कणाद : (इ. स. पू. सु. सहावे शतक). वैशेषिक दर्शनाचा आद्यप्रवर्तक. ह्याच्या दर्शनाला ‘औलूक्यदर्शन’ असेही म्हणतात. ‘उलूकाचे  किंवा औलूक्याचे तत्त्वज्ञान’ असा त्याचा  अर्थ. उलूक हे कणादाचे  किंवा  त्याच्या  पित्याचे  नाव असावे. त्याचे गोत्र काश्यप. माहेश्वर योगसंप्रदायातील हा अतिप्राचीन आचार्य होय. याने योगजन्य अलौकिकप्रत्यक्ष योग्याला होत असते, असे आपल्या वैशेषिक सूत्रामध्ये म्हटले आहे. त्यावरून हा शैव योगसंप्रदायाचा आचार्य होय असे सिद्ध होते.

माहेश्वर योगसंप्रदाय हा शैव संप्रदायच होय. उलूक नामक जमात गंधार देशात होती, असे इतिहासतज्ञ म्हणतात. तीतील ही व्यक्ती असणे शक्य आहे. कणाद हे त्याचे नाव, त्याने शेतात पडलेले धान्याचे कण वेचून त्यांवर उपजीविका करण्याचे व्रत आचरले, म्हणून त्याला प्राप्त झाले असे न्यायकंदली  ह्या वैशेषिक दर्शनाच्या प्रशस्तपादकृत भाष्यावरील श्रीधरभट्टाच्या टीकेत म्हटले आहे. मनुस्मृतीत या प्रकारच्या व्रतास ‘उंछवृत्ती’ म्हटले आहे. न्यायकंदलीत यास ‘कापोतीवृत्ती’ अशी संज्ञा दिली आहे. कबुतराप्रमाणे दाणे वेचून उदरनिर्वाह करणे, असा त्याचा अर्थ आहे. त्याचा वैशेषिक सूत्र हा वैशेषिक दर्शनावरील सर्वांत प्राचीन ग्रंथ. हा कणावादाचा, म्हणजे अणुवादाचा पहिला भारतीय तत्त्वज्ञ होय. पृथ्वी, जल, तेज व वायू यांच्या अविभाज्य अशा सूक्ष्मांशांच्या म्हणजे अणूंच्या समुदायाने दृश्य विश्व बनले आहे, असा त्याचा मूळ सिद्धांत होय. प्रत्येक अविभाज्य अणू दूसर्‍या तत्समान अमूहुन वेगळा होय, हे सिद्ध करणारा विलक्षण धर्म म्हणजे ‘विशेष’ प्रत्येक अणुमध्ये आहे, असे त्याने तर्कानेे सिद्ध केले आहे. कदाचित इ. स. पू. पाचव्या शतकात झालेल्या डिमॉक्रिटस ह्या परमाणुवाद्याच्याही पूर्वी हा भारतात झाला असावा; कारण हा बुद्धपूर्व तत्त्वज्ञ असण्याचा बराच संभव आहे. कनिष्काच्या दरबारातील इ. स. पहिल्या शतकात झालेल्या वसुमित्राच्या अभिधर्ममहाविभाषा सूत्रात वैशेषिक दर्शनाचा उल्लेख आहे आणि त्याच शतकातील अश्वघोषाच्या सूत्रालंकार  या ग्रंथात म्हटले आहे, की बुद्धाच्या उपदेशामुळे बुद्धपूर्व वैशेषिक शास्त्रातील वैचारिक गोंधळातून तत्त्वविचार मुक्त झाला; कारण बुद्ध हा सूर्यच; उलूकाचे (घुबडाचे) महत्त्व रात्री असते; सूर्योदयानंतर नसते. त्याच्या वैशेषिक सूत्रात बौद्ध दर्शनाचा कोठेही उल्लेख नाही. बाकीच्या तत्त्वदर्शनांमध्ये (उदा., न्यायदर्शन, वेदान्तदर्शन) बौद्ध दर्शनाचा पूर्वपक्ष असतो तसा ह्या सूत्रांत दिसत नाही. डॉ. भांडारकर इत्यादिकांनी वायुपुराण  हे सर्वांत प्राचीन पुराण म्हणून मानले आहे. त्यातील (पूर्व खंड, अध्याय २३) महेश्वर-ब्रह्मसंवादात याचे चरित्र सांगितले आहे. वायुपुराण  हे एक शैव पुराणच आहे. त्यात म्हटले आहे, की सत्ताविसाव्या चतुर्युग कालखंडात प्रभासक्षेत्री शिवावतार असलेल्या सोमशर्मा ह्या द्विजोत्तमाचा पुत्र व शिष्य कणाद हा होईल. तो माहेश्वर योगात प्रवीण होईल. मत्स्यपुराणात कणादाची काश्यप गोत्रामध्ये उलूक नामक पित्यापासून उत्पत्ती सांगितली आहे. विष्णुभागवत  आणि देवीभागवत  ह्या पुराणांमध्येेही कणादाचा निर्देश आढळतो. वैशेषिक दर्शनावरील प्रशस्तपादकृत भाष्यात असे म्हटले आहे, की योगाचरणाच्या योगाने प्राप्त झालेल्या बौद्धिक वैभवाने महेश्वराला संतुष्ट करून कणादाने वैशेषिक शास्त्र तयार केले. न्यायकंदलीवरील टीकेत कुठल्यातरी पुराणाच्या आधारे असे म्हटले आहे, की स्वत: ईश्वराने उलूकाचे म्हणजे घुबडाचे रूप घेऊन कणादमुनीला षट्पदार्थांचे हे तत्त्वज्ञान उपदेशिले.

बौद्ध दर्शनावर  कणादाच्या अणुवादाचा प्रभाव दिसतो; कारण बाह्यार्थवादी हीनयानी बौद्ध दर्शनात सर्व दृश्य पदार्थांचे सत्यस्वरूप अणुमय आहे, असा सिद्धांत प्रतिपादिला आहे. बौद्धांनी हे अणू क्षणिक असून स्थिर दृश्य पदार्थ हे क्षणिक अणूंचा प्रवाह होत, असा कणादाच्या अणुवादापेक्षा काहीसा वेगळा विचार मांडला आहे. कणादाच्या वैशेषिक सूत्रात ईश्वराच्या अस्तित्वाचा विचार सांगितलेला नाही आणि प्रत्यक्ष व अनुमान ही दोनच प्रमाणे मानलेली आहेत. बौद्ध दर्शन ईश्वराचे अस्तित्व मानीत नाही व ही दोनच प्रमाणे म्हणजे ज्ञानाची साधने मानते. वैशेषिक दर्शनाच्या प्रशस्तपादकृत भाष्यात ईश्वराची संकल्पना प्रथमच सांगितली आहे.

पहा : वैशेषिक दर्शन.

संदर्भ :

1. Thomas, F. W., Ed. Vaiseshika Philosophy, Varanasi, 1962.

२. द्विवेदी, विंध्येश्वरीप्रसाद, संपा. प्रशस्तपादभाष्यम्, वाराणसी, १८९५.

जोशी, लक्ष्मणशास्त्री