जॉन लॉक

लॉक, जॉन: (२९ ऑगस्ट १६३२-२८ ऑक्टोबर १७०४). थोर ब्रिटिश तत्त्वज्ञ आणि ज्ञानमीमांसेतील ⇨अनुभववाद ह्या विचारप्रणालीचा प्रवर्तक. समरशेटशरमधील रिंग्टन येथे त्याचा जन्म झाला. १६४२-४६ ह्या कालखंडात इंग्लंडमध्ये झालेल्या युद्धात त्याचे वडील पार्लमेंटच्या बाजूने सामील झाले होते. त्यांच्या प्युरिटन विचारांचा प्रभाव लॉकवर पडला. वेस्टमिन्स्टर स्कूलमध्ये आणि ऑक्सफर्ड विद्यापीठात त्याचे शिक्षण झाले. वेस्टमिन्स्टर स्कूलमध्ये ग्रीक-लॅटिन साहित्याचा, तसेच हिब्रू आणि अरबी ह्या भाषांचा त्याने अभ्यास केला. १६५६ मध्ये तो बी.ए. झाला. पु ढे रॉबर्ट बॉइल ह्या वैज्ञानिकाशी लॉकचा परिचय झाला. लॉकच्या जीवनावर ज्यांचा गाढ परिणाम झाला, अशांपैकी बॉइल हा एक होता. नव्या विज्ञानांचा परिचय बॉइलमुळे त्याला झाला. बी.ए. झा ल्यानंतर लॉकने वैद्यकाचे शिक्षण घेतले. १६६५ नंतर काही काळ तो राजनैतिक सेवेत होता. १६६७ मध्ये लॉर्ड ॲश ली, अर्ल ऑफ शाफ्ट्स बरी ह्याने त्याचा व्यक्तिगत वैद्य म्हणून लॉकची नेमणूक केली. १६६८ मध्ये रॉयल सोसायटीचे सदस्यत्व त्याला मिळाले. तो १६७५ मध्ये फ्रान्सला गेला. तेथे अनेक विद्वानांशी आणि वैज्ञानि कांशी त्याची मैत्री झाली. त्यांच्या सहवासाचा त्याच्या वैचारिकतेवर प्रभाव पडला. फ्रेंच तत्त्वज्ञ ⇨ रने देकार्त (१५९६-१६५०) ह्याच्या तत्त्वज्ञानाचा त्याने सखोल अभ्यास केला.

अर्ल ऑफ शाफ्ट्स्‍बरीची केवळ व्यक्तिगत वैद्य म्हणूनच नव्हे, तर सचिव म्हणूनही लॉकने केली. पुढे प्रतिकूल राजकिय परीस्थितीमुळे अर्ल ऑफ शाफ्ट्स्‍बरीला इंग्‍लंडमधून हॉलंडला पळून जावे लागले आणि तेथेच तो मरण पावला (१६८३). अर्ल ऑफ शाफ्ट्स्‍बरीबरोबर असलेल्या निकटच्या नात्यामुळे लॉकचे इंग्‍लंडमधील वास्तव्य अडचणीत आले आणि तो १६८३ मध्ये हॉलंडला आला. १६८८ साली इंग्‍लंडमध्ये रक्तशून्य क्रांती होउन विल्यम ऑफ ऑरेंज राजा झाल्यानंतर -१६८९ मध्ये-लॉक इंग्‍लंडला परतला. त्यानंतरच्या काळात विल्यम ऑफ ऑरेंजच्या सरकारची त्याने सेवा केली. एसे कन्सर्निंग ह्यूमन अंडरस्टँडिंग हा त्याचा अतिशय महत्त्वाचा ग्रंथ १६८९ मध्ये प्रसिद्ध झाला. टू ट्रीटिझिस ऑफ गव्हर्नमेन्ट (१६९०), सम थॉट्स कन्सर्निंग एज्युकेशन (१६९३), रीझनेबलनेस ऑफ ख्रिश्चॅनिटी (१६९५) हे त्याचे अन्य उल्लेखनीय ग्रंथ त्यानंतर प्रसिद्ध झाले. १६९१ पासून तो ओट्स, एसेक्स येथे स्थायिक झाला. तेथेच त्याचे निधन झाले.

लॉकचे बरेचसे लेखन आधुनिक तत्त्वज्ञानाचा जनक म्हणून प्रसिद्ध असलेल्या रने देकार्त ह्याच्या तत्त्वज्ञानाचे खंडन करण्याकरिता केले गेले आहे. देकार्त हा ⇨ विवेकवादी होता. संपूर्ण प्रमाण असे ज्ञान केवळ बुद्धिपासून प्राप्त होऊ शकते, अशी देकार्तची भूमिका होती. भूमितीत आपण स्वयंसिद्ध, स्वयंप्रमाण अशा मूलविधानांपासून निगमनाने, पायरीपायरीने, अन्य विधाने प्राप्त करून घेतो. त्याचप्रमाणे कोणतेही प्रमाण ज्ञान प्राप्त करून घ्यावयाचे असल्यास ते स्वयंसिद्ध विधानांपासून निगमनाने प्राप्त करून घेतले पाहिजे. विधानांचे प्रामाण्य इंद्रियानुभवात त्यांची प्रतीती येण्यास नसते, तर स्वयंसिद्ध विधानांपासून निगमनाने निष्पन्न होण्यात ते सामावलेले असते, अशी देकार्तची धारणा होती. ह्याउलट इंद्रियानुभव हाच ज्ञानाचा एकमेव स्त्रोत असून विधानात जे सांगितलेले असते, त्याचा खरेखोटेपणा, प्रतीती अनुभवद्वारा घेऊनच ठरवता येते, असे लॉकचे म्हणणे होते.

एसे कन्सर्निंग ह्यूमन अंडरस्टँडिंग या आपल्या ग्रंथाचा जो उद्देश लॉकने सांगितला, त्याचा आशय असा: ‘मानवी ज्ञानाचा उगम, निश्चितता आणि विस्तार, तसेच विश्वास, समजूत आणि संमती यांचे आधार आणि मात्रा यांचा शोध घेणे’.

देकार्तने कल्पनांचे तीन वर्गांत विभाजन केले होते : (१) सहजात (इनेट) कल्पना, (२) आगंतुक (ॲड्व्हेन्टिशस) कल्पना आणि (३) कृत्रिम (फॅक्टिशस) कल्पना. काही ज्ञाने आणि कल्पना मानवांच्या ठिकाणी सहजात असतात, असे देकार्तने म्हटले होते. ह्या सहजात कल्पना होत. दुसऱ्या प्रकारच्या कल्पना आपल्याला इंद्रियांद्वारे प्राप्त होतात-उदा., शब्द, स्पर्श इत्यादींच्या कल्पना-तर तिसऱ्या प्रकारच्या कल्पना आपण कल्पनांची विविध मिश्रणे करून रचतो, असे तो म्हणतो परंतु काही कल्पना इंद्रियांनी प्राप्त झालेल्या नसतात, किंवा अन्य कल्पनांच्या मिश्रणाने बनलेल्याही नसतात. उदा., ईश्वराची कल्पना किंवा कारणाची कल्पना. कोणत्याही कल्पना सहजात नाहीत, असे लॉकचे म्हणणे होते. त्याच्या मते, मानवी मन जन्मत: एखाद्या कोऱ्या पाटीसारखे असते. त्यावर अनुभव आपले लेख लिहितो. मानवाचे समग्र ज्ञान अनुभवातून उद्‍भवते, हे सिद्ध करण्याकरिता दोन गोष्टी करणे अवश्य होते : (१) सहजात कल्पनांचे खंडन आणि (२) आपल्या समग्र ज्ञानाची उत्पत्ती अनुभवातूनच होते, हे दाखविणे. ही दोन कामे लॉकने एसे कन्सर्निंग ह्यूमन अंडरस्टँडिंगच्या अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या विभागात केली आहेत. लॉक म्हणतो, की सहजात ज्ञानाची उदाहरणे म्हणून तत्त्वज्ञ तर्कशास्त्राचे नियम आणि नीतीचे नियम यांकडे बोट दाखवितात व त्यांच्या सहजातत्त्वाच्या पुष्ट्यर्थ ते या नियमांना असणाऱ्या सार्वत्रिक संमतीचा दाखला देतात. परंतु लॉक म्हणतो, की ही तथाकथित सार्वत्रिक संमतीचा म्हणजे केवळ भ्रम आहे. अर्भके आणि मूढ लोक यांना तर्कशास्त्राचे नियम ज्ञात नसतात आणि नीतीचे नियम देशकालपरिस्थितीनुसार किती विविध असतात, हे विस्ताराने सांगण्याची गरज नाही.

सहजात कल्पनांच्या सिद्धांताचे एक सौम्य रूपही आहे. सहजात ज्ञान जन्मतःच मनात असते, पण बुद्धीची पुरेशी वाढ झाल्यावरच त्याची आपल्याला स्पष्ट जाणीव होते, असे काही म्हणतात. यावर लॉकचे उत्तर असे आहे, की या मताचे दोन अर्थ संभवतात : (१) ज्यांच्या साह्याने काही विशिष्ट सत्यांचे आपल्याला आकलन होऊ शकते, अशा शक्ती मानवी मनात जन्मतःच असतात, पण या अर्थी कोणतेही ज्ञान सहजात होईल असे लॉक म्हणतो. (२) काही ज्ञाने मनात बीजरूपाने (अव्यक्त स्वरूपात) असतात आणि ती कालांतराने व्यक्त होतात. यावर लॉकचे उत्तर असे आहे, की ज्याची आपल्याला जाणीव नाही असे ज्ञान आपल्याला असू शकते, याचा कसलाही पुरावा असू शकत नाही. जर एखादे ज्ञान आपल्याला नकळत आपल्या मनात असू शकत असेल, तर ज्ञानात सहजात आणि आगंतुक असा भेद करणे अशक्य आहे. म्हणजे एकतर सर्व ज्ञान सहजात आहे किंवा सर्व ज्ञान आगंतुक आहे असे म्हणावे लागेल.

एसे कन्सर्निंग ह्यूमन अंडरस्टँडिंगच्या दुसऱ्या विभागात लॉक आपले सर्व ज्ञान आपल्याला अनुभवातूनच मिळते हे दाखविण्याकडे वळतो. त्याच्या मते अनुभव दोन प्रकारचा असतो : (१) वेदन (सेन्सेशन) व (२) अंतरीक्षण (रिफ्लेक्शन). वेदनाने आपल्याला बाह्य सृष्टीचे ज्ञान होते, तर अंकरीक्षणाने आपल्याला मनाच्या अंतःसृष्टीचे ज्ञान मिळते. आपल्या सर्व ज्ञानाचे मूलद्रव्य आपल्याला या दोन द्वारांनी मिळते.

या ठिकाणी लॉकच्या ज्ञानमीमांसेतील एका महत्त्वाच्या मुद्याचा उल्लेख केला पाहिजे. आपले समग्र ज्ञान कल्पना आणि त्यांचे परस्परांशी संबंध यांनी बनलेले असते, असे तो म्हणतो. आपल्या ज्ञानाचे साक्षात (इमिजिएट) विषय कल्पना (आयडिआज) होत. हा मुद्दा काहीसा परिभाषेचा आणि काहीसा सैद्धांतिकही आहे. परिभाषेचा अशा अर्थाने, की लॉक कल्पना–आयडिआ–हा शब्द अतिशय व्यापक अर्थाने वापरतो. आपल्या वर्तमान परिभाषेत आपण वेदन आणि कल्पना यांत भेद करतो. आपण जेव्हा प्रत्यक्ष एखादी वस्तू पाहात असतो, तेव्हा आपल्याला तिचे वेदन होते परंतु डोळे मिटल्यावर तिचे चित्र आपल्या मन:चक्षुंपुढे आणतो तेव्हा आपण तिला प्रतिमा-इमेज-किंवा कल्पना म्हणतो. परंतु लॉकच्या परिभाषेत या सर्व कल्पनाच आहेत. त्यांपैकी काही वेदन या ज्ञानप्रकाराने प्राप्त होणाऱ्या आहेत, तर काही प्रतिमान (इमेजिंग) किंवा कल्पन (इमॅजिनेशन) या व्यापारांनी प्राप्त होणाऱ्या आहेत. त्यांना तो अनुक्रमे वेदनाच्या कल्पना (आयडिआज ऑफ सेन्सेशन) आणि प्रतिमानाच्या कल्पना (आयडिआज ऑफ इमॅजिनेशन) अशी नावे देतो. लॉक म्हणतो, आपण केव्हाही विचार करीत असताना आपल्या मनासमोर जो विषय असतो, तो म्हणजे कल्पना.

परंतु या पारिभाषिक नवव्यहाराबरोबर एक ज्ञानमीमांसीय सिद्धांतही या ठिकाणी अनुस्यूत आहे. मानवी ज्ञानव्यापाराचे साक्षात विषय केवळ कल्पनाच असतात हा तो सिद्धांत. आपण सामान्यपणे असे समजतो, की आपल्या इंद्रियांनी आपल्याला खुद्द भौतिक वस्तूंचे ज्ञान होते पण लॉकच्या मते हा भ्रम आहे. आपल्याला टेबल, खुर्ची इ. भौतिक वस्तूंचे साक्षात दर्शन कधीच घडत नाही. आपल्याला साक्षात्कार होतो कल्पनांचा. डोळ्यांनी मला रंगाच्या कल्पना उपलब्ध होतात, कानानी आवाजाच्या कल्पना, स्पर्शेंद्रियाने स्पर्शाच्या कल्पना आणि असेच इतर इंद्रियांच्याही बाबतीत. खुद्द भौतिक वस्तू आणि त्यांचे अंगभूत धर्म यांचा साक्षात अनुभव आपल्याला कदापि येऊ शकत नाही. त्यांचे आपल्याला जे ज्ञान होते ते अप्रत्यक्षपणे, कल्पनांच्या मध्यस्थीने. कल्पना जशा अस्तित्वात असणाऱ्या मानसवस्तू आहेत, तशाच त्या अन्य पदार्थांच्या प्रतिनिधीही आहेत. प्रत्येक कल्पना कशाची तरी असते. ती ज्या गोष्टीची असते तिला त्या कल्पनेचा आशय किंवा विषय म्हणतात. विषयाचे अस्तित्व कल्पनेत आशयरूपाने असते. परंतु विषयाला मनोबाह्य अस्तित्वही असते, असे आपण मानतो. मनोबाह्य विषयाचे साक्षात ज्ञान आपल्याला कदापि होऊ शकत नाही. त्याचे आपल्याला होणारे ज्ञान त्याचे प्रतिनिधान करणाऱ्या कल्पनेच्या साहाय्याने होते. ही लॉकची जाणिवेची वा संवेदनाची (पर्‍सेप्शन) प्रतिनिधिवादी उपपत्ती (थिअरी ऑफ रेप्रिझेंटिव्ह पर्‍सेप्शन) होय.

कल्पना-मग त्या संवेदनाच्या असोत, की अंतरीक्षणाच्या असोत–दोन प्रकारच्या असतात. (१) केवल (सिंपल) आणि (२) मिश्र (काँप्‍लेक्स). अनुभवातून उपलब्ध होणाऱ्या सर्व मूळ कल्पना केवल, म्हणजे शुद्ध किंवा निरवयव असतात. त्यांच्या विविध मिश्रणाने सर्व प्रकारच्या मिश्र कल्पना तयार होतात. आपली कोणतीही कल्पना-मग ती कितीही उदात्त, गहन, सूक्ष्म किंवा विशाल असो-शेवटी अनुभवातून प्राप्त झालेल्या केवल कल्पनांच्या विविध मिश्रणातूनच उद्‍भवलेली असते. अनुभवातून घेतलेला नाही, असा एकही घटक तिच्यात नसतो. हे प्रमेय लॉक भिन्न भिन्न विषयांच्या आपल्या कल्पनांचे विश्लेषण करून विशद करतो.

या ठिकाणी हे लक्षात ठेवणे जरूर आहे, की केवल कल्पनांच्या अनुभवात आपल्या मनाची भूमिका पूर्णपणे अक्रिय असते हे जरी खरे असले , तरी त्याचा अर्थ असा नव्हे, की आपले मन हा एक क्रियाशून्य पदार्थ आहे. त्याच्या ठिकाणी कर्तृत्वही आहे. संवेदनात आणि अंतरीक्षणात प्राप्त झालेल्या कल्पनांच्या प्रतिकृती किंवा प्रतिमा निर्मिण्याचे सामर्थ्य आपल्या मनात आहे. याशिवाय भिन्न भिन्न केवल कल्पनांची विविध मिश्रणे करण्याचे सामर्थ्यही त्याच्या ठिकाणी आहे. या मिश्र कल्पनांचे तीन प्रकार लॉक मानतो : (१) द्रव्याच्या (सबस्टन्स) कल्पना, (२) विधांच्या (मोड्स) कल्पना आणि (३) संबंधाच्या कल्पना. द्रव्य म्हणजे स्वतंत्रपणे असणारा पदार्थ. उदा., दगड, पाणी, संत्रे इ. भौतिक पदार्थ. विधा म्हणजे वास्तवाची अशी अंगे, की ज्यांना द्रव्याप्रमाणे स्वतंत्र अस्तित्व नसते. उदा., अवकाश, काळ, त्रिकोण, कृतज्ञता इत्यादी. संबंधाच्या कल्पना दोन कल्पनांच्या तुलनेतून उद्‍भवतात. उदा., नवरा, शुभ्रतर.

भौतिक वस्तूंचे आपल्याला होणारे ज्ञान त्यांच्या प्रतिनिधी असणाऱ्या कल्पनांच्या मध्यस्थाने होते साक्षात होत नाही, या लॉकच्या मताचा उल्लेख वर आलाच आहे. भौतिक वस्तूंविषयी आपण काय जाणू शकतो, या प्रश्नाचे उत्तर देताना लॉक प्रथम कल्पना आणि गुण यांतील भेद स्पष्ट करतो. तो म्हणतो : मानवाचे संवेदन, विचार किंवा बुद्धी यांचे साक्षात विषय म्हणजे केवल कल्पना होत आणि ह्या कल्पना आपल्या मनात निर्माण करण्याची जी शक्ती वस्तूत असते तिला मी त्या वस्तूचा गुण म्हणतो. उदा., हिमकंदुकात आपल्या मनात शुभ्रत्व, शैत्य आणि गोलाकार यांच्या कल्पना निर्माण करण्याची सामर्थ्य असतात. हिमकंदुकात असणाऱ्या या शक्तींना मी त्याचे गुण म्हणतो आणि त्यामुळे माझ्या मनात उद्‍भवणाऱ्या वेदनांना मी कल्पना म्हणतो.

भौतिक वस्तूंचे गुण तीन प्रकारचे आहेत, असे लॉक म्हणतो : (१) प्राथमिक गुण. हे गुण म्हणजे घनत्व, आकार, स्थिती, गती आणि संख्या. या गुणांच्या आपल्या कल्पना आणि ते वस्तुगत गुण यांत साम्य असते. (२) दुय्यम गुण. हे गुण म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध यांच्या कल्पना आपल्या मनात निर्माण करण्याच्या भौतिक वस्तूमध्ये असणाऱ्या काही शक्ती होत. शब्दस्पर्शादी गुण केवळ मनोगत आहेत. त्यांच्यासारखे काहीही भौतिक वस्तूंत नसते. म्हणजे शब्द स्पर्शादिकांच्या कल्पना आणि त्या निर्माण करू शकणारे वस्तुगत गुण वा शक्ती यांत कसलेही साम्य नसते. (३) ह्यांच्या उल्लेख लॉक गुण असा न करता नुसताच शक्ती असा करतो. या शक्ती म्हणजे एका भौतिक वस्तूत असणारी दुसऱ्या भौतिक वस्तूचा आकार, विस्तार, अवयवरचना इत्यादींत बदल घडवून आणण्याची सामर्थ्ये. उदा., अग्‍नीमध्ये असलेले मेण वितळविण्याचे सामर्थ्य.

आपण सामान्यपणे एखादी भौतिक वस्तू आणि तिचे गुण यांत भेद करतो. उदा., संत्रे नारिंगी रंगाचे, गोल, आंबटगोड चवीचे असते. आपण म्हणतो, की रंग, आकार, चव इ. गुण संत्र्यात असतात. या भाषाप्रयोगाचा स्वाभाविक अभिप्राय असा दिसतो, की संत्रे म्हणजे त्यात असणाऱ्या गुणांहून अतिरिक्त असा काही तरी पदार्थ आहे. आपण असे मानले नाही, तर संत्रे म्हणजे गुणांचा समुच्चय असे आपल्याला म्हणावे लागेल. पण हे म्हणणे चमत्कारिक दिसते. ज्याला आपण संत्रे म्हणतो त्यात अनेक गुणांखेरीज असा एक घटक असतो, की जो स्वतः गुण नाही पण गुणांचा आधार आहे. गुण स्वतंत्रपणे कोठेही असू शकत नाहीत. उदा., शुभ्रत्व दुधात असते, खडूत असते, साखरेत असते. गुणांच्या या आधाराला लॉक ‘द्रव्य’ हे नाव देतो. पण ही द्रव्य कल्पना कशी उद्‍भवते या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर लॉक देऊ शकत नाही. तो म्हणतो, की ते काही तरी आहे, पण काय ते मला माहीत नाही. द्रव्याची कल्पना ही सांबंधिक (रिलेशनल) कल्पना आहे, असे लॉक म्हणतो. हा संबंध गुण आणि त्यांचा आधार या दोघांतील आहे.त्या संबंधाचे एक पद (गुण) अनुभवगोचर आहे, पण दुसरे (आश्रय) अनुभवगोचर नाही. मग या संबंधाची कल्पना आपल्याला कशी येऊ शकेल? लॉकप्रमाणेच अनुभववादी असलेल्या बर्कलीने नेमके याच अडचणीवर बोट ठेवले आणि भौतिक द्रव्याची कल्पना, हे शब्द निरर्थक आहेत, त्यांनी कोठलीही कल्पना व्यक्त होत नाही असा निष्कर्ष काढला.

लॉकला द्रव्यकल्पनेचे आनुभविक विश्लेषण करण्यात जशी अडचण आली, तशीच अडचण कारणकल्पनेच्या विश्लेषणातही आली. कारण कल्पना किंवा लॉक म्हणतो त्याप्रमाणे शक्तीची कल्पना अनुभवोद्‍भुत आहे, हे दाखविताना त्याला पुष्कळ प्रयास पडले. ‘कल्पना निर्माण करण्याची शक्ती’ ही कल्पना एका संबंधाची आहे परंतु आपल्या कोणत्या अनुभवातून आपल्याला ही शक्तीची कल्पना मिळते, हे त्याला सांगता येईना. लॉकने केलेल्या कारणकल्पनेच्या विवरणाचे पुढे अन्य एक अनुभववादी ह्यूम ह्याने केलेले खंडन प्रसिद्ध आहे.

एसे कन्सर्निंग ह्यूमन अंडरस्टँडिंगच्या तिसऱ्या विभागात लॉकने भाषा आणि विचार यांच्या संबंधाविषयी विवेचन केले आहे. ही गोष्ट त्या वेळी नवीन होती. भाषेच्या स्वरूपाचा विचार तत्त्वज्ञानाला आवश्यक आहे, याची फारशी जाणीव लॉकच्या पूर्वी-आणि नंतरही जवळजवळ चालू शतकापर्यंत-दिसत नाही. तत्त्वज्ञान आणि भाषा-मीमांसा यांचा घनिष्ठ संबंध आज सर्वसामान्य झाला आहे. फार काय, तत्त्वज्ञान म्हणजे भाषिक विश्लेषण, असे आजचे एक सुप्रतिष्ठित मत आहे. या विचारसरणीचा पहिला पदन्यास आपल्याला लॉकच्या तत्त्वज्ञानात दिसून येतो.

या विभागात लॉकने तीन प्रश्नांचा प्रामुख्याने विचार केला आहे : (१) भाषा आणि विचार यांतील संबंध. (२) सामान्य संज्ञांचा म्हणजे सामान्य नामे इत्यादींचा अर्थ आणि (३) व्यवस्थेचे स्वरूप. (१) प्रत्येक मनुष्याच्या ज्ञानाचे साक्षात विषय म्हणजे त्याच्या कल्पना असतात, हे लॉकचे मत आपण पाहिलेच आहे. परंतु कल्पना ही प्रत्येकाची खाजगीतील गोष्ट आहे. एकाची कल्पना दुसरा कोणी अनुभवू शकत नाही. मग परस्परांशी विचारविनिमय कसा होऊ शकेल? लॉक म्हणतो, याकरिता आपल्याला कल्पनांची वाचक अशी इंद्रियगोचर चिन्हे लागतात. भाषा म्हणजे अशा चिन्हांची व्यवस्था. (२) लॉकने केलेले सामान्य कल्पनांचे (ॲब्स्ट्रॅक्ट आयडीआज) विवेचन ऐतिहासिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाचे आहे. तो म्हणतो, की सामान्य नामे आणि इतर सामान्य शब्द (विशेषणे, क्रियापदे इ.) यांच्यावाचून विचारविनिमय शक्य नाही. परंतु निसर्गातील प्रत्येक वस्तू विशिष्ट आहे. मग सामान्य शब्द आलेच कोठून? लॉक म्हणतो, की सामान्य कल्पनांचे वाचक बनविले गेल्याने स्वतः विशेष असलेले शब्द सामान्यत्व पटवतात. परंतु सामान्य कल्पना कशा शक्य होतात? लॉक म्हणतो, की एकाच जातीच्या भिन्न कल्पनांमधील भेद वजा केल्याने जे उरते ती सामान्य कल्पना. समान वेगळे करण्याच्या या प्रक्रियेला लॉक ॲब्स्ट्रॅक्शन’ (अवकर्षण) असे नाव देतो आणि तयार झालेल्या कल्पनेला ‘ॲब्स्ट्रॅक्ट आयडीआ’ (अवकृष्ट कल्पना) म्हणतो. (३) लॉकच्या भाषामीमांसेतील तिसरे महत्त्वाचे विवेचन म्हणजे व्याख्येचे. ॲरिस्टॉटलच्या काळापासून चालत आलेले व्याख्येसंबंधीचे मत असे होते, की प्रत्येक वस्तुप्रकारचे एक तत्त्व किंवा सार (एसेन्स) असते हे वस्तुसार वा वस्तुतत्व म्हणजे असा गुणसमुच्चय, की ज्यांपैकी एक जरी गुण एखाद्या वस्तूत नसेल, तर ती वस्तू त्या प्रकारची राहणार नाही. वस्तुप्रकारचे हे तत्व सांगणे म्हणजेच त्याची व्याख्या देणे होय. याविरुद्ध लॉक म्हणतो, की वस्तूंचे खरे तत्त्व जाणणे ही गोष्ट मानवी आटोक्याबाहेरची आहे. वस्तूचे खरे तत्व तिच्या अंतर्गत परमाणूंच्या रचनेने बनलेले असते आणि ते आपण जाणू शकत नाही. परंतु आपण दुसऱ्या एका प्रकारचे तत्त्व मानतो. एखाद्या वस्तुप्रकाराला नाव देताना त्यात अमुक गुण असले पाहिजेत, असा आग्रह आपण धरतो. हे गुण म्हणजे त्या वस्तूचे नामिक सार (नॉमिनल एसेन्स) होय आणि आपण फक्त हे नामिक सार सांगणाऱ्या नामिक व्याख्या देऊ शकतो.

एसे कन्सर्निंग ह्यूमन अंडरस्टँडिंगच्या चौथ्या आणि शेवटच्या विभागात लॉक ज्ञानाची निश्चितता आणि समजूत (बिलिफ), मत आणि संमती (असेंट) यांची चर्चा करतो. संबंध ग्रंथात हा विभाग अतिशय असमाधानकारक उतरला आहे. ज्ञानाची व्याख्या तो पुढीलप्रमाणे करतो : ज्ञान म्हणजे आपल्या कल्पनांमधील संवाद आणि विसंवाद यांचे, किंवा अनुबंध प्रतिबंध (विरोध) यांचे आकलन. काही कल्पनांमध्ये तार्किकीय अनुबंध असतात, तर काही परस्परविरुद्ध असतात. हे ओळखणे म्हणजेच ज्ञान.

कल्पनांतील संवादाचे लॉकने चार प्रकार सांगितले आहेत : (१) तदेवता (आयडेंटिटी), (२) संबंध, (३) सहभाव किंवा अवश्य अनुबंध (को-इग्झिस्टन्स ऑर नेसेसरी कनेक्शन) आणि (४) वास्तव अस्तित्व. या विविध प्रकारांची त्याने विशेष चर्चा केली नाही आणि त्यांची दिलेली उदाहरणेही उद्‍बोधक नाहीत. पहिल्या प्रकारात फक्त उक्तवचने येतात. उदा., निळे म्हणजे निळे निळे म्हणजे पिवळे नव्हे. दुसऱ्या प्रकारचे त्याने दिलेले उदाहरण हे आहे : ‘दोन समांतर रेषांमधील समान पायावरील त्रिकोण समान असतात’. तिसऱ्या प्रकारात नियमाने एकत्र अनुभवाला येणाऱ्या कल्पनांतून उद्‍भवणाऱ्या ज्ञानाचा उल्लेख आहे. उदा., ‘सोने म्हणजे एक विशिष्ट स्पर्श, रूप’ वगैरे. चौथ्या प्रकारचे उदाहरण असे : ‘ईश्वर आहे’. पण या सर्व प्रकारात त्याला नेमके काय म्हणायचे आहे ते कळत नाही.

परंतु हा शेवटचा विभाग जरी असमाधानकारक उतरला असला, तरी सबंध एसे … ची कामगिरी युगप्रवर्तक अशीच आहे. या पुस्तकाचा प्रभाव या ना त्या स्वरूपात आजही दृग्गोचर होतो.

राजकीय तत्त्वज्ञान : लॉकची प्रमुख तत्त्वज्ञानात्मक कामगिरी म्हणजे एसे कन्सर्निंग ह्यूमन अंडरस्टँडिंग. पण याखेरीज राजकीय तत्त्वज्ञान, धार्मिक सहिष्णुता आणि शिक्षण या विषयांवरही त्याने लेखन केले आहे आणि त्याचा उत्तरकालीन विचारावर बराच प्रभाव पडला आहे.

लॉकचे राजकीय विचार त्याच्या टू ट्रीटिझिस ऑफ गव्हर्नमेंट या ग्रंथात व्यक्त झाले आहेत. हे पुस्तक ज्या वर्षी एसे … प्रसिद्ध झाला त्याच वर्षी, म्हणजे १६९० मध्ये, परंतु लेखकाच्या नावावाचून प्रसिद्ध झाले. त्याचा उद्देश १६८८ मध्ये इंग्‍लंडात झालेल्या क्रांतीचे समर्थन करणे हा होता, असे प्रस्तावनेत म्हटले आहे. ही क्रांती म्हणजे स्ट्यूअर्टवंशीय राजा दुसरा जेम्स याचा राज्यत्याग व फ्रान्सला पलायन आणि हॉलंडमधून विल्यम ऑफ ऑरेंज याचा इंग्‍लंडचा राजा म्हणून राज्यभिषेक, अशी होती.

टू ट्रीटिझिस … मध्ये समाविष्ट असलेल्या दोन प्रबंधापैकी पहिल्यात लॉकने राजांच्या राज्य करण्याच्या तथाकथित ईश्वरदत्त अधिकारांवर हल्ला चढविला आहे. दुसऱ्या प्रबंधात लॉक मानवाच्या आदि अवस्थेपासून विवेचनाला आरंभ करतो. तो म्हणतो, की मानवाची पहिली अवस्था नैसर्गिक अवस्था (अ स्टेट ऑफ नेचर) होती. त्या अवस्थेत सर्व माणसे स्वतंत्र होती आणि सर्वांचे हक्कही समान होते. प्रत्येक मनुष्याला आपले व्यवहार मनसोक्त करण्यास पूर्ण स्वातंत्र्य होते आणि त्याच्यावर हुकूमत गाजविणारी कोणतीही श्रेष्ठ सत्ता नव्हती. व्यक्तीच्या स्वातंत्र्याला मर्यादा होती फक्त नैसर्गिक कायद्याची (द लॉ ऑफ नेचर). लॉक नैसर्गिक कायदा आणि मानवाची प्रज्ञा (रीझन) ही एकच आहेत असे मानतो, असे दिसते. नैसर्गिक कायदा म्हणजे मानवाच्या प्रज्ञेला स्वयंसिद्ध दिसणारा नैतिक नियम. हा कायदा असे सांगतो, की आपण आपल्या आणि आपल्या बांधवांच्या जीविताचे रक्षण करावे आणि कोणीही इतराचे स्वातंत्र्य आणि मत्ता हिरावून घेण्याचा प्रयत्‍न करू नये. परंतु या व्यवस्थेत गैरसोयी होत्या कारण कोणी इतरांच्या स्वांतंत्र्याच्या किंवा मत्तेवर घाला घातला, तर त्याचा बंदोबस्त करणारी कोणी अधिकारी व्यक्ती ह्या व्यवस्थेत शक्य नव्हती. यातून मार्ग काढण्याकरिता माणसांनी आपले नैसर्गिक अवस्थेतील काही हक्क सोडण्याचे ठरविले आणि सर्वांनी मिळून एक समाजिक करार करून एक समष्टी निर्माण केली. या करारान्वये सर्व मनुष्यांची जीवने, स्वातंत्र्य आणि मत्ता यांचे रक्षण केले जावे आणि प्रत्येक मनुष्य बहुमतापुढे मान तुकविण्यास बांधला जावा, असे ठरले.

मनुष्याची मुळची नैसर्गिक अवस्था आणि समाजिक करार या दोन्ही गोष्टी प्रत्यक्ष इतिहासात होऊन गेल्या आहेत, असे लॉक मानताना दिसतो. या अवस्था होऊन गेल्या आहेत. याचा कसलाही पुरावा उपलब्ध नाही हे त्याला मान्य आहे पण याचे कारण तो काळ इतका प्राचीन आहे., की त्या वेळी लेखनकलाही अस्तित्वात नव्हती असे तो म्हणतो.

लॉरच्या राजकीय विचारातील एक महत्वाचा विशेष असा आहे, की त्याच्या मते जे लोक कायदे करणारे आहेत, त्यांना त्या कायद्यांची अंमलबजावणी करायचा अधिकार असता कामा नये. हे दोन्ही अधिकार त्याच व्यक्तींच्या ठिकाणी असल्यास त्या कायद्यांची अंमलबजावणी स्वतःच्या याबतीत न करण्याचा मोह त्यांना होण्याचा संभव आहे. म्हणून हे अधिकारविभाजन राज्यघटनेत नमूद करावयास हवे, असे तो म्हणतो. या तत्वाचा पुढे सु. साठ वर्षांनंतर फ्रेंच राजकीय तत्वज्ञ माँतेस्क्यू याने केलेला विकास प्रसिद्ध आहे. जिथे लॉकने वैधानिक (लेजिस्लेटिव्ह) आणि अनुष्ठापक (एग्झिक्यूटिव्ह) अधिकारांचे विभाजन सुचविले होते. तिथे माँतेस्क्यूने वैधानिक आणि अनुष्ठापक अधिकारांच्या जोडीला न्यायिक (जूडिशल) अधिकारांचेही विभाजन असावे, असे मत मांडले.

लॉकच्या मत्तेविषयीचे विवेचन एका प्रसिद्ध आधुनिक उपपत्तीचे मूळ आहे, असे दिसते. मनुष्याचे शरीर ही त्याची मत्ता असते. त्यामुळे नैसर्गिक स्थितीस असलेल्या कोणत्याही वस्तुत तो आपल्या श्रमाने जे स्थित्यंतर घडवून आणतो तेही त्याच्या मत्तेत समाविष्ट होते असे मानले पाहिजे, असे तो म्हणतो. या मतातून पुढे ॲडम स्मिथ आणि रिकार्डो या अर्थशास्त्रज्ञांच्या लिखाणात ‘मूल्याची पारिश्रमिक उपपत्ती’ (लेबर थीअरी ऑफ व्हॅल्यू) विकसित झाली आणि नंतर कार्ल मार्क्सच्या ग्रंथात तिच्यातून अतिरिक्त मूल्याची उपपत्ती (थीअरी ऑफ सरप्लस व्हॅल्यू) निर्मांण झाली.

धार्मिक सहिष्णुता : लॉकची धार्मिक सहिष्णुतेविषयीची मते त्याच्या ‘अ लेटर ऑन टॉलरेशन’ या लेखात व्यक्त झाली आहेत. सहिष्णुतेच्या बाजूने लॉकचे मुख्यातः दोन युक्तिवाद होते. पहिला युक्तीवाद असा होता, की धर्मंसंस्थेला कोणाचाही छळ करण्याचा अधिकार नाही. धर्मंसंस्था (चर्च) आणि राज्यसंस्था (स्टेट) यांत साम्य आहे. खरे परंतु जेव्हा मनुष्य एखादा धर्मं स्वीकारतो. तेव्हा तो आपल्या नैसर्गिक राजकीय हक्कांवर पाणी सोडत नाही आणि म्हणून धर्मं संस्थेचा अधिकार फार तर एखाद्या मनुष्याला बहिष्कृत करण्याइतपत असू शकेल पण त्याचा छळ करण्याचा तिला अधिकार नाही. दुसरा युक्तिवाद असा होता : मानवी ज्ञान इतके मर्यादित आहे आणि आपली मते चूक असण्याची संभाव्यता इतकी मोठी आहे, की आपली धार्मिक मते बरोबर आहेत आणि अन्य सर्वांची खोटी आणि पाखंडी आहेत. याबद्दल खात्रीलायक निर्णय करणे. अशक्य आहे. परंतु जरी लॉक सहिष्णुतावादी होता, तरी अमर्यांद धार्मिक सहिष्णुता त्याला मान्य नव्हती. जर एखादे बेकायदा कृत्य धर्मंसंस्थेने करायला सांगितले (उदा.,मानवमेध), तर दंडाधिकारी त्याला अटकाव करू शकतो. याशिवाय लॉक सामान्य सहिष्णुतावादाला पुढील अपवाद सुचवितो काही धर्म असे आहेत, की त्यांचे अनुयायी सहिष्णुतावादी नाहीत. म्हणजे हे लोक उद्या अधिकारात आले, तर ते अन्य कोणत्याही धर्माला सहिष्णुता दाखविणार नाहीत. अशा लोकांना धार्मिक सहिष्णुता दाखवायला आपण बांधलेलो नाही, असे लॉक म्हणतो. उदा., रोमन कॅथलिक लोक असहिष्णू आहेत परंतु कॅथलिक नसलेल्या समाजात ते सहिषणुतेची मागणी करतात. अशा धर्मांना सहिष्णुता दाखवू नये, असे लॉकचे मत आहे.

शिक्षण : लॉकचे शिक्षणविषयक विचार त्याच्या एसे… आणि टू ट्रीटिझिस… या ग्रंथांतील कल्पनांत रुजलेले आहेत. त्याचा उदार दृष्टिकोण आणि स्वातंत्र, सहिष्णुता व सत्य यांचे प्रेम यांची निदर्शक अशी ही मते आहेत. हे विचार त्याच्या थॉट्‍स कन्सर्निंग एज्युकेशन (१६९३) या पुस्तकात व्यक्त झाले आहेत. हे विचार प्रामुख्याने तीन आहेत. पहिला, शिक्षणात मुलांत वैयक्तिक कल, शक्ती आणि स्वभाव वैशिष्ट्ये यांचा विचार झाला पाहिजे. ठराविक अभ्यासाची धोकंपट्टी छडीच्या साह्याने करून घेणे चूक आहे. दुसरा विचार असा, की शिक्षणात बौद्धिक बाबींबरोबरच शारीरिक स्वास्थ्य आणि शीलविकास यांच्यावरही लक्ष दिले पाहिजे आणि तिसरे म्हणजे जिथे शक्य असेल तिथे बालकांचे शिक्षण हसतखेळत झाले पाहिजे आणि बालकाला शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, अशी त्याची पद्धती असावी. उपदेशापेक्षा उदाहरण आणि शिक्षेपेक्षा उपयुक्तता ही शिक्षणात अधिक महत्वाची मानावी. उत्तरकालीन शिक्षणविषयक विचारांवर या कल्पनांचा खूपच प्रभाव पडला आहे, हे उघड आहे.

संदर्भ : 1. Aaron, R. I. John Locke, Oxford. 1937. Rev. Ed. 1955.

2. Adamson, S. W. The Educational Writings of John Locke, Cambridge. 1922.

3. Bourne. H. R. Fox. Life of John Locke, 2 Vols., London. 1876.

4. Christophrson. H. O. A BibIiographical Introduction to the Study of John Locke, Oslo, 1930.

5. Clapp, J. G. Locke’s Conception of the Mind, New York, 1937.

6. Cranston, Maurice, John Locke, a Biography, London, 1957.

7. Gibsorn, James, Locke’s, Theory of Knowledge, Cambridge, 1917.

8. Gough, J. W. John Locke’s Polltical Philosophy, Eight Studies, Oxford, 1950.

9. Leibniz, G. W. Trans. Langley, A. G. New Essays Concerning Human Unserstanding, New York. 1896.

10. Ryle, Gilbert, Locke on the Human Understanding, Oxforb, 1933.

11. Webb, T. E. The Intellectualism of Locke, An Essay, Dublin. 1867.

12. Yottan, J. W. Locke and the Way of Ideas, Oxford, 1956.

देशपांडे, दि. य.