यकोपनिषदभाष्य ३·८·१२) सांगितले आहेत : अवस्थापक्ष, शक्तिपक्ष, विकारपक्ष आणि अवयवी पक्ष. भर्तृप्रपंचनामक आचार्यांचा द्वैताद्वैतवादी विचार शंकराचार्यांनी मांडला आहे, असे शंकराचार्यांचे शिष्य सुरेश्वर यांनी आपल्या बृहदारण्यकभाष्यवार्तिकात अनेक ठिकाणी म्हटले आहे. या चार पक्षांपैकी अवस्थापक्ष असा : परब्रह्म हा महासमुद्र आहे. तळामध्ये हा अचल व अत्यंत स्थिर आहे. तो किंचित प्रचलित अवस्थेमध्ये वरच्या भागात असतो. ही किंचित प्रचलीत अवस्था म्हणजे अंतर्यामी परमेश्वर होय. त्याची विशेष अत्यंत प्रचलित अवस्था म्हणजे जीवात्मे व त्रिगुणात्मक प्रकृत्ती होय. या विशेष प्रचलित अवस्थेच्या पुन्हा पाच अवस्था असतात. त्या म्हणजे पिंड, जाती, विराट, सूत्र आणी दैव या होत. पिंड म्हणजे व्यक्ती, जाती म्हणजे मनुष्यत्व, गोत्व इत्यादी दृश्य ब्रह्मांड हे समुच्चित स्वरूप म्हणजे विराट  या विराटाचे नियमन करणारे तत्त्व सूत्र आणि सूक्ष्म विश्वात्मा हिरण्यगर्भ अथवा ब्रह्मदेव म्हणजे दैव होय. एकंदरीत या आठ अवस्था होत. परब्रह्माच्या या अवस्था परब्रह्माहून भिन्न आहेत परंतु अत्यंत भिन्न नाहीत व अत्यंत अभिन्नही नाहीत. शक्तिपक्षाप्रमाणे या आठ अवस्था म्हणजे परब्रह्मातील आठ शक्तीच होय. शक्ती म्हणण्याचे कारण अवस्था निरनिराळ्या आहेत म्हणून या अवस्था ज्यांच्यामुळे असतात, अशा आठ शक्ती कल्पाव्या लागतात.  म्हणून ब्रह्म हे अक्षरतत्त्व अनंत शक्तींनी युक्त आहे, असे जे उपनिषदामध्ये किंवा अन्य शास्त्रग्रंथांमध्ये म्हटले आहे, ते उपपन्न होते. शक्ती आणि शक्तिमान एकमेकांहून भिन्न म्हणता येतात आणि अभिन्नही म्हणता येतात. ही गोष्ट अवस्थापक्षाप्रमाणेच आहे. विकारपक्षाप्रमाणे जीवात्मे आणि दृश्य विश्व हे परब्रह्माचे विकार होत. विकार आणि विकारी यांचा भेद आणि अभेद संबंध दिसून येतो. लाटा आणि समुद्र, सुवर्ण व त्याचे अलंकार ही उदाहरणे भेदाभेदासंबंध दाखवितात. अवयवी पक्षाप्रमाणे जीव आणि दृश्य विश्व परब्रह्माचे अवयव असून परब्रह्म हा अवयवी आहे. अवयवी व अवयव हे एकमेकांहून भिन्नही म्हणता येतात आणि अभिन्नही म्हणता येतात. उदा., तंतू हे अवयव व पट हा अवयवी यांचा भेदाभेदसंबंध दिसतो. येथे हे मात्र लक्षात ठेवले पाहिजे, की अवस्था, शक्ती, विकार किंवा अवयव म्हणजे परब्रह्मच असे म्हणता येत नाही. कारण परब्रह्म हे सर्वव्यापी तत्त्व आहे.


भर्तृप्रपंचादी प्राचीन भाष्यकार व भास्कर, रामानुज इ. शंकराचार्योत्तर काली झालेले भाष्यकार हे पूर्वमीमांसा आणि उत्तरमिमांसा (ब्रह्मसूत्रे) मिळून एक शास्त्र होय, असे मानतात. पूर्वमिमांसेचा विषय कर्मकांड आणि उत्तरमीमांसेचा विषय ज्ञानकांड होय. कर्म व ज्ञान यांचा समुच्चयच मोक्षास कारण होतो, असा ज्ञानकर्मसमुच्चयवाद शंकराचार्यांच्या पूर्वीच्या भाष्यकारांनी मांडला होता. ज्ञानानेच मोक्ष होतो, कर्माचा म्हणजे कर्मयोगाचा मोक्षाशी संबंध नाही, मोक्षास कर्म कारण नसून ज्ञान हेच कारण आहे, असे सांगून शंकराचार्यांनी कर्मकांडाचा ज्ञानकांडाशी प्रत्यक्ष संबंध नाही हे सिद्ध केले आहे. जीव आणि विश्व परब्रह्माहून भिन्न आहे, असा प्रत्यय असेल तरच कर्मकांड आचरता येते कारण ईश्वरार्पण बुद्धीने जीवात्म्याने भौतिक साधनांच्या योगाने क्रम आचारावयाचे असते. त्याकरिता द्वैतबुद्धीची आवश्यकता असते. केवळ भेदज्ञान असेल, अद्वैतज्ञान नसेल, तर जन्ममरणाचा संसार म्हणजे बंध चालू राहतो. संसारापासून मुक्ती प्राप्त करण्याकरिता अभेद ज्ञान आवश्यक ठरते. ‘तत्त्वमसि’- परब्रह्मच तू आहेस-या अनुभवाने मुक्ती मिळते. मुक्ती मिळेपर्यंत शरीर असते, भेदज्ञान असते म्हणून कर्मही आवश्यक ठरते. मात्र मोक्षाकरिता सत्कर्म ईश्वरार्पण बुद्धीने करीत राहिले पाहिजे. यज्ञ, दान आणि तप यांच्या योगाने मुमुक्षूने ज्ञान प्राप्त करून घ्यावे, असे उपनिषदे म्हणतात. म्हणूनच ज्ञानयोग आणि कर्मयोग यांचा समुच्चय श्रुतीप्रमाणे इष्ट ठरतो.

भट्टभास्कर : शंकराचार्यांच्या नंतर व न्यायकुसुमांजलीकार उदयनाचार्यांच्या पूर्वी भट्टभास्करनामक ब्रह्मसूत्रांचे द्वैताद्वैतावादी भाष्यकार दहाव्या शतकात झाले. हे सिद्धांतशिरोमणिकार गणिती भास्कराचार्यांचे पाचवे पूर्वज होत. गणिती भास्कराचार्य १११४ मध्ये होते. उदयनाचार्यांनी  ब्रह्मपरिणामवादी  म्हणून भास्कराचार्यांचा उल्लेख केला आहे. वर्घमान उपाध्यायांनी आपल्या कुसुमांजलीच्या टीकेत ते त्रिदंडी संन्यासी होते, असे म्हटले आहे. भट्टभास्करांनी ब्रह्मसूत्रभाष्यात द्वैताद्वैतवाद मांडला असून शांकर केवलाद्वैतावादाचे व मायावादाचे विस्ताराने खंडण केले आहे. त्यांनी वरील अवस्थापक्ष आणि शक्तिपक्ष यांचा समन्वय करून एकच पक्ष मांडला आहे. मात्र जीव हा ब्रह्माचा अवयव किंवा विकार नव्हे, असे त्यांनी स्पष्ट म्हटले आहे.

भट्टभास्करांचे द्वैताद्वैतवाद तत्त्वज्ञान असे आहे : परमात्मा हे एकच अनंत शक्तिसंपन्न तत्त्व आहे. त्यांच्या अनंत शक्ती आहेत. भोग्य शक्ती, भोक्तृ शक्ती आणि नियंतृ शक्ती अशा तीन प्रकारच्या त्या आहेत. भोग्य शक्तीचा अविष्कार किंवा परिणाम म्हणजे त्रिगुणात्क जगत् होय. भोक्तृ शक्तीमुळे तोच परमात्मा अनंत जीवांचे मर्यादित रूप घेतो आणि त्याच्या नियंतृ शक्तीने जीव आणि जगत् यांचे तो नियंत्रण करतो. सूर्य रश्मींचा विस्तार करतो आणि त्यांना आवरतो त्याचप्रमाणे विश्वाच्या उत्पत्ती व स्थितीच्या काली भोग्य शक्तींचा तो विस्तार करतो आणि जगताच्या प्रलयकारी त्या शक्तींना आवरतो. हा विस्तार म्हणजेच विश्वरूपी परिणाम होय. विस्तारपूर्वकाली जगद्रूपी कार्य हे कारणावस्थेतच राहते व उत्पत्तिस्थितिकाली कार्यावस्थेमध्ये येते. जगद्रूपाने परिणाम पावलेले परमब्रह्म शुद्ध स्वरूपापासून केव्हाही च्युत होत नाही. स्वप्नामध्ये जीवात्मा विविध कार्ये निर्माण करून ती पाहतो परंतु त्याचे स्वतःचे स्वरूप बदलत नाही. त्याचप्रमाणे परमात्मा विश्वरूप बनूनही विश्वोत्तीर्ण स्वरूपात पूर्णरूपाने राहतो. शक्तीच्या योगे जगत निर्माण होते. या निर्मितीप्रक्रियेला ‘शक्तिविक्षेप’ अशी संज्ञा आहे. विक्षेप म्हणजे पसरणे. भोग्य शक्तीच्या योगाने बुद्धी व मन  या स्वरूपातील अंतःकरण, पंच ज्ञानेंद्रिये, पंच कर्मेंद्रिये आणि पाच सूक्ष्म महाभूते निर्माण होऊन त्यांच्यातून सूक्ष्म देह निर्माण होतात. हे सूक्ष्म देह म्हणजेच जीवात्म्याचे उपाधी होत. जीवात्मे वस्तूतः परमेश्वरच होत. भेद पडतो तो उपाधींच्या म्हणजे लिंगशरीराच्यामुळे या उपाधींमुळेच निरवयव, अखंड, अक्षर परमेश्वराचे अंश पडतात. हे अंश स्वाभाविक नव्हेत. आकाश एकच असते घट, मठ हे निराळी उपाधी असल्यामुळे घटाकाश व मठाकाश असे निरवयव आकाशाचे भेद पडतात तसेच जीवाचे पडतात. जीवात्म्याला स्वतःचे परमेश्वराशी तादात्म्य प्रत्यक्ष प्रतित झाले म्हणजे प्रारब्ध कर्माचा क्षय झाल्यावर लिंगदेहही क्षय पावतो आणि समुद्रात नदी मिसळावी त्याप्रमाणे जीवात्मा परमात्म्याशी एकरूप होतो. हाच मोक्ष होय. देह असेपर्यत मूमूक्षूला कर्मयोग आचरावाच लागतो ज्ञानयोग आणि कर्मयोग यांचा समुच्चय करावा लागतो. जिवंत स्थितीत अद्वैत ज्ञानासह कर्म केल्याने रागद्वेषाही विकार आणि आसक्ती नष्ट होते. जिवंत स्थितीतील ही अनासक्ती म्हणजेच जीवनमुक्ती होय. जीवाचा परमात्म्याशी असलेला औपाधिक भेद आणि भोग्य शक्तीचा अर्थात जगताचा वास्तव भेद यांचे भान असतेच. म्हणून या भेदज्ञानाने कर्मयोग घडत असतो.

द्वैत म्हणजे भेद हा पारमार्थिक आहे म्हणजे खराखुरा आहे त्याचप्रमाणे अभेद हाही पारमार्थिक आहे. भेदबुद्धी व्यवहारास कारण आहे आणि अभेदबुद्धी मोक्षास कारण आहे.


भोग्य शक्ती, भोक्तृ शक्ती आणि नियंतृ शक्ती या परमात्म्याच्या शक्ती आहेत. त्या शक्ती आणि शक्तिमान परमात्मा यांचा गुण आणि गुणी यांच्याप्रमाणे भेदाभेदसंबंध आहे. अश्वाचा शुक्ल रूप हा गुण, अश्व हा गुणी होय. शुक्ल रूप आणि अश्व हे वेगळे आहेत आणि वेगळे नाहीत तसेच हे आहे किंवा तंतू व तंतूचा पट यांचाही दृष्टान्त या संदर्भात लक्षात घ्यावा. शुक्ल रूप  आणि अश्व किंवा तंतू व पट हे अत्यंत भिन्न नव्हेत किंवा अत्यंत अभिन्न नव्हेत. तसा हा भेदाभेदसंबंध आहे. प्रत्यक्ष, अनुमान आणि आगम म्हणजे वेद या तिन्ही प्रमाणांनी हा संबंध सिद्ध होतो.

भट्टभास्करांच्या या द्वैतद्वैतवादाला संमती देऊन लिंगायत वा वीरशैव पंथाच्या पंडित श्रीपती या आचार्यांनी वीरशैव मतानुसार ब्रह्मसूत्रांवर द्वैताद्वैतवादाचे समर्थन करणारे भाष्य लिहिले आहे. त्यांनी परब्रह्म शिवाच्या वरीलप्रमाणे तीन शक्ती मानल्या आहेत.

निंबार्क: रामानुजाचार्यांनंतर आणि मध्वाचार्यांपूर्वी निंबार्क हे भक्तिमार्गी आचार्य झाले असावेत, असे म्हणतात. राधाकृष्णांची भक्ती पूर्णतेस प्राप्त झाली म्हणजे भगवंताच्या अनुग्रहाने मोक्षप्राप्ती होते, असा सिद्धांत निंबार्क संप्रदायांनी मांडला आहे. निंबार्काचार्यांचे वेदांत पारिजातसौरभ हे ब्रह्मसूत्रांचे संक्षिप्त भाष्य तसेच वेदांतकामधेनू दशश्लोकी, रहस्यषोडशी, सदाचारप्रकाश, प्रपत्तिचिंतामणी, भगवद्‌गीताभाष्यप्रात:स्तव या कृती प्रसिद्ध आहेत. त्यापैकी पहिल्या तीन व शेवटची ह्या आज उपलब्ध आहेत. निंबार्काचार्यांचेच शिष्य श्रीनिवासाचार्य यांचे ब्रह्मसूत्रांवरील वेदान्तकौस्तुभभाष्य उपलब्ध आहे. या भाष्यावर केशव काश्मीरी भट्टाची टीका उपलब्ध आहे.

निंबार्कमत असे : नित्य परब्रह्म हे अचिंत्य, चिदानंदमय, अनंत, परम, व परिपूर्ण अशा गुणांचा आश्रय असून तोच सर्वज्ञ, सर्वशक्ती, सर्वेश्वर, सर्वकारण, सर्वश्रेष्ट, सर्वव्यापक, सर्व वेदांचा व सर्व शब्दांचा विषय श्रीकृष्ण होय. त्यालाच नारायण, वासुदेव इ. नावे आहेत. चित म्हणजे जीवात्मे व अचित म्हणजे जड विश्वकारण प्रकृत्ती या त्याच्या दोन शक्ती आहेत. या त्याच्या दोन शक्ती नित्यच आहेत. भट्टभास्कारांच्या मते जीवात्मा स्वभावतः परब्रह्मरूप आहे, भेद औपाधिक आहे, परंतु या मतापप्रमाणे जीवात्मा स्वभावतःच परब्रह्माहून भिन्न आहे. मोक्षाच्या वेळी बंधनिवृत्ती झाल्यावर जीवात्मा भगवद्‌रूप बनतो म्हणजे भगवंताचे आनंद हे स्वरूप त्याला प्राप्त होते, जीवाचे रूपांतर होते. त्याला भगवद्‌भावापत्ती असे म्हणतात. चितला ‘पराप्रकृत्ती’ व अचितला ‘अपराप्रकृती’ अशा संज्ञा आहेत. चित म्हणजे जीवात्मे हा अणुपरिमाणाचा आहे. जीवात्मे हे नित्यमुक्त, भक्त, बद्ध आणि मुक्त असे चार प्रकार आहेत.

प्राकृत, अप्राकृत आणि काल हे तीन अचित् पदार्थ होत. तीन गुणांचा आश्रय असलेले द्रव्य म्हणजे प्राकृत होय. ते नित्य आणि जगद्‌रूपाने परिणाम पावते. देह, इंद्रिय, मन, बुद्धी यांच्या रूपाने परिणाम पावून जीवाच्या बंधनास कारण होते. सांख्यांच्या प्रमाणेच ते महत्, अहंकारादी रूपांनी परिणाम पावते. अप्राकृत अचित्‌ म्हणजे त्रिगुणात्मक प्रकृतीच्या बाहेर असलेले नित्य असे वैकुंठ किंवा विष्णुपद होय. या वैकुंठात भक्त आणि नित्यमुक्त यांना केवळ संकल्पमात्रेकरून विविध दिव्य भोगांची प्राप्ती होते. हे वैकुंठस्थान किंवा विष्णुपद निर्विकार असते. कालतत्त्व हे त्रिगुणात्मक प्रकृतीच्या विश्वाला नियंत्रित करते. परंतु परमेश्वराकडून काल हा नियंत्रित असतो. चित् आणिँ अचित् पदार्थवर्ग हा परब्रह्माहून भिन्न असला, तरी त्याची स्थिती आणि प्रकृती ब्रह्माधीन असल्यामुळे तो ब्रह्माहून अभिन्न म्हटला जातो. भट्टभास्करांच्या मताप्रमाणेच ब्रह्माच्या ठिकाणी भोग्य शक्ती, भोक्तृ शक्ती  आणि नियंतृ शक्ती निबार्कांनीही मानल्या आहेत. या सर्व शक्तींना आणि तिच्या कार्यांना स्थूल रूप देऊन परब्रह्म व्यक्त करते, प्रकाशीत करते, म्हणजेच परब्रह्म हे चित् आणि अचित् यांचे उत्पादन कारण होय. जीवात्म्यांना कर्मफलांच्या उपभोगाला योग्य असे ज्ञान देऊन उपभोग साधनांशी जीवात्म्यांचा परब्रह्म हे संयोग घडविते, म्हणजेच ते निमित्त कारण होय. निबार्कांनी अवयवी पक्ष स्वीकारलेला दिसतो. म्हणजे चित् आणि अचित् हे अंश असून अंशी परमात्मा होय अंश आणि अंशी यांचा भेदाभेदसंबंध असतो. चित् आणि अचित् पदार्थ स्वरूपतः परब्रह्माहून भिन्न असले, तरी ब्रह्माहून पृथक्‌पणे त्यांची स्थिती व प्रवृत्ती नसल्यामुळे, ते ब्रह्माहून अभिन्न आहेत. त्रिगुणात्मक प्रकृती म्हणजे माया होय. या मायेमुळे ब्रह्माशी असलेला अभेद संबंध कळत नाही हे अज्ञान होय. ज्ञान म्हणजे ब्रह्माशी असलेल्या अभेदाचे ज्ञान होय. भगवंताच्या अनुग्रहाने असा अभिन्न ब्रह्मसाक्षात्कार होतो. हा साक्षात्कार म्हणजेच चिरंतन ध्यान, ज्ञान, पराभक्ती किंवा ध्रुवस्मृती होय. त्यामुळे रागद्वेषादी दोषांची निवृत्ती होते आणि दुःखाचा कायम अंत होतो.

पहा : निंबार्क.

संदर्भ : 1. Dasgupta, S. N. A History of Indian Philosophy, Vol. III, Delhi, 1975.

            २. अनंतराम, वेदान्ततत्त्वबोध :, चौखंबा ग्रंथावली, अनुक्रम १२३, बनारस, १९०८.

            ३. निंबार्क, दशश्लोकीव्याख्या (पुरुषोत्तमाचार्यकृत वेदांन्तरत्नमंजूषासहित), चौखंबा ग्रंथावली, अनुक्रम ११३ व १२३, बनारस, १९०७, १९०८.

            ४. निंबार्क, श्रीब्रह्मसूत्रम् (निंबार्ककृत वेदान्तपारिजातसौरभ व श्रीनिवासाचार्यकृत वेदान्तकौस्तुभसहित), चौखंबा ग्रंथावली, अनुक्रम ९९ बनारस, १९३२.

            ५. भास्कर, ब्रह्मसूत्रभाष्यम्, ३ भाग, चौखंबा प्रत, बनारस, १९०३.

            ६. शंकराचार्य, बृहदारण्यकोपनिषद, आनंदगिरीकृत टीकासंवलितशांकरभाष्यसमेता.

            ७. शंकराचार्य, ब्रह्मसूत्रशांकरभाष्यम्, निर्णयसागर प्रत, मुंबई, १९४८.

            ८. श्रीपती, श्रीकरभाष्यम्, बंगलोर, १९३६.

            ९. सुरेश्वराचार्य, बृहदारण्यकोपनिषद्‌भाष्यवार्तिकम्, भाग २ व ३, आनंदाश्रम प्रत, पुणे, १८९३, १८९४.

जोशी, लक्ष्मणशास्त्री