द्वंद्ववाद : (डायलेक्टिक्स) ‘द्वंद्वीय’ हा शब्द ‘डायलेक्टिक’ ह्या इंग्रजी शब्दासाठी म्हणून वापरण्यात आला आहे. पाश्चात तत्त्वज्ञानाच्या इतिहासात ‘डायलेक्टिक’ हा शब्द अनेक अर्थांनी वापरण्यात आला आहे. ह्या भिन्न अर्थात एक समान सूत्र शोधायचेच, तर ‘विरोधात निरसन करून सत्य किंवा वास्तव निश्चित करण्याची पद्धती’ असे ते सूत्र मांडावे लागेल. पण ‘डायलेक्टिक’च्या सर्व भिन्न अर्थांना हे सूत्र लागू पडत नाही. ‘द्वंद्ववाद’ म्हणजे अंतिम दृष्ट्या विचाराची द्वंद्वीय पद्धती हीच प्रमाण आहे आणि वास्तवतेचे स्वतःचे स्वरूप द्वंद्वीय आहे हे मत.

पाश्चात्त्य तत्त्वज्ञानात द्वंद्वीय पद्धतीचा पहिला वापर ⇨ ईलीआचा झीनो (इ. स. पू. ४९०–?) याने केला. सत् एक आहे आणि ते अपरिवर्तनीय आहे, हे झीनोला सिद्ध करायचे होते. ह्यासाठी ‘अनेक वस्तू आहेत’, ‘वस्तू एका ठिकाणाहून दूसऱ्या ठिकाणी जातात’ असे गृहीतक पुढे मांडून त्यांच्यापासून परस्परविरोधी किंवा गृहीतकाला विरोध असलेले निष्कर्ष तार्किक युक्तिवादांच्या साहाय्याने झीनो काढून दाखवितो आणि ह्या आधारावर गृहीतकाची असत्यता सिद्ध करतो. यापासून ‘सत् एक आहे’ इ. सिद्धांत सत्य आहेत, हे सिद्ध होते.

झीनोनंतर प्रतिपक्षाच्या भूमिकेचे खंडन करण्यासाठी ह्या द्वंद्वीय पद्धतीचा वापर विशेषतः ‘सॉफिस्ट्‌स’ म्हणून ओळखण्यात येणाऱ्या तत्त्ववेत्त्यांनी केला [→ सॉफिस्ट्‌स] पण सॉफिस्ट्‌सची वृत्ती प्रामाणिक सत्यान्वेषणाची नव्हती कोणत्याही युक्तिवादांचा पाडाव करण्यासाठी सॉफिस्ट अप्रमाण, तर्काभासात्मक युक्तिवाद जाणूनबुजून वापरीत, असा प्लेटोचा त्यांच्यावर आरोप होता. तार्किक युक्तिवादांच्या ह्या स्वरूपाच्या गैरवापराला प्लेटोने ‘एरिस्टिक’ वितंडवादी पद्धती असे नाव दिले आणि ही वितंडवादी पद्धती व तत्त्ववेत्ता सत्यान्वेषणासाठी वापरीत असलेली द्दंद्वीय पद्धती यांच्यामधील विरोधात त्याने भर दिला.

सॉफिस्टांनंतरचा आणि त्यांचा कनिष्ठ समकालीन असलेला श्रेष्ठ तत्त्ववेत्ता म्हणजे ⇨ सॉक्रेटीस (इ. स. पू. सू ४७०–३९९) ‘सद्‌गुण’, ‘न्याय’ इ. नैतिक संकल्पनांच्या नेमक्या व्याख्या शोधून काढणे हे सॉक्रेटीसचे प्रधान उद्दिष्ट होते. ह्या व्याख्या निश्चित करण्यासाठी तो संभाषणात्मक पद्धतीचा वापर करीत असे. कुणीतरी मांडलेली व्याख्या गृहीतक म्हणून तात्पुरती स्वीकारून, त्याला अनेक प्रश्न-उपप्रश्न विचारून त्या व्याख्येपासून विपरीत निष्कर्ष निष्पन्न होतात, असे तो दाखवून देई. मग व्याख्या करणारा स्वतःच तिच्यात सुधारणा सुचवी वा ती मागे घेई आणि तो किंवा दुसरा कुणीतरी त्या व्याख्येऐवजी दुसरी व्याख्या सुचवी. सॉक्रेटीसच्या द्वंद्वीय पद्धतीचे उद्दिष्टही चुकीच्या मतांचे तार्किक युक्तिवादाने खंडन करून त्यांच्या जागी प्रमाण मतांची स्थापना करणे हे होते.

येथपर्यंत द्वंद्वीय ही युक्तिवाद करण्याची एक विशिष्ट पद्धती होती, पण ⇨ प्लेटोने (इ. स. पू. ४२८–३४८) द्वंद्वीय ह्याचा वेगळा अर्थ केला. ह्या अर्थाप्रमाणे द्वंद्वीय ही एक ज्ञानशाखा आहे. प्लेटोच्या मताप्रमाणे परिवर्तनशील, इंद्रियगोचर विशिष्ट वस्तू पूर्णपणे सत् नसतात. पूर्णपणे सत् असलेल्या व म्हणून खऱ्याखुऱ्या ज्ञानाचा विषय असलेल्या वस्तू म्हणजे वस्तूंची सामान्य रूपे किंवा आकार. उदा., विशिष्ट घोडे पूर्णपणे सत् नसतात. तर घोड्यांचे परिपूर्ण, आदर्श असे जे सामान्य रूप आहे – अश्वत हे रूप ते पूर्णपणे सत्‌ असते आणि खरेखुरे ज्ञान ज्याला यथार्थपणे ज्ञान म्हणता येईल असे ज्ञान, अशा सामान्य सद्रुपांचेच असते. आता प्लेटोच्या मताप्रमाणे ह्या सद्रुपांचे परस्परांशी अनिवीर्य असे संबंध असतात आणि ह्या संबंधातून संबध सत्तेची किंवा वास्तवतेची घडण निश्चित झालेली असते. ह्या सबंधांचे आणि घडणीचे ज्ञान म्हणजे द्वंद्वीय म्हणजे वास्तवतेच्या अनिवार्य घडणीचे ज्ञान, ह्या प्लेटोच्या मताचा प्रभाव हेगेलवर झाला आहे.

इतरांनी किंवा आपण स्वःत पुरस्कारिलेल्या मतांचे करण्यात येणारे तार्किक परीक्षण, या स्वरूपात द्वंद्वीयाची पद्धती ॲरिस्टॉटलच्या वेळेपर्यंत बरीच स्थिर झाली होती. द्वंद्वीयात वापरण्यात येणाऱ्या अनेक युक्तिवादांचा संग्रह ॲरिस्टॉटलने आपल्या टॉपीक्स ह्या ग्रंथात केला होता. पण स्वतः ॲरिस्टॉटल द्वंद्वीय पद्धती आणि विज्ञानाची विधाने सिद्धांत म्हणून सिद्ध करण्याची पद्धती यांच्यात भेद करतो. विज्ञानात स्वतःप्रमाण अशा तत्त्वांपासून सुरुवात करून, प्रमाण निगमनाचा अवलंब करून सिद्धांत सिद्ध करण्यात येतात. द्वंद्वीयाचा उपयोग सर्व साधारणपणे स्वीकारण्यात येणाऱ्या मताची, किंवा जी सत्य असणे संभवनीय आहेत अशा विधानांची चिकित्सा करण्यासाठी करण्यात येत असे.


 स्टोइक तत्त्वज्ञानात द्वंद्वीयाला महत्त्वाचे स्थान होते. ह्या द्वंद्वीयात आकारिक तर्कशास्त्राचा, विशेषतः स्टोइक तत्त्ववेत्त्यांची वैधानिक निगमनाचे जे प्रमाण आकार शोधून काढले होते त्यांचा अंतर्भाव करण्यात येत असे. त्याचप्रमाणे विधाने व्यक्त करणाऱ्या वाक्यांचे व्याकरणात्मक स्वरूप, शब्द आणि अर्थमधील संबंध इ. विषयांचा विचारही द्वंद्वीयात मोडत असे. मध्ययुगातील तर्कशास्त्राचा द्वंद्वीय या शब्दाने निर्देश होत असे [ → स्टोइक मत].

आधुनिक तत्त्वज्ञानात ‘द्वंद्वीय’ ह्या परिभाषिक शब्दाचे पुनरुज्जीवन ⇨इमॅन्यूएल कांट(१७२४-१८०४) याने केले, पण ह्या शब्दाला स्वतःचा एक खास अर्थ त्याने दिला. कांटच्या मताप्रमाणे आपली आकलनशक्ती कित्येक पूर्वप्राप्त संकल्पनांना जन्म देते आणि आपल्याला लाभणाऱ्या वेदनांचे ह्या पूर्वप्राप्त संकल्पनांच्या साहाय्याने संश्लेषण करून आपल्या अनुभवाचे स्वरूप सिद्ध करते. ‘द्रव्य-गुण’, ‘कारण-कार्य’ ह्या अशा पूर्वप्राप्त संकल्पना होत आणि त्याचा वापर करूनच आपल्या अनुभवाचे स्वरूप आपण सिद्ध करीत असल्यामुळे आपल्या अनुभवाचे विषय असलेल्या वस्तूंना उद्देशून ह्या संकल्पनाचे उपयोजन करणे प्रमाण ठरते, उदा., आपल्या अनुभवाचा विषय असलेली कोणतीही वस्तू म्हणजे अनेक गुण असलेले द्रव्य असते किंवा आपल्या अनुभवातील कोणतीही घटना कार्यकारणनियमाला अनुसरून घडते, ही विधाने अनिवार्यपणे सत्य असतात. पण पूर्वप्राप्त संकल्पनांचा वापर आपल्या अनुभवाचे विषय असलेल्या वस्तूंपुरता मर्यादित न ठेवता त्यांच्यापासून केवळ तार्किक अनुमानांनी अनुभवापलीकङे असलेल्या स्वरूपवस्तूंचे ज्ञान प्राप्त करून घेण्याचा मोह आपल्याला स्वाभाविक होतो. स्वरूपवस्तूंचा अनुभव आपल्याला येऊ शकत नाही व ज्या वस्तूचा आपल्याला अनुभव येत नाही तिचे केवळ तार्किक संकल्पनाद्वारा ज्ञान आपल्याला होऊ शकत नाही. तेव्हा पूर्वप्राप्त संकल्पनांपासून केवळ तार्किक अनुमानांनी स्वरूपवस्तूंचे जे ज्ञान आपण प्राप्त करून घेतले असे आपल्याला वाटते, ते भ्रामक असते. स्वरूपवस्तूंचे ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी पूर्वप्राप्त संकल्पनांवर आधारलेली जी तार्किक अनुमाने आपण रचतो, त्यांना कांट ‘द्वंद्वीय अनुमाने’ म्हणतो. आपल्या ज्ञानाच्या संदर्भात पूर्वप्राप्त संकल्पनांच्या प्रमाण उपाययोजनांच्या सीमा ओळखणे ह्या संकल्पनांच्या प्रमाण उपाययोजनाच्या सीमा ओळखणे ह्या संकल्पनांपासून अनुभवातील वस्तूंचे ज्ञान होणे शक्य नाही हे दाखवून देणे आणि ह्या भ्रमाचे निरसन करणे हे कांटच्या चिकित्सक तत्त्वज्ञानाचे एक महत्त्वाचे कार्य आहे. द्वंद्वीय अनुमानांचा भ्रामकपणा दाखवून देण्यासाठी त्यांच्या स्वरूपाचे जे विश्लेषण करण्यात येते त्यालाही कांट ‘अतिशायी द्वंद्वीय’ म्हणतो ह्या स्वरूपात अनुमाने भ्रामक, ‘द्वंद्वीय’ असतात. ह्याचे कांटच्या म्हणण्याप्रमाणे एक गमक असे की अनेकदा ह्या अनुमानांनी जे विधान ‘सिद्ध’ करण्यात आलेले असते, त्याच्या व्याघाती असलेले विधानही तितक्याच प्रमाण भासणाऱ्या अनुमानांनी ‘सिद्ध’ होते. सारख्याच सयुक्तिक भासणाऱ्या युक्तिवादांनी सिद्ध होणाऱ्या परस्परविरोधी सिद्धांताच्या अशा द्वंद्वीला कांट ⇨ व्याघाती द्वंद्व किंवा विप्रतिषेध म्हणतो. अर्थात अशा व्याघाती द्वंद्वाचे निरसन करावे लागते सिद्धांत आणि त्याचा प्रतिसिद्धांत यांमध्ये खराखुरा विरोध नाही असे दाखवून द्यावे लागते.

कांटची द्वंद्वीयाविषयीची कल्पना प्रामुख्याने निषेधात्मक होती. तत्त्वज्ञानाची शाखा म्हणून द्वंद्वीयाचे कार्य भ्रमाचे निरसन करणे हे होते. द्वंद्वीयाला विधायक स्वरूप ⇨ योहान गोटलीप फिक्टे (१७६२–१८१४) याने दिले. एकांगी असलेले सत्य किंवा पक्ष, त्याचा प्रतिपक्ष असलेले आणि तितकेच एकांगी असलेले विरोधी सत्य आणि ह्या विरोधात निरसन करून पक्ष व प्रतिपक्ष यांना सुसंगतपणे स्वतःत सामावून घेणारा पक्षसमन्वय असे द्वंद्वीयाचे त्रिपदी स्वरूप असते, ही कल्पना फिक्टेने मांडली .पण आधुनिक काळात द्वंद्वीयाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली, ती ⇨ जार्ज व्हिल्हेल्म फ्रीड्रिख हेगेल (१९७०–१८३१) यानेच हेगेलची द्वंद्वीयाविषयीची कल्पना अशी मांडता येईल : सत् हे पूर्णस्वरूप असते असे म्हणण्यापेक्षा स्वःत चे पूर्णत्व साधणारा असा तो पूर्ण असतो, हे म्हणजे अधिक यथार्थ आहे. सत् हा गतिशील असा पूर्ण आहे. म्हणजे स्वतःच्या अपूर्णत्वाचे निरसन करून पूर्णत्व साधणारा असा तो पूर्ण आहे. जे अपूर्ण आहे त्याचे परिवर्तन त्याला नाकारणाऱ्या, त्याच्यापुढे विरोधाने ठाकलेल्या अशा त्याच्याविरोधी अस्तित्वात अनिवार्यपणे होते आणि ह्या परिवर्तनातून त्या अपूर्णाचे अपूर्णत्व, त्याचे एकांगीपण व्यक्त होते. जे अपूर्ण आहे, त्याचे स्वतःचे जसे स्वरूप असते तसेच त्याच्या स्वरूपाला निषेधात्मक असे अंग अनिवार्यपणे असते. यामुळे स्वतःच्या मर्यादा नाहीशा करून, म्हणजेच स्वतःचे विसर्जन करून, अधिक पूर्ण स्वरूपात प्रकट होण्याची प्रवृत्ती त्याच्या ठिकाणी असतेच. ते स्थिर नसते तर स्वयंगतिशील असते. सत्‌चे स्वरूपच असे द्वंद्वीय आहे आणि म्हणून ज्या संकल्पनांद्वारा आपण सत्‌च्या स्वरूपात ग्रहण करतो, त्या संकल्पनांचाही ह्या द्वंद्वीय पद्धतीने अनिवीर्यपणे विकास होतो.

सत्‌चे स्वरूप अनिवार्यपणे द्वंद्वीय असते, हा हेगेलचा सिद्धांत ⇨ कार्ल मार्क्स (१८१८-८३) याने स्वीकारला आणि त्याची जडवादाशी सांगड घातली. म्हणून मार्क्सवादी तत्त्वमीमांसेला ‘द्वंद्वीय जडवाद’ म्हणतात.

पहा : जैन दर्शन मार्क्सवाद.

संदर्भ : 1. Bird, G. H. Kant’s Theory of Knowledge, London, 1962.

           2. Hook, Sidney, From Hegel to Marx, London, 1936.

           3. Kneale, C. Wkneale, Martha, The Development of Logic, Oxford, 1962.

रेगे. मे. पुं.