हॅमिल्टन, सर विल्यम : (८ मार्च १७८८–६ मे १८५६). स्कॉटिश मीमांसक, तत्त्वज्ञ व प्रभावशाली शिक्षणतज्ञ, शिवाय तर्क-शास्त्रातील कामगिरीसाठीही त्यांची ख्याती आहे.

 

सर विल्यम हॅमिल्टनहॅमिल्टन यांनी १८११ मध्ये बॅलियल कॉलेजमधून (ऑक्सफर्ड) बी.ए. पदवी मिळविली व १८१३ मध्ये ते स्कॉटिश वकीलवर्गाचे (बारचे) सदस्य झाले. १८१६ मध्ये न्यायालयातील एका वादानंतर बॅरोनेटी (ज हा गि र दा री, नववेबॅरोनेट) त्यांना वारसाने मिळाली. १८२१ मध्ये त्यांची युनिव्हर्सिटी ऑफ एडिंबर्गमध्ये नागरी (मुलकी) इतिहासाचे प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. ते विविध विषयांचे निष्णात अध्यापक होते. तसेच त्यांना शारीर, शरीरक्रियाविज्ञान, साहित्य व धर्मशास्त्र या विषयांचे चांगले ज्ञान होते. शिवाय ते वारंवार ज्ञानपत्रिकांमधून लेखन करीत असत. फ्रेंच तत्त्वज्ञ व्हीक्तॉर कूझॅ यांच्याशी त्यांची दीर्घकाळापासून मैत्री होती. या मैत्रीतून हॅमिल्टन यांचा ‘द फिलॉसफीऑफ द अन्कंडिशन्ड’ (१८२९) हा एडिंबर्ग रिव्ह्यू मध्ये छापलेला लेख तयार झाला. हा लेख कूझॅ यांच्या Cours de philosophie या ग्रंथावरील भाष्य होते. हॅमिल्टन यांचे जर्मन तत्त्वज्ञानावरील नंतरचे लेख एडिंबर्ग रिव्ह्यू मध्ये छापून आले. त्यामुळे त्यांना तत्त्वज्ञ अशी ख्याती लाभली आणि १८३६ मध्ये त्यांची एडिंबरो विद्यापीठातील तर्कशास्त्र व तत्त्वमीमांसा याविषयीच्या अध्यासनावर निवड झाली.

 

हॅमिल्टन यांनी स्कॉटिश ‘फिलॉसफी ऑफ कॉमन सेन्स’ ( व्यवहारवादी वा सामान्य ज्ञानविषयक तत्त्वज्ञान) व इमॅन्युएल कांट यांची मतप्रणाली यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, टीकाकारांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले परंतु ब्रिटनमध्ये तत्त्वमीमांसेमध्ये रस निर्माण होण्यास त्यांचा हा प्रयत्न यशस्वी ठरला आणि ब्रिटिश लोकांना कांटयांच्या विचारांची ओळख झाली. ‘क्वांटिफिकेशन ऑफ द प्रिडिकेट’ (विधेयाचे प्रगणनकरण) या त्यांच्या सिद्धांतामुळे तर्कशास्त्राच्या इतिहासात त्यांचे स्थान निश्चित झाले आहे. या सिद्धांताचा संबंध तर्कशास्त्रातील’ ‘All A is B’ या परंपरागत विधानाशी आहे. या विधानात परिमाणात्मक( संख्यात्मक) रीतीने सुधारणा करून ‘All A is all B’ व ‘All A is some B’ ही दोन रूपे निर्माण होतात. त्यांनी विधानांच्या वर्गीकरणाचा पल्ला व्यापक केला.

 

हॅमिल्टन यांचे एडिंबर्ग रिव्ह्यू या नियतकालिकातील लेखांचे संकलन डिस्कशन्स ऑन फिलॉसफी, लिटरेचर अँड एज्युकेशन (१८५२) या ग्रंथात केले आहे. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे लेख इंग्लिश विद्या-पीठांतील बदलांना उद्युक्त करणारे होते. त्यांच्यामुळे १८५० चा रॉयल कमिशन (शाही आयोग) स्थापण्यास व त्यातील नंतरच्या सुधारणा होण्यास मदत झाली.

 

एडिंबर्ग येथे त्यांचे निधन झाले.

ठाकूर, अ. ना.